Wednesday, 17 February 2021

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके

 

                                   आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके

 “वासुदेव बळवंत फडके यांची प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्याची कल्पना, त्यासाठी प्रणार्पण करण्याची तयारी म्हणजे सातपुडा पर्वतरांगांसमोर हिमालय जेव्हढा उंच दिसेल तितके फडके सर्वसामान्यांपेक्षा थोर होते” इति अमृतबझार पत्रिका १५ नोहेंबर १८७९ 

             

   

                                             

भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतले सशस्त्र क्रांतिचे आद्य प्रवर्तक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. मुळातच संवेदनशील मनाचे आणि स्वाभिमानी. रायगड जिल्ह्यातल्या शिरढोण गावचे त्यांचे मूळ घराणे. त्यांचे आजोबा अनंतराव, कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. ऐतिहासिक घराण्यात वासुदेव यांचा जन्म झाला होता. कुस्ती घोडेस्वारी, तलवार चालविणे याचे प्रशिक्षण त्यांना मिळाले होते. त्यामुळे मुळातच लढाऊ वृत्ती अंगात होती.  

 

कल्याण, मुंबई आणि पुणे येथे थोडेसे शिक्षण झाल्यावर वासुदेव नोकरीस लागले. रेल्वेतल्या नोकरी नंतर, लष्कराच्या हिशोब खात्यात त्यांना १८६३ मध्ये नोकरी मिळाली आणि दोनच वर्षात १८६५ मध्ये मुंबईहून पुण्यात बदली झाली. ते १८६५ ते १८७९ या काळात पुण्यात राहिले. त्यांच्या क्रांतिकारक होण्याला हाच पुण्यातला काळ कारणीभूत ठरला. १८७३ ते १८७५ या विशेषता दोन वर्षात न्यायमूर्ती रानडे इंग्रजांच्या अन्यायविरुद्ध व्याख्यानातून जनजागृती करत असत. त्याचवेळी दुष्काळाचे संकट, अन्न पाण्याचे दुर्भिक्ष्य, कॉलरा आणि देवीची साथ यामुळे थैमान चालले होते. अनेक जण मृत्यूमुखी पडले. यात अनाथ झालेली मुले अनाथाश्रमात वाढवून त्यांना ख्रिश्चन केले जाईल अशी गुप्त योजना ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी आखली होती. महाराष्ट्रातील ही सर्व आपत्ती, तरुण वासुदेव यांना बघवत नव्हती. इंग्रजांच्या दरबारी नोकरीस असून सुद्धा त्यांच्या विरुद्ध उठाव करण्याचे त्यांनी ठरविले आणि दीर्घ सुट्टी काढून खेडोपाड्यात प्रवास सुरू केला. ओसाड पडून निर्मनुष्य झालेली गावच्या गावं आणि गुरे व मृत मनुष्यांचे सापळे बघून त्यांचे अंतकरण पिळवटून निघाले.        

 

पुण्यात ते सदाशिव पेठेत, खजिना विहीरीजवळच्या लक्ष्मीनृसिंह मंदीरालागत राहत होते. याच काळात पुणे राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र झाले होते. कारण भारताची आर्थिक स्थिति ब्रिटीशांच्या स्वार्थी आणि अन्यायकारक आर्थिक धोरणांमुळे खालावत चालली होती. ब्रिटीशांच्या स्वार्थी आणि अन्यायकारक धोरणांची जाणीव पुण्यात राहणार्‍या लोकांना झाली. या नृसिंह मंदिराच्या वास्तव्यात ते असतानाच सशस्त्र लढ्याची ठिणगी पडली होती. त्यामुळे ही वास्तू इतिहासाची आजही साक्षीदार आहे.

 

   न्या.महादेव गोविंद रानडे आणि लहुजी वस्ताद साळवे यांचा वासुदेव यांच्यावर प्रभाव पडला होता. त्याच सुमारास एक घटना घडली. त्यांची आई मुंबईला अत्यंत आजारी झाली असताना सुट्टी दिली नाही. आई गेलीच. त्यांना आईच्या अंत्यदर्शनासाठी सुद्धा रजा दिली नाही. मन फारच अस्वस्थ झाले. तसेच ते शिरढोणला गेले, पण आईचे दर्शन झाले नाही. परत आल्यावर कार्यालयात इंग्रजांच्या रोषाला सामोरे जावे लागलेच. वर्षभराने पुन्हा आईच्या वर्षश्राद्धासाठीही रजा दिली गेली नाही आणि तेंव्हाच त्यांनी इंग्रजांच्या विरोधात प्रतिशोध घ्यायचा ठरविले. स्वता घेतलेल्या अशा अनुभवामुळे देशाभिमान जास्तच जागृत झाला. परदेशी मालावर बहिष्कार घातला. स्वदेशीचे  व्रत घेतले. सामाजिक कामही करत होते.

   

    वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ त्यांनी घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय, निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्था सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये पूना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते, त्यांनी दत्त माहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.   

व्यायामाने शरीर कमावले, मल्लविद्या शिकले. लहुजी वस्तादांच्या आखाड्यात तलवारबाजी, बंदूक चालविणे, दांडपट्टा, घोडदौड अशा विद्याही त्यांनी पारंगत केल्या. युद्धकला शिकले. आपल्या सहकार्‍यांनाही शिकवले. पुढे तर शनिवार वाड्यासामोर ते वीरश्रीयुक्त व्याख्याने देऊ लागले. वैध चळवळीचा मार्ग त्यांनी स्वीकारला, पण उपयोग होत नव्हता. परिस्थिति आणखीन गंभीर होत होती. नुसती व्याख्याने देऊन जनतेला इंग्रजांविरोधात लढण्याचे प्रयत्न साध्य होईनात. आपल्या पूर्वजांनी दिलेले इतिहासातील लढे आठवून आपणही हे करू शकतो असा आत्मविश्वास जागृत होऊन, सशस्त्र लढा द्यायचा, इंग्रज सरकारला त्राही माम करून सोडायचे आणि स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचे त्यांनी ठरविले.

 

   त्याच वेळी रामोशी सुद्धा इंग्रजांच्या अन्यायाला कंटाळले होते. रामोशींची सेना या चळवळी साठी वासुदेव यांच्या बरोबर उभी राहिली. ब्रिटीशांच्या विरोधात लढा उभारायचा असेल तर इतर लोकांना ही सामावून घ्यायला हवे असे क्रांतिवीर लहुजी साळवे यांनी वासुदेव यांना पटवून दिले. फौज उभी राहिली. पण त्यांच्या खर्चासाठी कोणीही मदत करेना. इंग्रजांचा रोष कोणीही श्रीमंत, ओढवून घेण्यास तयार होत नव्हते. धनाढ्य लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले पण त्याचाही उपयोग झाला नाही. मग छोट्याशा सैन्यासह ते सैन्य गावागावात श्रीमंतांकडे आणि सरकारी खजिन्यावर धाडी टाकू लागले. त्याचा हिस्सा घेऊन शेवटी शेवटी तर काही जण परत निघून गेले. वासुदेव यांना कळेना की यांना पैशांपालीकडे राष्ट्रभक्ती, देशप्रेम कसे समजून सांगावे. शेवटी ते हताश झाले. आत्मसमर्पण करावे असा विचार मनात आला, तब्येत बिघडली. आपण आता फार दिवसाचे सोबती नाही असे त्यांना वाटू लागले. पण दरम्यान श्रीशैलमला रघुनाथ मोरेश्वर भट भेटले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला. आता रामोशींच्या ऐवजी रोहिल्यांचे हजारो सैनिक पुन्हा जमा झाले. आत्मसमर्पणाचा विचार मनातून काढून टाकला. गाणगापुरात येऊन राहिले. थोडी तब्येत सुधारली. पुन्हा पुण्याकडे निघाले. 

 

  सशस्त्र उठाव सर्वदूर पसरवायचा प्रयत्न होता. त्याच वेळी लुटारूंनी टाकलेले छापे वासुदेव यांच्या नावावर गोवले जात होते. वास्तविक त्यांचा यात काहीही संबंध नव्हता. इकडे इंग्रज हा उठाव दडपण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारची धावपळ सुरू झाली. झडत्या सत्र सुरू झाले. त्यांच्या सर्व नातेवाईकांना एकत्र करून बंदिस्त केले. पत्नीला जुन्नर येथून शिरढोणला आणून चाळीस जणांच्या पहार्‍यात ठेवलं. या कामगिरीवर मेजर डॅनियल हा अधिकारी होता. त्याने सर्व हैद्राबाद पर्यन्त प्रदेश पिंजून काढला. वासुदेव यांना पकडून देणार्‍यास सरकारने बक्षीस जाहीर केले.

    

  विजापूर जिल्ह्यात देवरनावडगी गावातील बौद्ध विहारात अत्यंत श्रमाने थकून, तापाने फणफणलेल्या अवस्थेत डॅनियलला फितुरा मुळे वासुदेव सापडले.  निद्रित अवस्थेत वासुदेव यांना ओळखून तो त्यांच्या छातीवर जाऊन बसला आणि गदागदा हलवत “मी तुला पकडले आहे आमच्या स्वाधीन हो” म्हणून सांगितले पण वासुदेव यांनी तशाही अवस्थेत द्वंद्वयुद्ध खेळण्याचे आव्हान डॅनियलला दिले. डॅनियल बरोबर अनेक सशस्त्र माणसे होती. वासुदेव व गोपाळ मोरेश्वर हे दोघेच होते . किती पुरे पडणार? शेवटी पकडले गेले. दिवस होता,२१ जुलै १८७९. वासुदेव यांना पकडल्याची बातमी सर्व वृत्तपत्रात झळकली ती वाचून सर्वांना हळहळ वाटली. 

 

    पुण्यात आणून वासुदेव यांचा बंदिस्त कोठडीत आठवडाभर अनन्वित छळ करण्यात आला. या स्वाभिमानी क्रांतिकारकाने छळ सहन केला पण, माहिती दिली नाही. या प्रचंड छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तो फसला. आता यूरोपियन सैनिकांचा पहारा आणखीनच कडक झाला. पुढील दोन महीने काहीही हालचाल झाली नाही. वासुदेव यांनीच सरकारला ही आठवण करून दिली आणि तिसर्‍या महिन्यात कोर्ट केस सुरू झाली. न्यायमूर्ति रानडे आणि इतर देशभक्त यांनी वासुदेव यांचा विचार करून, सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असलेले वकील गणेश वासुदेव जोशी यांनी वासुदेव यांचे वकीलपत्र घ्यायचे ठरवले. पुण्यात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. रामोशी,रोहिले, काही मित्र मंडळी या साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. कोर्टात वाचून दाखवलेल्या पत्रात लिहिलं होतं,  “वासुदेव बळवंत हा एक असामान्य देशभक्त असून, त्याने आपले सर्व जीवन देशकार्यासाठी वेचले आहे”.

 

   सरकारविरोधी सशस्त्र युद्ध पुकारणे, त्यासाठी मनसे, शस्त्रास्त्र गोळा करणे यासाठी फाशीची शिक्षा आरोपपत्रात सुचवली होती. ब्रिटिश सरकार उलथवून टाकण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांना अंदमानला काळ्या पाण्याची कडक शिक्षा देण्यात आली. ते ऐकून वासुदेव देशबांधवांना म्हणाले,  “पारतंत्र्याच्या या असह्य जीवनातून आपणास सोडविण्यासाठी न्यायालयाने हा निर्णय देऊन कृपा केली आहे”. कोर्टातून त्यांना सशस्त्र पाहर्‍यातून नेत असताना जमलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचा जयजयकार केला. दुसर्‍या दिवशी वर्तमान पत्रात एक ध्येयवेडा देशभक्त अशा मथळ्यांचे अग्रलेख छापून आले.

 

     दिलेली कडक शिक्षा सौम्य करावी म्हणून वासुदेव यांच्या तर्फे अपील करण्यात आले पण हायकोर्टाने काळ्या पाण्याची शिक्षा कायम केली. फक्त अंदमान ऐवजी त्यांना येमेन येथील एडन द्वीपकल्पावर पाठवावे असा शेरा मारला. ५ जानेवारी १८८० रोजी, मुंबईहून बोटीने एडनला त्यांना नेण्यात आले. कारागृहात पुन्हा छळ सुरू झाला. दोन दोन महीने तेलाच्या घाण्याला जुंपून काम करावे लागे, सतत फिरल्याने चक्कर येई. या छळातून निसटायचा त्यांनी प्रयत्न केला पण, पुन्हा पकडले गेले. आता पायात बेड्या ठोकल्या. पळून गेल्याचा गुन्हा केला म्हणून पुन्हा जास्त शिक्षा. या शिक्षेने तब्येत जास्तच खचत चालली होती. त्यात क्षय झाला. एडन ची हवा सर्वांना त्रासदायकच होती. शिवाय कोठडीत मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध १८८१ मध्ये त्यांनी अन्नत्याग केला. प्रायोपवेशन सुरू केले. एडन येथे असणारे डॉक्टर बर्वे यांनी वासुदेव यांना अन्नत्यागापासून परावृत्त केले. क्षयरोग इतका वाढला की वासुदेव आता अस्थिपंजर झाले. अंथरुणाला खिळलेले जर्जर वासुदेव आता पळून जाऊ शकत नाही अशी खात्री झाल्यावर त्यांच्या बेड्या काढून टाकण्यात आल्या. शेवटी एडनच्या कारागृहात च १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले . एडन च्या किनार्‍यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या या आदि क्रांतिकारकाने जाता जाता हिंदुस्थानात स्वातंत्र्याची ज्योत मना मनात पेटवली.

 

 ©-डॉ.नयना कासखेडीकर

                                          --------------------------

 


No comments:

Post a Comment