Thursday, 23 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी कुसुमाग्रज

 

   स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - १६



कुसुमाग्रज ( विष्णू वामन शिरवाडकर)

(१९१२ ते १९९९) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त

म्यानातून उसळे तरवारीची पात , वेडात मराठे वीर दौडले सात! हे लता दिदींनी गायलेले गीत ऐकले की आपण कुठल्याही लढाईत कधीही भाग घेतला नसला तरी आपल्याला स्फुरण चढतं असं हे गीत कुसुमाग्रजांनी लिहिलंय. छत्रपती शिवरायांच्या सात वीरांनी शत्रूशी लढून स्वराज्यासाठी बलिदान दिलं.  फेब्रुवारी १६७४ मध्ये घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचं वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात,

दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे, अजुनी रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात

असे हे एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार, समीक्षक आणि लेखक. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन केलं. नाशिक येथे शिक्षण झाल्यावर १९३४ ते १९३६ या काळात ते चित्रपट व्यवसायात होते. पुढे १९४९ पर्यंत पुणे, मुंबई व नाशिक येथील विविध नियतकालिकांत संपादक म्हणून त्यांनी काम केले. नंतर ते नाशिकला स्थायिक झाले. काही पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी सत्याग्रह केला होता. वीज म्हणाली धरतीला हे त्यांनी लिहिलेले नाटक, झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पराक्रमावर आधारीत आहे.

सामाजिक आस्था आणि क्रांतिकारक वृत्ती, शोधक व चिकित्सक स्वभाव ही त्यांची वैशिष्ठ्ये . १९३० मध्ये झालेल्या नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात कुसुमाग्रज यांनी भाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारक कवितेची सुरुवातच या सत्याग्रहा पासून झाली. नाटक, कथा, लघुनिबंध आणि कादंबरी असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. त्यांचे २२ काव्य संग्रह आहेत, २ निबंध संग्रह, २२ नाटके, ९ कथा संग्रह, ३ कादंबर्‍या,६ एकांकिका,आणि इतर लेखन प्रकाशित आहे.  त्यांच्या विशाखा या काव्य संग्रहाला १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. अमृतसर मध्ये घडलेली जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कुणीही विसरू शकत नाही.त्या घटनेच वर्णन त्यांच्या या कवितेत आहे.     

जालियनवाला बाग -

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

---------------

१९४२ च्या लढ्यावर आधारित त्यांची कविता सर्व ज्ञात आहेच. ती आहे 

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार |

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

------------------------------

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त-

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

आणखी त्यांची या विषयावरील कविता - जय भारता जय भारता, बर्फाचे तट पेटुनी उठले,माझा हिंदुस्थान अशाही रचना  आहेत.

  भारत माता की जय !

 © डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------------

No comments:

Post a Comment