Thursday, 9 July 2020

विचार - पुष्प – भाग ६.




 स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
                                    विचार - पुष्प – भाग ६.         




                                                         अनुकरण  
       
        मुलं अनुकरणप्रिय असतात. घरात आपले आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कपडे काय घालतात, नातेवाईकांशी कसे संबंध ठेवतात हे सर्व ते रोज बघत असतात. त्यांच्या सवयी काय आहेत ,कोणत्या आहेत? हे मनात साठवत असतात. मुली असतील तर त्या आईची नक्कल करतात,उदा. भातुकली च्या खेळात मुली आईची भूमिका नेहमी करत असतात. आजही. मुले वडिलांची नक्कल करतात. म्हणजे आई वडील या नात्याने आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले काही घडण्यासाठी ची आईवडिलांची जबाबदारी किती मोठी असते हे लक्षात येईल. घरात जसे वातावरण असेल तशी तशी मुलं घडत जातात.  
      
      नरेंद्रही अशा वेगळ्या वातावरणात घडत होता. १८७७ मध्ये नरेंद्र विश्वनाथबाबूंच्या बरोबर रायपूर येथे राहत होता. तेथे शाळा नव्हती. त्यामुळे ते स्वत:च नरेंद्रला शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय इतिहास तत्वज्ञान, साहित्य विषय शिकवीत असत. शिवाय घरी अनेक विद्वान व्यक्तीं येत असत. त्यांच्या चर्चाही नरेंद्रला ऐकायल मिळत असत. त्याचं वाचन इतकं होतं कि, तो वादविवादात पण सहभागी होत असे. नरेंद्रची बुद्धी आणि प्रतिभा बघून ते वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणी मत मांडण्याची संधी नरेंद्रला देत असत.
      
      नरेंद्रचही असच होत होतं. वडिलांचे गुण, दिलदारपणा, दुसर्‍याच्या दु:खाने द्रवून जाणं, संकटकाळी धीर न सोडता, उद्विग्न न होता, शांतपणे आपलं कर्तव्य बजावत राहणं अशी वैशिष्ठ्ये त्यानं आत्मसात केली होती. दुसर्‍यांची दुखे पाहू न शकल्याने दिलदार विश्वनाथांनी मुक्त हस्ताने आपली संपत्ती वाटून टाकली होती. तर ज्ञानसंपदा दोन्ही हातांनी मुलाला देऊन टाकली होती. एकदा कुणाच्या तरी सांगण्यावरून नरेंद्रनी आपल्या भविष्यकाळाबद्दल वडिलांना विचारले , “ बाबा तुम्ही आमच्या साठी  काय ठेवले आहे?”  हा प्रश्न ऐकताच विश्वनाथबाबूंनी भिंतीवरच्या टांगलेल्या मोठ्या आरशाकडे बोट दाखवून म्हटलं, “ जा, त्या आरशात एकदा आपला चेहरा बघून घे, म्हणजे कळेल तुला, मी तुला काय दिले आहे”.  बुद्धीमान नरेंद्र काय समजायचं ते समजून गेला. मुलांना शिकविताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून विश्वनाथबाबू त्यांना कधीही झिडकारत नसत, की त्यांना कधी शिव्याशाप ही देत नसत.
        
     आपल्या घरी येणार्‍या आणि तळ ठोकणार्‍या ऐदी आणि व्यसनी लोकांना वडील विनाकारण, फाजील आश्रय देतात म्हणून नरेंद्रला आवडत नसे. तो तक्रार करे. त्यावर नरेंद्रला जवळ घेऊन वडील म्हणत, “ आयुष्य किती दुखाचे आहे हे तुला नाही समजणार आत्ता, मोठा झाला की कळेल. हृदय पिळवटून टाकणार्‍या दु:खाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, जीवनातला भकासपणा थोडा वेळ का होईना विसरण्यासाठी हे लोक नशा करत असतात. हे सारे तुला जेंव्हा कळेल, तेंव्हा तू पण माझ्यासारखाच त्यांच्यावर दया केल्याखेरीज राहणार नाहीस”. 
         
    समोरच्याचा दु:खाचा विचार करणार्‍या वडिलांबद्दल गाढ श्रद्धा नरेंद्रच्या मनात निर्माण झाली होती. मित्रांमध्ये तो मोठ्या अभिमानाने वडिलांचे भूषण सांगत असे. त्यामुळे, उद्धटपणा नाही, अहंकार नाही, उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असा भाव कधीच त्याच्या मनात नसायचा. वडीलधार्‍या माणसांचा अवमान करणे नरेंद्रला आवडत नसे. अशा प्रकारे नरेंद्रला घरात वळण लागलं होतं.

© डॉ.नयना कासखेडीकर                                                                                       

ही मालिका ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे ,ज्यांना ऐकायची आहे त्यांनी You Tube च्या


या लिंकवर जाऊन हा यू ट्यूब व्हिडिओ बघावा. 
 

No comments:

Post a Comment