Wednesday 15 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला-स्वा. सावरकर

 

  स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - ८


 स्वातंत्र्यवीर सावरकर

( विनायक दामोदर सावरकर )

(१८८३  ते १९६६ )


सावरकरांच्या कवितेत राष्ट्रीय जाणीव अत्यंत दिव्य आणि दाहक स्वरुपात दिसते . त्यांच्या एकूणच सर्व कविता याच विचारांनी भारलेल्या आहेत. अनेक कवि राष्ट्रीय विषय कवितातून लिहीत होते आणि जेंव्हा कवितेतून इंग्रजी राजवटीबद्दल कवी लिहू लागले, या माध्यमातून राजकीय जागृती घडू लागली, या राजवटीबद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण होऊ लागली तेंव्हा इंग्रजांचं लक्ष या राष्ट्रीय कवितेकडे गेलं. या कविता क्रांतीचा जयजयकार करत होत्या, तेंव्हा इंग्रज सरकारने अशा कविता जप्त करण्यास सुरुवात केली. त्यावर बंदी घालण्यात आली. सावरकर यांचा श्री बाजी देशपांडे यांचा पोवाडा आणि सिंहगडचा पोवाडा, गोमांतक, ही त्यांची प्रसिद्ध काव्ये.

१९३८ मध्ये शस्त्र निर्बंध रद्द करण्याची मागणी करण्यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यानी मोठी मिरवणूक काढली होती तेंव्हा हे रचलेले शस्त्रगीत. 

शस्त्रगीत

व्याघ्र-नक्र-सर्प-सिंह हिंस्त्र जीव संगरी
शस्त्रशक्तीने मनुष्य ही जगे धरेवरी।।

रामचंद्र चापपाणी चक्रपाणी श्रीहरी
आर्तरक्षणार्थ घेति शस्त्र देव ही करी
शस्त्र पाप ना स्वयेंची, शस्त्र पुण्य ना स्वयें
इष्टता-अनिष्टता त्यास हेतूनेच ये ।। १ ।।
राष्ट्र रक्षणार्थ शस्त्रधर्म मानिते जरी
आंग्ल, जर्मनी, जपान, राष्ट्र राष्ट्र भूवरी
भारतातची स्वदेश रक्षणार्थ का तरी
शस्त्रधारणीं बळेची बंध हा आम्हावरी
शस्त्र बंधने करा समस्त नष्ट या रक्षण
शस्त्रसिद्ध व्हा झणिं समर्थ आर्त रक्षणा
व्हावया स्वदेश सर्व सिद्ध आत्मशासना
नव्या पिढीस द्या त्वरें समग्र युद्ध शिक्षणा ।।

राष्ट्रीय जाणिवेच्या कविता लिहिणारे, आपल्या सर्वांना माहिती असणारे या कालखंडातील महत्वाचे कवी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. श्रीमंत सवाई माधवरावाचा रंग ही त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहिलेली पहिली कविता. बाजीप्रभू, तानाजी यांच्यावरील पोवाडे त्यांनी रचले आहेत. त्यांच्या कवितेचा गाभा हा राष्ट्रप्रेम किंवा देशभक्ती हाच होता. त्यांच्या कवितेने मनामनात देशभक्तीची प्रेरणा जागवली आहे. सागरास, सांत्वन, बेदी, पहिला हप्ता, चांदोबा भागलास का?, मूर्ती दुजी ती, माझे मृत्यूपत्र, आत्मबल, सायंघंटा अशा दर्जेदार काव्यरचना मराठी साहित्याला बहाल केल्या. मृत्युपत्रात तर स्वातंत्र्य देवतेसाठी मरण म्हणजे जनन अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या बरोबरच त्यांचे दोन्ही बंधू श्री.बाबाराव (गणेशराव) सावरकर आणि डॉ.नारायणराव सावरकर मित्रमेळ्यासाठी क्रांतिगीते लिहून तरुणांना स्फूर्ती देत होते. 

१८९८ मध्ये त्यांनी लिहिलेला                स्वदेशीचा फटका

आर्यबंधू हो उठा उठा ,का मठासारखे नटा सदा |

हटा सोडूनी कटा करूं या म्लेंच्छपटां ना धरूं कदा ||

काश्मिराच्या शाली त्यजुनी अलपाकाला कां भुलतां|

मलमल त्यजुनी वलवल चित्तीं हलहलके पट कां वरितां?||

राजमहेंद्री चीट त्यजोनी विटके चीट ते कां घेता|

दैवें मिळता वाटी इच्छितां नरोटि नाही कान आता?

असा हा ३१ कडव्यांचा फटका आहे.

 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशभक्तीपर गाणी, अभंग, नाट्यपदं, पोवाडे, आरत्या असे वैविध्यपूर्ण आणि उत्स्फूर्तपणे काव्यलेखन केले आहे. त्यांचे कुठलेही काव्य असो वा लिखाण, भाषण असो वा अखिल मानवजातीला, हिंदूराष्ट्राला सातत्याने मार्गदर्शक ठरणारे असेच होते. शस्त्र निर्बंध व्हावे यासाठी १९३८-३९ सालच्या दरम्यान पुण्यात विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली होती. त्यावेळी सावरकरांनी रचलेलं संचलन शस्त्रगीत हे एका प्रसंगापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण शस्त्र वादाचेच महान शस्त्र आहे. अशा प्रकारचे अर्थपूर्ण आणि जोशपूर्ण शस्त्र संचलन गीत गातांना अंगावर अक्षरशः शहारे येतात.त्यांची देशभक्ती सांगणार्‍या या रचना -

जयोस्तुते

जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

-------------------

सागरास -

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

 भारत माता की जय !

    © डॉ. नयना कासखेडीकर

                                                 ----------------------- 

No comments:

Post a Comment