Sunday, 11 April 2021

लंडनलिंक

  

  • v      पुस्तक परिचय

            लंडनलिंक

 लंडनलिंक  या पुस्तकाच्या नावावरूनच पुस्तकात लंडन बद्दल माहिती असेल हे कळतच. तर हे प्रवास वर्णन आहे का असेही वाटणारच. पण हे प्रवास वर्णन नाही तर लेखकाचं त्या शहाराशी अनेक वर्षे तिथे राहून बांधलं गेले घट्ट नातं आणि जवळीक यात वाचायला मिळते. लंडनचा राजेशाही थाट, खानदानी अदब,सुबक शहर रचना ,तिथली सभ्यता, देखणेपणा आणि तिथली वैभवसंपन्नता पाहून भारावून जाऊन ते पाहिल्याचा आनंद ,झालेलं समाधान आपण वाचकांपर्यंत पोहोचवावं म्हणून लेखक वि मा. जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. यात तब्बल ६८ छोटी छोटी प्रकरणं आहेत. अत्यंत मनोरंजक, लंडनची  वैशिष्ठ्य सांगणारी, तिथल्या संस्कृती व पाऊलखुणा यांचा वेध घेणारी ही प्रकरणे आहेत.

                           

     
लंडन मधल्या विशेष वास्तु, त्यांचा इतिहास, तिथे घडलेल्या घटना व प्रसंग, तिथले लोकजीवन त्यांची जीवन मूल्ये आणि आपली मूल्ये वं त्याचे संदर्भ तपासून घेत घेत, लेखकाने पुस्तकाचा शेवट ब्रिटन आणि भारत यांचा परस्पर संबंध वं त्यांचे नाते काय असले पाहिजे यावरही प्रकाशा टाकला आहे. दोन्ही देशातली साम्यस्थळे दाखवून दिली आहेत. मग इंग्रजी भाषेचा दोन्ही देशांचा जिव्हाळ्याचा संबंध, आहारातली करी(जेवणातील रस्सा), लोकप्रिय क्रिकेटचा खेळ, शिक्षण पद्धती हे सांगून ब्रिटनला भारत हा इतर देशांपेक्षा कसा अधिक जवळचा आहे हे पटवून दिले आहे.

          आज ४००,५००  वर्षांनंतरही ज्याच्या नावाची मोहिनी कमी झालेली नाही असे इंग्रजीने जगाला दिलेले नाटककार शेक्सपियर व कवी वर्डसवर्थ ह्यांचे लंडन मधल्या लोकांच्या मनातले स्थान त्यांचा या दोघांबद्दलचा अभिमान लेखक सांगतो. जो भारतीय लोकांनी अतिशय विचार करण्यासारखा आहे. जगभरातल्या नाट्य प्रेमींना शेक्सपियर चं गाव स्टँटफर्ड याचं का आकर्षण वाटतं ते वाचण्यासारख आहे.

अशा या पुस्तकात लंडन च्या वेलिंग्टन कोर्ट, ट्रफलगार चौक, लंडन आय, स्कॉटलंड च्या लेक डिस्ट्रिक्ट मधलं रोमॅन्टिक वाटणार्या  परिसरातलं असं कवी वर्डसवर्थचं डोव्ह कॉटेज या बरोबरच हिंदूंचं लंडन मधलं वैभव  स्वामींनारायण मंदिर, मुंबईचे डबेवाल्यांचा सत्कार, भारत-पाकिस्तानची  क्रिकेट मॅच, योगसाधना, तिथलं महाराष्ट्र मंडळ असे बरेच यथार्थ वर्णन या पुस्तकात आहे. अनुभव आहेत. ते वाचून लंडनला आपणही  राहून आलो की काय असे वाटायला लागते इतके ते बोलके आणि सुंदर अनुभव देणारे आहे. सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे.                          

 © ले.डॉ. नयना कासखेडीकर.

                               --------------------------------------

No comments:

Post a Comment