‘स्वराज्य
७५’ लेखमाला
स्वातंत्र्यपूर्व
काळातील राष्ट्रीय कवी
लेखन – डॉ.नयना कासखेडीकर
लेखांक - १३
अज्ञातवासी( दिनकर गंगाधर केळकर)
(१८९६– १९९०)
दिनकर यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी करंजगाव, कामशेत येथे झाला. दिनकरराव हे कवी, काव्यसंग्रह
संपादक, तत्वज्ञानाचे अभ्यासक, म्हणून ओळखले
जात असत. त्यांचे शिक्षण बेळगाव आणि पुणे येथे झाले. ते पुण्यात रहात होते. विसाव्या
शतकाच्या सुरूवातीला राजकीय, सामाजिक चळवळी आणि
स्वातंत्र्याची उर्मी याने भारलेला जो तरुण वर्ग होता त्यात अज्ञातवासी एक होते.
लहानपणापासूनच स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग मनात जागृत झालेलं होतं. ते कवितांमधून
शब्दबद्ध होत असे. १९५० पासून ' अज्ञातवासी ' या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन सुरु केले. वेगवेगळ्या मासिकात त्यांच्या
कविता प्रसिद्ध होऊ लागल्या व प्रत्येकाच्या तोंडी येऊ लागल्या पण कवी कोण हे
गुलदस्त्यात होतं. कवी अज्ञातवासींच्या कविता मनोरंजन मासिकात छापल्या जाऊ लागल्या
तेंव्हा त्यांचं वय फक्त १४ वर्षे होते. अज्ञातवासी हे ध्येयवादी कवी होते.
अज्ञातनंद (१९२४) आणि अज्ञातवासींची कविता (१९३३) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह.
त्यांनी लोकजागृतीसाठी काव्य लिहिले.
‘रसिकांस...’ या कवितेत ते
म्हणतात,
या नव्या युगाचे पाईक तुम्ही
थोर
या चला जतू बांधण्या नवे मंदिर
स्वातंत्र्यदेवता उभी संचित
समोर
मी वाजवणार नगारा ||
तर मायभूमी या कवितेत ते म्हणतात,
तन मन तुझ जननी, होय मुक्त अर्पूनी
देह पडो तव भजनी, आस पूर्ण ही करी ||
ध्यास मायभूमी तुझा लागला मदंतरी
||धृ ||
पेशव्यांच्या पुण्याच्या दरबाराचे वर्णन करताना ते म्हणतात,
फुरफुरे लाख भिमथडी,
सलामी खडी
झडतसे फेरी
तळपती तिखट तल्वारी
केव्हढी, पुण्याची भीती!
पहा कपटी
चळचळा वैरी
तळपती तिखट तल्वारी ||
अज्ञातवासी यांची कविता महाराष्ट्राचे गतवैभव, मराठ्यांचे सामर्थ्य यांची उठावदार चित्रे रेखाटणारी, कमला, गोदातटी, खडकीची लढाई, मराठेशाहीतील एक प्रसंग यातून पूर्वजांच्या पराक्रमांचे वर्णन त्यांनी
केले आहे.
इथे पडे परम पवित्रा, पराक्रमी राणी
इथे स्वर्ग या भूवरती, खेचून जी आणी || असे
झाशीच्या राणीच्या पराक्रमाचे वर्णन ते करतात.
सरदार धन्य
एव्हढा -
धडधडा झडे चौघडा, गडावर चढे मर्द फांकडा
अवघड गड अस्मानी डोले
वरतीं बघतां फिरतिल डोळे
खालीं पाताळांतिल इमले
आसर्यास बाजुस कडा, गडावर चढे मर्द फांकडा १
अजुनी तांबडें नाहीं फुटलें
फटीफटींतुनि गवत कोंवळें
वार्याच्या झुळुकेनें हाले
शोभतो दंवाचा सडा, गडावर चढे मर्द फांकडा २
हातांतील तल्वार ठिबकते
पाठीवर वाघीण नाहते
‘ करील कौतुक ती, ’ मन वदतें
चालला शिपाई खडा, गडावर चढे मर्द फांकडा ३
गडावरुन खिडकींतुन कोणी
एकसारखी टक लावोनी
बघे स्वारिला डोळे भरुनी
सरदार धन एवढा, गडावर चढे मर्द फांकडा.४
शिवाजी महाराज, महादजी शिंदे,
स्वातंत्र्यवीर मॅझीनी, समाजसुधारक आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या विषयीची
भक्तीसुद्धा त्यांनी कवितेतून मांडली आहे. भारतीय स्वातंत्र्याबद्दल ते खूप
आशावादी होते. भारताला नवे स्वातंत्र्य मिळेलच अशी त्यांची श्रद्धा होती. ते
म्हणतात,
हा निजलेला दक्षिण
जातिवंत केसरी पण
उगवणार लवकर दिन
नव्या युगाला|स्वातंत्र्याचे हा बांधील तोरण ||
वर्तमानकालीन दुःस्थितीविषयी खंत
व्यक्त करणारी ऐतिहासिक कविता, काव्य आणि रसिक, निसर्ग, वात्सल्य, प्रेम
इत्यादी विषयी, गूढगुंजनात्मक अशी रचना त्यांनी केली.
त्यांच्या कवितेवर तांबे यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कवितेमधील शेवटच्या
भागातील कविता १९८० नंतरच्या आहेत. अज्ञातवासी यांनी १९२४ साली 'अज्ञातवास' तर १९३३ साली 'अज्ञातवासींची
कविता भाग : १' प्रकाशित केला. तर १९८५ साली 'अज्ञातवासींची कविता भाग : २ ' प्रकाशित केला.
भारत
माता की जय !
© डॉ. नयना कासखेडीकर
------------------------------
No comments:
Post a Comment