Sunday, 12 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी बा. भ.बोरकर

 

स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ५

बाकीबाब - बा.भ. बोरकर ( बाळकृष्ण भगवंत बोरकर) 

(१९१० ते १९८४)

    मराठी व कोकणीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार. गोव्यातील खासगी आणि सरकारी शाळेत शिक्षक होते. मुंबईला काही काळ त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम केले. १९४६मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्य  आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आमचा गोमंतक (१९४८) अन पोर्जेचो आवाज (कोकणी १९५५) या वृत्तपत्राचे ते संपादक होते. १९५५ ते १९७० पर्यन्त ते आकाशवाणी पुणे व पणजी केंद्रावर वाङ्ग्मय विभागात काम करून निवृत्त झाले.

      त्यांचे प्रतिभा (पहिला काव्यसंग्रह ),जीवन संगीत, दूधसागर, आनंद भैरवी, चित्रवीणा, गितार, चैत्रपुनव, कांचनसंध्या हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सासाय हा कोकणी काव्यसंग्रह आहे. त्यांचे ६ अनुवाद, २ कथासंग्रह, ४ कादंबर्‍या, २ चरित्रात्मक प्रबंध, ४ ललितलेख संग्रह असे त्यांचे साहित्य आहे. कवी भा.रा.तांबे, मामा वरेरकर, काका कालेलकर, एक गोमंतकीय विदुषी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते संवेदनशील असल्याने त्यांच्यावर देशातील अनेक घटनांचा प्रभाव पडला आणि तो त्यांच्या कवितेत दिसतो. त्यांना देशाबद्दल ज्वलंत अभिमान आहे आणि गुलामगिरीबद्दल चीड आहे ते कवितेत प्रतिबिंबीत होते. ते महाराष्ट्र गीत या कवितेत म्हणतात,

महाराष्ट्र गीत

राकट कणखर देश मराठा जित्या हिंदवी रक्ताचा,

सरल मनाचा सिद्धा सिपाई भीम जसा की कुंतीचा

स्वातंत्र्यचा ध्यास  त्यांच्या कवितेत दिसतो.

गर्भवतीचे गर्भ पुकारित सुटले जयहिंद|

स्वातंत्र्याच्या जयघोषांनी गिरीदरी धुंद||

स्वाभिमानशून्य लोक गुलामगिरीत च सुख मानतात त्याचा त्यांना राग आहे

ते आपल्या इमानी कुत्र्यास या कवितेत म्हणतात,

जरी तुझ्या धन्याच्या सुटल्या सू सूं गोळ्या

रक्ताच्या अमुच्या फुटल्या जारी आरोळ्या

रे,मोड अपुले कान,मिटुनी  घे डोळे

तू चघळ हाडके चघळ सुखाने पोळ्या||

कवि बोरकर स्वातंत्र्यची तळमळ एक मागणे  या कवितेत व्यक्त करतात.

करी तरवार तेजस्वी मुखी रसवंती ओजस्वी

तये स्वातंत्र्य जिंकाया माला सामर्थ्य दे प्रभुजी ||

त्यांच्या स्वातंत्र्याविषयी लिहीलेल्या भगवती स्वतंत्रतेस’, स्वातंत्र्य लक्ष्मीस’, स्वातंत्र्याची सिंहगर्जना या कवितेत ध्यास दिसतो. त्याचप्रमाणे थोर हुतात्मे आणि महात्मेयांच्या बद्दल त्यांना वाटणारा आदर जाणवतो. सर्वस्वाचे बलिदान देणार्‍या वीरांना ते तेथे कर माझे जुळती या कवितेत वंदन करतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येऊनिया जाती
जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परि जयांच्या दहनभूमिवर
नाही चिरा नाही पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी
निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवया ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांगी डोळे भरती ॥४॥

महात्मा गांधी बद्दलचा आदर त्यांच्या साबरमतीच्या काठी या कवितेत दिसतो. महात्मजींच्या जीवनावर त्यांनी महात्मायन हे प्रदीर्घ काव्य लिहिलं.

भारत माता की जय !

-डॉ. नयना कासखेडीकर 

                                                           ------------------------- 

No comments:

Post a Comment