‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार - पुष्प , भाग ९
वडील
वडिल म्हणजे पिता, अर्थात घराला घरपण देणारा, सर्वांना एकत्र बांधून
ठेवणारा कर्ता पुरुष.
वरुन कडक आणि कठोर, पण तेव्हढाच आतून प्रेमळ. पुत्रवियोगाने अत्यंत
विव्हल झालेला राजा दशरथ आणि वचन पाळणारा श्रीराम यांच्यातलं बापलेकाचं नातं
सर्वज्ञात आहेच. जगण्याचं पाठबळ देणारे, आपल्या जन्मापासून
त्यांच्या मरण्यापर्यंत आयुष्य खर्ची घालणारे असे हे आपले वडिल आपली ‘प्रेरणा’ असतात. मुलांच्या आयुष्याच्या शिदोरीची एलआयसी
म्हणा किंवा कुठल्या स्कीम मध्ये म्हणा किंवा एखाद्या रिकरींग अकाऊंट मध्ये सोय
लावणारे वडिल. मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व घडावं म्हणून प्रयत्नशील असतात. मुलं
जसजशी मोठी होतात तसातसा वडिल आणि मुलगा यांच्यात संवाद होणं तितकच महत्वाचं असतं.
ही नात्यांची घट्ट वीण संवादानेच बांधली जाते असे मला वाटते. या विणेतूनच घडत जातं
मुलांचं भवितव्य. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद असेच घडत होते.
नरेंद्र आणि वडिल विश्वनाथबाबू यांच्यात
संवाद घडण्याचे अनेक विषय उपलब्ध असत आणि त्याचा फायदा नरेंद्रला होत असे. आपले
विचार तर्कशुद्ध असावेत, त्यासाठी आवश्यक असणारी तात्विक बैठक भक्कम
असावी. अशी बैठक भक्कम होण्यासाठी विषयाचे ज्ञान मिळवावे,
कोणत्याही विषयाचा विचार करताना त्याच्या मुळाशी जावे. स्वत: विचार करून निर्णय घेण्याची
सवय लावावी, अशा गोष्टी नरेंद्र वडिलांकडून शिकला होता.
आपल्या स्वाभिमानाचा मूळ पाया आत्मसन्मान आणि आत्मप्रतिष्ठा आहे, त्याला कधीही बाधा पोहोचता कामा नये, हे नरेंद्रला
वडिलांनीच शिकवले होते.
जेंव्हा नरेंद्राने विचारले होते, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले? याच्या
उत्तरादाखल त्याने आरशात पाहिले होते. तेंव्हा त्याला स्वत:चे,
तेजस्वी मुद्रा, टपोरे डोळे, भव्य कपाळ, सतेज अंगकांती, भारदार देहयष्टि, भरत येत असलेली विशाल छाती, व्यायामामुळे कामावलेले
पिळदार स्नायू, आपल्या प्रतिबिंबात दिसले होते. हा
वडिलांकडून मिळालेला वारसाच होता ना ?
शिवाय घरी प्रतिष्ठित व्यक्ति येत असत,त्यावेळी त्यांची अनेक विषयावरची चर्चा कानावर पडून
नरेंद्रच्या ज्ञानात भर पडत होती व
प्रत्येक गोष्टीचा विचार करायची, वाचन करायची सवय पण लागली
होती. विश्वनाथ बाबूंकडून नरेंद्र बुद्धिबळ, पाककला, शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. विश्वनाथबाबू स्वत: चांगलं गात. बंगाली फारसी आणि पर्शियन भाषेतली कितीतरी गीतं त्यांनी नरेंद्रला शिकवली
होती. संगीतात माणसाला निरामय असा आनंद देण्याची फार मोठी शक्ति आहे असे विश्वनाथ
बाबूंना वाटे. नरेंद्रला शास्त्रोक्त संगीत यावे म्हणून त्यांनी त्यातील योग्य
जाणकारांकडून धडे गिरविणे व रियाज करून घेणे यासाठी प्रयत्नपूर्ण नियोजन
केले. नरेंद्रमध्ये अशा प्रकारे त्यांनी
शास्त्रीय संगीताची शास्त्रशुद्ध गोडी उत्पन्न केली .
पालकांकडून मुलांचे योग्य वेळी योग्य
ते कौतुक व्हायला पाहिजे म्हणजे प्रोत्साहन मिळते. यानुसार शालेय शिक्षण संपता
संपता 3 वर्षाचा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करून नरेंद्रने चांगले यश मिळवले
होते. ही बुद्धिमत्ता बघून विश्वनाथबाबूंना खूप कौतुक वाटले. तेंव्हा त्यांनी
नरेंद्रला चांदीचे एक सुंदर घड्याळ बक्षीस म्हणून दिले.
अशा प्रकारे आजच्या लहान मुलांचे वडील म्हणून
आजच्या पिढीने अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जबाबदारीने, विवेकाने वागले पाहिजे. मुलांबरोबर सुसंवाद ठेवला पाहिजे. आज
वरवरच्या चंगळवादी आणि आभासी दुनियेत मुलांकडे नीट लक्ष देण्याची आणि अनेक गोष्टी
शिकविण्याची गरज आहे. आई वडील झालेल्या पतीपत्नींना त्यांच्या मुलांचे चारित्र्य
घडवायचे आहे .
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
No comments:
Post a Comment