v पुस्तक परिचय
कहाणी लंडनच्या आजीबाईंची
सातासमुद्रापलीकडून नुकताच लंडन मध्ये येऊन दाखल झालेला २,४ दिवसात अजिबाईंच्या घरचाच व्हायचा. दिवसभर
कामात वेळ जायचा पण, संध्याकाळ झाली की हुरहूर लगायची आणि
घरच्या मंडळींची आठवण बेचैन करायची तेंव्हा, रात्री जेवायला
ज्या घरी जायचे तिथे जेवणानंतर मनातल्या आपल्या घरच्यांच्या आठवणी सांगायच्या, मन मोकळं करायचं आणि निवांत व्हायचं. गप्पा मारता मारता त्या आजीच्या
घरचेच होऊन जायचे. ते घर होते, पंचवीस, हुप लेन, लंडन. अर्थात लंडनच्या अजिबाईंच. हो सगळ्यांनाच ऐकून माहिती आहेत लंडनच्या या
आजीबाई.
एकदा पूना गेस्ट हाऊस चे कै.चारुकाका
सरपोतदार यांच्या मुलाखत घ्यायला गेले होते, त्यांनीही परदेश प्रवासातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यात
लंडनच्या आजींच्या हातच्या पुरणपोळया खाल्याची आठवण सांगून त्यांचे कौतुक केले
होते, बर्याच वेळा अनेकांच्या कडून ऐकलं होत, वाचलं होतं लंडनच्या अजिबाईंच्या बद्दल. तेंव्हा फार विशेष वाटलं नाही.
पण हे पुस्तक हातात आलं आणि या लंडनच्या आजींचं मोठेपण, त्यांनी
घेतलेले कष्ट मुळातून समजलं. विदर्भातल्या, खेड्यातल्या एका
मराठमोळ्या निरक्षर स्त्रीने एका पाश्चिमात्य देशात, तिथली
माणसं, रितीरिवाज, भाषा, परंपरा संस्कृती माहिती नसताना लंडनमध्ये एक कर्तबगार ‘आजीबाई बनारसे’ म्हणून संपूर्ण ब्रिटन मध्ये प्रसिद्ध
झाल्या. त्यांचा १९४७ ते १९८३ पर्यन्त चा (निधन) प्रवास मनाचा ठाव घेणारा आहे.
प्रेरणा देणारा आहे. लंडनला येऊन प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा व्यवसाय सुरू करणं, तो वाढवण, अनेकांना रोजगार देणं, आपली संस्कृती तिथे जोपासण आणि सर्वांना जोपासला लावणं, महाराष्ट्र मंडळाच उपाध्यक्ष व अध्यक्षपद सांभाळणे, युरोपातल्या
पहिल्या हिंदूंच्या मंदिराची, साईबाबा मंदिराची निर्मिती, इंडिया कल्चरल सेंटर ची स्थापना, गणपती ऊत्सव, राणी एलिझाबेथ वरील प्रेम - ते ब्रिटन मधली एक
नामवंत व्यक्ती म्हणून या आजींचा हा प्रवास थक्क करणारा आहे. फक्त ‘आजीबाई वनारसे, लंडन’. एव्हढ्याच
पत्त्यावर ३० वर्षे आजींची पत्र न चुकता मिळत होती. किती नाव कमावलं होतं आजींनी .
आचार्य अत्रे, सुधीर फडके, पु.ल.देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, वसंत बापट,
शांता शेळके, पं जितेंद्र अभिषेकी,
हृदयनाथ मंगेशकर,असे दिग्गज आणि बरेच जण आजींच्या घरी उतरले
आहेत. लंडन भेटी नंतर, आचार्य अत्रे तर संयुक्त महाराष्ट्र
चळवळीचा घोषणा देताना गमतीने म्हणायचे, “बेळगाव, कारवार, निपाणी पंचवीस हुप लेन सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”.चळवळीच्या घोषणेमध्ये गमतीने का होईना आजींचे नाव घेणे ते ही आचार्य अत्रे
यांनी म्हणजे केव्हढा मोठेपणा देत होते त्यांच्या कर्तृत्वाला याचीच साक्ष
आहे.
लेखिका सरोजिनी वैद्य यांनी ही कहाणी अर्थात
आजींचे चरित्र लिहिले आहे. ही चरित्र कथा जेंव्हा पहिल्यांदा लंडन मध्ये २४
सप्टेंबर १९९६ ला प्रसिद्ध झाली, तेंव्हा ती आवृत्ती दोन अडीच महिन्यात संपली. आता २०१७ ला त्याची नववी
आवृत्ती काढायला लागली होती. आणि इतक्या उशिरा का होईना ते पुस्तक हातात पडले होते.
आणि पुस्तकातल्या लंडनच्या आजींना भेटण्यासाठी उत्सुक होते मी. एका
बैठकीत वाचून तृप्त झाले मन. एका भारतीय स्त्रीचा अभिमान वाटला. सर्वांनी अभिमानाने
वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक. अवश्य वाचावे.
© - डॉ. नयना कासखेडीकर.
----------------------------------------
No comments:
Post a Comment