मातृदेवो भव!
आज स्वामी
विवेकानंद यांची जयंती , त्यानिमित्त विशेष लेख
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात हिंदू धर्माची श्रेष्ठता कशा कशात आहेत हे सार्या जगाला दाखवून दिले. कुठेही विकासाच्या आड धर्म येत नाही हे सांगीतले. जगात प्रगती, संस्कृती आणि शांतता याला धर्माचा अडथळा कुठेही येत नाही हेही समजविले.
हिंदू धर्मावरचा विश्वास त्यांनी हिंदूंच्या
मनात नुसता वाढवला नाही तर त्या प्रमाणे ते स्वत:च्या आचरणात सुद्धा तो आणायचे. त्याच
प्रमाणे हिंदू संस्कृतीचा गौरव जागतिक पातळीवर नेला. हिंदू परंपरा किती समृद्ध आहे
ते जगाला दाखविले.
त्यांच्या मते ज्या देशात स्त्रियांना योग्य
सन्मान मिळतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला अनुकूल वातावरण ज्या देशात निर्माण
करण्यात येतं त्या देशाचीच प्रगती होते. खरं तर विवेकानंद एक संन्यासी होते, त्यांचा विवाह नव्हता झाला. मग त्यांना
माता, पत्नी, कन्या आणि भगिनी यांच्या
भूमिका कशा कळतील असे सर्वांना वाटेल. असे असले तरी स्वामीजी जेंव्हा जेंव्हा धर्म
प्रचारक म्हणून अखंड देशात व देशाबाहेर फिरले तेंव्हा तेंव्हा, त्यांना स्त्री जीवनाचा जवळून परिचय झाला होता. त्यामुळे, त्यांना पाश्चिमात्य स्त्री जीवन
आणि भारतीय स्त्री जीवन यांचा जवळून अभ्यास करता आला. त्यांच्यात फरक काय, त्यांच्या समस्या काय, त्यावर उपाय काय असे मूलभूत
चिंतन त्यांनी केले होते. त्यांच्या चिंतनातून बाहेरील देशात आणि हिंदू लोकांना
सुद्धा स्त्री जीवनात प्रगती होण्यासाठी आपली काय मुख्य कर्तव्य आहेत ह्याचे
मार्गदर्शन मिळाले होते. जे आजही तेव्हढेच मार्गदर्शक ठरेल.
सर्वात आधी विवेकानंद यांनी आपली आई
भुवनेश्वरी देवी तसेच गुरुमाता शारदा देवी यांचे जीवन पाहिले होते, त्यांचे आदर्श अनुभवले होते. लहानपणापासून
त्यांच्यावर संस्कार झाले होते त्याचा मोठेपणी डोळसपणे विचार केला होता त्यांनी.
ग्रंथांमधून अभ्यासलेल्या स्त्रियांबरोबरच, परिव्राजक म्हणून फिरताना देशातील
स्त्रियांची स्थिती काय आहे ते त्यांना दिसले होते. तर अमेरिका, युरोप, येथे फिरून तिथले स्त्री जीवन पण त्यांनी
पाहिले होते. यावरून त्यांना हिंदू कुटुंबाचे जे दर्शन झाले त्याबद्दल ते म्हणतात, “सीता सावित्रीच्या या पुण्यक्षेत्र
भारतात स्त्रीयांचे जे चारित्र्य आढळले, त्यांच्या ठायी जी सेवावृत्ती, सहनशीलता, दया, संतोष व भक्ती
हे गुण पाहण्यात आले, तसे ते मला या पृथ्वीच्या पाठीवर इतर
कुठेही दिसले नाहीत”.
भारतात आणि परदेशात त्यांना परस्पर विरोधी
आदर्श दिसले होते. प्रत्येक राष्ट्राच्या काही परंपरा आणि काही आदर्श असतात, तसे ते भारतात तर होतेच. परंपरेप्रमाणे
प्रत्येकाचे मापदंड वेगळे असतात. त्यांना दिसलं होतं की,
भारतात विधवा विवाह म्हणजे अध:पतन तर अमेरिकेत तो नीतिसंमत होता.
आदर्श स्त्री जीवन म्हटलं की आपल्या मनात
मातृभाव च येतो. हा भाव आई या नात्यातच मग, अगदी देव संकल्पनेत सुद्धा विठू माऊली,
संत सज्जनांना ,ज्ञानेश्वर माऊली आणि कुटुंबात व समाजातील
वडीलधार्या मंडळीतील स्त्री या सर्व मातेसमान मानल्या जातात. देव संकल्पनेतील
स्त्री देवता जशी मातृ शक्ति मानली जाते तसेच आपला देश म्हणजे भारत ही सुद्धा
भारतमाता म्हणून आपण कल्पितो.पण,पाश्चात्य देशात मात्र
स्त्री म्हणजे पत्नीत्व च असते हे स्वामी विवेकानंद यांचे निरीक्षण आहे.
स्वामीजी या भिन्न आदर्शांचे स्वरूप काय व का
याचा मागोवा घेतात. त्यात त्यांनी भारतीय कुटुंबात पत्नीचे स्थान, जिच्या पासून आपल्याला हा देह लाभला आहे
तिचे समाजात असलेले माहात्म्य, जी नऊ महीने आपल्याला तिच्या
उदरात वाढवते तिचे स्थान, वेळ आली तर हजारो वेळा आपले बलिदान
ही देते तिचे समाजात असलेले स्थान, जी आपले अपराध मोठ्या
प्रेमाने आपल्या पोटात घालते, ज्यामुळे तिच्या आपल्यावरील
प्रेमात जराही खंड पडत नाही तिचे स्थान, याचा भारतीय दृष्टीकोनातून
विचार करतात. त्त्या उलट मनाविरुद्ध झाले म्हणून शुल्लक कारणावरून चिडून, कोर्टात
जाऊन घटस्फोट घेतात त्या पत्नीचे पाश्चात्य देशात काय स्थान,
(आता आपल्याकडेही अशा घटना घडू लागल्या आहेत,) अमेरिकन समाजातले मातेचे स्थान काय ? असे प्रश्न ते
प्रत्यक्ष अनुभवावर अमेरिकेतल्या स्त्रियांना विचारतात.
ते विचारतात, “अमेरिकन महिलांनो,
सांगा तुमच्या समाजात मातेचे स्थान कुठे आहे? मातेला
सर्वोच्च स्थान देणारा पुत्र मला या देशात आढळला नाही . आईच्या अगोदर मरण आल्यास
तिच्याच मांडीवर डोके ठेऊन मरण यावे अशी आमची भावना असते. अशा मातेची तुमच्याकडे
काय कदर आहे? स्त्रीचे स्त्रीत्व काय फक्त हाडामांसाच्या
शरीरातच असते काय? नारीला फक्त शरीर संबंधातच बंदिस्त केलं
आहे तुमच्याकडे. मात्र ज्याच्या समोर जाण्याची काम भावनेला हिंम्मत होणार नाही
किंवा पशुत्त्व ज्याला स्पर्श करू शकणार नाही असा ‘आई’ शब्द आहे.
भारताचा हाच आदर्श आहे.
आमच्या सांप्रदायिक प्रथांनुसार सुद्धा प्रत्येक
स्त्रीला आम्ही आई मानतो. एखाद्या लहान बलिकेला सुद्धा आम्ही माता मानतो. असे
विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग ही आपल्याला माहिती आहेत. एका नर्तीकेला, एका गायिकेला, सुद्धा
त्यांनी माता म्हणूनच पाहिले होते. मातृत्व किंवा मातृशक्तीच ही आपल्या
स्त्रीत्वाचा सर्वोच्च आविष्कार भारतीय मानतात. त्यात स्वार्थ नाही, मूर्तीमंत सहनशीलता आहे, क्षमा आहे, अशी मूर्ति म्हणजे आमची ‘आई’
असते. तीच आमचा आदर्श असते. म्हणूनच भगवंताच्या प्रेमाची साक्ष आमच्या ‘आई’ मधेच आम्हाला पटते. म्हणून तर म्हंटलं आहे की, ‘ कुपुत्रो जयेत क्वचिदपि कुमाता न भवति’ कुपुत्र जन्माला येऊ शकतो पण कुमाता मात्र कधीही असू शकत नाही.
ही हिंदू मातांची थोरवी सांगताना स्वामीजी
घरातलं सासू-सुनेचं उदाहरण देतात. तरुण मुलाच्या पत्नीचे आणि आईचे पटत नसेल, पत्नी आईच्या मर्जी विरुद्ध वागत असेल तर
त्या तरुणाला खपत नाही, कारण तो मातृपूजक असतो. आई त्याला
पूजनीय असते. वात्सल्य प्रेम हा आदर्श भारतात आपल्या शास्त्रात सांगितला आहे. पाश्चात्य लोक व्यक्तिस्वातंत्र्यवादी
आहेत. हाच फरक दोन संस्कृतीत आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात, “ हे भारता विसरू नकोस की तुझ्या स्त्री
जीवनाचा आदर्श आहे सीता, सावित्री, दमयंती.
विसरू नकोस की, तुझा उपास्य देव आहे सर्वस्वत्यागी उमानाथ
शंकर, विसरू नकोस की तुझा विवाह, तुझी धनदौलत, तुझे जीवन यापैकी काहीही तुझ्या इंद्रियसुखासाठी नाही, वैयक्तिक सुखासाठी नाही, विसरू नकोस की, जन्मापासून तुझ्या जीवनाचे जगदंबेच्या चरणी बलिदान झाले आहे, तुझा सारा समाज त्या विराट महामायेची केवळ छाया आहे याचा कधीही विसर पडू
देऊ नकोस”.
आज च्या
पिढीला हे आदर्श पटणार नाहीत कदाचित, पण असे आदर्श असल्यानेच आजही चांगुलपणा सत्यता, प्रमाणिकता, त्याग यासारखी मूल्ये टिकून आहेत. ती
काळाच्या कसोटीवर सुद्धा खरी उतरली आहेत, यापुढेही
उतरतील.
म्हणून पत्नीपदापेक्षा मातृपद सर्व श्रेष्ठ
मानले आहे. जननी हे शक्तीचे पहिले विकसित रूप आहे असे विवेकानंद म्हणतात. आपली आई
म्हणजे सर्वशक्तिमान व्यक्ती अशी बालकाची भावना असते. जन्मदात्या आईच्या ठिकाणी जगन्मातेचा
जो अंश आहे त्याची उपासना केल्याने श्रेष्ठत्व प्राप्त होते.
प्रत्येक स्त्री बद्दल आपल्या मनात मातृभावच
असायला हवा. आपल्या विवाहित पत्नी व्यतिरिक्त अन्य स्त्रियांकडे प्रत्येक पुरुषाने
माता, कन्या किंवा बहीण या भावनेनेच बघावे आणि
अजून महत्वाचा विचार ते मांडतात की, ज्यांना धर्मगुरूची पदवी हवी असेल त्याने सर्वच स्त्रियांकडे मातृभावाने
पाहायला हवे.. त्याच जाणिवेने तिच्याशी वागायला हवे.
स्वामी विवेकानंद यांनी जगभरातल्या स्त्रिया
पहिल्या होत्या, त्यांना
भेटले होते, अनेक स्त्रिया त्यांच्या शिष्या झाल्या, त्यांच्या कार्यात सहभागी झाल्या. त्यांनी समाजातील अनेक स्त्रियांना
जीवनात योग्य मार्गदर्शन केले.
स्वामीजींनी आपल्या कडील स्त्रियांच्या समस्यांचा
जसा अभ्यास केला होता. तसाच पाश्चात्य स्त्रियांचा पण केला होता. त्यावरून आपल्या
कडे चारित्र्य निर्माण करणार्या शिक्षणाबरोबरच स्त्रियांना धर्म, गृहव्यवस्था कला, बाल
संगोपन याचेही शिक्षण द्यायला हवे असे तेव्हा त्यांनी सुचविले होते, स्वत:चे प्रश्न किंवा समस्या सोडवायला स्त्रिया स्वत: समर्थ कशा बनतील
याचा विचार त्यांनी मांडला होता.
आज इतक्या वर्षानी परिस्थिति बदलली आहे. पण
त्यांचा, ‘भारतातील
स्त्रियांचं जीवन सर्व दृष्टीने उन्नत करणे ज्यामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल होऊ
शकेल’ हा विचार आज सुद्धा तितकाच आवश्यक आहे. स्त्रियांकडे
बघण्याचा दृष्टीकोण आपल्याकडील सर्वांना दिशा देणारा आहे. रूढी, परंपरांपेक्षाही आज स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर
स्वामी विवेकानंद यांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टीकोण समजून घेतला पाहिजे असे
वाटते. मातृदेवो भव !
© डॉ. नयना कासखेडीकर
-----------------------------------------
अत्युत्तम
ReplyDeleteयोग्य विवेचन 👍👍
ReplyDelete