Sunday 12 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-कवी दु.आ.तिवारी

 

 स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ४

कवी दु.आ.तिवारी ( दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी)

( १८८७ ते १९३९)

दू आ तिवारी जळगाव जिल्ह्यात ल्या शेंदुर्णी गावी स्थायिक झालेले, पण मूळ उत्तर प्रदेशातले रायबरेलीचे होते.लहानपणापासूनच त्यांना मराठ्यांच्या इतिहासाचे आकर्षण होते. त्यातूनच त्यांना काव्य करण्याची प्रेरणा मिळत असे.   

तिवारी यांचे शिवराज भूषण हे कवी भूषणकृत हिन्दी अलंकारिक ग्रंथाचे मराठी रूपांतर आहे.  हे किरण काव्यमालेतला दहावा भाग – किरण  हे एप्रिल १९३१ ला जळगाव येथे श्रीकृष्ण प्रेसने छापले. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्राम गीते या पुस्तकावर केलेल्या परीक्षणात संपादक ग.त्र्य. माडखोलकर यांनी म्हटले आहे की, “मराठ्यांच्या इतिहासातील उदात्त किंवा अद्भुत प्रसंगावर इतकी कवणे महाराष्ट्रातील दुसर्‍या कोणत्याही कवीने लिहिलेली नाहीत, त्या दृष्टीने तिवारी यांनी हि वीर रसपूर्ण संग्राम गीते लिहून केवळ मराठी  वाङ्गमयाचीच नव्हे तर मातृभूमीची स्पृहणीय सेवा केली आहे.     

काव्य कुसुमांजली (१९१६), काव्यरत्नमाला (१९२०) , मनोहर लीला (१९२०) (खंडकाव्य), महाराणा प्रताप सिंह( १९२६ ,पूर्वसूरींची आठवण करून देणारं ओजस्वि काव्य), मान्याची यमुना(१९२६),नंदिनी खंडकाव्य, अभंगमाला,काव्य तुषार (१९२३ ) कविता-वनिता, शिवप्रताप, मराठ्यांची संग्रामगीते (१९२०), चंडी शतक(१९२७ ) झांशीची संग्रामदेवता(१९२५ ),राजपूत वीरांगना, राधामाधव, मराठी शिवराज भूषण असे अठरा ग्रंथ लिहिले  आहेत.  शिवकलीन हिन्दी कवि भूषण यांच्या शिवबावनी ,शिव प्रताप, आणि शिवराज भूषण या काव्याची मराठी रूपांतरे केली. ऐतिहासिक स्थळांचे सुद्धा त्यांना वेड होते. ते इतिहासाची दखल घ्यायला सांगतात ती अशी.

घेवोनी उत्कंठेने ,वाचवा गत इतिहास

भिजवावी त्याची पाने ,सोडवा दिर्घोच्छ्वास

जीर्ण दुर्ग ते पाहुनी,व्हावे हो चित्त उदास,

आठवून त्या त्या गोष्टी ,लाक्षून आजची सृष्टी

अंतरात व्हावे कष्टी,येती वच सहजची वदता

एक काळ ऐसा होता. ..   

मोहरा इरेला पडला-

बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला
दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला
त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला
गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला
लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला
मोहरा इरेला पडला ||||

बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले
शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले
बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील
जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||||

तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे
शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते
ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी
प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला
मोहरा इरेला पडला ||||

गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत
उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत
गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात
जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला
धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला
मोहरा इरेला पडला ||||

मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या
जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या
कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा
परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला
मोहरा इरेला पडला ||||

वारावर करतची वार अनुसरले शूर पवार
शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर
बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात
आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला
मोहरा इरेला पडला ||||

गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या
घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या
धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या
पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना
तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला
शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला
जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला

तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती
मोहरा इरेला पडला ||||

(कै. दु. आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून)

संताजीची घोडदौड

तळहातीं शिर घेउनिया दख्खनची सेना लढली
तरि विजयी मोंगल सेना ना नामोहरम जहाली
पडली मिठि रायगडाला सोडवितां नाहीं सुटली
राजरत्न राजाराम
कंठास त्यास लावून
जिंजीवरती ठेऊन
परते सरसेनापतिची घोडदौड संताजीची

मिरजेवर पातशहाचीं शहाजणें वाजत होतीं
हाणिल्या तयांवर टापा फोडून टाकिलीं पुरतीं
मारिली टांच तेथून घेतला पन्हाळा हातीं
तों कळलें त्या वीराला
जिंजीला वेढा पडला
पागा घेवोनी वळला
चौखूर निघे त्वेषाची घोडदौड संताजीची

वाजल्या कुठें जरि टापा धुरळ्याची दिसली छाया
छावणींत गोंधळ व्हावा संताजी आया ! आया !
शस्त्रांची शुद्धे नाहीं धडपडती ढाला घ्याया
रक्तानें शरिरें लाल
झोंपेनें डोळे लाल
जीवाचे होती हाल
ऐशी शत्रूला जाची घोडदौड संताजीची

 धों धों वाहे गिरसप्पा त्याला प्रतिसारिल कोण?
 सों सों  शिशिराचा वारा रोधील तयाला कोण ?
हिमशैल खंड कोसळतां त्याला प्रतिरोधिल कोण ?
होता जो गंगथडीला
आला तओ भीमथडीला
एका दिवसांत उडाला
करि दैना परसेनेची घोटदौड संताजीची

                                                पुरताच बांधिला चंग घोड्यास चढविला तंग
                                                  सोडी न हयाचे अंग भाला बरचीचा संग
                                                     नौरंगाचा नवरंग उतरला जहाला दंग
                                                             तुरगावर जेवण जेवी
                                                             तुरगावर निद्रा घेई
                                                             अंग न धरेला लावी
                                                भूमीस खूण टापांची घोडदौड संताजीची.

न कळे संचरलें होतें तुरगासहि कैसें स्फुरण
उफळाया बघती वेगें रिकिबींत ठेवितां चरण
जणुं त्यासहि ठावेम होतें युद्धें जय किंवा मरण
शत्रूचे पडतां वेढे
पाण्याचे भरतां ओढे
अडती न उधळती घोडे
ऐशी चाले शर्तीची घोडदौड संताजीची.

नेमानें रसद लुटावी नेमाजी शिंदे यांनीं
हयगज सांपडती तितुके न्यावे हैबतरावांनीं
खाड खाड उठती टापा
झेंपावर घालित झेंपा
गोटावर पडला छापा
आली म्हणती काळाची घोडदौड संताजीची.

चढत्या घोढ्यानिशिं गेला बेफाम धनाजी स्वार
करि कहर बागलाणांत ओली न पुशी समशेर
बसवितो जरब शत्रूला बेजरब रिसालेदार
वेगवान उडवित वाजी
तोंडावर लढतो गाजी
धांवून आला संताजी
पळती मोंगल बघतांची घोडदौड संताजीची.

नांवाचा होता संत ’ - जातीचा होता शूर
शीलाचा होता साधू ’ - संग्रामीं होता धीर
हृदयाचा सज्जन होता रणकंदनिं होता क्रूर
दुर्गति संभाजीची
दैना राजारामाची
अंतरीं सर्वदा जाची
उसळे रणशार्दूलाची घोडदौड संताजीची

मर्दानी लढवय्यांनीं केलेल्या मर्दुमकीचीं
मर्दानी गीतें गातां मर्दानी चालीवरचीं
कडकडे डफावर थाप मर्दानी शाहीराची
देशाच्या आपत्कालीं
शर्थीचीं युद्धें झालीं
गा शाहीरा, या कालीं
ऐकूं दे विजयश्रीची घोडदौड संताजीची.

भारत माता की जय !

    डॉ.नयना कासखेडीकर 

                                                     -----------------------------------

No comments:

Post a Comment