‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार - पुष्प – भाग ५.
प्रेरणा
एकोणीसाव्या शतकात मुंबईत उत्तमोत्तम
वास्तु उभ्या राहत होत्या. साहेबाला लाजवेल असं उत्तम हॉटेल जमशेटजी टाटा यांना आपल्या
देशात बांधायच होतं. गेटवे ऑफ इंडिया अजून निर्माण झालं नव्हतं. समुद्रात भराव
घालून तिथं काम चालू होतं. त्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीने ओळखलं की हीच जागा पुढे
आकर्षण ठरेल म्हणून तिथेच जागा निश्चित करून हॉटेलचा मुहूर्त केला. जर्मनी, अमेरिका, बर्लिन, पॅरिस, टर्की इथून ऊंची शोभिवंत सामान आणले गेले.
जो माणूस पोलाद कारखाना, इमारती,
गिरण्या काढतो तो हा भटारखाना का चालू करतोय असा प्रश्न त्यांच्या बहिणीला पडला होता
. पण जमशेटजी टाटांना आपल्या लाडक्या मुंबई शहराला एक ताजमहाल भेट द्यायचा होता.
स्वत: लक्ष घालून ते काम पूर्ण करत होते. हेच ते जगप्रसिद्ध हॉटेल ताज. अशा अनेक
वास्तूंबरोबरच नवनवे उद्योगधंदे भारतात टाटांनी उभे केले. जग फिरून आल्यानंतर
माझ्या देशात पण असे प्रकल्प, अशी विद्यापीठे. संस्था झाल्या
पाहिजेत अशी जमशेट टाटांची इच्छा होती. ‘स्वदेशी’ हाच त्यांचा उद्देश होता.
इंग्लंड मध्ये सुधारणेचे वारे वाहत
होते. ते भारतापर्यंत पोहोचले होते. हवामान खातं, विज्ञान केंद्र, प्रयोगशाळा, संस्था, विद्यापीठं यातही गुंतवणूक होऊन ती सुरू
होत होती. मिशनर्यान्ची कामं सुरू झाली
होती. पण त्याच वेळी भारताच्या भविष्याचा विचार जमशेटजी करत होते. देशहिताच्या
दृष्टीने भारतात, त्यांना एक विज्ञान संशोधन संस्था उभी
करायची होती, ती विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि ते रुजण्यासाठी.
त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांना पत्र लिहिलं की, “काही
वर्षापूर्वी आपण एका बोटीत सहप्रवासी होतो तेंव्हा आपल्यात बर्याच विषयांवर चर्चा
झाली. देश आणि समाज या विषयावरच्या आपल्या मतांनी माझ्या मनात तेंव्हापासून घर केलंय.
या कामात ध्येयवादी व्यक्तीनं काम केल्यास, परिणामकारकता वाढेल
व देशाचं नावही गौरवानं घेतलं जाईल”.
ही भेट झाली होती, जेंव्हा स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्मपरिषदेत
सहभागी होण्यासाठी जात होते. तर जमशेट टाटा, जपानहून
अमेरिकेत शिकागो इथे औद्योगिक प्रदर्शनासाठी निघाले होते. योगायोग असा की ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या बोटीवर दोघंही बरोबर प्रवास
करत होते. या भेटीत एकमेकांची चांगली ओळख त्यांच्या विचारांच्या आदान प्रदानाने
झाली होती. एकमेकांचे ध्येयवादी विचार बघून दोघंही भारावून गेले होते. त्यांना या
स्वप्नांसाठी व प्रचारासाठी विवेकानंदांची साथ हवी होती. जमशेटजींच्या स्वप्नातील
ही संस्था, भारतातील एक अद्वितीय अशी,
विज्ञान संशोधन आणि शिक्षणात अग्रेसर असलेली, ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’ आज बंगलोर इथं आहे. ही संस्था म्हणजे स्वामी
विवेकानंदांच्या बरोबर झालेल्या संभाषणातून पेरलेलं बीजं च होतं. दोघांचंही ध्येय
होतं मातृभूमीचं सर्वांगीण पुनरुत्थान.
हे आज सांगायच
कारण म्हणजे, अजूनही
टाटा कुटुंबाचा हाच लौकिक कायम आहे. देशाच्या विकासात ,त्यांचा
मोलाचा वाटा आहे. आज जगभरात कोरोना नं धुमाकूळ घातला आहे. देशादेशांचे सर्व
व्यवहार ठप्प झाले आहेत. पुढचे आर्थिक संकट आ वासून उभे आहे. या संकटात टाटा
ट्रस्ट कडून रतन टाटा यांनी मोठं योगदान दिलं आहे. १५०० कोटीची मदत त्यांनी देऊ
केली आहे. देशसेवेत योगदानाची हीच ती काळाची गरज त्यांनी ओळखली. प्लेगच्या साथीत पण
जमशेटजी टाटा यांनी असेच योगदान दिले होते. असं हे टाटा कुटुंब आपल्या देशाचा ‘अभिमान’ आहे.
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
No comments:
Post a Comment