आद्य पत्रकार देवर्षि नारद
लहानपणी रोज संध्याकाळी प्रार्थना, श्लोक आणि पाढे म्हणताना सर्व प्रथम गणपती स्तोत्र म्हणायचो. मग मारुति
स्तोत्र, रामरक्षा, इतर प्रार्थना, काही श्लोक, शेवटी पाढे म्हणायचे असे शिस्तीत
ठरलेले असेल ते म्हणावेच लागे. हे सर्व म्हटल्याशिवाय जेवण नाही असा आजोबांचा नियम
असे. त्याचा अर्था काय, ते कोणी लिहिले आहे किंवा असे कुठलेही
प्रश्न त्या वयात पडत नव्हते. फक्त शिस्त पाळायची एव्हढं कळायचं. पण हे सर्व खूप
मोठ्ठं झाल्यावर कळायला लागलं. नारद पुराणात लिहिलेलं हे गणपती स्तोत्र नारद
मुनींनी लिहिलेलं आहे हे कळलं. नारद म्हणजे आम्हाला फक्त पौराणिक चित्रपट किंवा
कथांमधून दिसले आहेत. पण पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेताना चिपळ्या आणि वीणाधारी
नारदांचे एक वेगळे रूप समजले. ते म्हणजे,आद्य पत्रकार नारद
ऋषि. नारायण नारायण !
नारायण नारायण .. असे विणेच्या झंकाराच्या पार्श्वभूमीवर उद्गार
ऐकले की नारद मुनींचा प्रवेश होणार हे लगेच कळायच. जणू काही एंट्रीला may i come in असेच विचारत असतील आणि ज्या लोकांमध्ये एंट्री घेतली ते सर्व लोक साहजिकच
सावध होत असणार. आज पत्रकारांना ओळखपत्र/ अॅक्रिडिटेशन दाखवून प्रवेश घ्यावा लागतो.
देव ऋषि नारद आणि त्यांची
परंपरा -
भगवान
विष्णुंचे परम भक्त, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देवऋषि
नारद. नारद मुख्यत: भक्ति मार्ग प्रवर्तक आणि कीर्तन संस्थेचे आद्य प्रवर्तक मानले
जातात. तरी ते धर्मज्ञ, तत्वज्ञ, राजनीति
तज्ञ आणि संगीतज्ञ होते. ते बृहस्पतीचे शिष्य होते.
आपण
पाहिलेल्या पौराणिक चित्रपटात एका हातात वीणा, दुसर्या हातात चिपळ्या घेऊन, नारायण
नारायण असा उच्चार करणारे, स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक अशा त्रिलोकात मुक्तपणे संचार करणारे नारदमुनि यांच्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची.
यांना सगळं माहिती आहे, सगळीकडे यांचा वावर आहे, देव, दानव आणि मानव यांच्या जगात काय चाललय, हे कसं काय याचं आश्चर्य वाटायचं.
पण त्यांना वरदान मिळालं होतं ते कधीही कुठल्याही लोकांत संचार करू शकत. त्यामुळे ते
सतत भ्रमण करत असायचे. तिथल्या सर्व सूचना आणि बित्तम बातम्या भगवान विष्णुपर्यन्त
पोहोचवायच्या. दानवांच्या कारवायांना आळा
घालायचा, मानवांना दिशा द्यायची आणि देवांना माहिती द्यायची, सल्ला द्यायचा अशी लोककल्याणाबरोबर वार्ता प्रसाराची कामे नारदमुनी करत
असत. शस्त्रांमध्ये त्यांना देवाचे मन असेच म्हटले आहे. म्हणून सगळीकडेच त्यांचं महत्वपूर्ण
स्थान आहे. देवतांप्रमाणेच दानवांनी पण नारदांचा नेहमीच आदर केला आहे. भगवान श्रीकृष्णांनी
सुद्धा हे महत्व मान्य केल्याचं भागवत पुराणात सांगितलं आहे.
त्यांच्यात
देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय होता असे म्हणतात. या तिन्ही लोकांत समन्वय
साधायचा हे ही कार्य ते करत. म्हणून त्यांना आद्य पत्रकार म्हटले जाते. अध्यात्म, राजनीती, धर्म
शास्त्र, यज्ञ प्रक्रिया, संगीत अशा
अनेक विषयांचे त्यांना ज्ञान होते. त्यांना भूतकाळ, वर्तमानकाळ
आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांचे ज्ञान होते. देव आणि माणूस यांच्यातला दुवा
म्हणजे नारद मुनि होते. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार
युगातही नारदमुनि देव व मानव यांच्यातील संवादाचे माध्यम होते. त्यांनी वार्ता
प्रसारित करताना सद्गुणांची कीर्ती सांगणे हे काम हेतुत: केले. मुख्य म्हणजे खडानखडा
माहिती नारदांना असायची.
लोकांना न्याय मिळवून देण्याचीच त्यांची भूमिका
असयची. पृथ्वी आणि पाताळ लोकातील भक्तांची खरी भक्ति भगवान विष्णु पर्यन्त पोहोचविणे, त्यांना न्याय मिळेल असा प्रयत्न करणे, लोकांवर होणार्या अन्यायाची माहिती देवांपर्यंत पोहोचविणे असे काम नारद करत
असत. याचं आपल्याला माहिती असणारं उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद,ध्रुव बाळ आणि अंबरीश यांच्या कथा. नारद मुनींनी या सर्वांचं
म्हणणं अनेक वेळा नारायणापर्यन्त पोहोचविले होते. त्यांना न्याय मिळवून देण्यात मदत
केली होती. एव्हढच नाही तर, दु:खी दरिद्री लोकांचे दु:ख निवारण
करणे, दुष्ट, अभिमानी, लोभी आणि भ्रष्टाचारी लोकांचा नायनाट करण्याचे उपाय पण ते सांगत.
हिन्दी
पत्रकारितेच्या विश्वात पहिले हिन्दी वृत्तपत्र ‘उदंत मार्तंड’ हे जुगलकिशोर सुकुल यांनी
३० मे १८२६ रोजी साप्ताहिक स्वरुपात सुरू
केले. त्यावर पहिल्या पानावर नारदांचा उल्लेख असे.
नारदमुनी ऋग्वेदातील एक सूक्तकार म्हटले जातात.
त्यांच्या ठिकाणी देवत्व आणि ऋषित्व यांचा समन्वय झालेला होता म्हणून त्यांना देवर्षी
म्हणतात. असं म्हणतात की वायु पुराणात एकूण आठ देवर्षी असल्याचा उल्लेख आहे, त्यापैकी नारद हे अग्रगण्य आहेत. देवर्षी नारद
यांच्याबद्दल अनेक पुराण ग्रंथात माहिती आहे. नारद पुराण हे नारदांनी रचलेले पुराण आहे . अठरा
पुराणांमद्धे हे पुराण सर्व श्रेष्ठ मानले गेले आहे.
देवर्षी नारद समजले
की त्यांचं कार्य समजेल आणि त्यांना विश्वातला पहिला पत्रकार आणि पत्रकारीतेतला आदि
पुरुष का म्हटलं आहे ते कळेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकारिता क्षेत्राला
संबोधले जाते, जे स्थान दिलं
जातं, तसेच भारतीय देवतांमध्येही ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या नंतर नारद यांचंच स्थान आहे.
देवर्षी नारद यांची
गुण वैशिष्ठ्ये लक्षात घेतली तर आजच्या पत्रकारांचीच ती वैशिष्ठ्ये आहेत हे लक्षात
येते म्हणूनच हे गुण कोणते आहेत हे आजच्या पत्रकारिता क्षेत्रात काम करणार्यांनी समजून
घ्यायला हवेत. सर्वत्र संचार करता करता तिथल्या घटनांनी आपलं ध्येय विचलित होऊ न देता
पत्रकाराने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. सतत सत्याचा शोध घेतला पाहिजे, चौकस
दृष्टी, निरीक्षण शक्ति, जिज्ञासा, संवाद कौशल्य, बहुश्रुतता, याबरोबरच
मैत्री आणि वैर बाजूला ठेवून सत्य, न्याय आणि वस्तुनिष्ठता आंगीकारली पाहिजे. पत्रकारिता करताना ती प्रामाणिकपणे
केली पाहिजे, निर्भयपणे केली पाहिजे.
त्यासाठी आज वर्तमानाचे भान ठेवणे, समस्या माहित असणे, संबंधित विषयाचे मूलभूत ज्ञान असणे, आपल्या जीवन मूल्यांची ओळख असणे आणि महत्वाचं म्हणजे आपली परंपरा, आपले प्राचीनत्व, आपली संस्कृती काय आहे याचही ज्ञान असणे आवश्यक आहे, आपल्या मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा माहिती असणेही आवश्यक आहे. असे सर्व विशेष गुण नारद यांच्यामध्ये होते. आजच्या पत्रकारितेत काम करणार्या सर्व नव पत्रकारांनी /विद्यार्थ्यानी या नारद जयंती निमित्त ‘नारद- एक पत्रकार’ म्हणून समजून घ्यावेत आणि पत्रकारिता एक व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून न करता एक ध्येय म्हणून करावी, मग नक्कीच माध्यमांचे चित्र पालटेल .
- डॉ. नयना कासखेडीकर,पुणे
----------------------------------------------
No comments:
Post a Comment