Monday 6 June 2022

स्वराज्य ७५ - लेखमाला - 'राष्ट्रीय कवी' (१९०१ ते १९४७ )



स्वराज्य ७५ - लेखमाला

राष्ट्रीय कवी (१९०१ ते १९४७ )



                                    नमस्कार ,स्वराज्य ७५ या लेखमालेच्या निमित्ताने -

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही. त्यासाठी हिंदुस्थानातील जनता अनेक पातळीवर , हजारो वर्ष लढली आहे. सुरूवातीला पोर्तुगीज, डच, फ्रेंच पाठोपाठ इंग्रज यांच्या बरोबर लढा दिला.  स्वातंत्र्याची चळवळ सामान्य  जनतेची चळवळ होती. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी मिळून बलाढ्य अशा वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याला शरणागती पत्करायला लावली. म्हणून जगाच्या इतिहासात या लढ्याला महत्वाचे स्थान आहे. हा लढा समाप्त झाला तो १५ ऑगस्ट१९४७ ला.  स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात व  प्रमुख घटना बघितल्या तर हिंदुस्थानच्या जनतेने वर्षानुवर्षे काय काय आणि किती भोगले होते याची कल्पना येते. साहजिकच याचे पडसाद केंव्हातरी उमटणारच होते. 

        १७५७ मध्ये  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल मध्ये प्लासीची लढाई जिंकली आणि स्वत:चे साम्राज्य उभे केले त्यांच्या साम्राज्याच्या विरोधातले आंदोलन जवळ जवळ १८६ वर्षे चालले होते.

 कंपनी सरकारचा कालखंड १७५७ ते १८५८ होता आणि ब्रिटिश साम्राज्याचा पुढे कालखंड १८५८ ते १९४७ असा होता. १८५७ चा लढा हे पहिले संघटित आंदोलन होते.

        त्यानंतर च्या घटना होत्या १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना, १९०५ मध्ये बंगालचं  विभाजन, वंगभंग आंदोलन, लाल बाल पाल यांचा सहभाग, १९१५ मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन, पुढे खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन, चौरीचौरा  कांड, आझाद हिंद सेना स्थापना, भारत छोडो आंदोलन,१९४२ ची ऑगस्ट क्रांती आणि १९४७ला विभाजनाच्या दु:खात भारत स्वतंत्र झाला.

      मराठी मुलूखात इंग्रजी राजवट इ .स. १८१८ मध्ये सुरू झाली. ब्रिटिश राजवटीचा सर्वच क्षेत्रात समाजाला त्रास होऊ लागला. इंग्रजी शाळा आणि इंग्रजी शिक्षण यामुळे हिंदू संस्कृतीवरच घाला घालणारे वातावरण तयार होत होते. हिंदू लोकांचे ख्रिस्त धर्मात धर्मांतराचा समाजावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. गुलामगिरी, पिळवणूक, व्यापारांचे खच्चीकरण, हस्तव्यवसायाचा नाश, अशा अनेक बाजुंनी हिंदू समाज भरडला जात होता. त्या वेळचे समाज सुधारक वृत्तपत्रातून या राजवटीवर कोरडे ओढत होते. क्लेश देणार्‍या घटनांचं प्रतिबिंब साहित्यातून पण उमटत होतं.

     विद्वान, पूरोहित, पंडित, मौलवी, लेखक, कलावंत, जमीनदार, शेतकरी, कारागीर असे सर्वजण ब्रिटिश सरकारच्या विरोधात गेले. अनेक जण यात सामील होऊ लागले. घरादारचा त्याग केला. कोणी फकीरी पत्करली. बहादुर स्वातंत्र्य विरांनी रणांगणात उडी घेतली. यात शाहीर आणि अनामिक कवी अग्रेसर होते.या काळात शाहीरांच्या आणि कवींच्या काव्य रचनांनी मोठी कामगिरी बजावली. त्यांच्या गीतांनी लोकांवर संस्कार केले. स्वातंत्र्याच्या भावनेने भारावून जाऊन आपणही काहीतरी केले पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले. लोकांना सकाळपासूनच स्वातंत्र्याची आठवण करून देऊन त्यांच्या मनात ही ज्योत पेटवण्याचे काम प्रभात फेर्‍यांची गीते करू लागली होती. एखादे गीत असे – साखरझोपा कसल्या घेता राष्ट्र जळत असता?’ प्रभात फेरीतले पहाटेच हे गीत ऐकून लोकांच्या खरचच झोपा उडत असत.

    यातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध  जनमत तयार करण्यासाठी व जागृती करण्यासाठी अनेक साहित्यिक कवी यांनीही आपली लेखणी चालवली होती. अशा कवींची ओळख सर्व वाचकांना व्हावी, विद्यार्थ्यांना व्हावी, पालकांना व्हावी आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील काळात घडलेला इतिहास या काव्यातून कळावा म्हणून ही स्वराज्य ७५ - राष्ट्रीय कवी मालिका लिहिण्याचं प्रयोजन. गेल्या वर्षी स्वामी विवेकानंद मालिकेचे आपण सर्वांनी भरभरून स्वागत केलंत, तसच आपण सगळे या विषयाचं स्वागत कराल अशी आशा करते.यात १९०१ ते १९४७ या पन्नास वर्षांच्या काळातल्या कवींचा आढावा घेतला आहे.

© डॉ. नयना कासखेडीकर.  

-----------------------------

No comments:

Post a Comment