Monday 13 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-कवी भा.रा.तांबे

 

स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ६

भा.रा.तांबे ( भास्कर रामचंद्र तांबे)

(१८७३ ते १९४१)

     प्रसिद्ध मराठी कवी. भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य पण नंतर ते १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थांनचे  राजकवी झाले. इंग्रजी कवींप्रमाणेच त्यांच्यावर रविंद्रनाथ टागोर यांच्या काव्याचा प्रभाव होता. एक सौंदर्यवादी आणि स्वतंत्र प्रतिभेचा कवी म्हणून त्यांना साहित्य प्रांतात आदराचे स्थान आहे. १९२० साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या २२५ कविता उपलब्ध आहेत. प्रेम कविता, बालगीते, विधव विषयक गीते, मृत्यू गीते, नाट्यगीते व भाव गीते असे काव्य प्रकार त्यांनी लिहिले. त्यांना संगीताचे पण उत्तम ज्ञान होते. त्यामुळे ते त्यांच्या अनेक कविता कोणत्या रागात गाव्यात याच्या सूचना देत असत. त्यांना आधुनिक  मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आपल्या परंपरांचा त्यांना अभिमान होता. त्यांचा वैदिक संस्कृतीचा अभ्यास होता. साखये या स्थानी,कलेचे हृदगत, भैरव, चिरंजीव कोण ,जय वाल्मिकी, सरस्वतीचे स्तोत्र,या कवितातून ते आपल्या राष्ट्राच्या पूर्वीच्या वैभवाची आठवण करून देतात. 

चिरंजीव कोण? या कवितेत त्यांनी राष्ट्रासाठी झटणार्‍या थोर अशा व्यक्तींचा गौरव केला आहे. ते म्हणतात,

चिरंजीव कोण?

तेची चिरंजीव जगीं जहाले,

हाले जयांचे मरणें धरा ही;

राही जयांचें यश शुभ्र येथे,

येतें जयांचे स्मरणें दृगंबू.

झंझानिला वा अशनिप्रपाता,

पातालभेदीहि नदीपुरांना,

रानांतल्या चंड दवानला जे

लाजेप्रती लाविति हिंस्त्र जीवां,

ऐशा महाक्रूर नराधमांना

मानार्थि, केव्हां न जुमानुनीया,

मानूनिया केवळ देशमाता,

माथां तिला वंदुनि मात्र लोकीं,

वेल्हाळ कांता गृहिं सोडुनीया

तोडोनिया जे धन मोहजाला,

ज्याला रुची अन्न असें त्यजोनी

यजोनि तेजा निजदेशकार्यीं

उग्रारिशीं झुंजुनि झुंजुनी जे

नीजेस ठेले समरांगणात

गणाग्रणीं रोवुनिया ध्वजाते;

ज्यांतें अरीही स्तविती मनांत

ये वास त्यांच्या जरि त्या शवांशी,

शिवा शिवो क्षुद्रहि भक्षणार्थ,

क्षणार्ध भीत्यार्त अरी तयांना

यानांस बांधोनि निघो स्वदेशा;

हालाहालप्राय अरी शिरांना

रानांत फेको, स्वपुरा हरो वा

रोवावयालागि शिरें स्वदुर्गा,

दुर्गावली त्यांस करो खुशाल.

अरीस होवो बघुनी प्रमोद,

आमोद त्यांचा तरि सर्वदाही

दाही दिशा व्यापुनिया उरेल,

भरेल चित्तीं निजदेशजांच्या.

विभूति त्यांच्या धरणीप्रदीप,

प्रदीपतील स्वसुतीं स्वतेजां,

ते ज्या करीं होति विदेहधारी

धारीं असीच्या चिरण्या अरी ते.

न मानवां केवळ ते सजीव,

निर्जीव वारी, गिरि, पादपाशीं

पाशीं उभे ते गमती सदैव,

सुदैव त्यांच्या जननीपित्यांचें !

ज्यां पूत केलें निजवारिपानें

पानें दुरी सारुनिया करांनीं

रानीं झरे ते अतिदीनवाणी

वाणी करोनी रडती तयांना !

तत्पादधूली शिरी पुष्पमाना

मानावली ज्यां गिरिराज ते ज्यां

स्वजातवारिप्रबलीं रवांनीं

वानीत गातील सदैव त्यांना !

छायेंत ज्यांच्या बसुनी कदा ते

दाते सुखाचे गमले जयांस

जयांस त्यांच्या दंव-आसवांनीं

वानीत गातील तरु प्रभातीं!

आश्चर्य तें काय जरी प्रबंधीं

बंदीजनें गाउनिया यशाला

शाला स्वभू केलि गुणां शिकाया

काया विनाशी झिजवावयाच्या!

रणार्क राणा मृत का 'प्रताप'

प्रताप तापप्रद यद्रिपूतें ?

पूतं रिपूनें प्रबलें जयाच्या

यांचा करोनी बहुमान केला !

तेजोबलौदार्यगुणानुपेत

न पेटते ज्योति अजून कां ती ?

कांती तयांची तनुजांतरंगीं

तरंगिलेली न दिसे कुणाला ?

अशांस ये मृत्युहि मृत्युहीन,

हीनां अम्हां मृत्युच जीवनांत.

वनांत थोडें तृण होय तें का,

तें काय हाले न डुले न किंवा ?

तर मातृभूमीप्रत कवितेत ते म्हणतात ,

जन्मा येउनिया कुशीं तव; तुझ्या स्कंधीं उरीं वाढुनी

प्रेमाचा नच गोड शब्द वदलों केव्हां तुला आजुनी,

नाहीं एक विचारही अजुनिया त्वत्सेवनीं योजिला;

ऐशाला म्हणशील काय मजला तूं सांग गे आपुला ?

जे त्वत्पुत्र उदारधी झिजविती काया तुझ्या सेवनीं,

जाळाया निज पोट ही शिणविली वाणी तयां निंदुनी;

व्हावा तोष धन्यास यास्तव सदा मी हासलों त्यांजला,

आतां तूं कुरवाळशील वद का ऐशा कुपुत्रा मला ?

'खोटी ही दुबळी, गुलाम, भरला वृद्धापकाळीं चळ,'

ऐसा दोष दिला तुला वश परां होवोनिया केवळ;

आतां हें स्मरतां मना हळहळे तें; गे गळा दाटला-

डोळे तूं पुसशील काय पदरें घेवोनि अंकीं मला ?

जें त्वां जीवन हें दिलें, सकळ ही सत्ता तुझी ज्यावरी

जातां तें परसेवनीं न तिळही संकोचलों अंतरीं;

धिग्धिग् जीवन हें ! असें मन अतां धिक्कारितें गे मला,

त्यातें तूं धरिशील काय ह्रदयीं पान्हा फुटोनी तुला ?

आहाहा ! सुत ते असिव्रत जईं त्वत्सेवनीं पाळितां

धैर्याचे गिरि ते कधीं न डगले आकाशही फाटतां,

नेतां त्यांस दिगंतरास फुटला आई, उमाळा तुला-

डोळे तूं पुसशील का निज, यमें नर्कास नेतां मला ?

 झाशीवाली  या त्यांच्या कवितेत ते स्वातंत्र्य युद्धात सर्वस्व पणाला लावलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना मराठीतून श्रद्धांजली वाहतात ,ते म्हणतात,

झाशीवाली -

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली ll ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! llll

ही कविता भा.रा. तांबे यांनी १९२९ साली जेंव्हा झाशीच्या राणीचे स्मारक ग्वाल्हेरच्या किल्ल्याखाली बांधले गेले, त्यावर लिहिण्यासाठी हि कविता लिहिली.

लोकमान्य टिळक यांच्या देशकार्यावर भा रा तांबे यांनी लोकमान्यास कविता लिहिली आहे.

राजराजेश्वरा हो दयाळा,

तातडी कां असे हो निघालां ? ||ध्रु||

व्याप संताप सोसूनी सारा

वैरियांचाही साहुणी मारा,

लाथ हाणोनिया हं सुखाला

कष्टविले सदा की जिवाला. ||

घास नाहीं सुखाचाहि ठावा,

नाहिं ठावा शरीरा विसावा.

व्याप ज्यासाठिं हा थोर केला

नाहिं भानू अजूनी उदेला,

काय याहूनि ओढी तुम्हांला ?

तातडी कां असे हो निघाला ?

महात्मा गांधी यांच्याबद्दल पण त्यांनी कविता लिहिली आहे. त्यांच्याबद्दलचा आदर कवितेत व्यक्त होतो. भगतसिंह यांचे कौतुक ते एका कवितेत करतात. देशद्रोह की राजद्रोह यात ते म्हणतात,

शिरार्थ याच्या लविले, बक्षीस तुम्ही हजार

खडा पहारा करीन मी, होईन आधी ठार |

भा. रा. तांबे यांना पारतंत्र्याची अत्यंत चीड होती. इंग्रजी सत्तेविरूद्ध त्यांनी आपल्या कवितेतून आवाज उठवलेला दिसतो. घटोत्कच माया, तरुणाचे पाते, अर्जी ऐका हो सरकार, साम्राज्यवादि, मातृभूमीप्रत कोण रोधील? अशातून ती चीड व्यक्त होते.

भारत माता की जय !

© डॉ. नयना कासखेडीकर

No comments:

Post a Comment