Wednesday, 8 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-कवी विनायक



स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्य पूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - २ 


                                 कवी विनायक (विनायक जनार्दन करंदीकर)

(१८७२ ते १९०९)

       मराठी साहित्यातील देशभक्तीचा प्रवाह कवी विनायक यांच्यापासून सुरू झाला. मराठीतील राष्ट्रीय कवितेचे पहिले  आणि श्रेष्ठ उद्गाते असं त्यांना म्हटलं जातं. पूर्वजांचे वैभव आणि त्यांची वीर वृत्ती याचे लोकांना स्मरण करून देऊन त्यातून त्यांना स्फूर्ति देणे, पारतंत्र्याविषयी लोकांच्या मनात चीड उत्पन्न करणे याच ध्यासाने विनायक कविता लिहीत.  ते एक मित्र या टोपण नावाने लिहीत असत. त्यांनी राष्ट्रभक्तिपर सुद्धा वीररसयुक्त कविता लिहिल्या. खान्देशात वास्तव्य असल्याने त्यांचा कवी केशवसुत यांच्याशी संबंध येत होता. केशवसुत फैजपूर व भडगाव येथे राहिले होते. केशवसुतांची सुरुवातीची असलेली देशभक्तीची भावना कवी विनायक यांच्यामध्ये आली ती नंतर वाढीस लागली.

 लोकमान्य टिळकांचा कारावास, चाफेकर बंधूंची फाशी, शिवजयंती, गणेशोत्सव, रशिया- जपान युद्ध, जहाल-मवाळ यांचा वाद, या विषयवार सुद्धा त्यांनी कविता केल्या आहेत. त्यांनी हिरकणी, अहिल्या, पन्ना, रानी दुर्गावती, संयोगिता तारा, पद्मिनी, कृष्णकुमारी वीरमती इ. ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनांतील प्रसंगांवर आदर्श सुंदर काव्ये लिहिली आहेत. हतभागिनी, मातृभक्तीचे लेणे, जन्मसार्थक्य या त्यांच्या कविताही आहेत. त्यांच्या कविता काव्यरत्नावली, मनोरंजन, करमणूक या नियतकालिकातून प्रकाशित होत असत. त्यांनी एकूण ८५ कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी ७३  कवितांचा संग्रह प्रकाशित झाला. नंतर  १९६० पर्यन्त त्याच्या तीन आवृत्ती निघाल्या. त्याच्याच प्रस्तावनेत, कवि विनायकांचा मराठीतील राष्ट्रीय कवितेचे पहिले व श्रेष्ठ उद्गाते असा उल्लेख प्रा. भवानीशंकर पंडित यांनी केला आहे. कथा कवी, परंपरा पूजक आणि बोधवादी कवी अशी त्यांची वैशिष्ठ्ये होती.

  कवी केशवसुत, लोकमान्य टिळक आणि कवी विनायक हे समकालीन होते. केशवसुतांनी त्यांना महाराष्ट्रचा बायरन म्हटले आहे. हिंदू धर्माबद्दल त्यांना विशेष अभिमान वाटत असे. आधुनिक मराठी कवितेतील राष्ट्रीय कवितेची परंपरा कवी विनायक यांच्यापासून अधिक उत्कट झालेली दिसते असे एका संशोधनात म्हटलेले आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रीय कवितेतून पूर्वजांच्या पराक्रमाची गौरवगाथा वर्णन केली आहे. त्यांनी म्हटले आहे, राष्ट्र भक्तांचे आणि हुतात्म्यांचे बलिदान कधीच व्यर्थ ठरत नाही . ते महाराष्ट्रलक्ष्मी या आपल्या कवितेत म्हणतात-

पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावी काळ

बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ असा अभिमान ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात.

 महाराष्ट्र-लक्ष्मी

महाराष्ट्र-लक्ष्मी मातें जगीं धन्य वाटे,
यशोगीत तीचें गातां मनीं हर्ष दाटे. ।। ध्रू ।।

पुनःपुन्हा परचक्राने ताडिली बिचारी,
दीर्घकाल खचली होती पारतंत्र्यभारी,
द्वादशाब्द दुष्काळाने जाहली भिकारी,
संकटांत तीच म्हणोनी करी उंच माथें. ।।१।।

मावळांत वास, न ठावें जया बाह्य वारें,
नेमधर्म ज्यांचे लोकीं कृषीकर्म सारें,
विळा कोयतीच जयांची काय ती हत्यारें,
तेच वीर बनलें समयीं मावळे मराठे. ।।२।।

नये नीट धरितां ज्याला लेखणी करांनी,
कृपादृष्टी संपत्तीची न ज्याचे ठिकाणीं,
परी यवनसत्तेची जो करी धूळधाणी,
कोण तया शिवरायाच्या पावला यशातें? ।।३।।

साधुसंत झाले, असती, तयांची न वाण,
मात्र रामदासा लाधे समर्थाभिधान,
जो मनीं स्वदेशहिताचे धरोनी निशाण,
ध्वजा कौपिनाची मिरवी भारतांत थाटें ।।४।।

कढीभातखाऊ म्हणती ब्राह्मणां जगांत,
ढिली कांस ज्यांची म्हणुनी हांसती, हंसोत,
तयांनीच करणी केली प्रसंगी अचाट,
खोल गढे परसत्ता ती ढासळली लाथें ।।५।।

पूर्व दिव्य ज्यांचें, त्यांना रम्य भाविकाळ,
बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ,
कासया वाहावी चिंता मनीं मग जहाल,
रात्र सरे तेव्हां उगवे दिनही पूर्ववाटे

  'मातृभक्तीचे लेणे'  या कवितेत भारतमाता आपल्या देशभक्त असलेल्या, टिळकांचे कौतुक करत आहे असे वर्णन केले आहे. ते म्हणतात,

मज काळमुखी द्यायला

सजले रिपु त्या समयाला

कळवळा तुला मम आला

झटलास बाळ बहुसाल

देशभक्ती ज्याचे ठायी

ठरतो तो राजद्रोही

यास्तव तव पडली पायी

जड लोह्श्रुंखला काल ||

भारत माता की जय !

 - डॉ.नयना कासखेडीकर 

-------------------------

No comments:

Post a Comment