Sunday, 19 June 2022

‘स्वराज्य ७५’ लेखमाला- कवी यशवंत

 

स्वराज्य ७५ लेखमाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय कवी

लेखन – डॉ.नयना कासखेडीकर

लेखांक  - १२  



यशवंत  ( यशवंत दिनकर पेंढरकर)

(१८९९  ते १९८५)

     स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी  ही व्याकुळ करणारी कविता लिहिणारे कवी यशवंत. कवी यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली.

रविकिरण मंडळात आल्यानंतर यशोधन, यशोगंध, यशोनिधि, यशोगिरी, ओजस्विनी हे काव्य संग्रह प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वातंत्र्याचा ध्यास घेतला. "आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन, पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/ यशोधन) "स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे, तेव्हाच आपण पावन होऊ,  असे ते उद्‌गारतात (तुरुंगाच्या दारात/यशोधन). तुटलेल्या तारा या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. गुलामाचे गाऱ्हाणे' आणि इशारा' या प्रतिकात्मक आशय व्यक्त करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते.

तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी यशवंत म्हणतात-

वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची

किती मन्मना नाही क्षिती

भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी?

मुक्त तो रात्रंदिनी

शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे

घोष मंत्रांचा गमे ||

या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.यातून त्यांनी स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास पत्करणार्‍या,देशभक्ताचे  आत्मत्याग, निष्ठा, स्वातंत्र्य भक्ती यांचे वर्णन केले आहे.  आणखी एक कविता --

गाऊ त्यांना आरती -

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती
राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती

कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले
संभ्रमी त्या जाहले कृष्णापरी जे सारथी, गाऊ त्यांना आरती

स्वार्थहेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती
आप्तविस्तारांत ज्यांच्या देशही सामावती, गाऊ त्यांना आरती

देश ज्यांचा देव, त्याचे दास्य ज्यांचा धर्म हो दास्यमुक्ति ध्येय हो
आणि मार्कंडेयसे जे जिंकिती काळाप्रती, गाऊ त्यांना आरती

देह जावो, देह राहो; नाहि ज्यांना तत्क्षिती, लोकसेवा दे रती
आणि सौभद्रापरी देतात जे आत्माहुती, गाऊ त्यांना आरती

जाहल्या दिंमूढ लोकां अर्पिती जे लोचने, क्षाळुनी त्यांची मने
कोटिदीपज्योतिशा ज्यांच्या कृती ज्यांच्या स्मृती, गाऊ त्यांना आरती

नेटके काही घडेना, काय हेतु जीवना, या विचारी मन्मना
बोधितो की "एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती."

जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून मांडले. त्यांची कविता विविध रुपातली आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. ते मानवतावादी आहेत म्हणूनच त्यांचे बंदिशाला' हे बालगुन्हेगारांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. यातून त्यांची राष्ट्रमाते विषयीची गाढश्रद्धा दिसून येते.

ते यात म्हणतात,

वंदन तुज मायभूमी हे अखेरचे,

नकळे तव दर्शन कधी फिरून व्हायचे |

उपेक्षित बाल गुन्हेगारा कडे कवीचे लक्ष आहे.

दिवंगताचे स्मारक या त्यांच्या कवितेत दिवंगत झालेल्या देशभक्ताच्या घरी त्याचे कुटुंबिय हालअपेष्टान्ना सामोरे जात आहेत. त्यांच्या दैन्य अवस्थेकडे कोणाचेही लक्ष नाही, ते उपेक्षित झाले आहेत. त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले पाहिजे असे ते म्हणतात . या देशभक्ताच्या स्मारकासाठी पैशांची मागणी होते. स्मारक होते, समारंभपुरक उद्घाटन होते त्याच दिवशी रात्री घरातील बायका मुलांना हाकलून दिले जाते हे दृश्य कवीला सहन होत नाही. राष्ट्रासाठी प्राणर्पण करणार्‍यांच्या घरातील माणसांचे असे हाल होऊ नयेत असे ते म्हणतात. ते या कवितेत अशा लोकांवर टीका करतात.   

    बडोदा संस्थानचे ते राजकवी होते. काव्यकिरीट ' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणाविषयावरील  खंडकाव्य आहे.  जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून कवी यशवंतांनी हृदयंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटलं तर यातील प्रत्येक भावगीत, ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. मुठे लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. मोतीबाग ' हा त्यांचा एकमेव बालगीतांचा संग्रह आहे. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या कर्म भूमीत सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील चाफळ या गावी यशवंत यांचे आयुष्य गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अभिमानाचा ठसा त्यांच्या मनावर उमटला होता. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम केल्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

  भारत माता की जय !

 © डॉ. नयना कासखेडीकर

                                                  ------------------------ 

No comments:

Post a Comment