Sunday 11 April 2021

देशोदेशींच्या पंतप्रधान

  

v पुस्तक परिचय

                                             देशोदेशींच्या पंतप्रधान

       एखाद्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याला लोकांनी निवडून दिले तर ? एक सिनेमा आठवतोय आजचा दिवस माझा’. यात नोकरशाही आणि राजकारण यांच्यातले संबंध व संघर्ष दाखवला आहे. एक दिवस मुख्यमंत्री सामाजिक जाणिवेने निर्णय घेताना दाखविले आहेत. समाजाचं देणं आपण लागतो त्याची फेड आपण कशी करू शकतो याचा विचार करून तो मुख्यमंत्री जे शक्य होईल तेव्हढी चांगली कामे करतो. आणि ज्याला आपल्या देशासाठी आपण काम करणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटत असते तो/ती जर मुख्यमंत्रीच काय पंतप्रधान झाला/झाली तर. केव्हढी कारकीर्द गाजवू शकतो. आणि पंतप्रधानपदी महिला असेल तर. अर्थात असे प्रगत देश असेल तरच घडेल असे आपल्याला वाटेल. पण नाही, जिथे समाजात स्त्रीला स्थानच नसते अशा देशात सुद्धा स्त्रिया पंतप्रधान झालेल्या आहेत.आफ्रिका खंडासारख्या अविकसित देशात सुद्धा देशाचे नेतृत्व स्त्रीने केले आहे. राजकरणात स्त्रीयांचे प्रमाण कमी आहेच. पण 1912 पर्यन्त जवळजवळ 193 देशांपैकी 50 देशांमध्ये पंतप्रधान महिला होत्या.त्यांचा कार्यकाळ अगदी दोन दिवसांपासून ते 15 वर्षांपर्यंत असा होता.

    महिला पंतप्रधान म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येतात आपल्या इंदिराजी ,बेनजिर भुट्टो, मार्गरेट थॅंचर ,चंद्रिका कुमार तुंगा, शेख हासिना, खलिदा झिया इतक्याच आपल्याला माहिती असतात.गोल्डा मायर आणि अँजेला मर्केल, हेलन क्लार्क ही नाव पण ओळखीची आहेत. पण तानसू सिलर,इरिना डिगुटिनी , पोर्शिया ल्युक्रेशिया, सिमन्स मिलर, आयव्हीटा रॅडीकोव्हा आणि अशी आणखी काही नावे महिला पंतप्रधान असलेली कधी वाचली नाहीत. माहिती नाहीत.

अशा 50 महिलांचा परिचय करून देणारं पुस्तक म्हणजे शिल्पा बेळे यांनी लिहिलेले देशोदेशींच्या पंतप्रधान महिला हे पुस्तक. परम मित्र पब्लिकेशनचं हे पुस्तक छान आहे. यात या महिलांचा कार्यकाळ, देश, देशाचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, पक्ष,सरकार पद्धती कोणती, देशाच स्थान कुठे आहे आणि स्वातंत्र्यदिन कधी असतो या छोट्या पण महत्वाच्या माहितीशिवाय त्या पंतप्रधान महिलांची थोडक्यात माहिती दिली आहे. 

यावरून महिलांची राजकीय कारकीर्द किती होती हे लक्षात येते. त्यांचे राजकारणातले पूर्वीचे अनुभव काय होते हे समजते.दक्षिण कोरियाची पहिली महिला पंतप्रधान चॅङ्ग सॅंग . यांना फक्त 20 दिवस कार्यकाल मिळाला. त्या 11 जुलै 2002 ते 31  जुलै 2002 एव्हढा काळ पंतप्रधान राहिल्या. कुणी 4 तर कुणी 6 महीने, कुणी दोन वर्षे, तर कुणी 10 वर्षे किंवा 15 वर्षे सुद्धा पंतप्रधानपदावर राहिल्या.

  एक नाव उल्लेखनीय वाटलं ते म्हणजे अँजेला मर्केल. 2005 सालापासून जर्मनीच्या पंतप्रधानपदी म्हणजे चाँन्सेलर पदी विराजमान झालेल्या पहिल्या महिला.रशियन भाषा येते, क्वांटम केमिस्ट्री मध्ये त्यांची PhD आहे. संशोधक म्हणून त्यांनी काम केले आहे. पुढे लोक्षाहीसाठीच्या चळवळीत भाग घेतला आणि बर्लिनची भिंत पाडल्यावर म्हणजे पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र झाल्यावर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.सर्वात तरुण मंत्री, आधी युवा मंत्री, मग महिला मंत्री आणि मग पर्यावरण व अन्नसुरक्षा मंत्री अशी विज्ञान विषयक कामे त्यांनी केली.खूप बदल घडवून आणले.मंदीतून देशाला बाहेर काढलं, G8 गटाचे नेतृत्व केले. त्यांचं परराष्ट्र धोरण सुधारले. 2011 मध्ये झालेल्या अणुसंकटानंतर त्यांनी जर्मनी मधल्या जुन्या अणुभट्ट्या तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.               

   अँजेला मर्केल मध्य युरोप मधल्या जर्मनी च्या फेडरल रिपब्लिक मध्ये, आजही राजकरणात सक्रिय आहेत म्हणून हे सांगण्याचा प्रपंच. अनेक पुरस्कार मिळवले आहेत. फोर्ब्स च्या यादीत त्या मोस्ट पावरफुल 100 वुमेन म्हणून, 2006 ते 2010 या पाच वर्षात अव्वल स्थानावर होत्या. अँजेला या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ देवाची दूत असा होतो म्हणतात.

असे एकेक महिलांची माहिती थोडक्यात असली तरी आपल्याला नंतर ची माहिती वाचण्याचा व शोधण्याचा छंद लागतो आणि आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडते म्हणून अशी हटके पुस्तके वाचावीत. तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक. लेखिकेने आकाशवणीसाठी गोल्डा मायर यांच्यावर भाषण लिहिता लिहिता पुढे जगातील राजकारणातील, कर्तृत्ववान स्त्रियांच्या माहितीच्या या पुस्तकाचा कसा विचार झाला ते सांगितले आहे. वा! गरज ही शोधाची जननी असते पण शोध असा इंटरेस्टिंग सुद्धा असतो की.

© ले- डॉ. नयना कासखेडीकर

-----------------------------------   

 

No comments:

Post a Comment