‘स्वराज्य ७५’ लेखमाला
स्वातंत्र्यपूर्व
काळातील राष्ट्रीय कवी
लेखन – डॉ.नयना कासखेडीकर
लेखांक - १९
कुंजविहारी (हरिहर गुरूनाथ कुलकर्णी –
सलगरकर)
(१८९६ ते १९७८)
कवी कुंजविहारी यांचा जन्म अक्कलकोटमधील सलगर या गावी झाला. वडील लवकर स्वर्गवासी झाल्याने त्यांचे फार शिक्षण होऊ शकले नाही, त्यामुळे सोलापूर येथील लक्ष्मी विष्णु कापड गिरणीत ते काम करू लागले. त्यांना काव्याचा छंद लहानपणापासूनच होता. ‘कधी रे आता भेटसी रामराया’ ही पहिली कविता १९१८ मध्ये त्यांनी लिहिली. १९२० साल त्यांच्यासाठी महत्वाचे आणि राष्ट्रीय बाणा घडवण्याचे ठरले. सोलापूर येथे मुंबई प्रांतिक परिषदेला लोकमान्य टिळक आले होते. त्याचा अनुभव घेऊन हरिहर यांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, स्वत:ला त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले.
ध्येय एक निश्चित झाले | मी सेवक या राष्ट्राचा ||
मातृभूमीची सेवा करण्याची प्रतिज्ञा घेणार्या कुंजविहारी यांनी आपल्या नमो
मायभूमी या कवितेत मातृभूमीला वंदन केले आहे ,ते म्हणतात,
आम्हा देव तू धर्म तू मायभूमी ,आम्हा स्फूर्ती तू मायभूमी,
आम्ही न कुणी सर्व तू मायभूमी, नमो मायभूमी,नमो मायभूमी |
आयुष्याचे ध्येय त्याचे एकची ठरलेले|
परक्याला मुळी येऊ न देणे प्राण जरी
गेले ||
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर, भारतास, गोंधळ,
नोकरशाहीची आरती, या कविता लिहिल्या. गोंधळ कवितेत ते
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आंबा माता आम्हाला एक नवा शिवाजी दे अशी मागणी देवीकडे
करतात.
हक्काची मागणी पुरवी ही दान नका देऊ |
हिमतीने गतवैभव अमुचे परत आम्ही मिळवू ||
समशेरिसह नवा शिवाजी एक आम्हा देई |
कुंजविहारी विनवी अंबिके अन्य आस नाही ||
त्यावेळच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळी आणि कामगार आंदोलन यामुळे त्यांची
प्रतिभा आणखीन बहरली. त्याचे रूपांतर चळवळीसाठी काव्य करण्यात झाले. वृत्तपत्रात
त्यांनी हरिजनांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जो लेख लिहिला होता, त्याच सुमारास त्यांनी मामा वरेरकर यांचे ‘कुंजविहारी’ हे नाटक पाहिले आणि हेच आपले टोपण नाव
घेऊन हा लेख लिहिला. तेंव्हापासून ते हरिहरचे कुंजविहारी झाले. १९१९ साली
सोलापूरला मजुरांचा मोठा संप झाला, त्यावेळी त्यावर गोळीबार
झाला. त्याचा निषेध करण्यासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कविता
लिहिल्या. त्या इतक्या लोकप्रिय झाल्या की त्यानंतर कुठल्याही जाहीर सभेचा प्रारंभ
याच कवितांनी तेंव्हा होऊ लागली.सुरूवातीला त्रिशूल आणि हरीहर य नावाने ते काव्य
लेखन करत असत. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्यामुळे त्यांची नोकरी गेली.
स्वातंत्र्य पूर्व काळात थोर ऐतिहासिक व्यक्तींवर कुंजविहारी यांनी ज्वलंत
राष्ट्रीय काव्य लिहिले. तानाजीच्या पराक्रमावर त्यांनी
मराठा गडी यशाचा धनी हे काव्य रचले. १९१९ साली महात्मा गांधींच्या चौरीचौरा येथील
सत्याग्रहात पकडलेल्या एकोणीस देशभक्तांना फाशी दिले गेले. एका देशभक्ताने फासावर
जाताना आपल्या आईला लिहिले की मातृभूची सेवा करण्यासाठी आई मी पुन्हा तुझ्याच पोटी
जन्म घेईन. तेव्हा, “मातृभूमीच्या सेवेसाठी आई, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन” असे सांगणारी भेटेन नऊ महिन्यांनी
ही कविता कुंजविहारी यांनी लिहिली आणि आता फाशी दिली तरी पुनर्जन्म घेऊन
मातृभूमीची सेवा करायला पुन्हा येईन अशी इच्छा असलेला धैर्यशाली क्रांतिवीर त्यांनी आपल्या
कवितेतून रंगवला. भारताच्या
स्वातंत्र्ययुद्धात प्राणाची आहुति देणार्या हुतात्म्यांच्या जीवनाचे रहस्य आणि
तत्वज्ञान कुंजविहारी यांनी ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ या कवितेत सांगितले आहे.
१९२१ सालच्या मुळशी सत्याग्रहावर ‘मुळशीचा पाळणा’ लिहिला. या कवितेने ते सर्वपरिचित झाले. धरणासाठी जमिनी ताब्यात घेतल्यावर
शेतकर्यांची अवस्था काय होते ते त्यांनी लिहिले. ही कविता डिसेंबर १९२२ ला गया येथील कॉग्रेसमध्ये वाचून दाखवली
गेली.
भेटेन नऊ महिन्यांनी ..
मनी धीर धरी शोक आवरी, जननी !
भेटेन नऊ महिन्यांनी !!
या न्यायाची रीत मानवी असते !
खरी ठरते, केंव्हा चुकते !!
किती हुतात्मे असतील असले !
जे अपराधाविन मेले !!
लाडका बाळ एकुलता
फाशीची शिक्षा होता
कवटाळून त्याला माता
अति आक्रोशे रडते केविलवाणी !
भेटेन नऊ महिन्यांनी !!
तुज सोडुनि
मी जाइन कां गे इथुन ।
परि देह
परस्वाधीन
बघ बोलति
हे,
बोल मुक्या भावाचे ।
मम दोरखंड
दंडाचे
अन्नपाणि
सेवुनि जिथले
हे शरीर
म्यां पोशियले
परदास्यिं
देश तो लोळे
स्वातंत्र्य
मला,
मिळेल मग कोठोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥
लाभेल
जया वीरमरण भाग्याचे !
वैकुंठ्पदी तो नाचे !!
दे जन्म मला मातृभूमीचे पोटी !
पुनपुन्हा मरण्यासाठी !!
मागेन हेच श्री हरीला
मातृभूमी उद्धारण्याला
स्वातंत्र्यरनी लढण्याला
तव शुभ उदरी जन्म पुन्हा घेऊनी !
भेटेन नऊ महिन्यांनी !! (गीतगुंजारव )
(संदर्भ-
मराठ्यांची संग्रामगीते कविता संग्रह-)
१९३१ साली सोलापूर येथे मार्शल लॉ मध्ये फाशीची शिक्षा
झालेले हुतात्मा कुर्बान हुसेन यांची व कवी कुंजविहारी यांची शेवटची भेट झाली
तेंव्हा कुंजविहारी यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यावर कुर्बान हुसेन म्हणाले की, आपके आंखोमे आसूं? भेटेन नऊ महिन्यांनी
ही कविता तुमचीच ना? मग हे अश्रु कशासाठी? मी फाशी गेलो तर माझे जीवन सार्थकी लागेल आणि तुमची ‘मनि धीर धरी...’
ही तुमची कविता गातच मी फासावर जाईन. एव्हढी ही कविता परिणामकारक ठरली
होती.
१२ मे १९३० ला जेंव्हा इंग्रज सरकारने मार्शल लॉं पुकारला
त्यावेळी धरपकड झाली. त्यात कुन्जविहारी यांनाही अटक झाली व एक वर्षाची
सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड झाला. आधीच नोकरी गेली होती, किराणा दुकानही लिलावात काढायला लागले. जेंव्हा १९४६ साली सेनापति बापट यांना
जहाल भाषणा बद्दल रत्नागिरी येथे सरकारने पकडले
आणि ७ वर्षांची शिक्षा केली. यावरही कुंजविहारी मत
व्यक्त करतात. ‘तयाला
तुरुंग भिवविल किती?’ या कवितेत ते म्हणतात ,
देशास्तव सर्वस्व समर्पिण ध्येय जायचे निके,
तया गृह कारागृह सारिखे ||
१९४६ मध्ये सुभाषचंद्र बोस यांचा गौरव करणारी जयहिंद कविता
त्यांनी लिहिली. स्वातंत्र्यप्राप्ती त्यांनी स्वत: अनुभवली. त्या नंतर १९४७ मध्ये
त्यांनी ‘स्वराज्य सोहळा’, ‘स्वराज्यसुख’ ‘स्वराज्य नारायण’,या कविता लिहिल्या. स्वातंत्र्योत्तर चिरंजीव होवो जागी लोकशाही ,उद्याचा देव कसा असावा?, सैन्य चालले पुढे,बंडखोर स्फूर्ति, अशा कविता लिहिल्या.
भारत माता की जय !
© डॉ. नयना कासखेडीकर
No comments:
Post a Comment