Tuesday 2 August 2022

जय देवी मंगळागौरी...

 

जय देवी मंगळागौरी...

 श्रावणातली मंगळागौर म्हणजे गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत मांडलेली पार्वतीची पूजा. मंगळागौर म्हणजे पार्वतीच्या रुपातील अन्नपूर्णा. मंगळागौरीची पूजा करणं हे विशेषता महाराष्ट्रातले पारंपरिक व्रत.अशाच प्रकारची सौभाग्यदायिनी पूजा बंगालमध्ये मंगलचंडिका नावाने करतात. पुराण ग्रंथात भगवती मंगल चंडिका स्तोत्र आहे . शिव शंकराने तिला जगन्माता म्हटलं आहे. ही भगवती सर्व संकटनाचा नाश करणारी आणि सदैव कल्याण करण्यात तत्पर असणारी आहे.सढळ हाताने शुभ, मंगल करणारी, मंगल ग्रहाची पण इष्ट देवता असणारी मंगलाधिष्ठात्री आहे .या स्तुतीतले हे वर्णन भगवान शंकराने भगवतीची उपासना करताना केलेलं आहे असे म्हंटले आहे. या मंगला देवीची सर्व प्रथम श्री शंकराने उपासना केली त्यानंतर, देवता, मुनि आणि नंतर मानवाने ही उपासना सुरू केली.मग विश्वात सगळीकडे ही पूजली जाऊ लागली. स्त्रियांनी सुद्धा आपले कल्याण व्हावे म्हणून या देवीची उपासन केली. आणि बरोबरच आहे आपले आयुष्य सुखासमाधानात जावे,मुला-बाळांचे कल्याण व्हावे, संकटे येऊ नयेत असे कुणाला वाटणार नाही? त्यामुळे मनाला विश्वास देणारी एक शक्ती आपण मानत असतो.हा मनुष्य स्वभाव आहे. त्यामुळेच अशा उपासना होत असतात.पद्धती वेगवेगळ्या असतात एव्हढंच. ही संस्कृती मनुष्याने आपले जीवन सुखकर व आनंदी व्हावे म्हणून ती निर्माण केली आहे.ती तो सामूहिक पद्धतीने पाळत असतो ,यात आपले विविध सण, उत्सव, पूजा-अर्चा यासारख्या धार्मिक गोष्टी आणि त्या निमित्ताने वडीलधारी माणसे लहान मुलामुलींवर जीवनातल्या चांगल्या मूल्यांचा संस्कार करत असतात.  


  

       वटसावित्री, मंगळागौरी, हरितालिका हे तसे हिंदू धर्मातले कौटुंबिक धार्मिक सण.नवविवाहिता श्रावणात शिव आणि गणपती सहित पार्वतीची पूजा करतात.

मम पुत्र पौत्रादिवृद्धये अवैधव्य भर्तुरारोग्यादि सकलकामना

सिद्धीद्वारा श्री शिवमंगलागौरी प्रीत्यर्थं पञ्च-वर्षात्मकं मंगलागौरीव्रतम करिष्ये !

असा संकल्प नवीन लग्न झालेल्या मुली या पूजेच्या वेळी करतात. यातला धार्मिक दृष्टीकोण थोडा बाजूला ठेऊन पाहिलं तर, तो एक प्रकारचा कौटुंबिक संस्कार सुद्धा आहे. हिंदू धर्मातील कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठीचा मूल्यसंस्कारच. कारण शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते. पती-पत्नी मधील प्रेम आणि निष्ठा याचं हे उदाहरण आहे. मंगळागौर पूजेचे हे अधिष्ठान म्हणजे हेच आदर्श आमच्यात यावेत. शिवाय पुजा समूहाने म्हणजे आपल्या नवविवाहित मैत्रिणी,बहिणी यांच्या समवेत एकत्रित पणे ही आराधना करणे म्हणजे एक सामुहिक संस्कारच.

  नवीन लग्न झालेल्या सुनेला/मुलीला या निमित्ताने आपल्या घरातिल नातेवाईक मंडळींचा परिचय व्हावा, आपले हितचिंतक, ओळखीचे यांचा परिचय व्हावा ,जवळून ओळख व्हावी व हे संबंध आणखी दृढ व्हावेत म्हणून या प्रसंगी हळदी कुंकू करण्याचे प्रघात पडले. त्याच बरोबर प्रत्यक्ष भेटीमुळे होणारा आनंद  आणि तो एकमेकात वाटताना मिळणारे समाधान सुद्धा वेगळेच . 

मंगळागौरी पूजनानिमित्त समवयस्क मैत्रिणी व बहिणी जमलेल्या असताना आपले अनुभव एकमेकांना सांगताना, गप्पा मारताना आणि एक मनोरंजन म्हणून सुद्धा मंगळागौरीचे खेळ व गाणी म्हणण्याची पद्धत आहे. यात रात्री जागरण करून हे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. हे खेळ म्हणजे सर्वांगाला व्यायाम होणारे असतात. ती एक प्रकारची आसनेच असतात.स्त्रियांना फक्त घरातली कामेच करावी न लागता त्यांना मनोरंजन पण हवे ,आनंद मिळावा या हेतूने गाण्याची ही जोड देऊन हे खेळ खेळले जातात.हे जिम्नास्टिकच आहे.मनाची एकाग्रता, शरीराची लवचिकता, नेम साधणे हे सर्व आजच्या आरोबीक्स प्रमाणे  गीतांच्या तालावर व चालींवर खेळले जातात. 


    यात अनेक प्रकारच्या फुगड्या, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, कोंबडा,गाठोड, कीकीचे पान, नखोल्या, आई मी येऊ का?, भोवर भेंडी,पिंगा ,  सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा असे जवळ जवळ ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात खेळताना स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर केलेला असतो. या गीतांतून त्या नवविवाहितेच्या मनातील विचारच प्रगट होत असतात. आचार विचार महत्वाचे आहेत पण आता याच्या जोडीला परंपरा म्हणून दागिन्यांना पण महत्व आलेलं आहे. नटण मुरडण, खेळणं बागडण हे जात्याच स्त्री विशेष गुण. मनात काहीतरी असतं, कुठेतरी खुपत असतं, काही गुपित पण असतं, तर कुठला आनंद आणि कुठल तरी दु:ख, कोणाला तरी सांगावसं वाटतं, तिथे औपचारिकता नको असते. पण यासाठी भेटायला हवं ना? मग निमित्तही हवं त्याला.

    पूर्वी लहान वयात मुलींचे लग्न होत असे. मुलगी म्हणून बंधने असत. खेळण्या बागडण्याचे वय असताना सुद्धा तिला सासरी एका शिस्तीत राहावे लागे. कारणाशिवाय कुठे जायचं नाही, उशिरा पर्यन्त बाहेर थांबायचे नाही. मग पुढे पुढे या रूढीच होऊन गेलेल्या दिसतात.  सासरच्या लोकांबद्दल तक्रार करायची नाही. घरात बोलायची सोय नाही मग कोणापाशी बोलणार? जिवाभावाच्या मैत्रिणीच. दुसरं कोण? त्या एक तर समदु:खी असतात. आपल्याच सारख्या आनंद आणि दु:खाच्या अनुभावातून ती ही गेलेली असते. त्यामुळे तिला माझे मन जास्त च कळेल या भावनेतून ही अशी गीते लिहिली गेली असणार. यासाठीच भेटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी निमित्त असायची ती श्रावणात मंगळागौर जागविणे, भाद्रपदात हरितालिका जागविणे, भोंडला किंवा हादगा किंवा भुलाबाईची पुजा करणे.  वटसावित्री, नागपंचमी, संक्रांत, चैत्र गौर हे सुद्धा अशा निमित्त केलेले हळदी कुंकू समारंभ. पण विशेषत: लहान मुलींना एकत्र आणणे, त्यांना निसर्ग शिक्षण देणे, वनस्पतींची ओळख करून देणे, कुटुंब संस्थेतल्या नात्यांची ओळख पक्की करून देणे, पाककृती किंवा पदार्थ ओळखणे, सजावट, मांडणी स्वच्छता यातलं कला कौशल्य दाखविणे, संस्कार करणं अशा अर्थाने त्यांना शिक्षण द्यायचे ते त्यांना साजेशा अशा खेळातून, गाण्यातून. कारण हे सर्व त्या मुलीला तिच्या आयुष्यात उपयोगी पडणार असतं.

माहेरी जाणे वनस्पतींची ओळख, आयुर्वेदाची ओळख, औषधी वंनस्पती बद्दल माहिती, संयम, आदर, प्रेम ,किचन मधली ओळख, पदार्थ शिकणे, गाणी म्हणणे , याबरोबरच जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूल्ये तिला शिकविणे हा उद्देश असायचा आजही हा उद्देश आवश्यक आहे. 

आज मंगळागौर पूर्वी जी घरातच असायची ती आता सामाजिक झाली आहे. सर्वच जण आता हे खेळ आपल्याकडे मुलींना बोलवून कार्यक्रम म्हणून ठेऊ लागले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे, सामाजिक संस्कार घडतो आहे. हे खेळ सामाजिक उपक्रम म्हणून करण्यात संस्कार भारती या संस्थेचे मोठे योगदान आहे हे जवळून अनुभवले आहे. आपल्या संस्कृतीचा जागर असाच होत राहिला पाहिजे . वेळ नाही च्या निमित्ताने या गोष्टी केल्या नाहीत तर अनेक संस्कार करायचे राहून जातील आणि सतत वरच्या वर्गात ढकलल्या सारखे होईल. काही गोष्टी शिकायच्या आणि शिकवायच्या राहतील.एकत्र कुटुंबं व्यवस्था जाऊन 3 जणांच माझं कुटुंब झालच आहे , वैयक्तिक स्वार्थ बोकळतो आहे, नाती नको आहेत . यावर हे कसे टिकवायचे याचे उत्तर म्हणजे ती शिकवण्याच्या परंपरा पाळणे होय. नव विवाहित मुलींनो या परंपरा डोळसपणे पाळत रहा आपोआप शिक्षण मिळत राहील. सर्वांना मंगळागौरीच्या शुभेच्छा !   (सर्व फोटो गूगल वरुन साभार)

-       © डॉ. नयना कासखेडीकर.

------------------------

No comments:

Post a Comment