‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार - पुष्प , भाग १३
संगीत -२
नरेंद्र
शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सर्वात आधी वेणी माधव अधिकारी यांच्याकडे जाऊ
लागला आणि दुसरे गुरु होते उस्ताद अहमद खां. दोघांकडेही काही दिवस शिक्षण घेतले.
हिन्दी, उर्दू आणि पर्शियन भाषेतली अनेक भक्तीगीतं
शिकला. या बरोबरच त्याचे शास्त्र पठण सुरू होते, चीजांचा संग्रह व सरगम तयार करणे हे शिक्षण सुद्धा एकीकडे चालू होते.
गायना बरोबर नरेंद्र वादन पण शिकत होता.
यातले वादन गुरु त्याचे सख्खे चुलत भाऊ अमृतलाल उर्फ हाबू दत्त होते. त्यांचे
कलकत्त्यात संगीत विद्यालय होते. या विद्यालयात जागतिक किर्तीचे उस्ताद
अल्लाउद्दीन खांसाहेब यांनीही सुरूवातीला सतार व सरोद वादनाचे शिक्षण अमृतलाल
यांचे कडून घेतले होते असा उल्लेख आहे. यांच्याकडे नरेंद्राने सतार, पखावज आणि तबला वादनाचे धडे घेतले. गायन आणि तबला वादनात
त्याने चांगले कसब कमावले होते. अगाध संपदा मिळवली होती. कुटुंबात आणि परिचयात, मित्रांमध्ये एव्हाना चांगली माहिती झाली होती की,नरेंद्र खूप छान गातो.
१८८१ मध्ये जेंव्हा नरेंद्र आणि श्री
रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाल्याची घटना अशी, नरेंद्रच्या शेजारच्या गल्लीत, शिमला स्ट्रीटवर
सुरेन्द्र बाबू राहत होते. त्यांनी एक दिवस अचानक तातडीने नरेंद्रला घरी बोलावलं.
त्यांच्याकडे रामकृष्ण परमहंस आले होते. त्यांना ठाकुर म्हणत असत. ठाकूरांना गायन अत्यंत
प्रिय होते. त्यांना एक दोन गीतं तरी नरेंद्र ने ऐकवावीत, यासाठी नरेंद्रला तिथे बोलावले होते. तेंव्हा
नरेंद्रने मल्हार रागातलं एकतालातलं , अयोध्यानाथ पाकडाशी
यांची रचना ‘मन चलो नीज निकेतने...’
आणि मुलतानी रागातलं, एकतालातलं, बेचरम
चट्टोपाध्याय यांची रचना, ‘जाबे की हे
दिन आमार बिफले चालीये...’ ही दोन गीतं त्याने ऐकवली. पुढे
प्रत्येक भेटीत श्री रामकृष्ण नरेंद्रला गायचा आग्रह करत असत. तो गाणी, भजन, कीर्तन त्यांना ऐकवीत असे.
तानपुरा सुरांत लावल्याशिवाय नरेंद्र कधीही गाणं सुरू करत नसे. मनाचे समाधान
जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तारा जुळवित असे. कधी कधी त्यात खूप वेळही जात असे.
बाकीचे अस्वस्थ होऊन जात. एकदा तर अशा वेळी परमहंस इतके ऊतावीळ झाले की, ते दर दोन मिनिटांनी नरेंद्रला गायन सुरू करण्याचा आग्रह करु
लागले.तानपुरा लागेपर्यंत नरेंद्र कोणाचेच ऐकत नसे. अगदी गुरूंचे सुद्धा. एकदा
तानपुरा लागेच ना मनासारखा, तेंव्हा नरेन्द्र हताश होऊन,
ढीम्म बसून होता. गायन ऐकण्यास व्याकुळ झालेले परमहंस शेवटी,
शिष्यांना म्हणाले. “उठा आता, आजचा दिवस तंबोरा जुळणीचा आहे.
गाणं उद्या होईल”. असे इतके ते नरेंद्रला ऐकण्यासाठी आतुर झालेले असत.
नरेंद्रचा आणखी एक गुण ,म्हणजे काव्यरचना
करणे. बंगाली, संस्कृत आणि इंग्रजीत त्यांनी भावपूर्ण कविता
रचल्या आहेत. ‘विरवाणी’ या पुस्तिकेत त्या संग्रहीत आहेत. त्याचे अनेक
भाषांमधून भाषांतर पण झाले आहे. याशिवाय त्यांनी सहा बंगाली गीतं पण रचली. त्याला
चाली लावल्या आहेत. ध्रुपद गातांना ते स्वताच पखावज वाजवित. कवी आणि संगीतकार असून सुद्धा पुढच्या
कार्यबाहुल्यात वेळे अभावी संगीताकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते.
तरी पण गायन वादनातले आणि संगीत शास्त्रातले
ते कसे मर्मज्ञ अधिकारी होते हे त्यांच्या ‘संगीत कल्पतरू’ या शास्त्रीय ग्रंथावरून दिसते.
१८८७ मध्ये चंडीचरण बसक यांनी हे पुस्तक बंगालीत प्रकाशीत केलं आहे. हे जवळ जवळ संपूर्ण नरेंन्द्रने
लिहिले आहे काही भाग चंडीचरण यांनी लिहून पूर्ण केला आहे. नव्वद पानांचे नरेंद्रचे
प्रास्ताविक त्याला आहे. ही तेवीसाव्या वर्षी लिहिलेली, सर्वांनी चकित व्हावी अशी प्रस्तावना आहे. स्वता आर्थिक दृष्ट्या अडचणीत
असताना गरीब प्रकाशकाला काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावे या हेतूने हे पुस्तक
लिहिल्याचे सांगितले जाते.
संगीत कल्पतरू |
या पुस्तकात ,भारतीय परंपरेतील मौखिक संगीत आणि वाद्य संगीत यांच्या मागील
असलेला शास्त्रीय दृष्टीकोन व त्याची विविध अंगे यात स्पष्ट केली आहेत. संगीतातील
सिद्धांताचे विवेचन आणि गायनाच्या मैफिलीतील सौंदर्याचा अविष्कार याचे दर्शन यात
होते. तसेच विविध भारतीय भाषातील, प्राचीन,आधुनिक आणि पाश्चात्य संगीत,वाद्य, कवी यांची माहिती आहे. एक हजार भक्तिपर आणि स्फूर्ति गीतांचा संग्रह यात आहे.
संगीताचार्य रामकृष्ण बुवा वझे |
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
स्वामीजींचं विलोभनीय दर्शन
ReplyDelete