‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा,प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार-पुष्प - भाग १०
वाचन – १
आज घरातला प्रत्येकजण, रस्त्यावरचा प्रत्येकजण , जिथे बघाल
तिथला प्रत्येकजण मोबाईल मध्ये डोकं घालून काहीतरी वाचत असल्याचा भास होतो. ते
बघून रसिक वाचक संख्या अनेक पटीने वाढली की काय असे वाटते. मोबाईल वर मेसेजस, विडिओ, इमेजेस, जोक्स आणि व्हाट्सअप
वर जे जे असेल ते ते वाचत असतात. या आधी काही दशकांपूर्वी रेल्वे, विमान अथवा गाडी प्रवासात, जाता येता, सुटीत, आणि वेळ मिळेल तसे पुस्तके हातात घेऊन
जाताना मुले आणि माणसे दिसायची. जिथे आज मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसतो.
शाळेत
जाणारी लहान मुले सुद्धा या मोबाईलच्या आहारी गेली आहेत. पुस्तकं वाचायला नको
असतात. या मुलांसाठीची पुस्तकं म्हणजे काय मनोरंजनाचीच असतात. लहान मुलांच्या
विश्वातले ते विषय असतात. पण चांदोबा, विक्रम और वेताळ, गोष्टीची,
इसापनीती अशी मनोरंजनाची असली तरी ती वाचनाची सवय, आई वडिलांनीच
लावायला लागते. हीच सवय महाविद्यालयात गेल्यावरही, मोठ्ठे
झाल्यावरही कायम राहते. आईवडिलांना वाचनाची आवड असेल किंवा महत्व असेल तर ते
मुलांनाही असतं. जे आईवडील वाचत नाहीत त्यांची मुलेही वाचत नाहीत, म्हणजे आवड नसते, असा अनुभव आहे.
पण नरेंद्र मात्र अशा वाचनातूनच शालेय
जीवनापासून घडत होता. त्याला तर बी.ए.ला असताना विश्वनाथबाबूंनी नेहमीच्या विषयांव्यतिरिक्त
‘तत्वज्ञान’ हा विषय
घ्यायला लावला होता. माणसाच्या मनाचा विकास होण्यास आणि त्याची संवेदनशीलता
परिपुष्ट होण्यास हे विषय अधिक उपयुक्त आहेत, असा विश्वनाथबाबूंचा
त्या मागचा विचार होता आणि खरच विचारांची परिपक्वता येण्यास त्याचा उपयोग झाला
होता. हे विवेकानंदाचे चरित्र वाचल्यावर लक्षात येतं.
परीक्षेत आपल्याला किती गुण मिळाले
याकडे नरेंद्रचे लक्ष नसे. तर खर्या अर्थाने त्या विषयाचे ज्ञान आपल्याला किती
मिळाले याकडे लक्ष असे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना नरेंद्रने किती आणि काय काय
वाचन केले होते हे पाहिले तर आश्चर्य वाटते आपल्याला. यातली अनेक नावे तर आपण
कदाचित ऐकलीही नसतील.
नरेंन्द्रने, मार्शमन आणि एल्फिन्स्टन यांचे बंगाल आणि भारत यांच्या
इतिहासाचे ग्रंथ वाचले, जे त्यांना अभ्यासाला नव्हतेच. तर्कशास्त्राचे
‘एलेमेंटरी लेसेन्स ऑन लॉजिक’ हे
जेव्होंस चे पुस्तक, ‘स्टडीज इन
डिडक्टिव्ह लॉजिक’ हे सखोल विवेचन करणारे ग्रंथ अभ्यासले.
ग्रीन ने लिहिलेला इंग्लंडचा आणि अॅलिसन फिलिप्सने लिहिलेला युरोपचा इतिहास वाचला.
गिबनचा जगप्रसिद्ध ग्रंथ ‘डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन
एम्पायर’ हा तर एका दमात वाचला. फ्रेंच राज्यक्रांतीचा
इतिहास काळजीपूर्वक वाचला होता. या सगळ्याचे संदर्भ त्यांच्या वेगवेगळ्या भाषणात
बोलण्यात येत असत.
नंतर फ्रान्स मध्ये उदयाला आलेला
नेपोलियन हा तर नरेंद्रला अत्यंत आवडणारा एक वीरपुरुष होता. नेपोलियन च्या अनेक
लढयांचे वर्णन सांगताना नरेंद्र रंगून जात असे. नेपोलियन तर रणांगणावरचा योद्धा होता.
त्याचा आध्यात्मिकतेशी काहीही संबंध नव्हता, पण विवेकानंदांना नेपोलियन बद्दल आकर्षण होते. कारण मनुष्याचे कर्तृत्व
एखाद्या क्षेत्रात किती ऊंची गाठू शकतं याचं नेपोलियन हे एक उज्ज्वल उदाहरण होतं. तो
केवळ झुंजार सेनानी नव्हता तर तो, उत्कृष्ट प्रशासक, उद्यमशील, भव्य आकांक्षा बाळगणारा, मन शांत ठेवणारा धीरोदात्त असा विद्या-कलांचाही भोक्ता होता. म्हणून तो
आवडता होता. अशक्य हा शब्द त्याच्या कोशात नव्हता.
नरेंद्रने महाविद्यालयात असताना तत्वज्ञानाचा
अभ्यास विशेष केलेला दिसतो. देकार्त, ह्युम, फिक्टे,स्पिनोझा, हेगेल, शॉपेनहौर, कांट, आणि डार्विन यांच्या विचारांचा परिचय त्याने करून घेतला होता. तो ते
समजून घेई आणि त्यावर विचार करी. याबरोबरच हॅमिल्टन मिल, लॉक, प्लेटो यांचेही ग्रंथ वाचले. पुढे भारतीय तत्वज्ञान पाश्चात्यांसमोर
मांडताना या वाचनाचा उपयोग त्यांनी केलेला दिसतो.
काय होतं वाचनाने? जीवन जगण्याचा दृष्टीकोन मिळतो, उमेद
मिळते. एकमेकांच्या सुखदु:खाची तीव्रता कळते. मन संवेदनशील होते. शब्दसंग्रह वाढतो
आणि बरच काही मिळतं. मुलांच्या हातातल्या मोबाईलची जागा पुस्तकं घेतील असा प्रयत्न
आज होणं आवश्यक आहे.
© डॉ.नयना कासखेडीकर
ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You
Tube च्या
या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा.
No comments:
Post a Comment