Saturday, 11 July 2020

विचार - पुष्प - भाग ८




 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका  
                       विचार - पुष्प - भाग ८ 




                        
                       आई

       आपल्या जीवनात आईचं अत्यंत महत्वच स्थान आहे. अनन्यसाधारण महत्व आहे.सोन्याच्या लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षाही  माझी जन्मभूमी अयोध्याच श्रेष्ठ आहे असे श्रीरामचंद्र सांगतात. जन्मभूमीची तुलना ते आपल्या आईशी करतात.

       आपल्या मुलाचं/मुलीचं भवितव्य घडविणारे आई आणि वडील दोघेही असतात. पण प्रत्येक व्यक्तिचं चारित्र्य घडविणारी आई असते.तिची भूमिका जास्त महत्वाची असते. जन्मल्यापासून त्याला भाषा शिकविणारी, पहिला घास भरवताना चिऊ काऊ सारख्या पक्ष्यांची ओळख करून देणारी, पहिलं पाऊल टाकताना नीट चालायला  शिकविणारी, शाळेत डबा खाताना सर्वांबरोबर वाटणी करून खाण्याचा, सामूहिक समानता मूल्यांचा संस्कार करणारी, भावंडांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचे बीज पेरणारी, कुटुंबातली नाती सांभाळण्याचे आणि ती टिकविण्याचे ही संस्कार कळत्या वयात देणारी इथ पासून पुढील आयुष्यात येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड द्यायला शिकविणारी आणि मुलाला घडवताना त्याच्यात साहित्य, कला, तत्वज्ञान, इतिहास यासाठी योग्य ते कष्ट घेणारी अशी आई असते.

      आपला मुलगा यथार्थ मनुष्य निपजावा असं प्रत्येक आईलाच वाटत असतं. पण असा माणूस घडवण्याची कला सर्वच मातांजवळ नसते, म्हणूनच स्वामी विवेकानंद यांच्यासारखे चारित्र्यवान व्यक्तिमत्व एखादेच घडत असते. कारण सुसंस्कृत आणि अभिजात माता भुवनेश्वरी देवी पण एखादिच असते.
नरेंद्रनाथांच्या  चारित्र्यात जे जे महान, जे जे सुंदर होतं ते ते सर्व त्यांच्या सुसंस्कृत मातेच्या सुशिक्षणाचं  फळ होतं  असंच म्हणावं लागेल. त्यांनी नरेंद्र ची योग्य ती जोपासना केली. आपल्या मुलांच्या चारित्र्यात कोणत्याही प्रकारचा हिणकसपणा येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यात तेल घालून जपले होते. मातृभक्त नरेन्द्रनेही आपल्या आईची आज्ञा कधीही मोडली नव्हती. स्त्री सुलभ गुणांपेक्षाही धैर्य, खंबीरता, असत्य आणि अविचाराचा प्रतिकार करण्याचा बेडरपणा भुवनेश्वरी देवींकडे होता. आपल्या मुलांना उच्च ध्येयं आणि व्रतं अंगिकारण्यासाठी त्या स्फूर्ति आणि उत्तेजन देत असत.


     स्वामी विवेकानंदांच्या देहत्यागा नंतर सुद्धा ही माता पुढील नऊ वर्ष हयात होती. तिनं आपल्या लाडक्या नरेंद्रनाथाचे जगप्रसिद्ध स्वामी विवेकानंद होताना पाहिले होते. भागीरथीच्या पवित्र तीरावर पुत्राच्या धडधडत्या  चितेजवळ अंतिम प्रार्थनेत सहभागी झालेल्या या दु:खी मातेच्या मनात आले की जर, विवेकानंद आणखी काही दिवस इहलोकी राहिले असते तर, अखिल मानवजातीचे केव्हढे तरी कल्याण झाले असते.  पुत्रवियोगपेक्षा मानवजातीचे कल्याण हीच भावना तिच्या मनात यावेळी होती.ती विवेकानंन्दाची आई होती या गौरवाचा सात्विक गर्व तिच्या संयमित,गंभीर आणि शांत चेहर्‍यावर दिसत होता.

      खाण तशी माती अशी म्हण आहे. आजकाल मुलांच्या आया म्हणजे माता घरगुती कलागतीत नको ते संस्कार करत असतात. अजाणतेपणी का असेना नको ते मुलांना शिकवीत असतात. (आज मालिका/माध्यमे  सुद्धा असे आदर्श घालून देण्यात अग्रेसर आहेत.)मूल घडविण्याच्या काळात, त्या मुलांमध्ये द्वेष, मत्सर, लोभ पेरत असतात. कौटुंबिक नाती तोडतात. त्यामुळे मोठे होऊन ती मुले दुसर्‍याच्या प्रगतीमुळे जळफळणारी, हलक्या मनाची व कानाची अवलक्षणीच निघातील याची त्यांना कल्पना नसते. त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्या भविष्यावर होणार असतो. म्हणून मुलांच्या आई /मातांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे फार आवश्यक आहे. चारित्र्यवान मुलं घडवणं सोप्पं नाहीच मुळी !

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 
  


No comments:

Post a Comment