‘स्वराज्य ७५’ लेखमाला
स्वातंत्र्य पूर्व काळातील राष्ट्रीय कवी
लेखन – डॉ.नयना कासखेडीकर
कवी केशवसुत( कृष्णाजी केशव दामले)
(१८६६ ते१९०५)
आधुनिक मराठी कवितेचा जन्म केशवसुतांपासूनच झाला असे मानले जाते. लौकिक जीवन हा त्यांच्या कवितेचा विषय असे पण त्याबरोबरच वैयक्तिक भाव भावना हे ही विषय असत. तसेच भोवतालचा समाज. त्यातील घडणार्या घडामोडीसुद्धा त्यांचे कवितांचे विषय बनले, तेंव्हा पासून राष्ट्रीय कविता म्हणजे कवितेत राष्ट्रीय भावना यायला लागल्याचे दिसते. केशवसुत यांच्या कवितेत राजकीय परिस्थितीचे चित्रण येत असे. तसे इतर कवींच्याही कवितेत ते येऊ लागले. केशवसुत यांनी काव्यलेखनास विद्यार्थीदशेतच सुरुवात केली. त्यांचा काव्यकाळ १८८५ ते १९०५ आहे. ते नागपुर येथे असताना त्यांचा रेव्हरंड ना.वा. टिळक आणि कवी वसंत यांच्याशी संबंध आला. त्यांनी नवी अभिरुचि निर्माण करणार्या कविता लिहिल्या त्याचबरोबर निसर्गाविषयी आणि प्रेमाविषयीही कविता लिहिल्या आणि नंतर क्रांतिकारक सामाजिक विचार देणार्या कविता लिहिल्या. त्याचे उद्दिष्ट्य होते स्वातंत्र्य समता, बंधुता आणि विशाल मानवतावाद. या कविता म्हणजे तुतारी(१८९३ ), नवा शिपाई (१८९८ ) आणि गोफण केली छान(१९०५). चौदा ओळींचा इंग्रजी साहित्यातला ‘सॉनेट’ काव्यप्रकार केशवसुत यांनी मराठीत ‘सुनीत’ नावाने लोकप्रिय केला.
आधुनिक मराठी
काव्याबद्दल समीक्षक रा.श्री.जोग म्हणतात ‘मराठी कवितेत सामाजिक सुधारणांविषयी नवीन दृष्टी त्यांच्या
काव्यात दिसते. कवी केशवसुत यांनी १३२ कविता लिहिल्या. त्यापैकी १५ कविता
राष्ट्रीय आणि सामाजिक विषयासंबंधी आहेत. ते पुण्यात असताना १८८५ ते १८९० काळात
निबंधमाला, केसरी, सुधारक या
वृत्तपत्रात केलेल्या काव्य लेखनामुळे आणि येथील वातावरणामुळे त्यांना राष्ट्रीय
स्वातंत्र्य व समाज सुधारणेचा ध्यास लागला होता. तुतारी, नवा
शिपाई, स्फूर्ती, मूर्तीभंजन, गोफण केली छान, अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न, मजुरावर उपासमारीची पाळी, एका भारतीयाचे उद्गार यात
केशवसुत आपला प्रक्षोभ व्यक्त करतात. त्यांची ‘तुतारी’ ही कविता सामाजिक क्रांतिचे स्तोत्र ठरली आहे असे म्हटले जाते. ते
त्यांच्या कवितेत राष्ट्रवादाबरोबर समाज, बंधुभाव, मानवता या मूल्यांचा पुरस्कार करतात. आपले राष्ट्र फक्त स्वतंत्र न होता
ते बलसंपन्न आणि समतेच्या विचाराने एकत्र आले पाहिजे असा विशाल विचार ते कवितेत
मांडतात. त्यांची ही कविता स्फूर्ती
स्फूर्ती
काठोकाठ भरु
द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !
अमुच्या भाळी
कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते
खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
सोमाचा रस
वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू
द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
पद्यपंक्तीची
तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या ! (मुंबई, २३ मे १८९६)
----------------------------
त्यांची दुसरी
कविता- तुतारी
तुतारी
त्यांच्या काव्यावर क्रांतिकारक विचार, स्वातंत्र्यवाद आत्मनिष्ठा यांचा
प्रभाव होता.
एका भारतीयचे उद्गार
भारत माता की जय
- डॉ.नयना कासखेडीकर
----------------------------
No comments:
Post a Comment