संवत्सर प्रतिपदा
चैत्र शुद्ध प्रतिपदा , श्री शालिवाहन शके १९४३
ब्रह्मध्वज
नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेऽस्मिन्
वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।
संवत्सर प्रतिपदा ! चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे वर्षारंभाचा दिवस. याच दिवशी
सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’
अर्थात ‘ब्रम्हध्वज’ पूजन करण्याची
पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात
सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन
मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.
गुढीपाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला आपला
सण आहे. त्याच बरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान पण आहे. तर पर्यावरण संदर्भ सुद्धा
आहे. चैत्रापासून पुढील चार महीने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी. किंवा रोज एकाच्या घरी माठ
भरून पाणी नेऊन द्यावे ई ... इथे धार्मिक
दृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे
असा आहे. इथे हा पर्यावरण वादी दृष्टीकोण दिसतो. हे चार महीने उन्हाळा असतो. जसे
मनुष्य प्राण्याला उन्हाचा त्रास होतो, तसे प्राणी आणि
पक्ष्यांना पण होतो. झाडांना पण होतो. एरव्ही सुद्धा आपण आपल्याकडे भर उन्हात कोणी
आलं, अगदी पोस्टमन, सिलिंडर घेऊन
येणारा, कुरीयर वाला, किंवा कुणीही घरी
आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे.
हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती आहे असे
मानतात म्हणून पाण्याचे महत्व आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही हे
सर्वांना माहिती आहेच.
पाडवा म्हणजे नव निर्मितीचा आरंभ होण्याचा
दिवस असतो. पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये
करण्यास सुरुवात करायची असते. यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी
शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची
साठवण करून ठेवणे. बी बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची
असतात. तर नव्या गोष्टींचा आरंभ या दिवशी करतात.
वसंताचे आगमन होणार्या काळात शरीराला थंडावा
देणार्या कडुनिंबाचे महत्व चैत्र प्रतिपदेला असते. आरोग्यास हितवर्धक, पचन क्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बारा करणारा, शिवाय धान्यातील किडेचा नायनाट करणारा कडूनिंब आयुर्वेद दृष्ट्या
महत्वाचा आहे म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात
आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे.
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो
याच दिवशी. म्हणूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा
करू लागले. असाच विजयदिवस लंकाधिपती रावण वधानंतर, प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षानी परत आले तो विजय आणि
आनंदोत्सव म्हणून घरोघरी ब्रम्ह ध्वज /गुढ्या तोरणे उभी केली. ही गुढी /ब्रह्म
ध्वज आनंदोत्सवाची द्योतक आहे. कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं भावगीत तुम्हाला स्मरत
असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती,
लोकांना किती आनंद झाला होता याचं हे
वर्णन खूप बोलकं आहे.
विजयपताका
श्रीरामाची, झळकते अंबरी,
प्रभू आले मंदिरी
.
गुलाल उधळून नगर
रंगले, भक्त गणांचे थवे नाचले,
राम भक्तीचा गंध
दरवळे,
गुढ्या तोरणे
घरोघरी ...
अशा उत्साहात लोकांनी हा आनंदउत्सव साजरा केला असल्याचा उल्लेख रामायणात आहे.
अशी ही उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन इतिहासात सांगितले
आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पुजा म्हणून इतिहासात आढळतो. आपल्या
सारखाच इतर देशात काठीपूजा /ब्रम्ह ध्वजपूजन /गुढी पूजन करण्याची परंपरा होती.
दक्षिण आफ्रिकेत दामारा जमाती मध्ये ,सायबेरियातील सामोयीड्स मध्ये, इस्रायल मध्ये, युरोप मध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात, कुक बेटावर आदिवासींचा काठी
पुजा उत्सव, तसंच, युनान, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार
या ठिकाणी काठी उत्सवांची परंपरा होती. भारतीय उपखंडात याला निरनिराळी नावे आहेत. नेपाळमध्ये
काठी उत्सव, आसाम मध्ये बास पुजा, मणीपुर त्रिपुरा मध्ये काठी पूजा, बलुचिस्तानात, राजस्थान,
मध्यप्रदेश, तर ओरिसा मध्ये तर आदिवासींची ‘खंबेश्वरी’ देवीची पूजा ही काठी पूजा असते.
आपल्या या
प्राचीन परंपरेचे उल्लेख महाराष्ट्राच्या अनेक साहित्यात सुद्धा दिसतात. अगदी
म्हाइंनभट्ट यांच्या लिळा चरित्र ग्रंथापासून ,संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत
नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या अभंगात गुढीचा
उल्लेख सापडतो.
गेल्या वर्षीचा गुढीपाडवा कोरोंना साथी मुळे अत्यंत
चिंतायुक्त वातावरणात झाला. लॉकडाउन मध्ये झाला. जरा परिस्थिति सुधारते असं वाटत
असतानाच आता पुनः दुसरी लाट सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा
पाडवा सुद्धा चिंतेत च साजरा होणार/किंवा कसा होईल हे सांगता येत नाही. पण मागच्या
वर्षी पेक्षा या पाडव्याला सगळ्या राम भक्तांच्या मनात सुखद आनंदाची लहर आहे, ती रामजन्मभूमीचे काम सुरू झाल्याची.
२०ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचा
भूमिपूजन सोहोळा पार पडला होता. या वेळेचं वातावरण म्हणजे अयोध्यावासीयांची
दिवाळीच होती जणू. संकट काळात भक्तांच्या मनाला, उभारी
देणार्या श्रीरामांच्या मंदिराची निर्मिती होणार आहे . मग यंदा आम्हाला घरातच
राहून, कुठल्याही तयारी शिवाय हा उत्सव साजरा करावा लागणार
असला तरी मन या गोष्टीने आनंदी असणार आहे हे नक्की. दु:खाच्या आणि चिंतेच्या मन:स्थितीत
मनाचा एक कोपरा आनंदी असणार आहे हे या परिस्थितीत सकारात्मकता वाढवणारे असेल.
हे राम मंदिर उभे करण्यात सर्व लोकांचे
समर्पण भावाने दान आले आहे. लोकांच्या सहभागातून हे मंदिर उभे राहणार आहे हे याचे
विशेष आहे. एक विशेष नोंद घ्यावीशी वाटते ती म्हणजे, या मंदिरात त्या शिवाय अध्ययन केंद्र असणार आहे. ‘ग्लोबल एनसायक्लोपेडिया ऑफ द रामायण’ अर्थात ‘रामायण विश्व महाकोशा’चे खंड तयार होणार आहेत. यात
पुरातत्व, इतिहास, सर्व संस्कृतिक, साहित्यिक दृष्टीकोणातून माहिती असणार आहे, तसेच
अयोध्याच्या इक्ष्वाक्षू वंशाची सर्व ६५ राजांची माहिती असेल. असे अनेक खंड, जवळ जवळ २०० खंड, अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
त्यांचे इंग्लिश. हिन्दी, तामिळ अशा भाषांतून भाषांतर होणार
आहे. जगातल्या २०५ देशातील रामायणाचे मूर्त-अमूर्त माहिती या कोशात असेल. तो तयार
करण्यासाठी सर्व राज्यातील विद्वान सहभागी होतील. सर्व भाषेतील, सर्व परांपरतील, सर्व लोककथातील भगवान श्रीरामाची
माहिती यात सर्वांना वाचायला मिळेल. असे नियोजन अयोध्या शोध संस्थान तर्फे करण्यात
आले आहे. ही फार मोठी आणि महत्वाची निर्मिती होईल असे मला वाटते. कारण या
विषयाच्या संशोधनासाठी अभ्यासकांना महत्वाचे संदर्भ उपलब्ध होणार आहेत.
रामायणात
विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय आहे. यातील सर्व घटनांमध्ये श्रीरामांनी
स्वताला मानवी मर्यादेमध्ये सिद्ध केलं आहे. त्यात मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणून
ती आज लागू आहेत.
चैत्रांगण रंगावली |
भारतात
सगळीकडच्या या परंपरा पाहिल्या की लक्षात येतं आपली संस्कृती धर्म, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक आणि कौटुंबिक सलोखा या धाग्याने बांधली आहे. नव्याचं स्वागत करा.
जुने जाउद्या, विसरून जा, एकमेकांशी
सौहार्दाने वागा ही आणि अशी अनेक आदर्श मूल्ये आणि संस्कार अशा सणांमधुन प्रसारित
होत असतात.
म्हणून थोर
कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेत हाच संदेश देतात,
गुढीपाडव्याचा सन,
आतां उभारा रे गुढी |
नव्या वरसाचं देनं,
सोडा मनांतली आढी |
गेलं सालीं गेली आढी,
आतां पाडवा पाडवा |
तुम्ही येरांयेरांवरी,
लोभ वाढवा वाढवा ||
आजच्या सामाजिक व राजकीय सद्य परिस्थितीत हा संदेश खूप महत्वाचा आहे. म्हणूनच,
सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु।
सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु।।
आताच्या
कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन ,सर्वांच कल्याण होईल याची योजना करून येणारं वर्ष
सर्वांसाठी मंगल ठरो, हीच प्रार्थना !
(हा लेख आज 'विश्व संवाद केंद्र' ,'सोलापूर तरुण भारत' गुढीपाडवा विशेष पान आणि 'न्यूज 24 पुणे' या वेब पोर्टल वर प्रसिद्ध झाला )
© ले. डॉ. नयना कासखेडीकर
-------------------------
No comments:
Post a Comment