तीर्थ विठ्ठल ....
संत नामदेव (रेळेकर)
(जन्म-१२७०- नरसी,हिंगोली,वैकुंठगमन-१३५० )
(आई-गोणाई,वडील-दामाशेटी)
तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥
आज कार्तिक शुद्ध एकादशी! कार्तिक एकादशीला वारकरी सांप्रदायात विशेष महत्व आहे. आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी वारी करणारे सुद्धा असंख्य वारकरी भक्त महाराष्ट्रात आहेत.चातुर्मासात आषाढी एकादशी पासून कार्तिक शुक्ल दशमी पर्यन्त शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णु या दिवशी जागे होतात, म्हणून या एकादशीला प्रबोधिनी किंवा देवऊठी एकादशी म्हणतात.या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पुजा करतात. देव जागे होऊन पुन्हा कल्याणकारी कामाला सुरुवात करतात अशी श्रद्धा आहे.
आजचे अजून महत्व म्हणजे आजच कार्तिक एकादशीला संत नामदेवांची जयंती असते. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार करणारे आद्य प्रचारक संत नामदेव महाराज मराठीतले पहिले चरित्रकार व आत्मचरीत्रकार होते.भागवत धर्माचा प्रचार भारतभर करत त्यांनी भावनिक एकात्मता आणि सामाजिक समरसता साधली होती. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हेच त्यांचे ध्येय होते. जनतेचा आध्यात्मिक विकास त्यांना साधायचा होता. संत नामदेवांची आणि संत ज्ञानेश्वरांची पहिली भेट आळंदी येथे झाली. गुरुपदेशाचे महत्व त्यांना कळले. या भेटीनंतर नामदेवांच्या आयुष्यात बदल झाला. विसोबा खेचर त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. ज्ञांनेश्वर आणि इतर संतांबरोबर त्यांनी तीर्थयात्रा केल्या. ते भक्तीप्रचारासाठी महाराष्ट्रातून निघून भारताच्या चारही दिशांना फिरले. कर्नाटक, तामिळनाडू, रामेश्वर, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब .हरयाणा,हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेले. हि त्यांची पदयात्रा होती. त्यांच्या तीर्थयात्रेची साक्ष या सर्व प्रांतात, मंदिरांच्या रूपाने आजही आहे. सामाजिक समरसता, भक्ति, मानवता, भूतदया ,प्रेम .आदर या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून आपल्याला शिकवण देतात.
संत नामदेव हे एक अभ्यासू आणि बहुश्रुत होते हे अनेक कीर्तनातून आपण सर्व जण ऐकतोच, संत नामदेव यांनी आपल्या अभंगातून आणि भक्ति गीतातून समता व ईश्वर भक्तीची शिकवण दिली. संत नामदेव यांनी आत्मस्वरूप स्थिति, उपदेशपर, आत्मसुख, भक्तवत्सलता, नाम महिमा, गौळण, करुणा, कृष्ण माहात्म्य, नाम संकीर्तन माहात्म्य, पंढरी माहात्म्य, पौराणिक चरित्रे, काही कथा लिहिल्या आहेत. अतिशय मार्गदर्शक अभंग रचना आहेत.
संत नामदेव म्हणजे आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावणारा पांडुरंगाचा सगळ्यात जवळचा सखा होता असे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीन्चा संतांचा उपदेश सामान्य लोकांमध्ये रुजविणार्या नामदेवांना या भक्तिमार्गाचा आधारस्तंभ मानतात. म्हणूनच म्हणतात,
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥ नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारीला भागवत ॥ भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥
सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भागवद्भ भाव मानावा ,हाच खरा भागवत धर्म आहे . जे जे भेटे भूत ,ते ते मानिजे भगवंत हे भक्तीयोगाचे सूत्र त्यांनी निश्चित केले. याचे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रात आढळतात. संत नामदेव एकदा जेवत असताना त्यांच्या ताटातली पोळी कुत्र्याने पळविली, ते पाहून नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळतात आणि म्हणतात, “हे माझ्या देवा अशी कोरडी पोळी खाऊ नका तिला जरा तूप तरी लावून खा” असा हा प्राणिमात्रांच्या ठिकाणचा त्यांचा भक्तीभाव. असा हा विठ्ठलमय भक्त संत नामदेव, त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी विठ्ठलच दिसायचा.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।
पंढरपूरला अठ्ठावीस युगांपासून विठ्ठल विटेवरी उभा आहे, त्याच्या डाव्या हाताला रखुमाई उभी असून, त्यांचे हे रूप अत्यंत शोभा देणारं आहे. पुंडलिकासाठी विठ्ठल पंढरीला येऊन राहिला आहे. त्याच्या चरणी वाहणारी चंद्र्भागा सर्व भक्तांचा उद्धार करत आहे. हे वर्णन केले आहे संत नामदेव यांनी. तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की ही रचना म्हणजे आपण म्हणतो ती विठ्ठलाची आरती आहे. यात संत नामदेव यांनी पंढरीचा महिमा वर्णन करताना आषाढी आणि कार्तिक एकादशीला दरवर्षी येणारे भक्तजन,त्यांचा चंद्र्भागेतिरी जमलेला मेळावा, त्यांचा भक्तीभाव, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आणि केवळ कळस दर्शनाने सुद्धा आनंदलेले वैष्णवजन आणि हा सोहळा व त्याचे महत्व नामदेव महाराज या आरतीत सांगतात. शिवाय घालीन लोटांगण ही प्रार्थना आपण गणेश उत्सवात गणपती आरती नंतर नेहमीच तोंड पाठ म्हणतो. लयीत म्हणतो. ही संपूर्ण प्रार्थना म्हणजे चार कडवी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली आहे. त्यातले पहिलेच कडवे संत नामदेव महाराजांचे आहे.
घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन,
भावे ओवाळीन म्हणे नामा ।। १ ।।
यात कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन, एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. ही प्रार्थना कृष्णाला उदेशून आहे. गणपतीला नव्हे.
संत नामदेव यांचे अभंग मग ते कुठलेही असोत एकदा म्हटले की सतत गुणगुणत राहतो आपण, त्यांनी अनेक गवळणी लिहिल्या आहेत. पैकी -
रात्री काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवार काळी । गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥२॥
नामदेव गाथेतली ही गौळण आपण नेहमी ऐकतो.यातील काळी रात्र.काळी यमुना, काळी कृष्णमूर्ती याचे वर्णन करताना भक्ताच्या मनस्थितीतचे वर्णन नामदेव महाराज करतात. परमेश्वर दर्शनाची व भक्तीची ओढ आणि तळमळ या प्रतिमांमधून व्यक्त झालेली दिसते. गौळणीतल्या गोपींचे कृष्णावर जसे प्रेम आहे,तसेच प्रेम नामदेव महाराजांना विठ्ठलाचे आहे.विरहाचे दु:ख आहे. भेटीची प्रतीक्षा आहे. मिलनाची आस आहे. संत नामदेवांना विठ्ठल म्हणजे त्यांची जननी होती. म्हणून ते एका रचनेत म्हणतात,
पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी ॥१॥
तैसें माझें मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥
आत्मसुख कशात आहे हे सांगताना त्यांनी जवळ जवळ २०० अभंगातून उपदेश केला आहे. संत नामदेवांच्या अभंग गाथेत २५०० अभंग आहेत. त्यांनी हिंदीत व ब्रज भाषेत पण रचना केल्या आहेत, तर गुरुग्रंथ साहिब मध्ये गुरुमुखीत सुद्धा लिहिले आहे. त्याचा समावेश गुरुग्रंथ साहेब मध्ये आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले आहे, आत्मचरित्र लिहिले आहे.
त्यांचा एक आत्मसुख अभंग-
माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥
नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥
वारकरी संप्रदायचे तत्वज्ञान म्हणजे भक्तिमार्ग होता. सदाचार,शुद्ध अंतकरण,नामस्मरन भजन कीर्तन, या माध्यमातून संतांनी जनतेला समजेल अशा लोक भाषेतून सामान्य लोकांना उपदेश केलेला दिसतो. यात त्यांचे स्वतचे अनुभव ,तत्वज्ञान आणि जीवन यांची सांगड संतांनी घातली आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी ही नाम देवांच्या आयुष्यातील महत्वाचा ,प्रत्यक्ष पाहिलेलं प्रसंग आहे. त्यातून त्यांना संत ज्ञांनेश्वर यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे. संत नामदेवांनी इतर संतांची चरित्रे अभंगाच्या माध्यमातून लिहिली आहेत. त्यांनी कीर्तन प्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली . कीर्तनातून त्यांनी संतांची चरित्रे सांगण्याचा पायंडा पडला. त्या मागे भक्ती ही प्रेरणा आहेच.
विठ्ठलाच्या दर्शनाला येणार्या संतांच्या चरणाचा स्पर्श आपल्याला घडावा ही त्यांची भक्ती . म्हणून पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्याच्या पाहिल्याच पायरीजवळ त्यांनी आषाढ वद्य त्रयोदशीला समाधी घेतली.
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।
संत पाय हिरे देती वल ।।
अशा संत शिरोमणी असलेल्या ,संत नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन !
लेखन – डॉ. नयना कासखेडीकर
------------------------------------
No comments:
Post a Comment