आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना
आज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत.नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. म्हणूनच भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा,लज्जा, संस्कृती यांचं प्रतीक मानलं आहे. शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. देवीचे नवरात्र हे त्या पैकीच एक. मातृरूपात असणार्या शक्तिचे पूजन करण्याचे आणि आदिशक्तीची आराधना करण्याचे, जागर करण्याचे पर्व आहे.
या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः
नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमो नमः।।
सर्व विश्वात मातृरूपात वास करणारी हे भगवती देवी तुला
नमस्कार असो.
सर्व प्राणिमात्राच्या मध्ये शांतिरूपात राहणारी, शक्ति रूपात
असणारी, बुद्धिरूपात असणारी, चैतन्य
रूपात वास करणारी, निद्रारूपात, क्षुधा
रूपात, छायारूपात, तृष्णारूपात, क्षमारूपात असणारी आणि लज्जा, श्रद्धा, सौन्दर्य आणि ऊर्जा रूपात, लक्ष्मी रूपात, वृत्ती, स्मृति, दया, समाधान, अशा विविध रूपात वास असणार्या हे देवी तुला नमस्कार असो असं वर्णन असणारी शक्ति ही स्त्री देवता आहे. हे
आमच्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे आदराचे स्थान दर्शवणारी, आमच्या हिंदू धर्म ग्रंथातली पुराण काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
नवरात्रात लोक आपली आध्यात्मिक आणि मानसिक शक्ति वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात. ते या काळात उपवास, संयम, नियम पाळणे, भजन व पूजन करणे, साधना करणे, व्रतस्थ राहणे या गोष्टींवर भर देतात.
पौराणिक कथेनुसार असुरांकडून सृष्टीचा
नाश होताना देवदेवतांना बघवेना. मग ही
सृष्टी वाचवण्यासाठी त्यांनी जगदंबेची आराधना केली आणि या सृष्टीला वाचवावं म्हणून
विनंती केली, तेंव्हा
भगवती देवी व असुरांमद्धे युद्ध झालं. देवीने असूरांचा वध करून देव
देवतांना निर्भय केलं, आश्वस्त केलं. तेंव्हापासून या
व्रताची सुरुवात झाली असे मानतात. जगात जेंव्हा जेंव्हा असुर किंवा त्यांच्या
सारखे क्रूर लोक स्वत:च्या बळाने सज्जनांना छळतात, तेंव्हा
तेंव्हा जगज्जननी व विश्वाची पालनकर्ती देवी भक्तांच्या मदतीला धावून येते. म्हणूनच भक्त तिची आराधना, भक्ती करतात, उपासना करतात.
त्यात घटस्थापना, माळा चढविणे, अखंड नंदादीप लावणे आणि कुमारिका/ कन्या पूजन करणे. हे नवरात्राचे मुख्य भाग असतात. स्कंद पुराणात कुमारिकेचे वयाप्रमाणे प्रकार सांगितले आहेत.हे पूजन म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान च आहे एक प्रकारे.
घटस्थापना करतात म्हणजे,
कलशाखाली असलेल्या काळ्या मातीमध्ये सप्तधान्य पेरून नऊ दिवस त्याची नीट काळजी
घेतात. या नऊ दिवसात ,नवव्या दिवशी त्या धान्याचे सुंदर
तृणात रूपांतर झालेले दिसते.हे सृजन च असते, निर्मिती असते.
आणि निसर्गाची खरी पुजा असते. हे देवी तू धन धान्याने आम्हा सर्व तुझ्या लेकरांना
असेच समृद्ध कर अशी कृतज्ञता या देवी जवळ
भक्त व्यक्त करत असतात असे वाटते.
घटाला चढवण्यात येणारी माळ सुद्धा या ऋतुत येणार्या विविध फुलांच्या च असतात. शेवनती, सोनचाफा,अनंत,मोगरा,चमेली, गोकर्ण,कृष्ण कमळ, अबोली,तेरडा, तीलाची फुले, बेल,कर्दळ, झेंडू, कण्हेर,जास्वंद, गुलाब, अशा विविध रंगी व सुवासिक फुलांच्या माळा वाहण्याचा प्रघात आहे.
जगातील दुष्ट लोकांचे प्राबल्य कमी करण्यासाठी, लोकांची त्यातून सुटका करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो अशी समजूत आहे. ईश्वर
निर्गुण असल्याने त्याला जेंव्हा कार्य करायचे असते तेंव्हा तो अवतार घेऊन आपल्या
शक्तिदेवीला प्रेरित करतो आणि ही शक्ति वेगवेगळ्या रूपात प्रगट होते म्हणून त्या
अवतारांची पुजा करतात. ज्या उर्जेतून तेजस्वी तार्यांचा,
सूक्ष्म मानवी मनाचा, भावनांचा जन्म होतो ती ऊर्जा/शक्ति
म्हणजे देवी असे म्हटले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश या प्रमाणे पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ही शक्तीची तीन रुपे मानली जातात. या शक्तीचे मुख्य नऊ आणि इतर
अनेक असे अवतार मानले जातात.
आम्ही
एकेकाळी स्त्रीला अबला मानलं होतं. पण शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती
असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक
व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून
नऊ दिवस चालणारा हिंदूंचा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात ‘शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा उत्सव धार्मिक उत्सव पण आहे.
दुर्गा किंवा काली
ही सर्वांची कुलदेवता असल्याने भारतात हा उत्सव एक कुलाचार सुद्धा असतो. यावर इथला
प्रादेशिक ठसा उमटलेला आहे.
महाराष्ट्रातसुद्धा मराठ्यांच्या राज्यस्थापनेनंतर आपले उपास्य दैवत भवानीदेवीच्या पूजेचा प्रसार झाला. चारही दिशांना ही देवालये स्थापित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा आई भवानी जगदंबेची पूजा बांधली होती हा इतिहास सर्व परिचित आहेच. पेशवे काळातसुद्धा दसर्याआधी वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची प्रथा होती.
पश्चिम भारतात गुजरातमध्ये नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावून शक्ति जागर म्हणून गरबा मांडला जातो. यात गरबा म्हणजे गर्भदीप लावला जातो. सछिद्र मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट म्हणजे मनुष्याच्या शरीराचे प्रतीक आणि आतला तेवत असलेला दिवा म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गादेवीकडे केली जाते.
पुर्वेकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे
नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापुजा केली जाते. यातील सिंहावर आरुढ झालेली देवी
हातात सर्व शस्त्र घेतलेली आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे.
केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लहान
मुलांचा विद्यारंभ केला जातो. भाषा आणि वेष नि आहार वेगवेगळा,
पद्धती वेगवेगळ्या, पण या संस्कृतीतून दिला जाणारा संदेश
एकच. विविधतेतून एकता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य, हीच
परंपरा. अनेक काव्यातून वाड्मयातून शक्ति देवीची स्तुती केलेली दिसते.
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम्
।।
पंचमं
स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं
कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं
सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि
नामानि,
ब्रह्मणैव महात्मना ।।
नऊ दिवसात देवीची म्हणजे आदिशक्तीची ही नऊ रुपे पूजली जातात. ऊर्जा हे देवीचे मूळ तत्व, संरक्षणाची देवता दुर्गादेवी, ऐश्वर्याची देवता लक्ष्मीदेवी आणि ज्ञानदेवता सरस्वतीदेवी या शक्ति रूपात आपण मानतो. हे मानणे म्हणजेच आपल्या मनातील द्वंद्वाच्या, त्रासदायक नकारात्मक भावनांना दूर सारून सकारात्मक दृष्टीचा स्वीकार करणे आहे. कारण जेंव्हा एखादा मनुष्य लहान, मोठ्या संकटाचा सामना करत असतो, तेंव्हा तो आधार शोधतो. मन:शान्ती कशात मिळेल हे शोधतो आणि ती त्याला अध्यात्मामधून, साधनेमधून, कुठल्याही रुपातल्या आराधनेमधून मिळते. ही रुपे अर्थातच शक्तीची असतात. त्याची मनुष्याने प्रतीके शोधली. कारण अमुर्ताला मूर्त स्वरूप दिले की आश्वासक वाटत असते. म्हणून वेगवेगळ्या प्रतिकातून सूचक अर्थ निघत असतात. प्रतिकांचा वापर आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतो. प्रतीक म्हणजे एखादं चिन्ह किंवा खूण.
देवीची
नवरात्रे चार प्रकारची आहेत. शारदीय, वासंतिक, शाकंभरी आणि गुप्त नवरात्र. तर इतर नवरात्र म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाचे
नवरात्र असते आणि मार्गशीर्षात नृसिंहाचे नवरात्र असते.
मन:शान्ती
मिळवण्यासाठी, विशेषता महिलांनो लक्षात घ्या की, मनात
भाव व शुद्धता हवी, देवावर/ शक्तिवर विश्वास व श्रद्धा हवी, मन शरीर व परिसर स्वच्छता हवी, सात्विकता हवी.
त्यासाठी नुसतं रोज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या (नवरात्रीचे नऊ रंग, दांडिया, गरब्यासाठी ऊंची ड्रेस आणि अॅक्सेसरीज आणि
त्याला जोडून होणार्या पार्ट्या) आणि दागिने परिधान करणं,
आपल्या दिसण्या-असण्याचा भपका सादर करणं म्हणजे भक्ती नाही की पूजा होत नाही. तुम्ही
स्वत:च एक शक्ति आहात, मातृदेवता आहात,
मार्गदर्शक आहात ! जर तुम्हीच हे समजून नाही घेतलंत तर तुमची मुले व मुली /पुढची
पिढी चुकीच्याच पायंड्यांवरून जात राहतील. आपल्या देशाची सांस्कृतिक प्रतिके आणि
आपल्या हिंदू धर्मातील एक शक्तिपूजा, लोक परंपरा, त्यांचा निसर्गाशी असलेला मूळ कार्यकारण भाव, मूळ
तत्व हे शोधा, डोळसपणे समजून घ्या आणि ते तुमच्या मुलांना
सांगा, म्हणजे ती ‘देखल्या देवा दंडवत’ असं करणार नाहीत.
राष्ट्रसंत
तुकडोजी महाराजांनी म्हणूनच स्पष्ट केलय,
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव
अशानं, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
देवाच
देवत्व नाही दगडातं ।
देवाच
देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या
चांदीत नाही देवाची मात
देव
बाजारचा भाजीपाला नाही हो ॥
थोडक्यात, मनुष्य हा बुद्धीमान प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे म्हणूनच तो चराचराचा, निसर्गाचा, प्राणिमात्रांचा विचार करतो.
त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तसाच
तो या अमूर्त शक्तीची पूजा करतो. हे आपल्या देशाचे सांस्कृतिक महत्व आहे. ते मूळ
भावात आपण जपले पाहिजे.
आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा बाजार होत नाही ना याकडे आपणच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सध्या
स्वत:च्या व्यवसायसाठी, स्वार्थासाठी, अधिक
नफा कमवण्यासाठी नवे नवे फंडे तयार करून त्याचे मार्केटिंग करण्यात अनेकजण आघाडीवर
आहेत. यात माध्यमेही पुढे आहेत.त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे महत्व त्यांना आहे, यात कुठेही स्त्रीयांचे / लोकांचे कल्याण किंवा
देवाची भक्ती हा भाव नाही आणि नसतो. स्त्रियांच्या भावनांना आवाहन केले की
स्त्रिया बळी पडतात. याचाच उपयोग करून घेतला जातो. तेंव्हा आयाबायांनो, मैत्रीणिंनो सणावारी आपल्या संस्कृतीशी बादरायण संबंध जोडून भुलवणार्याना
लगेच ओळखा. बळी पडू नका. आणि शुद्ध भावाने यंदाची घटस्थापना करा, शक्ति देवतेची उपासना करा. तिच्यापासून संकटाचा सामना करण्याची आणि दुष्ट
शक्तींचा बीमोड करण्याची प्रेरणा घ्या एव्हढंच सांगते.
सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी
नमोऽस्तुते ||
लेखिका- डॉ. नयना
कासखेडीकर,
-------------------------------
No comments:
Post a Comment