Thursday, 16 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी सेनापती बापट

 

  स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ९

                                       सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

 (१८८०ते १९६७)

  सेनापती बापट हे सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वचिंतक. कुठल्याही अन्यायविरुद्ध लढणे हाच त्यांचा धर्म होता. पुणे येथे कॉलेजमध्ये असतानाच त्यांना क्रांतीदीक्षा मिळाली होती. कॉलेज मध्ये त्यांचे व्यायाम- शिक्षक, दामोदर बळवंत भिडे यांनी तलवारीवर हात ठेऊन एक क्रांतिकारी शपथ घेण्यास सांगितले की, “वेळ प्रसंगी सर्वस्वाचा होम करून राष्ट्रसेवा करीन”. आयुष्याला हे अचानक वळण मिळाले आणि बी.ए. पूर्ण झाल्यावर ते मुंबईला एम ए. व एल.एल.बी. करण्यासाठी गेले असता, इंजीनीयरिंगची स्कॉलरशिप मिळून लंडन येथे परदेशी शिक्षणासाठी गेले. तिथल्या सांस्कृतिक वातावरणात रमले. एकदा तिथे व्याख्यानमालेत भारतातील ब्रिटिश सत्ता या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले, ते खूप गाजले. ब्रिटिश सत्तेच्या विरोधाचा सूर त्यात असल्याने स्कॉलरशिप बंद झाली आणि त्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुटले आणि ते श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या बरोबरील क्रांतिकारक तरुणांच्या कार्यात सामील झाले जिथे विनायक सावरकर पण होते.

लंडनहून  शिक्षण न घेताच ते भारतात आल्याने क्रांतिकारक कामे करण्यासाठी सज्ज झाले. धरपकड, तुरुंगवास, भूमिगत राहणं सुरू झालं. त्यांचे स्वातंत्र्य कसे मिळेल यासाठी सतत चिंतन सुरू असे आणि ते व्याख्यानातून, लेखनातून बाहेर पडे. ते शीघ्रकवी होते. त्यांनी आपले चिंतन पद्यरूपात, श्लोक स्वरुपात, काव्यरूपात लिहिले. तुरुंगात अगदी पत्रसुद्धा काव्यातच असे. हिन्दी व संस्कृत भाषेत सुद्धा त्यांनी काव्य लिहिले. महाराष्ट्रातील जे जे क्रांतिकारक तुरुंगात गेले त्यांनी तिथे वाण्ड्ग्मय निर्मिती केलेली आढळते. त्यांनी मुळशी संग्राम आणि शांती संग्राम मिळून, १६ वर्षे तुरुंगात काढली. हैदराबाद, येरवडा, रत्नागिरी, बेळगाव येथील तुरुंगात असताना त्यांनी काव्य लिहिले. त्यांचे आत्मचरित्र २८७ कडव्यांचे अनुष्टूभ छंदात लिहिले आहे. तुरुंगातील पत्रे, स्फुट लेख, मुळशी संग्राम चालू असताना येरवडा तुरुंगातून त्यांनी काही निरोप पाठवले ते ही काव्य स्वरुपात आहेत. त्यात  --

त्यांची झेंडा गीते व शिस्त गीते, पत्रे, मुळशी संग्राम चालू असताना येरवडा तुरुंगातून सेनापती बापट यांनी पाठवलेले निरोप, रत्नागिरी तुरुंगातून सुटल्यावर लिहिलेली गीते,चैतन्यगाथेत अभंग, विविध वृत्ते, श्लोक, दिंड्या, आर्या, ओव्या इतके ८०प्रकारचे पद्य लेखन त्यांनी केले.  हे सर्वच राष्ट्रीय लेखन आहे. त्यांची ही कविता बघा , किती कळवळून आवाहन केले आहे.

येणार कोण बोला?

आईवरी विपत्ति, आम्ही  मुले कशाला

बंदित मायभू ही ,आम्ही खुले कशाला,

जखडूनी बांधीयेली ,बघवे तिच्या न हालां,

तिज फांस नित्य फट्के ,हृदयात होय काला ,

रक्ताळले शरीर, भडका जिवांत झाला,

आईस सोडवाया, येणार कोण बोला ?||1||

आईस सोडवूंच,निर्धार हा कुणाचा?

आहे कुणा पसंत,व्यवहार हा खुनाचा ?

आईस सोडवाया खून स्वयें स्वत:चा

व्हावा,सुखे कराया,व्यवहार हा खुनाचा

बेभान कोण कोण, पाहुनि मायजाचा

या तेच सोडवाया,व्यवहार हा खुनाचा ||2||

पाहूं स्वराज्य देशी, या देहिं याची डोळां

ऐसे म्हणे कुणी जो, काढा तया निराळा

जो कोणी असहकारी,विधिभंग भक्त गोळा

मरणे नको म्हणे जो,काढा तया निराळा

मरणें स्वयें पटे ज्या,मारूनि हांक काळा

आईंस सोडवील, तो मातृभक्त भोळा ||3||

भाई महंमदीचे,तैसे हरिजनांचे

हिंदुशिं ऐक्य पुरतें, व्हाया खरें मनाचे

हिंदुसि त्याग बुद्धी , व्हावी; तदर्थ ज्याचें

मन आत्महोम – वांच्छी, होमार्थ नित्य त्याचे

तो ऐक्य भक्त भोळा,मरणे विशुद्ध त्याचे

आईस सोडवील, दास्यातुनी सदाचे ||4||

गाऊनि आइ आई , नाचोत नाचणार

लिहुनी लेख लाख, वाचोत वाचणार

घेउनी बंदिवास ,कांचोत कांचणार

भिऊनी यांस आई, सोडी न जाचणार

रक्ताळले शरीर, भडका जीवांत झाला

आईंस सोडवाया, येणार कोण बोला ?||5||

-----------------

जन्मठेपी

अनेक जन्महि माते!रीन दासगति, तुला विमुक्त कराया झटुनिया जगतीं ॥ ध्रु॰ ॥

विपत्ती सर्वही देई विवेकियासी धडे, स्वमाय- सेवनिं ये जी तिनें जना सुगति

शिकावया बहु आहे जिवासी भूवरि या, श्रमुनी ते शिकताना  विरे विपत्ति –तति

मला न आस कशाची उदास मी विषयां , पहात राही  मजेनें काशी घुमे प्रकृति

हरी करीं धरि मातें स्वये हंसे हंसवी , पहा पहा प्रकृतीच्या पहा म्हणे गमती ४

कुठें कुठें गमतीचें नको म्हणे बघणें, करीं करीं कृति काही  अशी बुझावि मति

करी कृतीहि तदा मी,संत जी हरीशी , संत देइ पुन्हा तो अशी चरित्र गती  

कधीं पहात तमाशा  कृती करीत कधीं, सदा शिके मति काहीं अशी घडे प्रगति

तुला विमुक्त कराया, झटोत थोर जन.  हरीपदीं करितों मी अशी सदा विनति  

-----------

झेंडागीत

      महाराष्ट्रझेंडा | वंदूनी | महाराष्ट्र झेंडा|                                                                                          नव्या युगींचा नवीन वंदू हिंदराष्ट्र झेंडा | आमुचा                 ||धृ०||

स्वतंत्रतेचा विरक्ततेचा महाराष्ट्र झेंडा | भगवा |                                                                                                करील विजयी लोकशाहीचा नवा राष्ट्रझेंडा आमुचा                 १

स्वतंत्रतेचे लोकशाहीचे मिळून सर्व भक्त |  चला या |                                                                                          नवीन राष्ट्रीय झेंड्यासाठी आटवु या रक्त || आपुले                   २

स्वतंत्रतेचे लोकशाहीचे मिळू सर्व भक्त | चला या |                                                                                                    नवीन राष्ट्रीय झेंड्यासाठी वाहवू या रक्त || आपुले                   ३

      रक्त आटवू रक्त वाहवू प्रथम सामयुद्धी | भक्तीने |                                                                                                       पुरती लावू चला कसाला शत्रूची बुद्धी | आग्रही ||             ४

शत्रुबुद्धीची खरी परीक्षा खरी राष्ट्रशुद्धी |  आपुली |                                                                                                              दोन्ही गोष्टी घडती एक्या सत्याग्रहयुद्धी | शांतिच्या        ५

राष्ट्रशुद्धी जाहली राहिली अचल शत्रू-बुद्धी | आग्रही  |                                                                                                      तरी स्वभावे पडणे आहे शुद्ध धर्मयुद्धी ||  घोरतर                ६

धर्मयुद्धमंत्रे हटविले कृपामोह-बंडा |  अर्जुनी |                                                                                                                हरिमंत्रे त्या होईल विजयी  हिंदराष्ट्रझेंडा                          ७


देशदेव (अभंप्रकार)

नका देवातें विसरुं । नका देशातें विसरुं ,

देश हिंदुस्थान माझा । देव हिंदुस्थान माझा|

काहीं सज्जनता धरा । हिंदुस्थान सेवा करा,

देशी अंधार अंधार । नाना वेडांचा बाजार|

करा विचार विचार । करा अंधार हा दू ||

---------------

  अशा प्रकारे सेनापती बापट यांनी राष्ट्रोद्धारा च्या कार्यात सक्रिय भाग घेतला आणि आपल्या लेखणीने धर्म राजकारण,अर्थशास्त्र, काव्य या सर्व विषयांवर विचार व्यक्त केले आहेत. प्रेरणा दिली आहे.त्यांच्या प्रत्येक रचनेत राष्ट्र प्रेमाची तळमळ दिसते.

 भारत माता की जय !

© डॉ. नयना कासखेडीकर

                                                 ------------------------

No comments:

Post a Comment