Thursday, 9 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-गोविंदाग्रज

 

स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ३

 

गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

 (१८८५ ते १९१९)


 
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हटले जाते, एव्हढे त्यांचे साहित्य विशेष पैलू असणारं आहे. कविता, विनोदी कथा, नाटक असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. गोविंदाग्रज  या टोपण नावाने त्यांनी सुमारे दीडशे कविता लिहिल्या. तर बाळकराम या नावाने विनोदी लेख लिहिले. एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही नाटके आणि राजसंन्यास व वेड्यांचा बाजार ही दोन (अपूर्ण) अप्रतिम नाटके लिहिली. त्यातील सिंधु, सुधाकरघन:श्याम, तळिराम आणि लतिका ही पात्रे नाटकांप्रमाणेच अजरामर झाली आहेत. त्यांचे लिखाण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, अलंकारिक भाषा, उच्चप्रतीच्या कल्पना, पल्लेदार संवाद असे आहे. त्यांनी नाट्यछ्टेपासून संवाद, विडंबन, नाटके, कविता, दीर्घकाव्य असे मुक्तछंद व छंदबद्ध लिखाण केले. ते विनोदी लेखन बाळकराम या टोपण नावाने तर  काव्य लेखन गोविंदाग्रज या टोपण नावाने करत. उच्च अभिरुचि निर्माण करणार्‍या त्यांच्या लेखनामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना भाषाप्रभू ही उपाधी दिली होती.

     त्यांचा वाग्वैजयंती हा एकमेव काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यात १३६ कविता आहेत. १३ कविता अप्रकाशित आहेत. त्यांच्या कविता विशेषत: प्रेम कविता आहेत. त्यांना प्रेमाचे शाहीर म्हटले जायचे. त्यांनी चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पानांची दीर्घ कविता लिहिली. त्यांनी जे विनोदी लेखन केले ते संपूर्ण बाळकराम या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहे . ते उच्च अभिरुचि असणारे, हास्यरसाची निर्मिती करणारे लेखन आहे. लहान मुलांसाठी त्यांनी चिमुकली इसापनीती हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही जोडाक्षर नाही. तर सकाळचा अभ्यास म्हणून एक एकांकिका पण त्यांनी लिहिली. त्यांचे स्फुट लेखनही बरेच आहे. 

      लोकमान्य टिळक स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्लंडला गेले तेंव्हा गोविंदाग्रजांनी लोकमान्य टिळकांना उद्देशून भारत वर्षाचा आशीर्वाद  हे काव्य लिहिले होते, ते असे-

 लोकमान्यांस भारतवर्षाचा आशीर्वाद !

(लो. टिळक स्वराज्याच्या मागणीसाठी इंग्लंडला गेले त्या दिवसाकरिता )
अमृतसिध्दि हा योग मंगलचि जग सगळे गाय ॥
''महाभाग जन ! सुखं गम्यतां पुनर्दर्शनाय ॥''
जें जें नश्वर गेलें निघुनी काळाच्या पाठी ॥
अमृत तेवढें उरलें केवळ या दिवसासाठी ॥
अंधाराची वाट कंठिली फिरलों संकष्टी ॥
चार युगांची रात्र भोगिली यी दिवसासाठी ॥
रोज उगवला, रोज परतला, होउनि बहु कष्टी ॥
आनंदे रवि आज उगवला या दिवसासाठी ॥
दक्षिणसागार होउनि घटिकापात्र निरभिमान ॥
मोजित होता या दिवसांचे मंगल घटिमान ॥
पहिला पहिला किरण पहाया या शुभ दिवसाचा ॥
गंगासिंधू धांवत होत्या आंदोलित हृदया ॥
या दिवसाच्या या सूर्याला अर्घ्योदक द्याया ॥
स्वस्ति वाचना सिंहगडावर चढला गगनांत ॥
थरथरुनी श्री तानाजीचा तो तुटका हात ॥
मंगल हृदया बघे पांचही करुनि प्राण गोळा ॥
पंजाबी सिंहाचा दुसरा फुटकाही डोळा ॥
व्यासवाल्मिकीकालिदास कवि आळवीत बसले ॥
या दिवसाच्या भूपाळीस्तव वाङ्मय ते तसलें ॥

योगिवृंदगिरिकंदरि बसुनि लावूनि अवधान ॥
पाहत होते या दिवसाचें चिन्मंगल ध्यान ॥
आर्यभट्ट मिहिरादि काढुनी गगनाचा ठाव ॥
हुडकित होते या दिवसाचें चिन्मंगल ध्यान ॥
आर्यभट्ट मिहिरादि काढुनी गगनाचा ठाव ॥
हुडकित होते या दिवसाचें एकरास नांव ॥
सोरठचा श्री सोमनाथही या दिवसासाठी ॥
पडे त्रिस्थळीं फुटुनि लागतां महंमदी काठी ॥
तिष्ठत अठ्ठावीस युगांवर भीमेच्या कांठी ॥
खडा पहारा पांडुरंग करि या दिवसासाठीं ॥
अठरा पद्मे सेना योजुनि जलधीच्या पाठीं ।.
श्रीरामांनी सेतु जोडिला या दिवसासाठी ॥
अठरा अध्यायांची गीता एक मुक्तकंठी ॥
रणीं गाइली श्रीकृष्णांनी या दिवसासाठीं ॥
फितुरगडावर आग लागली या दिवसासाठीं ।
पानपतावर रक्त सांडलें या दिवसासाठीं ॥
पोट बांधुनी वेद राखिले सरस्वतीकांठी ॥
पुण्याई ती सर्वहि केवळ या दिवसासाठीं ॥
जन्मा येतो बाळ टिळकहि या दिवसासाठीं ॥
जन्मति श्रीमान् पंचम जॉर्जहि या दिवसासाठीं ॥

तहनाम्यावर सही घालितां करि खालीं मान ॥
दुसरा बाजीराव बघे वर धरुनी अभिमान ॥

न लगे दौलत, न लगे बरकत, नको कोहिनूर ॥
स्वदेश न लगे स्वराज्य न लगे हो सर्वहि चूर ॥
एक सांगणें एक मागणें तेंच लाखबार ॥
'' मागुनि घ्यावी श्रीशिवबांची भवानि तलवार ॥
स्वदेशभूषा, स्वराज्यजननी सकाळें दाखवावी ॥
दावित दावित सौभाग्यश्री स्वदेशिं आणावी ॥
चहुं मुलखांतुनि नव खंडांतुनि मिरवित आणावी ॥
रायगडावर समाधिची मग पूजा बांधावी ''
म्हणेल जो तो ऐन जिवाचा देशभक्त कट्टा ॥
सर्वस्वाचा ताम्रपटचि तो, तोच अमरपट्टा ॥
(अपूर्ण)

     महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पोवाडा सदृश एक मोठी कविता पानपतचा फटका लिहिली.हा सर्व काळ राजकीय स्थित्यंतराचा काळ होता. गडकरींचा त्यांचा उमेदीचा काळ टिळक युगाने भारलेला होता. त्यांची आणखी एक कविता महाराष्ट्राचे गौरवगान करणारी सुप्रसिद्ध आहे.

श्री महाराष्ट्र देशा कविता, 

मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ धृ. ॥

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा ।
अंजनकांचनकरवंदीच्या कांटेरी देशा ॥
भावभक्तिच्या देशा, आणिक बुध्दीच्या देशा ॥
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ॥
ध्येय जें तुझ्या अंतरी
निशाणावरी
नाचतें करीं ॥
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्यासी
वैभवासि वैराग्यासी ॥
जरिपटक्यासह भगव्या झेंडयाच्या एकचि देशा ॥
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥ १ ॥

 (राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज)

------------------

पानपतचा  फटका (पहिले आणि शेवटचे कडवे)

 कडवे पहिले-

कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥धृ॥

जासुद आला कधी पुण्याला – “शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहाने शिर चरणाने उडवुनि तो अपमानियला ।
भारतवीरा वृत्त ऐकता कोप अनावर येत महा
रागे भाऊ बोले, “जाऊ हिंदुस्थाना, नीट पहा.
काळाशी घनयुद्ध करू मग अबदल्लीची काय कथा?
दत्ताजीचा सूड न घेता जन्म आमुचा खरा वृथा.
बोले नाना, “ युक्ती नाना करुनी यवना ठार करा;
शिंद्यांचा अपमान नसे हा; असे मराठ्यां बोल खरा.
उदगीरचा वीर निघाला; घाला हिंदुस्थानाला;
जमाव झाला; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे;
वृद्ध बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसे.
होळकराचे भाले साचे, जनकोजीचे वीर गडी,
गायकवाडी वीर आघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्ये धीर धरी;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळे अंतरी विंचुकरही त्याचपरी;
नारोशंकर, सखाराम हरि, सूड घ्यावया असी घरी.
अन्य वीर ते किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासाते घेति सवे,
सूड ! सूड !! मनि सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवे.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे.
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥1

           

            |   कडवे शेवटचे |     

 जे झाले ते होउनि गेले फळ नच रडुनी लेशभरी;
मिळे ठेच पुढल्यास मागले होऊ शहाणे अजुनि तरी.
पुरे पुरे हे राष्ट्रविघातक परस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करिता मरण मराठी राज्याला.
हा हिंदू, हा यवन, पारशी हा, यहुदी हा भेद असा
नको नको हो ! एकी राहो ! सांगु आपणां किती कसा ?
एक आइची बाळे साची आपण सारे हे स्मरुनी,
एकदिलाने एकमताने यत्न करू तद्धितकरणी.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥8

- गोविंदाग्रज 

 

भारत माता की जय !

     डॉ.नयना कासखेडीकर 

------------------------------------------

No comments:

Post a Comment