‘स्वराज्य
७५’ लेखमाला
स्वातंत्र्यपूर्व
काळातील राष्ट्रीय कवी
लेखन – डॉ.नयना कासखेडीकर
लेखांक - १५
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
(माणिक बंडोजी इंगळे)
(१९०९ ते १९६८)
मनी नाही भाव म्हणे देवा
मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे... असा भक्तीभाव जागवणारे आणि
राजास जी महाली सौख्ये कधी
मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली या
झोपडीत माझ्या || ‘या झोपडीत माझ्या’ ही कविता लिहिणारे तुकडोजी महाराज यांनी अनेक मराठी व हिन्दी भाषात काव्य
रचना केल्या आहेत. .
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा ||
गावची भंगता अवदशा | येईल देशा
|| ग्रामगीता.
गावागावातले लोकनेतृत्व
लोकांच्या कल्याणासाठी, शांतता आणि सौहार्दासाठी काम करण्याचे ठरवून नेतृत्व करत असते. आज लोक
कल्याण हा उद्देश बाजूला सारून प्रत्येक गोष्टीत राजकारण करून अशांतता निर्माण होत
आहे. गावची समृद्धी, शांतता आणि विकासाला हे मारक ठरत आहे.
हेच संत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेत सांगून ठेवले आहे. सामाजिक
बंधुभावाचे महत्व सांगणारे त्यांचे गीत सर्वांना माहिती आहे
या भारतात
बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व
पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे ||
दे
वरचि असा दे ||
हे सर्व पंथ - संप्रदाय एक दिसू दे ।
मतभेद नसू दे ।।धृ।।
नांदोत सुखे गरिब-अमिर एकमतानी ।
मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी ।
स्वातंत्र्य सुखा या सकलांमाजि वसू दे ।
दे वरचि असा दे ।।१।।
सकळांस कळो, मानवता, राष्ट्रभावना
।
हो सर्वस्थळी मिळूनि, समुदाय-प्रार्थना ।
उद्योगि तरुण वीर, शीलवान दिसू दे ।
दे वरचि असा दे ।।२।।
हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही ।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी ।
खळ-निंदका-मनीही, सत्य न्याय वसू दे ।
दे वरचि असा दे ।।३।।
सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी ।
ही नष्ट होऊ दे विपत्ति, भीती बोहरी ।
तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसूदे ।
दे वरचि असा दे ।।४।।
त्यांची
सहज आणि सोप्या शब्दातली गाणी लोकांच्या हृदयाला भिडत. खंजिरीच्या तालावर जीवनाचं वास्तव
सांगणारी, शिक्षण देणारी रचना हे त्यांचा वैशिष्ट्य होतं.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या संतांच्या काळची सामाजिक परिस्थिति
वेगळी होती. मात्र तुकडोजी महाराजांच्या काळात देश पारतंत्र्याच्या जोखडाखाली
पिचून गेला होता. त्यांच्या भजनात राष्ट्रीय ऐक्य,
स्वातंत्र्य, विषमता, दु:ख हेही विषय
असायचे. त्यांनी सुरूवातीला ‘तुकड्यादास’ या नावाने काही रचना लिहिल्या. त्यांच्या रचनांमध्ये सामाजिक परिस्थितीचे
चित्रण असायचे. आपल्या देशाचे ‘सुजलाम सुफलाम’ चित्र त्यांनीही रंगविले होते.
१९३५ साली नागपूरजवळील मोझरी गावांत त्यांनी ‘गुरुकुंज आश्रम’ स्थापन केला. त्यांनी
ग्रामीण पुन:र्निर्माणाचे मूलभूत व रचनात्मक
काम हाती घेतले.
तरुण व्यसनांकडे वळू नयेत म्हणून ते भाषणातून प्रबोधन करत
असत .हे करता करता त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात पण भाग घेतला. १९३० मध्ये त्यांनी
वैयक्तिक सत्याग्रह केला. १९३६ मध्ये त्यांना महात्मा गांधी यांनी सेवाग्रामला
बोलवले. इथे त्यांचा परिचय पंडित नेहरू , डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याशी झाला.
स्वातंत्र्यलढ्याची चळवळ त्यांनी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविली. १९४२ च्या
स्वातंत्र्यलढ्यात त्यांची प्रेरणा महत्वाची ठरली. चिमुर, आष्टी व बेनोडा यातील चळवळीचे ते प्रेरणास्थान होते.
बोल बोल बा
! बोल भारता ! चिंतातुर का असा ?
हाल-बेहाल
तुझी लालसा ॥धृ॥
स्वातंत्र्याच्या
उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी ।
सोडुनी आज
दशा का अशी ?
॥
छोडो भारत या
आंदोलनात त्यांनी सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांतून चळवळीबद्दल लोकांचे
प्रबोधन केले. ‘आते है नाथ हमारे..’
या सारखं पद स्वातंत्र्य लढ्यातलं स्फूर्तीगान ठरलं होतं . अनेक स्फूर्तिदायक
गीतातून त्यांनी लोकांना संदेश दिला. यावेळी अंदोलना दरम्यान त्यांना चंद्रपूरला
अटक करून नागपुर व रायपूर येथील तुरुंगांत १०० दिवस ठेवले होते. तुरुंगातून
सुटल्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीचे काम हाती घेतले. जपान मध्ये झालेल्या विश्व
धर्म परिषदेत त्यांनी म्हटलेले ,
हर देश मे तू, हर भेष मे तू, तेरे नाम अनेक,तू
एकही है |
तेरी रंगभूमी यह विश्वंभरा.सब खेलमें मेलमें तू ही तो है | हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते.
महात्मा गांधी, डों. राजेंद्रप्रसाद आदींनी त्यांच्या या कामाची वाखाणणी केली व गौरव
केला. एका भव्य कार्यक्रमात देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी
“...आप संत नही, राष्ट्रसंत है” असे सद्गदित होऊन उद्गार
काढले आणि तुकडोजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देऊन गौरविले. तेव्हापासून ते लोकांना ‘राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज’ म्हणून माहीत झाले. आवेशपूर्ण भावनांनी
ओतप्रोत भरलेले व मनाचा ठाव घेणारे त्यांचे ‘खंजिरीभजन’ हा वैशिष्ठ्यपूर्ण व परिणामकारक उदबोधनाचा प्रकार ठरला.
१९४५ चा बंगालचा दुष्काळ, १९६२ चे चीनचे आक्रमण, १९६५ मधील पाकीस्तानबरोबरचे
युद्ध, (या दोन्ही युद्ध प्रसंगी त्यांनी सीमेवर जाऊन
सैन्याला धीर देण्यासाठी वीरगीते गायली होती.) १९६२ मधील कोयनाचा भूकंप अशा विविध
राष्ट्रसंकटाच्या वेळी त्यांनी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत केली.त्यांनी
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतला होता.
भू-दानाची, धन-दानाची, क्रांती
सफल करण्यास चला ।
भू-दानाची,
धन-दानाची, क्रांती सफल करण्यास चला
।
चला
विरांनो ! गुणी-जनांनो ! सकळा झाला मार्ग खुला ।।धृ।।
आपुली ही मालकी
सोपवा, भूमीची धन-मालाची ।
करा
कार्य मग निस्पृहतेने, पर्वा कसली
कोणाची ? ॥१॥
सगळ्यांसाठी
आपण म्हणुनी, आपणासाठी सर्व असे
।
हवे
तसे घ्या, मागा समजुनी,
जनतेचे कल्याण कसे ? ॥२॥
मीच
नव्हे मम देश सर्व मी ही जाणिव सर्वात करा ।
तुकड्यादास
म्हणे यासाठीच
स्वराज्य आले घराघरा ।।३॥
-मुंबई
दि. २८-०७-१९५३
मराठे शूर - वीरांनो ! निकामा स्वस्थ का बसला ?
मराठे शूर-वीरांनो ! निकामा स्वस्थ का
बसला?।
धैर्यबल खोवुनी सगळे, भिकारी दास का झाला?।।धृ ।।
बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा ।
शिवाजी शिवबा म्हणताना,रायगडी छत्रपती झाला ।।१।।
कधी शिवला न भीतीला, रंगला राजनीतीला ।
म्हणे दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला ।।२।।
गर्जला सिंह जणु धावे, मिळविला तोरणा किल्ला ।
राष्ट्रिचे दास्य खंडूनी, सुखी केले जना
सकला ।।३।।
शोभते का तुम्हा ऐसे, तयाचे वंश
म्हणवोनी? ।
प्राण द्या राष्ट्र-सेवेला, भितीने भ्याड का झाला ?
।।४।।
अहो ! मरणे अणि जगणे, दोन्हिही सारखे आपणा ।
तो तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या आपुला ।।५।।
------------
स्वातंत्र्य भारती आले आळशा !
स्वातंत्र्य भारती आले आळशा ! ऊठ जागोनी ॥धृ०॥
उजळले भाग्य देशाचे का राहशी तू झोपूनी ?
आनंद मनी ना मावे गर्जती चहू बाजूंनी ।
गांधीच्या जयजयकारे ही दुमदुमली रे अवनी ।
( अंतरा )स्वातंत्र्य मिळुनि
देशाला । जाहले वर्ष किती त्याला।
हा विजय शांतीचा झाला ।
लाग लाग तुही कामी आळशा ! ऊठ जागोनी ॥१॥
या प्रिय स्वातंत्र्यासाठी जाहले किती बलिदान ।
लागले भिकेला कांही धन मान सर्व सोडून ।
कष्टला देशची सारा नच वस्त्र मिळेना अन्न ।
( अंतरा ) गेले ते दिवस दुःखाचे
। असतिल ते जातिल साचे I
अति प्रेम कार्या नेत्यांचे ।
हो सज्जचि तू सजवोनी आळशा ! ऊठ जागोनी ॥२ ॥
या समाज - शिक्षेसाठी लागले कामी सरकार ।
किति गावी केंद्रे खुलली करितात प्रौढ सत्कार ।
जनतेत सभ्यता यावी हा विचार त्यांचा थोर ।
( अंतरा ) उद्योगि खेडि करण्याला
। बलवान तरुण बनण्याला
सौंदर्य कला शिकण्याला ।
उघडले नेत्र सर्वांनी आळशा ! ऊठ जागोनी ॥३॥
एक जात मानवतेची ही देशाची अभिलाषा ।
नच भिन्न पंथ देवादी नच भिन्न वेष आणि भाषा ।
सर्वांची हो समदृष्टी नच राव - रंक ही आशा ।
( अंतरा ) देशाचा सर्व पसारा ।
पुरुष हा कार्य करणारा ।
कर्तव्य - फळे घेणारा ।
तुकड्याची हाक घे कर्णी आळशा ! ऊठ जागोनी ॥४॥
भारत माता की जय !
© डॉ. नयना कासखेडीकर
No comments:
Post a Comment