भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही जगातल्या इतिहासातली सर्वाधिक महत्वाची सामान्य जनतेची चळवळ आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी मिळून बलाढ्य अशा वसाहतवादी ब्रिटिश साम्राज्याला शरणागती पत्करायला लावली. म्हणून जगाच्या इतिहासात या लढ्याला महत्वाचे स्थान आहे. हा लढा समाप्त झाला तो १५ ऑगस्ट१९४७ ला.
स्वातंत्र्य
लढ्याची सुरुवात व प्रमुख घटना बघितल्या
तर हिंदुस्थानच्या जनतेने वर्षानुवर्षे काय काय आणि किती भोगले होते याची कल्पना
येते. यासाठी पुरुषांच्या बरोबर स्त्रिया सुद्धा लढल्या. भारताला स्वातंत्र्य
मिळवण्यात त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणार्या ,रूढी परंपरेने जखडल्या असताना,अनेक प्रकारची बंधने पाळावी लागत असताना समाजातल्या अनेक थरातील महिलांनी
स्वयंस्फूर्तीने ,जबाबदारी घेऊन स्वातंत्र्य लढ्यात कामगिरी
केल्याचे दिसते.त्यांच्यापुढे आदर्श होते ते १८५७ च्या स्वातंत्र्याच्या उठावात, स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढलेल्या योद्ध्या राणी लक्ष्मीबाई व तिच्या
सहकारी, अवधची बेगम हजरत महल,
इंदूरच्या होळकर घराण्यातली राणी भीमाबाई, मद्रास प्रांतातील
शिवगंगा संस्थांनाची राणी वेलुंचीयार, कित्तूरची राणी
चेन्नमा.
या सर्व घटना मनाला क्लेश देणार्या होत्या. त्याचं
प्रतिबिंब वृत्तपत्रे आणि साहित्यातून उमटत होते. आनंदमठ- बंकिम चंद्र
चट्टोपाध्याय, स्वा. सावरकर यांचे
१८५७ चे स्वातंत्र्य समर, महात्मा गांधी यांचं हिंद स्वराज्य, यातून लोकांमध्ये जागृती होत होती. वेळोवेळी ब्रिटीशांच्या अन्यायाला
कंटाळून देशप्रेमी, देशभक्त आपल्या भावनांना लिखाणातून वाट
करून देत होते. काही जाहीरपणे, काही एकमेकांशी संवादातून, दैनंदिन व्यवहारात व्यक्त होत.स्त्रिया सुद्धा या विषयावर आपली मते प्रकट
करत. लिहित. विशेषता शिक्षणाचा प्रसार होऊ लागला तसे महिलाही वाचू लिहू लागल्या.
विचार करू लागल्या.
१९ व्या शतकात हिंदुस्थानात साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार वाढत गेला .त्यामुळे लोकांना ज्ञानाची गोडी लागली होती.दळणवळणाची साधने निर्माण झाली होती. पुढे विद्यापीठे निर्माण झाली. इथल्या लोकांना शिक्षणातून लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद, समाजवाद या संकल्पना कळू लागल्या. दृष्टीकोण बदलला. सतीप्रथा, बालविवाह, केशवपन, नरबळी, अस्पृशता या प्रथा बंद करण्यासाठी सुधारक प्रयत्न करत असले तरी ब्रिटीशांनी याचा फायदा घेतला. मिशनर्यांनी तर स्त्री शिक्षणाचा उपयोग धर्मांतराचा मार्ग म्हणून केला.स्त्रियांना शिक्षण देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. बंगाल मध्ये याची सुरुवात झाली. मग महाराष्ट्रात .
समाज सुधारक जनजागृती पर लेखन करू लागले.
शिक्षणामुळे व्यापक दृष्टीकोण तयार झाला आणि स्वातंत्र्य आंदोलनाला चालना पण
मिळाली. उपेक्षित लोक ही जागृत झाले आणि ख्रिश्चन धर्म प्रसार रोखण्याचे प्रयत्न
होऊ लागले. अशा प्रकारे ब्रिटीशांनी त्यांच्या सोयीसाठी केलेल्या शिक्षण व सोयी, सुधारणा यांचा फायदा भारतीय लोकांना झाला.
या सुधारणा भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जागृती निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या.
भाऊ दाजी लाड,विष्णुशास्त्री पंडित,
गोपाल हरी देशमुख, जगन्नाथ शंकर शेठ,
बाळशास्त्री जांभेकर,महात्मा ज्योतिबा फुले, ताराबाई शिंदे,पं .रमाबाई ,महर्षी
धोंडो केशव कर्वे,या सुधारकांनीही स्त्री सुधारणेसाठी
प्रयत्न केले. शिक्षणामुळे सजग झालेल्या स्त्रिया, रूढी
परंपरा यांचे जोखड बाजूला करत त्या स्वत:ला बदलू पहात होत्या. स्त्री नेतृत्व
उदयाला येत होतं. स्त्रिया आत्मविश्वासाने स्त्रियांसाठीच अनेक क्षेत्रात सामाजिक
काम करू लागल्या. स्त्रियांच्या संघटना निर्माण होत होत्या.क्रांतिकारक बाबाराव
सावरकर यांनी तर १९०५ साली स्वदेशीचा पुरस्कार करणारी आत्मनिष्ठ युवतीसंघ ही
स्त्री संघटना नाशिक येथे स्थापन केली.
अशा प्रकारे सर्वच
क्रांतिकारकांच्या आणि देशभक्तांच्या घरातून स्त्रिया सुद्धा कामाला लागल्या
होत्या. सामान्य देशभक्ताच्या घरातील स्त्रिया आपला पती ब्रिटीशांच्या विरोधात
आंदोलनात सहभागी झाल्यानंतर तुरुंगवास भोगायला कैदेत जातो,
तेंव्हा तर लहान लहान मुले आणि संसार कसा सांभाळायचा असा मोठा प्रश्न या
स्त्रियांना असे.
काहीं स्त्रियांनी तर स्वातंत्र्य चळवळीत नेतृत्व
केले,
हेरगिरी केली, भूमिगतांना सहकार्य केलं आणि तुरुंगवास सुद्धा
भोगला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची चळवळ याबरोबरच समांतर सुरू असलेले सामाजिक
सुधारणा हे ही काम स्त्रिया करत होत्या. ब्रिटीश
विरोधाने सगळा भारतच ढवळून निघाला होता.
मॅडम
भिकाजी कामा - परदेशात राहून आपल्या
देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणे अत्यंत अव्घ्जड गोष्ट तेही एका स्त्रीने हे
आश्चर्यकारक होतं. १८ ऑगस्ट
१९०७ या दिवशी,स्वतंत्र भारताचा ध्वज एका आंन्तराष्ट्रीय मेळाव्यात फडकीवणाऱ्या
धाडसी मॅडम कामांचे नाव भारताच्या स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक लढ्यात ठळकपणे लिहिले
गेले आहेच.परंतु जगभरातही त्यांचे नांव आदराने घेतले जात असे.त्याचे
कारण,हिंदुस्थानातल्या ब्रिटीशांच्या दडपशाहीचा अर्थ व स्वरूप,त्यांनी
अमेरिका,फ्रान्स व इंग्लंड मध्ये जाऊन तिथल्या जनते समोर उलगडून दाखविला. हिंदुस्थानाबद्दल
व स्वातंत्र्य मिळण्याबाबत तिथल्या जनतेला आपल्या भाषणातून, वृत्तपत्रीय लेखनातून,
प्रसिद्धी पत्रकातून, बैठकांमधील चर्चातून जनमत वळवण्याचा प्रयत्न मडॅम कामा यांनी
केला.
बंगालच्या फाळणी नंतर पॅरिस मध्ये एक सभा
बोलावली होती त्यात मॅडम कामा यांचे भाषण झाले, त्या म्हणाल्या, “ हिंदुस्थानच्या
स्त्री पुरुषांनो ,अशा पारदास्यात
जगण्यापेक्षा आपण सर्वच्या सर्व लोक नष्ट होऊन गेलो तरी चांगले असा निर्धार
तुम्ही करा”. शूर राजपुतांनो, शिखांनो, पठाणांनो, गुराख्यांनो, देशभक्त मराठ्यांनो
आणि बंगाल्यांनो, उद्योगी पारश्यांनो, मुसलमानांनो आणि सौम्य वृत्तीच्या जैनांनो,
धीम्या वृत्तीच्या हिंदुनो, तुम्ही आपल्या स्वताच्या. परंपरांप्रमाणे जीवन का जगात
नाहीत? चला पुढे व्हा.स्वराज्यातील स्वातंत्र्य,समता यांची प्रतिष्ठापना
करा.तुमच्या स्वतासाठी आणि मुलाबाळांसाठी पुढे या. मानवी हक्कांची लढाई लढा. पौर्वात्य
लोक पाश्चीमात्यांना काही नवे शिकवू शकतात
हे जगाला दाखवून द्या.
हिंदुस्थानच्या
पहिल्या राष्ट्रध्वजाचा जन्म लंडन मध्ये झाला. जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या
आंतर्राष्ट्रीय समाजवादी कोंग्रेसच्या अधिवेशनात मॅडम कामा उपस्थित राहिल्या
होत्या. सावरकरांनी लिहून दिलेला ठराव या अधिवेशनात मांडावा असे ठरले. मॅडम कामा
व्यासपीठावर उभ्या राहिल्या आणि शांतपणे ठराव वाचून दाखविला . बरोबर पोलक्यात
लपवलेला ध्वज होता तो नाट्यमय रित्या त्यांनी फडकावला. आणि गंभीर आवाजात म्हणल्या, “
“हा पहा हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज आहे. आज याचा जन्म
झालाय.हिंदुस्थानच्या तरुण हुतात्म्यांच्या रक्ताने तो आधीच पावन झालेला आहे.
नागरिकहो उठा आणि या अभिनव भारताच्या, या हिंदवी स्वातंत्र्याच्या ध्वजाला प्रणाम
करा”.या त्यांच्या स्फूर्तीदायक आवेशाने सर्व प्रतिनिधी भारावून गेले.आणि या
ध्वजाला सर्वांनी उभे राहून अभिवादन केले.वातावरण एकदम भारावून गेले.”
सरकारला
सुगावा लागू न देता या पुस्तकाच्या विक्रीची व वितरणाची व्यवस्था कामांनी अगदी
व्यवस्थित पणे केली. पुस्तकाचे प्राप्तीस्थळ म्हणून स्वतःचा पत्ता, ‘मिसेस
बी.आर.कामा,पब्लिकेशन कमिटी, ७४९ थर्ड अव्येन्यू,न्यूयॉर्क’. असा देऊन
वाचकांना ते नीट मिळेल याची कौशल्याने योजना आखली. असा हा क्रांतिकारक ग्रंथ
आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी मॅडम कामांनी अतोनात कष्ट घेतले.अनेक
क्लृप्त्या लढविल्या.
मॅडम कामांनी १० सप्टेंबर १९०९ ला
हरदयाळांसाठी ‘वंदेमातरम’ हे पत्र सुरु
केलं.भारतीय स्वातंत्र्याच्या या मासिक मुखपत्रासाठी सर्व आर्थिक बोजा कामांनी
स्वतः उचलला होता. हे मुखपत्र स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा येथून प्रसिध्द होत
असे.यातील सर्व लिखाण कामा स्वतः संपादित करत असत.याची वितरण व्यवस्थाही कुशलपणे त्यांनी
केली होती. याचा पुरावा ब्रिटीश सरकारला शोधूनही सापडला नव्हता.
कमला देवी चट्टोपाध्याय या नाट्य कलावंत
आणि समाज सुधारक पण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. ब्रिटीशांनी अटक
केलेल्या पहिल्या महिला होत. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. त्यांनी
अखिल भारतीय महिला परिषद स्थापन केली. स्त्रियांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक
लघूद्योग सुरू केले.
कॅप्टन
लक्ष्मी सहगल - शांतपणे
काम करणार्या महिलांनी लढायची वेळ आलीच तर तेही काम करू हे दाखवून दिले ते,नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद
सेनेत दाखल होऊन,कॅप्टन म्हणून काम करणार्या लक्ष्मी सहगल
यांनी. विशेष म्हणजे त्यांनी दुसर्या महायुद्धात भाग घेतला होता आणि त्यांना
ब्रह्मदेशात तुरुंगवास भोगावा लागला होता.
अरुणा असफ अली- द ग्रँड ओल्ड लेडी म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय
स्वातंत्र्य लढ्यातले महत्वाचे नाव . भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले
होते.त्या तर इंग्रजाच्या हातात सापडत नव्हत्या, शेवटी त्यांना पकडून देणार्यास ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर
केले होते. ब्रिटीशांविरोधी आंदोलन केले म्हणून तुरुंगात पण त्यांना जावे लागले. ही
आंदोलने भारतभर चालू होती.
कनकलता बरूवा- स्वातंत्र्य लढ्यातील वीरबाला. असम मध्ये १९४२ च्या
आंदोलनात भाग घेतला. त्याचे नेतृत्व कनकलता यांनी केले. ब्रिटीशांनी अडवले आणि
लाठीमार केला त्यातच या वीर बालेला वीरमरण आलं.
मातंगिनी
हाजरा यांनी भारत
छोडो आंदोलनात आणि आशकर चळवळीत भाग घेतला हातात ध्वज घेवून वंदेमातरम च्या घोषणा
देत असताना आंदोलनावर गोळीबार झाला ,मातंगिंनींना 3 गोळ्या लागल्या. मृत्यू आला तरी हातातला ध्वज
त्यांनी खाली पडू दिला नाही.
बिहारच्या ताराराणी श्रीवास्तव – सामान्य
कुटुंबातल्या तारा राणी यांचे लग्न , महात्मा गांधी यांच्या आंदोलांनातील एक कार्यकर्ता फुलेन्दू
बाबू यांच्याशी झाले. १९४२ च्या आंदोलनात फुलेन्दू यांच्याबरोबर तारा राणी यांनीही
सहभाग घेतला. सीवानच्या पोलिस स्टेशनवर भारतीय झेंडा फडकवण्यासाठी आंदोलनकर्ते
निघाले ,इन्कलाब झिंदाबाद घोषणा देत असताना पोलिसांनी
गोळीबार केला. त्यात फुलेन्दू यांचा अंत झाला, तरीही पुढे
भारत स्वतंत्र होईपर्यंत ताराराणी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
मूलमती- काकोरी कटातील सहभागी असलेल्या रामप्रसाद
बिस्मिल यांना ब्रिटीशांनी अटक केली होती. तुरुंगात त्यांना भेटायला आई मूलमती
गेल्या असताना कोलमडलेल्या रामप्रसाद यांना धीर दिला आणि तुझ्यासारखा मुलगा पोटी
जन्माला आल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.रामप्रसाद यांना १९२७ मध्ये फाशी झाली. मृत्यूनंतर शोकसभेत या
धैर्यशील मातेने सांगितले की, माझ्या एका मुलाने देशासाठी प्राण दिले आता पुढच्या लढाईसाठी माझा हा दुसरा
मुलगा तयार आहे.
सुचेता
कृपलानी – गांधीवादी
विचारसरणीच्या सुचेता कृपलानी ,स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री . स्वातंत्र्य
लढ्यात सक्रिय असलेल्या सुचेता यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून
आंदोलन केले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य अधिवेशनात
पंडित जवाहर लाल नेहरूंच्या भाषणा आधी वंदेमातरम गायले होते. १९४० मध्ये त्यांनी अखिल भारतीय महिला
कॉंग्रेसची स्थापना केली.
सरोजिनी नायडू – एक कवयित्रि अन स्वातंत्र्य सेनानी होत्या. साहजिकच
त्यांच्या कवितेत राष्ट्रीय भावना उमटत होत्या. पं. जवाहरलाल नेहरू आणि रविंद्रनाथ
टागोर या कवितांचे चाहते होते. त्या हिन्दी आणि इंग्रजीत कविता करत. या कवितांमुळे
त्यांना भारताची नाईटेंगल किंव भारत कोकिला म्हणत. ही उपाधी त्यांना महात्मा गांधी
यांनी दिली होती. महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात बदल झाला. नागरी हक्क, महिला मुक्ती,या विचारांच्या त्या
समर्थक होत्या. जालियन वाला बाग हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर रविंद्रनाथ टागोर
यांनी नाइट हुड ही पदवी तर, नायडू यांनी कैसर-ए-हिंद हा मिळालेला
पुरस्कार परत केला होता.
उषा मेहता – स्वातंत्र्यालाढ्यत भूमिगत रेडियो स्टेशन चालू करून
स्वातंत्र्य लढा कुठे चालू आहे, कोण कोण सहभागी आहेत,ब्रिटीशांचे अन्यायकारक काम कसे
चालू आहे,देशाच्या कुठल्या भगत चळवळ जोरात चालू आहे, त्याचे स्वरूप याची माहिती रेडियो वरुन त्या द्यायच्या.नेताजी सुभाष
चंद्र बोस यांनाही या चळवळीची माहिती या रेडियो मुळे कळत असे.पोलिसांचे लक्ष
चुकविण्यासाठी हे केंद्र त्यांना सतत दुसरीकडे हलवावे लागत असे.
अॅनी
बेझंट- एक विदेशी भगिनी थिओसॉफीच्या प्रचारासाठी भारतात आलेल्या.
पण इथे आल्यावर त्यांनी होमरूळ चळवळ सुरू
करून भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले.
बिना दास - अशा अनेक वेगवेगळ्या वयाच्या महिलांनी स्वातंत्र्य
लढ्यात क्रांतिकारी कामे केली आहेत. बांगलातील कृष्णनगर या गावातील बिना दास या
कॉलेज कन्येने सायमन कमिशनाला विरोध करण्यासाठी मुलींचा गट तयार केला, ती पदवीधर झाल्यानंतर १९३२ साली, पदवीदान समारंभात ती व्यासपीठावर पदवी घेण्यास गेली. बंगालचे गव्हर्नर
स्टॅनले जॅक्सन यांच्या हस्ते पदवी स्वीकारताना बिनाने आपल्या पदरात लपवलेले
पिस्तूल काढून जॅक्सनवर गोळ्या झाडल्या.
पण दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. पण बिनाला ९ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. “मी
माझ्या मातृभूमीच्या प्रेमामुळे पिस्तूल झाडले, तुम्ही जी
शिक्षा द्याल ती मला मंजूर आहे” असे न्यायाधीशांना सांगितले.
महाराष्ट्रात ज्या
गृहिणी होत्या किंवा उघड उघड चळवळीत भाग घेऊ शकत नव्हत्या, त्या मुली व स्त्रिया हस्तलिखित पत्रके
तयार करून वाटणे, माहिती देणे, बातम्या
पोहोचविणे, गुप्त संदेशाच्या चिठ्ठ्या नेऊन देणे ,स्फोट द्रव्ये सांगितल्या ठिकाणी नेऊन ठेवणे आदि जिवावर उदार होऊन कामे
करत होत्या. प्रेमा कंटक, हंसा मेहता,
पद्माबाई हरोलीकर, भक्तीबा देसाई,
खांदेशातल्या लीला पाटील, सातार्याच्या काशीबाई हणवर, राजूताई बिरनाळे , हंसा ताई पाटील यांचा फार मोठा
सहभाग होता.विशेषता १९४२ च्या लढ्यात स्त्रीयांचे प्रमाण लक्षणीय होते.
वर्ध्याच्या १४ वर्षीय अंजनाताई नंदरधने, जानकीदेवी बजाज, तर चिमुर आष्टी खडकी, चंद्रपूर,भंडारा, नागपुर, अमरावती, अकोला, यवतमाळ , सोलापूर, नगर, नाशिक, पुणे, बार्शी, इथे सहभागी झालेल्या मुली व महिला यांचेही
योगदान आहे. लढ्यात भाग घेतलेल्या महिलांची यादी खूप मोठी आहे. अनेक ज्ञात तर अनेक
जणी अज्ञात आहेत.भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे.
त्यांच्या शिवाय हे स्वातंत्र्य मिळणं खरच शक्य नसतं झालं एव्हढे काम या
स्त्रियांनी केले आहे. भारतीय स्त्री कणखर आहे, धैर्यवान
आहे. निष्ठावान आहे, विचाराने प्रगल्भ आहे, मनाने आणि शरीराने बलवान आहे ,गरज पडली तर आक्रमक
आहे, ती चांगले नेतृत्व करू शकते या सर्व गुणांमुळेच तिने
इतिहास गाजवला आहे, त्यांचे कार्य पुढच्या पिढीला सतत
प्रेरणा देत राहील यात शंका नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
लढ्यातल्या सर्व सहभागी रणरागिणींना विनम्र अभिवादन!
सर्व फोटो गुगल वरुन साभार परत, हा लेख सप्टेंबर २०२२ च्या एकता मासिकात/विशेषांकात प्रकाशित झाला.
-
डॉ. नयना कासखेडीकर,पुणे .
No comments:
Post a Comment