Tuesday, 14 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी गोविंद

                                                         स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ७  

स्वातंत्र्यशाहीर गोविंद

 (गोविंद त्र्यंबक दरेकर)

(१८७४ ते १९२६)

  नाशिकचे भूमीपुत्र कवी गोविंद त्र्यंबक दरेकर ऊर्फ स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद- नाशिकचे भूमीपुत्र.  

राष्ट्रस्वातंत्र्य द्या, हिंदभूला नवे!
धर्म-स्वातंत्र्य तें हिंदभूला हवे!
ज्ञानस्वातंत्र्य ती प्रार्थुनी मागते!
हिंदभू वांछिते सकल स्वातंत्र्य तें!

अशा काव्यांतून स्वातंत्र्याची ललकारी देणारे, राष्ट्रीय भावनेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून कवी गोविंद ओळखले जातात. स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका वठविणाऱ्या सावरकरांच्या अभिनव भारत ऊर्फ मित्रमेळा संघटनेच्या कार्यात कवी व एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी भूमिका निभावली होती.काव्य, कवित्व व स्वातंत्र्यत्व ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.

बालपणीच कमरेपासून खालचा भाग लुळा पडला असल्याने कवी गोविंद यांनी अंथरुणावर पडूनच अनेक काव्य, पद्ये लिहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर व लोकमान्य टिळकांसह अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या सहवासाने त्यांच्या स्फूर्तीदायक कविता अधिकच बहरत गेल्या. सुरूवातीला ते लावण्या लिहीत असत. १९०० साली त्यांचा मित्रमेळा या तरुण क्रांतिकारकांच्या संघटनेशी संबंध आला. अनेक शाहिरांच्या शृगांरिक व भेदी लावण्याही त्यांना अवगत होत्या. छत्रपती शिवाजी महारांजावरही त्यांनी अनेक काव्य, पोवाडे गायले होते. त्यांचे अनेक राष्ट्रीय विषयावरील ओजस्वी काव्य सरकारने जप्त केले. 

                                              देशाचा पालनवाला, तो शिवाजि राजा झाला!

धर्माचा रक्षणवाला, तो शिवाजि राजा झाला!
त्रिभुवनात डमरू ज्याचे, नांदताच नंदी नाचे!

जो परित्राण या भूचे, शंकर भोला, तो शिवाजी!
तसेच,

हिंदभू वांछिते विगत स्वातंत्र्य तें, भारतप्रशस्ती, महाराष्ट्रगीत, स्वातंत्र्य सकल सुखानेही समर्पुनि कधी पुरविशिल काम, स्वातंत्र्याचा पाळणा,  स्वतंत्रत देवी, स्वातंत्र्य लक्ष्मीस्तव, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? मुरली, वेदांतचा पराक्रम, शिवबाचा दरबार, धावं रे धांव भगवंता, टिळकांची भूपाळी आणि सुंदर मी होणार या कविता खूप गाजल्या. जिजाईने बालशिवाजीस दिलेला झोका यासारख्या कवितांनी पारतंत्र्याच्या काळात गोविंद घराघरांत पोचले होते. मेळावे, सभा-संमेलनांत त्यांच्या काव्यगायनामुळे अनेक स्वातंत्र्यसेनानींना ब्रिटिशांनी शिक्षा केली .

स्वत:ला सुसंस्कृत म्हणवुन घेणारे इंग्रज ज्या ज्या गोष्टींमुळे हिंदुस्थानची अस्मिता जागी होईल, स्वाभिमान जागा होईल वा क्षात्रतेज जागे होईल असा संशयसुद्धा येणारे सर्व साहित्य जप्त करीत असत व ते साहित्य बाळगणे, प्रसिद्ध करणे, वितरीत करणे वा वाचणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरविला जात असे. सुरुवातीला लावण्या व शृंगारिक काव्य करणाऱ्या गोविंदांनी पुढे अनेक ओजस्वी काव्ये लिहिली ज्यावर सरकारने बंदी आणली. क्रांतीवीर बाबाराव सावरकर यांना ज्या चार आक्षेपार्ह कवितांसाठी जन्मठेप दिली गेली त्या कवी गोविंदांच्या चार कविता

१) बोधपर पुरातन मौज- (७ वे कडवे):

पुढे माजतिल परके राक्षस कोणी जरी अनिवार।
काळ्यांचा कलिराजा त्यांना करील सिंधू पार 
॥७॥

२) शिवजन्मकालिन लोकमनोवृत्ति - (१० वे कडवे):

आर्यांचा हा परिसुन धावा गहिंवरला गणराय रे।
शिवरूपे मग येऊन मारी त्या परदस्या ठार रे ॥१०॥

३) रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?

घन:श्याम श्रीराम कां मूढ होता ?

कराया स्वमाता मही दास्य मुक्ता

वृथा कां तयानें तदा युद्ध केलें ?

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।१।।

किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी।

बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी।

तधीं काय तद्राज्य झोळीत आलें।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।। २।।

तुम्ही मेळविला कसा राष्ट्र-मोक्ष।

विचारा असे ग्रीक लोकां समक्ष।

न युद्धाविना मार्ग मोक्षा निराळे।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।३।।

खलांच्या बलांच्या धरुनी भयाला।

प्रतिकार मेंगा स्विसांनी न केला।

झणी ते सुसंग्राम यज्ञा निघाले।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।४।।

नमीना रिपुंना अहो ! टायरोल।

वरीना भिकेला अहो! टायरोल।

स्वखड्गास त्याने परी प्रार्थियेले|

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? ।।५।।

करावा परांचा वृथा प्राण नाश।

अशी होति कां? हौस त्या श्री शिवास।

किती बंधुंचे रक्तबिंदू गळाले|

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।६।।

तशा स्थापुनी गुप्त संस्था सुवेळी।

रणीं झुंजली वीरशाली इटाली।

तिला हांक मारीत मांगल्य आलें।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।७।।

अहो ! तेंच केलें अमेरिकनांनी।

दिली देश-दास्या गचांडी लढोनी।

तदा दास्यते पुर्वभागी पळालें।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।८।।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।

असा भूतकालीन सिद्धांत जाणा।

स्वराज्येच्छुनें पाहिजे युद्ध केलें।

रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें ? ।।९।।

 

४) श्री शिवास मावळ्यांची प्रार्थना - (९वे कडवे ):

तेव्हा शिवनेरी। शिव आले। मुदित मावळे झाले।
णे
ते डळमळले। परतचे। सिंहासन जुलुमाचे॥९॥

॥शिवबा ! ये रे ये॥

रणावीण स्वातंत्र्य, सुंदर मी होणार, कारागृहाचे भय काय त्याला, नमने वाहून स्तवने उधळा, मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे ? या कविता महाराष्ट्रात खूप गाजल्या. पुढे पुढे तर यातल्या काही ओळींना सुभाषित होण्याचा मान मिळाला. पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलुम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता.

मेळावे, सभा-संमेलनांत त्यांच्या काव्यगायनामुळे अनेक स्वातंत्र्यसेनानींना ब्रिटिशांनी शिक्षा केल्याच्याही नोंदी आहेत. १९१०च्या दशकात गोविंदांचे काव्य सरकार जमा झाल्याच्या नोंदी आहेत.

त्यांचा अफजलखान वधाचा पोवाडा म्हणजे स्वातंत्र्याची कथा सांगण्यासाठीचा पोवाडा आहे.

१६ कडव्यांचा हा मोठा पोवाडा कवि गोविंद यांनी १९०४ ला लिहिला आहे. कडव्याचे ध्रुवपद आहे

 उठा अलें स्वातंत्र्यपर्व –रणीं चलाच स्नानाला ||धृ ||

    स्वातंत्र्य युद्धाच्या रणभूमीत शत्रूचे रक्त सांडण्याच्या स्पष्ट सूचना गोविंद या पोवड्यात देतात. आपल्या आर्यभूमीला शिवाजी राजांनी परतंत्र्यतून सोडविले. अनेक अडचणी आल्या तरी त्यांनी पराक्रम गाजवला. आमच्या स्वातंत्र्यावर घाला घालू पाहणार्‍या अफजलखानचा वध केला.शत्रू कितीही प्रबळ असला तरी त्यावर मात करता येते असे गोविंद यांनी सांगण्याचा प्रयत्न या पोवाड्यातून केला आहे.शत्रूच्या रक्ताने स्नान केल्यावरच स्वातंत्र्य मिळू शकते असे त्यांनी म्हटले आहे.उघड उघड इंग्रज अधिकार्‍यान विरोधी संदेश देणारा हा पोवाडा असल्याने सरकारने त्यावर ६ एप्रिल १९१० साली वृत्तपत्र कायद्यातील कलमाप्रमाणे बंदी घातली. पुढे १९३८ साली त्यावरील बंदी उठविण्यात आली असा उल्लेख आहे. कवी गोविंद हे आधुनिक महाराष्ट्रातील प्रतिभावान  कवी होऊन गेले. त्यांच्या आयुष्याची उमेदीची वर्षे क्रांति काळात गेली. त्यांच्या कविता क्रांती काळातच झाल्या आणि त्या कवितांनी क्रांती पण घडवली.

    इंग्रजी राजवटीत जाच वर्णभेद,अपमान,दुष्काळ,प्लेग आर्थिक गुंतवणूक या सर्वांमुळे लोक वैतागून गेले होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंतांची, राजकीय, सामाजिक, धार्मिक व वाड्मयीन क्षेत्रात  विचारांची   आंदोलने सुरू  झाली. या विचारवंतात कवी गोविंद येतात. त्यांनी १९०० ते १९१० या काळात आपल्या राष्ट्रीय काव्याने वैचारिक क्रांती केली.       

                                                          भारत माता की जय !

© डॉ. नयना कासखेडीकर

                                                  ----------------------- 

No comments:

Post a Comment