Friday, 17 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी साने गुरुजी

       स्वराज्य ७५ लेखमाला

 स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

  लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

   लेखांक  - १०

साने गुरुजी (पांडुरंग सदाशिव साने)

(१८९९ते १९५०)

  साने गुरुजी मराठीतले श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक आणि समाजसुधारक होते. प्रतिभावंत लेखक होते. इंग्रजी साहित्यात एम. ए. झाल्यानंतर अमळनेर येथील प्रताप कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून १९२४ ते १९३० नोकरीस होते. तिथल्या प्रताप तत्वज्ञान केंद्रात त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. कॉंग्रेस नावाचे साप्ताहिक सुरू केले. फैजपूरचे कोंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी काम केले.  १९३० ला नोकरी सोडून ते सविनय कायदेभंग चळवळीत सामील झाले. १९४२ च्या लढ्यात त्यांनी भूमिगत राहून काम केले. राष्ट्र सेवा दल स्थापन केले.  

मातृहृदयी साने गुरुजी यांनी राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवासही भोगावा लागला होता. लोकोद्धार हाच त्यांचा ध्यास असे. त्यांच्या कविता देशभक्ती आणि ईश्वर भक्तिने भारलेल्या असत. बर्‍याच कविता त्यांनी तुरुंगातच लिहिल्या आहेत. त्यांचा पत्री काव्यसंग्रह १६३ कवितांचा आहे. वोल्ट व्हीट्मिनच्या लिव्हज ऑफ ग्रास यावरुन पत्री हे नाव दिलेले आहे. तो १९३५ मध्ये लिहिला आहे. यात ७३ पानांचे एक खंड काव्य आहे. यातील सर्व कविता भक्तिपर आणि देशभक्ती या विषयावर आहेत. श्रीरामची प्रार्थना करताना ते कवितेत म्हणतात,

शिरू दे मनात जोम| शिरू दे मतीत तेज

करण्यास मातृसेवा उठू देच जेवी वीज ||

देशद्रोही वृत्तीवर टीका करताना  श्वान, मुर्दाड .अजगरसे सुस्त,असे प्रेरणा देणारे शब्द तर, संगर, रणभेरी, हाणू लाथ करू नि:ष्पात हे शब्द वापरतात . १६३ कवितांच्या या पुस्तकात देशभक्त किती ते मराठी, तूफान झालो, स्वातंत्र्य, सुसंस्कृत कोण?, प्रतिज्ञ, खंडकाव्य या कविता आक्षेपार्ह ठरल्याने इंग्रज सरकारने हे पुस्तक जप्त केले होते. सत्याग्रही नावाचे खंड काव्य १९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्ली येथील  तुरुंगात असताना लिहिले होते.

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही कविता सर्वज्ञात आहे. त्यांची राष्ट्रभक्ती त्यांच्या बलसागर भारत होवो, मनमोहन मूर्ती तुझी माते, देशासाठी मरू, एकच वेड, भारत सेवा, भारत माता माझी लावण्याची खाण, दिव्य मी स्वर्ग निर्मीन या कवितेत व्यक्त होते.

बलसागर भारत होवो

 

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

 

हे कंकण करि बांधियले,

जनसेवे जीवन दिधले,

राष्ट्रार्थ प्राण हे उरले,

मी सिदध मरायाला हो । बलसागर.... ।।१।।

 

वैभवी देश चढवीन,

सर्वस्व त्यास अर्पीन,

हा तिमिर घोर संहारिन,

या बंधु सहाय्या ला हो । बलसागर .... ।।२।।

 

हातात हात घेऊन,

हृदयास हृदय जोडून,

ऐक्याचा मंत्र जपून,

या कार्य करायाला हो । बलसागर .... ।।३।।

 

करि दिव्य पताका घेऊ,

प्रिय भारत गीते गाऊ,

विश्वात पराक्रम दावू,

ही माय निजपदा लाहो । बलसागर .... ।।४।।

 

या उठा करू हो शर्थ,

संपादु दिव्य पुरुषार्थ,

हे जीवन ना तरि व्यर्थ,

भाग्यसूर्य तळपत राहो । बलसागर .... ।।५।।

 

ही माय थोर होईल,

वैभवे दिव्य शोभेल,

जगतास शांति देईल,

तो सोन्याचा दिन येवो । बलसागर .... ।।६।।

----------------

 भारतमाता माझी लावण्याची खाण

प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण,

भारत माता माझी लावण्याची खाण |

माझ्या महाराष्ट्र भूमीत मोठे

प्रतापी पुन्हा वीर निर्मि प्रभो

धवो यशोगंध देवा दिगंतात

माझा महाराष्ट्र भाग्ये सजो ||

----------------------------

१९३० मध्ये जेंव्हा दांडियात्रा निघाली त्यावर साने गुरुजी यांनी स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई ही कविता लिहिली.

स्वातंत्र्यचे आम्ही शिपाई,

सुखवू प्रियतम भारतमायी

देशभक्तीचा सुदिव्य सोम

पिऊनी करू प्राणांचा होम

कष्ट हाल हे आमुचे भाई|| स्वातंत्र्याचे ...

धैर्याची ती अभंग ढाल

त्यागाची ती वस्त्रे लाल

निश्चयदंडा करांत राही ||स्वातंत्र्याचे...

समानतेची स्वतंत्रेतची

पताकेवरी चिन्हे साची

दिव्य पताका फडकत जाई || स्वातंत्र्याचे ...

ऐक्याचा झडतसे नगारा

कृतिरणशिंगे भरीती अंबरा

चला यार हो करू रणघाई|| स्वातंत्र्याचे ...

कळिकाळाला धक्के देऊ

मारणालाही मारून जाऊ

प्रताप अमुचा त्रिभुवन गाई || स्वातंत्र्याचे ...

अशी चौदा कडव्यांची ही कविता त्यांनी धुळ्याच्या तुरुंगात मे १९३० मध्ये लिहिली. शेवटी ते यात म्हणतात,

देश अमुचा करू स्वतंत्र

मनोबुद्धीला करू स्वतंत्र

स्थापन करणार लोकशाही ||

----------------------

भारतमाता

हे भारतमाते मधुरे!

गाइन सतत तव गान।।

त्याग, तपस्या, यज्ञ, भूमी तव जिकडे तिकडे जाण

कर्मवीर किती धर्मवीर किती झाले तदगणगान।। गाइन....।। व

दिव्य असे तव माते करिता इतिहासामृतपान पान

तन्मय होतो मी गवहिरतो हरपनू जाते भान।। गाइन....।।

देऊन देऊन दीन जाहलीस तरिही देशी दान

परजीवन  सांभाळीशी संतत अर्पुनपुली मान।। गाइन....।।

सत्वाचा सत्याचा जगती तूची राखीशी मान

तुझ्या कथा ऐकाया उत्सुक भगवंताचे कान।। गाइन....।।

एकमुखाने किती वर्णू मी आई तव महिमान

थकले शेषही,थकले ईशही  अतलु तुला तुलना न।। गाइन....।।

धूळीकण, फळ, फूल, खडा वा असो तरुचे पान

तुझेच अनुपम दाखविती मज पवित्र ते लावण्य ।। गाइन....।।

मांगल्याची माधुर्याची पावित्र्याची खाण

परमेशाच्या  कृपाप्रसादे  नुरेतुजला वाण।। गाइन....।।

समरसता पावणे तुझ्याशी  मदानंद हा जाण

यश:पान तव सदैव करतो करतो मी तव ध्यान।। गाइन....।।

बहुभाग्याने बहुपुण्याने झालो तव संतान

तव सेवा मम हातुन होता हरपो माझा प्राण।। गाइन....।।

(त्रिचनापल्ली तुरुंग,जानेवारी १९३१)

त्रिचनापल्ली च्या तुरुंगात असताना त्यांना आंतरभारती ही संकल्पना सुचली. प्रांताप्रांतातील भेद नाहीसा करून बंधुत्वाचे वातावरण वाढावे म्हणून हा प्रयोग त्यांनी केला. प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात ,चालीरीती समजून घ्याव्यात, असे त्यांना वाटायचे. त्यांनी कादंबरी, लेख, निबंध, काव्य चरित्रे, नाट्यसंवाद असे विविध साहित्य लिहिले. शामची आई हे पुस्तक विशेष गाजले त्यावरील चित्रपट पुरस्कार प्राप्त ठरला. मानवता वाद सामाजिक सुधारणा आणि देशभक्ती हे त्यांचे लेखनाचे विषय होते.

 

भारत माता की जय !

© डॉ. नयना कासखेडीकर

                                                -------------------------

No comments:

Post a Comment