Friday, 10 July 2020

विचार - पुष्प – भाग ७




 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा, प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
                              
                     विचार - पुष्प भाग ७ 




                     
                          कृतज्ञता

         “कोणावरही उपाशी राहायची वेळ येऊ नये”, अशी राजकीय वाक्यं सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत ऐकायला मिळत आहेत. एरव्ही रस्त्यारस्त्यात कुणी अडवून काही मागायला लागलं तर चीड येते आणि भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करावं असं आपण सुचवित असतो. त्याउलट, मंदिराबाहेर दान देणारे  श्रद्धावान भाविक खूप असतात, तर हे दान स्वीकारणार्‍या व्यक्तीही मंदिराबाहेर खूप दिसतात. 
       
      पण आजची उपाशी राहण्याची परिस्थिति वेगळी आहे. लॉक डाउन काळात आपआपल्या गावी परत जाणारे मजूर, कामगार व काही लोक यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे बघून आपल्याला दु:ख होते. असच कलकत्त्यात एक माणूस उपासमारीने मेला अशी बातमी पेपर मध्ये छापून आली, ती वाचून स्वामी विवेकानंद, “देशाचा सर्वनाश ओढवणार, देश रसातळाला जाणार” असे दु:खाने म्हणू लागले. 
       
    या दुखाचे कारण त्यांचे मित्र हरिपाद मित्र यांनी विचारलं. त्यावर स्वामी म्हणले, “ इतर देशात कितीतरी अनाथ आश्रम, गरीबांना कामं पुरवणार्‍या संस्था, धर्मादाय, सार्वजनिक फंड असूनही शेकडो लोक दरवर्षी उपासमारीने मेल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण भुकेलेल्याला मूठभर अन्न देण्याची  प्रथा आपल्या देशात असल्यामुळे कधी कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते. आज प्रथमच वाचले की, दुष्काळाचे दिवस नसतानाही उपासमारीने एक मनुष्य अन्नान्न दशा होऊन कलकत्त्यासारख्या शहरात मृत्यूमुखी पडला”.

       आपण नेहमीच अनुभवतो की आज काही पैसे दान दिले तर फुकट मिळतात म्हणून त्या पैश्यातून व्यसनाधीन होऊन खितपत पडणारे लोक आहेत. तशी सवय लागते त्यांना. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, दारात भिकारी आला तर, आपल्या ऐपतीनुसार त्याला काहींना काही देणेच योग्य आहे. त्याचा सदुपयोग होईल की नाही याची नसती चिंता कशाला करायची? कारण तुम्ही त्याला दान दिले नाही तर तो  पैशांसाठी तुमच्याकडे चोरी करेल, त्यापेक्षा दोन पैसे भीक मिळाली तर स्वस्थ तरी बसेल घरात. त्यामुळे निदान चोर्‍या होणार नाहीत.

      स्वामी विवेकानंद यांच्या मते, आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवणे. कारण तो गरीब असल्यामुळेच मागतोय. लक्षात ठेवा दानाने धन्य होत असतो तो देणारा, घेणारा नव्हे. जगावर आपल्या दयाशक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळाल्यामुळेच तुम्ही स्वताला समर्थ बनवू शकता या बद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे.  

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक मध्ये पण उपलब्ध आहे. ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 

No comments:

Post a Comment