Sunday, 11 April 2021

गदिमा स्मारक होतंय

 

                                                     गदिमा स्मारक होतंय.....

    



   मराठी साहित्यात आणि मराठी जनतेच्या मनात अलौकिक ठसा उमटविणारे, आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गदिमा यांचे गेली अनेक दशकं रखडलेलं स्मारक आता पुणे येथे महात्मा सोसायटी, कोथरूडला साकार होतय. स्मारकाच्या या जागेचा भूमिपूजन सोहळा नुकताच २२मार्चला संपन्न झाला. हा सोहळा कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या, गदिमांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पार पडला. याविषयी जाणून होतेच, पण नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्याशी बोलून स्मारकाविषयी आणखी जाणून घेतले. त्या महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या सदस्या आहेत, कमलानेहरू उद्यानाच्या साहित्य कट्ट्याच्या संयोजकसुद्धा आहेत, त्यामुळे मराठी सारस्वतांबद्दल सतत त्यांचा विचार असतो. याबाबत त्यांचा पुढाकार म्हणून महत्वाचा आहे.    

  गेली अनेक वर्षे या विषयाचा पाठपुरावा सुरू होता. जन्मशताब्दी वर्षात तरी स्मारक होईल अशी आशा नागरिकांना आणि माडगुळकर कुटुंबीयांना होती, परंतु अनेक प्रशासकीय बाबी पूर्ण करणं आवश्यक होते आणि कोरोंना साथीमुळे नियोजनात येणारे असंख्य अडथळे दूर करत करत हे काम पुढे कसे नेता येईल हे आव्हान होते. २०१७ मध्ये (तत्कालीन महापौर) मुक्ता टिळक यांनी या स्मारकाची घोषणा गदिमा यांच्या जन्मशताब्दी सांगता कार्यक्रमात केली होती. सरतेशेवटी सर्व नियोजन पूर्ण करून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मुख्य उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन दि. २२ मार्च २०२१ रोजी संपन्न झाले, ही सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल. काही गदिमाप्रेमीनी हे स्मारक व्हावं म्हणून डिसेंम्बर २०२० मध्ये आंदोलन केलं. विशेष म्हणजे गेल्या ४० वर्षांपासून हि गदिमा स्मारकाची मागणी होत होती. 

 गदिमा हे  १२ वर्षे काँग्रेसतर्फे  महाराष्ट्र  विधानपरिषद नियुक्त सदस्य होते. त्यांचे चिरंजीव  कै. श्री श्रीधर माडगूळकर यांनी १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. पण सुमारे तीन दशकाहून अधिक काळ कॉंग्रेस विचारांच्या पक्षांकडेच पुणे मनपाची सूत्रे होती, तरी गदिमा स्मारकाचा विषय मार्गी लागला नव्हता हे विशेष! 

  पुण्यात गदिमा जन्मशताब्दी मध्ये राज्यसरकार पुरस्कृत महोत्सव झाला. यात माडगूळकर कुटुंबीयांचा पुढाकार होता. पण पुण्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक जगताने काही प्रातिनिधिक कार्यक्रम केले पण भरीव असे कोणत्याही संस्थेने केले नाही हे वास्तव आहे.

  स्मारक म्हणजे पुतळा उभा करू नये तर,ते कलात्मक असावे असे गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले होते. गदिमांचे स्मारक व्हावे म्हणून त्यांनी आणि त्यांचे कुटुंबिय आणि माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी सतत पाठपुरावा केला. हे स्मारकसुद्धा वेगळे असेल. त्यात अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार केला असेल. नव्या कल्पना असतील. ज्यामुळे ते स्मारक कायम स्मरणात राहील आणि उपयुक्त ठरेल.           

  स्मारक म्हणजे एखाद्या विशेष घटनेची किंवा विशेष व्यक्तीची दीर्घकाळ आठवण रहावी म्हणून निर्मिलेली वास्तू/रचना ज्यामुळे त्या व्यक्तीचे सतत स्मरण होत राहील, प्रेरणा मिळत राहील,असे आदर्श पुढच्या पिढीपर्यंत प्रसृत होत राहतील. प्रसंगांची आणि व्यक्तींची आठवण राहण्यास त्या निमित्ताने मदत होते. अशा आठवणी अनेक देशात स्मारकांच्या रूपाने अस्तित्वात आहेतच.

   मराठी वाड:ग्मयामध्ये आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविणारे प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून गदिमा यांचे नाव सर्वपरिचित आहे. महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात केलेले अनेक साहित्यिक आहेत जे मराठी अस्मितेचे मानबिंदू ठरावेत,या परंपरेतले एक नाव म्हणजे गदिमा. मराठी साहित्यात कवी, कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक म्हणून योगदान, तर मराठी चित्रपट क्षेत्रात कथाकार, पटकथाकार, गीतकार, अभिनेता आणि निर्माता म्हणून सुद्धा योगदान असलेले गदिमा. यांनी १५७ पटकथा लिहिल्या, २५ हिन्दी चित्रपट, २००० पेक्षा जास्त गाणी लिहिली,त्यांच्या काळातले चित्रपट तर सुवर्णकाळ घेऊन आले. गीतरामायण ही तर त्यांची अजरामर साहित्यकृती.

  यशवंतराव चव्हाण यांनी गदिमांच्या काव्य प्रतिभेवर प्रसन्न होऊन म्हटलं होतं की, “मी जर राजा असतो तर कविवर्याच्या हाती सोन्याचं कडं चढवलं असतं”. या सगळ्या कारकीर्दीचा आढावा प्रदर्शनरूपी दालनात रसिकांना अनुभवायला मिळाला तर रसिकश्रोते धन्य होतील.    

 अशा गदिमांचे स्मारक पुण्यातील महात्मा सोसायटी परिसराजवळ असेल. एक्सिबिशन सेंटर आणि गदिमास्मारक असे या संकुलाचे एकंदर स्वरूप असेल.

एकूण २५ हजार ११० चौरस मीटर आरक्षित क्षेत्रात हे एक्झिबिशन सेंटर आणि स्मारक असणार आहे. त्यातील वास्तू ३ हजार ७२२ चौरस मीटर क्षेत्रफळाची असेल. ही वास्तू तीन मजली असेल.

  यात गीतरामायण, साहित्यदालन, चित्रपटदालन, वैयक्तिक दालन, डिजिटल दालन अशी पाच दालने पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर असतील.

  दुसऱ्या मजल्यावर एक बहुउपयोगी सभागृह असेल. ज्याला जोडून एक भोजनगृह असेल.

श्री सुमित्र माडगुळकर यांनी या स्मारकाची एक छान संकल्पना मांडली आहे. त्यात कलात्मकता, आधुनिकता आणि सोय याचा चांगला मेळ साधला आहे. आशा आहे की प्रस्तावित स्मारकात या सर्व बाजूंचा विचार करून पुण्याची विशेष ओळख सांगणारे असे स्मारक उभे राहिल.

श्री सुमित्र माडगुळकर यांनी केलेल्या सूचना अशा आहेत.

गीत रामायण दालन -

 पहिल्या मजल्यावर गीतरामायण दालन असेल. यात गीतरामायणाची ५६ गीते शिल्पासारखी मोठ्या अक्षरात ग्रॅनाईटवर कोरलेली असावीत. सर्व कलाकारांची नावासकट छायाचित्र असावीत. सुधीर फडके या मूळ गायकाच्या आवाजातील ही गीते ऑडिओ बूथवर ऐकता यावीत, गीतरामायणाचा इतिहास व छायाचित्रे असावीत,रामायणातील काही प्रसंग म्युरल्सच्या स्वरुपात असावेत. गीतरामायणाच्या आठवणी वाचता किंवा ऐकता याव्यात. गीतरामायणाचे अनेक भाषात भाषांतर झाले आहे, ते उपलब्ध असावे. गीतरामायण मराठी व इतर भाषेतील त्याचे भाषांतर याची पुस्तके सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध व्हावीत.   

 साहित्यदालन–

यात गदिमांची सर्व ३७ पुस्तके, गीतगोपाळ डिस्प्लेला असावीत व ती वाचता यावीत.निवडक कवितांची शिल्पे किंवा म्युरल्स काढावीत. गदिमांच्या हस्ताक्षरातील कविता असाव्यात. त्यांच्या आवाजातील भाषणे, कविता ऑडिओ बूथवरुन ऐकता याव्यात. गदिमांच्या पुस्तकांची  ई -बुक्स करावीत. सर्व मराठी नामवंत साहित्यिकांचे फोटो या दालनात असावेत.  

 एक वैयक्तिक दालन, -

हे गदिमांनी वापरलेल्या त्यांच्या वैयक्तिक वस्तूंचे दालन असावे. त्यांच्या वापरतील वस्तु,विविध पुरस्कार, हस्तलिखिते, त्यांच्या आवाजातील कविता व भाषणे, गदिमांवर इथे चित्रपट अथवा डॉक्युमेंटरी पाहता यावी. त्यांच्या १२ वर्षांच्या आमदारकीच्या काळात झालेली त्यांची भाषणे, छायाचित्रे असावीत.  

चित्रपट दालन-

यात गदिमांचे १५७ मराठी व २५ हिन्दी चित्रपट असावेत त्यात, चित्रपटांची सूची, व छायाचित्रे असावीत. चित्रपटाची पोस्टर्स असावीत. चित्रपटा संबंधी मिळालेले पुरस्कार असावेत. चित्रपटा तील गाणी त्यांची निर्मितीची कथा ऑडिओ बुथवर ऐकता यावी. त्या सर्वांच्या CD/DVD/MP3 विक्रीस असाव्यात.

 गदिमा डिजिटल दालन-

गदिमा यांच्यावर चित्रपट व डॉक्युमेंटरी असावी. गदिमा यांची gadima.com ही वेबसाइट अधिक समृद्ध करावी. गदिमांचे चित्रपट या साइटवरून पाहता यावेत. ऑडिटोरियम किंवा कलादालन असावे . 200 ते 300 लोक बसू शकतील असे हे दालन साहित्यिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध व्हावे. आणि मुख्य म्हणजे या स्मारकात वर म्हटल्याप्रमाणे गदिमांचा पुतळा उभारू नये,त्या ऐवजी भव्य पेंटिंग असावे. स्मारकाभोवती सुंदर हिरवळ किंवा बाग असावी. विक्री हा भाग स्मारकाच्या देखभाल खर्चासाठी वापरावा.  

इतका विचार या स्मारकामागे केला आहे. संकल्पनेत दिल्याप्रमाणे हे जसेच्या तसे साकारले गेल्यास एक आदर्श असे हे गदिमा स्मारक महाराष्ट्राची शान वाढविणारे ठरेल यात शंका नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग हा आधुनिक काळात महत्वाचा ठरेल.पर्यटनाचे आणि साहित्यप्रेमींचे हे आकर्षण केंद्र ठरेल.

हे स्मारक नुसते गदिमा यांचेच नाही तर रामायणाचे पर्यायाने प्रभू श्रीरामचंद्राचे स्मारक असेल. ज्या गीतरामायणाने गेली अनेक वर्षे मराठी मनावर राज्य केलय,त्या गीतरामायणाचं गदिमास्मारक ही एक पवित्र, मंगल अशी भारलेली जागा असेल. हे स्मारक पूर्ण व्हायला साधारणपणे

दोन वर्षे लागतील असा अंदाज आहे. जसे बालगंधर्व रंगमंदिर बालगंधर्वांची आठवण करून देतं, तसं हे गदिमास्मारक म्हणजे गदिमा यांची आठवण करून देणारं, पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातलं सोनेरी पान असेल. या स्मारकाची सर्व रसिकश्रोते आतुरतेने वाट पाहत आहेत. ते लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा !

 © ले- डॉ. नयना कासखेडीकर.

                          ---------------------------------        

No comments:

Post a Comment