Sunday 26 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी वसंत बापट

 

     स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - १८


            वसंत बापट ( विश्वनाथ वामन बापट)

(१९२२ ते २००२)

सदैव सैनिका पुढेच जायचे

न मागुती तुवा कधी फिरायचे ,

हे स्फूर्तीगीत असो किंवा 

रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत ,

डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत !

हे भक्ति गीत कवि वसंत बापट यांचंच.   

वसंत बापट हे नुसतेच कवी नाहीत तर, गद्य लेखक, प्रवासवर्णनकार आणि स्वातंत्र्य शाहीर, स्वातंत्र्य सैनिक, वक्ता, राष्ट्रसेवा दल कलापथक संस्थापक . वसंत बापट हे स्वातंत्र्योत्तरकालीन कवी असले तरी त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात पण लेखन केले आहे. ते बी.ए. ला पुण्यात शिकत असतानाच १९४२ ची चळवळ सुरू झाली. ब्रिटीशांविरोधी आंदोलन तापलेले होते. या सगळ्या चळवळीत अनेक तरुण आपल्या कुटुंबाची व आपल्या प्राणांची पर्वा न करता देशासाठीच्या कामात पुढे आले, त्यात कवी बापट सुद्धा होते. चले जाव चळवळीत सहभाग, राष्ट्र सेवा दलात सहभागी, भूमिगत राहून आंदोलने केली, चळवळीला प्रेरणा देणार्‍या गीतांची रचना केली, राष्ट्र सेवा दलात, एस.एम जोशी यांच्या सांगण्यावरून चळवळीसाठी सोळा गाणी रचली. त्यांना पोवाड्याचे आकर्षण होते. ते येरवडयाच्या तुरुंगात असताना लेखनास अनुकूल वातावरण मिळाले. त्यांनी १९४६ साली महाराष्ट्र शाहीर असे कलापथक स्थापन केले त्यासाठी राष्ट्रीय तमाशा, संवाद, गाणी, आणि वगनाट्य आणि विशेष कविता लिहिल्या. त्यांनी जोशी वकील आणी शरद सप्रे या टोपण नावानेही लेखन केले.

   ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरोधात काम केले म्हणून बापट यांना दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता. येरवडा तुरुंगाला तर त्यांनी सर्वोच्च तीर्थक्षेत्र म्हटले आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या अग्निकुंडात त्यांनी उडी घेतली होती. सक्रिय सहभाग घेतला. पंढरपूर मुक्ति आंदोलन, १९४२ चा क्रांती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ति चळवळ, राष्ट्र सेवा दल, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूदान चळवळ यात प्रत्यक्ष सहभाग होता. विनोबा भावे यांचा भूदान यज्ञ, पाकिस्तान व चीन यांची आक्रमणे,या सर्वात त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सैनिक आणि जनतेसाठी स्फूर्तीगीते, पोवाडे, वगनाटये लिहिली. पोवाड्यातून त्यांनी देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि जनजागृती व लोकप्रबोधनाचे काम केले.

  शिंग फुंकले रणी (राष्ट्रीय गीतांचा संग्रह), लाठी खाऊ गोळी खाऊ’, लावा कुंकू तिच्या भाळी’, ही महत्वाची गीते लिहिली. बिजली (१९५२) हा त्यांचा पहिला कविता संग्रह ४६ कवितांचा आहे. त्यात १९४६ ते १९५२ पर्यन्तच्या कविता आहेत. त्यांचे ,सेतू (१९५७), अकरावी दिशा (१९६२), सकीना (१९७२), मानसी (१९७७), प्रवासाच्या कविता (१९८२), शिंग फुंकले रणी ( १९८८), शूर मर्दाचा पोवाडा (१९८८), मेघहृदय (१९९१), तेजसी (१९९१), राजसी, रसिया, शततारका असे काव्य संग्रह प्रकाशित आहेत.    

  देशाला इंग्रजी राजवटीतून मुक्त करणे आवश्यक आहे असे त्या वेळी बापट यांना वाटत होते. त्या क्रांतिकारी मूल्यांच्या जाणिवा व्यक्त करणार्‍या आहेत. बिजली, देशाची हाक, स्वातंत्र्य, कुठे स्वातंत्र्य? दिवाळी या कवितातून सामाजिक जाणीव दिसते. त्यांच्या कवितेत समता, जिव्हाळा, मानवता वाद, आशावाद अशी सामाजिक मूल्ये आढळतात. 

त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. संगीत, अभिनय, लोककला याची त्यांना जाण होती.  मराठी बाण्याचे स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्र्कवी आणि शाहीर म्हणून त्यांना महत्वाचे स्थान आहे.

शिंग फुंकले रणी -

शिंग फुंकले रणी, वाजतात चौघडे|

सज्ज व्हा, उठा उठा, सैन्य चालले पुढे||

दास्यकाल संपला, शांत काय झोपला?

अग्नि येथ कोपला, पेटुनी नभा भिडे.||

शिर घेउनी करी, दंग होऊ संगरी,

घालवूच हा अरी, सागरापलीकडे||

लोकमान्य केसरी, गर्जतात वैखरी,

मजला असे अरी चारू त्यजला खडे ||

वीस सालचा लढा, जाहला किती बडा

इंग्रजास बेरडा आणिले कसे रडे ||

तीस सालची प्रभा, उज्ज्वला भरे नभा

गांधी अग्रणी उभा, ठाकला रणी पुढे||

जीर्ण वृक्ष हालला, घाव घालण्या चला,

तोडण्यास शृंखला, जोम हा नवा चढे ||     

या काव्यातून ते राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांना प्रेरणा देतात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर ते आनंदाने आणि विश्वासाने म्हणतात,

जाती पाती ह्यांच्या भिंती आता कोसळणार |

हिन्दी तितुका एकाच आहे हेच खरे ठरणार ||

 

शूर मर्दाचा पोवाडा या काव्य संग्रहात १४ पोवाडे, ५ शाहीरी थाटाची कवने आणि एक कैफियत आहे . भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या ज्या रोमांचकारी घटना व प्रसंग घडले त्याचे वर्णन यात आहे. यात महात्मा गांधी, वसंत दाते, हेमू कलानी आणि सरहद्द गांधी यांच्या वरील पोवाडे आहेत.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वरील त्यांची कविता -

     जय सुभाष

जय सुभाष, जय सुभाष, मंत्र हाच आजला

घोष हाच आजला.

भारतात दश दिशांत नाद हा निनादला

जय हिंद| चलो दिल्ली

होऊनी  फकीर ध्येयमंदिरात रंगला

ना जुमानिलेत तुंग पर्वता नि जंगला

धन्य सैन्य ते.. 

आशेवर जगणारे| वार्‍यावर तगणारे

शांत ना कधी| श्रांत ना कधी

भारती | आरती |  म्हणूनी गाऊ या चला

मंत्र हाच आजला !

मस्तकावरी समस्त खड्ग, नग्न टांगले

भीतीशून्य सैन्य तुझे, तरीही नाही पांगले

धन्य सैन्य ते..

रात्र असो दिवस असो, अन्न नसो वस्त्र नसो

शांत ना कधी, श्रांत ना कधी

भारती | आरती |म्हणूणी गाऊ या चला

मंत्र हाच आजला !

भारतात ठायी ठायी व्यक्ति व्यक्ति पेटली

बेचाळीस क्रांतिलागी दिव्य शक्ति भेटली

धन्य नृपती तू..

देश नसो वेष नसो,दंड नसो कोष नसो

शांत ना कधी| श्रांत ना कधी

रक्त द्या! मुक्त व्हा!  हेच ठाऊके तुला

मंत्र हाच आजला !   

  शतकानंतर आज पाहिली-

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट

मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले.. भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट

कवी वसंत बापट यांचा जन्मच परतंत्र्यातला . त्यामुळे त्यांनी तो काळ लहानपणापासून अनुभवला. त्यांच्या कवितेतून पारतंत्र्याची चीड आणि स्वातंत्र्याचा जयजयकार दिसतो.

आम्ही सैनिक न्यारे

भारत वर्षा प्यारे,आम्ही सैनिक न्यारे.

नसानसातुनी खेळत राही  स्वातंत्र्याचे वारे.

येता आमुची सेना, हाहा:कार दिसेना

दुर्बल जनता आम्ही पाहून म्हणती यारे, यारे! महात्मा गांधीच्या तत्वप्तमाणे अहिंसक मार्गाने क्रांति घडवून आणण्याचे आवाहन ते या कवितेत करतात. भारतात धर्म भाषा भेद असले तरी एकता आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही भारतीय एक होऊन नवा इतिहास घडवू असे सांगताना ते म्हणतात,

नवा इतिहास पुन्हा घडवू

उत्तुंग अमूची उत्तर सीमा इंच इंच लढवू .

अभिमान धरू, बलिदान करू,ध्वज उंच उंच चढवू ,

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक धर बने किल्ला,

हे कोटी कोटी भुजदंड, होतील इथे ध्वज दंड

छातीची करून ढाल,लाल या संगिनीस भिडवू,

जरी हजार आमुच्या जाती, संकटामध्ये  विरघळती,

परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा ,

मग पक्ष,पंथ जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू .... आणि मग

बलवंत उभा हिमवंत ,करी हैवानाचा अंत .

हा धवलगिरी, हा नंगा, ही त्रिशूल कांचनगंगा,

जरी झुंड पुंड शत्रूंशी आली, खिंड खिंड लढवू    !

याशिवाय स्वातंत्र्यसूर्य उगवला हा पोवाडा, ध्वज उंच तिरंगा डोले ,जय हिंद हिंद आनंदभुवन,जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, अशी गीते आपल्याला प्रेरणा देतात. इतिहास सांगतात.    

 ----------------

  भारत माता की जय !

 © डॉ. नयना कासखेडीकर

-------------------------------------

No comments:

Post a Comment