‘स्वराज्य ७५’ लेखमाला
स्वातंत्र्यपूर्व
काळातील राष्ट्रीय कवी
लेखन – डॉ.नयना कासखेडीकर
लेखांक - ११
(
१८९४ते १९३९)
माधव ज्युलियन हे मराठीतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक, फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. गझल आणि रुबाई हे काव्य प्रकार फारसीतून मराठीत आणायचे काम त्यांनी केले. त्यांनी दित्जु, मा.जू., आणि एम.ज्युलियन या टोपण नावाने लिखाण केले. काव्याशिवाय त्यांनी भाषाशास्त्र यावर पण लिखाण केले आहे. ‘ भाषाशुद्धी विवेक’ हा ग्रंथ लिहिला. त्यात अनेक कालबाह्य झालेल्या मराठी शब्दांची सूची आहे. फारसी-मराठी कोश तयार केला. ‘ छंदोरचना’ हा महत्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्याबद्दल मुंबई विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवी बहाल केली .त्यांच्या कवितेत कल्पना विलासाबरोबर ध्येयवाद, व तरल सूक्ष्म भावना आढळते. राष्ट्रीय पुरुषार्थासाठी जनतेला आव्हान करणारी त्यांची कविता म्हणजे, ‘भ्रांत तुम्हा का पडे?’
भ्रांत
तुम्हां कां पडे?
हिंदपुत्रांनो, स्वतांला लेखिता कां बापडे? भ्रांत तुम्हां कां पडे?
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फाकडे.
भ्रांत तुम्हां कां पडे? ।। धृ।।
हिंदभू
वीरप्रसू जी वैभवाला पावली,
कां आता खालावली?
धन्यता द्याया कुशीला अंग झाडा, व्हा खडे.
भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१।.
पूर्वजांची
थोरवी लाभे पुन्हा बोलून कां? झिंगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहींकडे, द्या कालवैशिष्टयाकडे !
भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२।।
जीर्ण
त्या कैवल्यकुंडी घाण देखा माजली, डुंबता कां त्या जली?
ओज पूर्वीचे न तेथे, तीर्थ ते आता सडे. भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।३।।
ज्ञानगंगा
वाहते पूर्वेकडे,
घाला उड्या, अंतरी मारा बुड्या;
संपली पूर्वाग्रहांची रात्र, झाले तांबडे.
भ्रांत तुम्हां कां पडे? ।।४।।
मोकळी
ही खा हवा,
चैतन्य अंगी खेळवा, आत्मशुद्धी मेळवा,
मुंडिती जे फक्त डोके तेच गोटे कोरडे! भ्रांत तुम्हां कां पडे?
।।५।।
श्रेष्ठता
जन्मेच का ये?
जातिदर्पाला त्यजा, हिंदुतेला भजा,
नेमका का भेद भासे? साम्य सारे का दडे?
भ्रांत तुम्हां कां पडे? ।।६।।
ब्राम्हणत्वाची
बढाई लाज ही वेदास हो! षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।७।।
कर्मयोगी
एक व्हा रे,
नायकी वा पायकी, दावुनी घ्या लायकी;
खानदानीतील नादाना, करी घे फावडे. भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।८।।
जो
करी कर्तव्य,
घामेजूनि खाई भाकरी, धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी! न गीतावाक्य हे खोटे पडे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।९।।
लेखणी
बंदूक घ्या वा तागडी वा नांगर, हिंदवी व्हा चाकर;
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे. भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१०।।
एकनाथाची
कशी आम्हास होई विस्मृती,
जो दया मानी स्मृती.
जो कडे घे अंत्यजाचे पोर तान्हे शंबडे! भ्रांत तुम्हां कां पडे?
।।११।।
संकराची
बंडखोरी उभारा या ध्वजा! उन्नती स्वातंत्र्यजा!
राजकी वा गावकी – सारी झुगारा जोखडे! भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।१२।।
भारताच्या
राउळी बत्तीस कोटी देवता जागत्या, या पावता
मुक्तिसंगे स्वर्ग लाभे- कोण पाही वाकडे? भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।१३।।
पोट
जाळायास देव्हारे पुजारी माजवी, ईश्वराला लाजवी
चूड घ्या अन् चेतवा हे रूढ धर्माचे मढे! भ्रांत तुम्हां कां पडे?
।।१४।।
काय
भिक्षेची प्रतिष्ठा?
चैन चाले आयती, मुख्य दीक्षा काय ती?
कष्टती ते खस्त होती, पोळ साई-जोगडे. भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।१५।।
‘बुत् शिकन्’ व्हा! ‘ बुत्फरोशी’ कासया बालाग्रही? भक्त व्हा सत्याग्रही!
मानिती वेड्यास साधु स्वार्थसाधू भाबडे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।१६।।
आचरा
शांतिक्षमा,
निंदोत ते जे निंदती, संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममंत्राने झडे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।१७।।
ही
अहिंसा प्रेमनीती वाटता नामर्दुमी क्षात्रता दावा तुम्ही,
सोडवा क्षेत्री लढूनी राज्यसत्तेचे लढे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।१८।।
दृष्टि
राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी, उन्नतीची घे हमी;
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे.
भ्रांत तुम्हां कां पडे? ।।१९।।
बंधुला
हाणावयाला पत्करुनी दास्यही, शत्रु आणावा गृही
दोष हा राष्ट्रघ्न अद्यापिही देशाला नडे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।२०।।
तो
असो जैचंद वा राघो भरारी वा कुणी, तो स्वराज्याचा खुनी!
हाकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे! भ्रांत तुम्हां कां पडे?
।।२१।।
बंधुलाही
गांजुनी जो शत्रुगेही मोकली मूळ साक्षात तो कली!
ना गणा त्याची प्रतिष्ठा, ते विषारी रोपडे!
भ्रांत तुम्हां कां पडे? ।।२२।।
इच्छिता
स्वातंत्र्य,
द्या स्वातंत्र्य हे अन्यांसही, का न कोणा आस
ही?
का गुलामांचे तुम्हा सुल्तान होणे आवडे? भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।२३।।
’जो बचेंगे तो लढेंगे’! शूर दत्ताजी वदे, स्वामिकार्यी जीव दे,
शौर्य हे दावाल का कल्ले मिशांचे आकडे? भ्रांत
तुम्हां कां पडे? ।।२४।।
काळ
राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा, अंध ऐशाराम का?
स्वर्ग जिंका वा मही! ऐका रणीचे चौघडे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।२५।।
कायदा
पाळा गतीचा,
काळ मागे लागला, थांबला तो संपला!
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे. भ्रांत तुम्हां कां पडे?
।।२६।।
जा
गिरीच्या पैल जा! समृद्धि नांदे वैभवे तेथ सौंदर्यासवे;
मोकळीकीच्या मुदे उत्कर्ष तेथे बागडे! भ्रांत तुम्हां कां पडे?
।।२७।।
हिंदपुत्रांनो, हिताचे ते तुम्ही हाती धरा, एरव्ही माफी करा.
शब्द माझे बोबडे अन् ज्ञान माझे तोकडे, चित्त
माझे भाबडे. ।।२८।।
‘स्वप्नरंजन’मधील ‘महाराष्ट्र-गीत’ या कवितेत ते मराठी मनाला आवाहन करतात
की,
म्लेच्छांपुढे
मराठ्यांनो, कां व्हा दीन, कां वाका?
फडफडे भोसल्यांच्या
प्रतापाची पताका!
अल्पसन्तुष्टता का रे?
ठेवा थोर आवाका!
पसरू द्या हिंदुस्थानभर नवा
आवेश!
‘मराठबाणा’ या कवितेत महाराष्ट्राच्या
भूप्रदेशाविषयीचा, शिवाजी महाराजांविषयीचा, संतपुरुषां विषयीचा आणि ज्या भाषेत ‘ज्ञानदेवी’
प्रकटली त्या मराठी भाषेविषयीचा सार्थ अभिमान व्यक्त झाला आहे.
मराठीस
अन्याय कोठेहि झाला, स्वदेशीं विदेशीं कुणी गाञ्जिलें
मराठी कसा मी न सन्ताप माझा
धडाडे जरी तीव्र दुक्खानिलें?
मराठी जनांचेच वर्चस्व राहो
स्वतःच्या महाराष्ट्र देशीं तरी-
प्रसादें तुझ्या कोणती
व्यक्त आशा करू अन्य हे वन्द्य वागीश्वरी?
‘ शिव-प्रताप’ या कवितेत शिवाजी महाराजांच्या
कर्तृत्वाचा गौरव त्यांनी केला आहे.
माधव जूलियन यांनी ‘सुधारक’प्रमाणे ‘नकुलालंकार’
लिहिलेले हे सामाजिक आशयाचे खंडकाव्य आहे.याच प्रमाणे ‘सुधारक’ या खंडकाव्यात त्यांनी समाजातील विसंगती दाखविली आहे. त्यांच्या मते
सामाजिक सुधारणेचे कार्य समजतील मान्यवर व्यक्तींनी आपल्या अंगावर घेतले असते तर, सामाजिक सुधारणा झपाट्याने झाली असती. ते म्हणतात,
कां काळाची महती गाता?
काळास पुढे लोटी व्यक्ती
अनिवार जिची ध्येयासक्ती;
अवतार गणी मग तिज भक्ती
परिस्थितीच्या खाऊन लाथा
जाल पुढे घालित लोटाङ्गण
त्यात तुमची काय शहामत?
भारत माता की जय !
© डॉ. नयना कासखेडीकर
No comments:
Post a Comment