Wednesday, 22 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-कवी अनिल

 

 स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - १४


कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)

(१९०१ ते१९८२)


अजुनी रुसून आहे
,खुलता कळी खुलेना... , कुणी जाल का सांगाल का ..,  केळीचे सुकले बाग ...., थकले रे डोळे माझे..., वाटेवर काटे वेचित चाललो..., वेळ झाली भर मध्यन्न्ही ..., अशी अनेक अजरामर कविता रसिकांना देणारे कवी अनिल या गाण्यामुळे प्रसिध्द्ध आहेतच. मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे कवी अनिल, मुक्तछंदाचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कवितेत सौंदर्यवाद आणि हृदयातील भाव स्पष्ट दिसतात. त्यांना मुक्तछंद काव्यप्रकाराचे जनक मानले जाते. दहा चरणांची कविता म्हणजे दशपदी हा काव्य प्रकार त्यांनी सुरू केला.

मूर्तीजापुर, अमरावतीचे कवी अनिल शालेय शिक्षणानंतर पुण्यात बी.ए. झाले . नंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. वकिली सुरू केल्यावर, मध्यप्रदेश होशंगाबाद येथे न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले. त्यांच्या आवडीचे विषय होते, पुरातत्व ,शिल्प, संगीत आणि तत्वज्ञान. भारतीय चित्रकलेचा अभ्यास पण त्यांनी केला होता. त्यांचं काव्य लेखन १९३० ला सुरू झालं.त्यांचा पहिला काव्य संग्रह फुलवात . अत्यंत साध्या ,सरळ आणि भावस्पर्शी त्यांच्या रचना.      

त्यांचे फुलवात’(पहिला काव्य संग्रह,१९३२  ) प्रेम आणि जीवन’(खंड काव्य,१९३५ ) भग्नमूर्ती’(दीर्घकाव्य,१९४०), निर्वासित चीनी मुलांस’( खांडकाव्य,१९४३) पेर्ते व्हा’(स्फुट कविता,१९४७) सांगाती’(१९६१), दशपदी’(१९७६) असे कविता संग्रह आहेत. दशपदी ला १९७७ चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

निर्वासित चीनी मुलास या खंडकाव्यात, दुसर्‍या जागतिक महायुद्धात साम्राज्यवादी जपानने केलेल्या चीनवरील आक्रमणात कोरिया हस्तगत करायचा उद्देश होता. अनेक चीनी कुटुंबे यात उध्वस्त झाली. पाश्चात्य राष्ट्रांनी दुर्बल असलेल्या चीनचे लचके तोडण्यास सुरुवात केली. या युद्धमुळे चीनची आर्थिक घडी विस्कटली.  या युद्धात संपूर्ण उध्वस्त झालेल्या कुटुंबातील वाचलेल्या चीनी मुलास उद्देशून, निर्वासित चीनी मुलांस या कवितेतून त्याची कहाणी कवी आपल्याला सांगतात.या बालकाला उद्याचा आशावाद सांगतात. दिलासा देतात.  

त्या जीर्ण जगाच्या चितेतूनच

उठणार आहे अमरपक्षी,

नव्या स्थितीच्या नव्या व्यवस्थेचा

नव आदेशाचा नवाकांक्षेचा

ते चीनी मुलाला म्हणतात,

धीर धार थोडा,

घेणारच आहे तुला ते पोटी,

तूच त्यांची शक्ति,

आणि उमाळा तुझ्याचसाठी

मानवता, बंद, सुप्त ज्वालामुखी, धडकी, पेर्ते व्हा, या त्यांच्या मानवतावादी कविता आहेत. तर देशभक्तीचा उत्कट आविष्कार स्वातंत्र्यचक्रप्रवर्तन या काव्यात आहे.

आमच्या स्वातंत्र्य चक्राची ध्वजा वरती चढे

दास होऊ न कधीही न कधी आता पुढे

राज्य चालक एक छत्री तू ध्वजा आम्हावरी.... ||

तर स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद ते अर्घ्य या कवितेत व्यक्त करतात.

मायभूमी मम स्वतंत्र

स्वातंत्र्यच सर्व जानी

मी स्वतंत्र घोष मंत्र घुमत सदा कानी,

नवशक्ती, राष्ट्र नवे

आज इथे हे जन्मूनी

मानवता आणि जगत

उजळो नाव स्फूर्तिनी ||

पेर्ते व्हा या काव्य संग्रहातील कविता -

मानवता

अन्याय घडो कोठेही, चिडून उठू आम्ही
घाव पदो कोठेही, तडफडू आम्ही

हाल पाहून हळूहळू, होवोत कोठेही
पिळवणूक पाडील पीळ आम्हा, असो कोणाचीही

वजन आमच्या छातीवर, पायांतल्या बेड्यांचे दासांच्या
चाबूक उडो कोठेही, वळ पाठीवर आमच्या

अवघ्या अभाग्यांचे अश्रू, उभे आमच्या डोळ्यांत
दु:खितांच्या, वेदनांच्या कळा आमच्याही उरात

संवेदना सार्‍या जगाची,हृदयात आहे भरभरून
नाते नवीन असे काही,जोडून आहोत आम्ही
मानव तेही मानव आम्ही!

भारत माता की जय !

 © डॉ. नयना कासखेडीकर

                                            ----------------------  

No comments:

Post a Comment