संत मुक्ताबाई
(जन्म-आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१,आपेगाव,पैठण
वैशाख वद्य द्वादशी शके १२१९ मृत्यू तापीवरील मेहूण गाव).
मुंगी उडाली आकाशी ,तिने गिळिले सूर्याशी
थोर नवलाव
झाला, वांझे पुत्र प्रसवला
विंचू
पाताळासी जाय , शेष माथा वंदी पाय
माशी व्याली
घार झाली , देखोनी मुक्ताई हासली...-संत मुक्ताबाई
आश्विन शुद्ध प्रतिपदा ! आज घटस्थापना, आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत
मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत
नाही.आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा स्थान होती. तिचे ताटीचे
अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती.निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत
कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर
संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक
त्यांना गृहस्थाश्रमात आणते.विवाह होऊन ही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा
गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत
टाकतो. परंतु याची शिक्षा समाज त्यांना देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. चार
चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणार्या छळाला
कंटाळून विठ्ठल पंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे
स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरच ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन
करतात. या वेळी मुक्ताबाई फक्त चार वर्षाची असते.
भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या
निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सन्याशाची मुलं म्हणून समाज
त्यांनाही वाळीत टाकतो.आईवडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही.
जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वताला सतत सिद्ध करावे
लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तरच नवल. असे अनेक
प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले
आहे.
समाजातून सतत
उपेक्षा, अपमान सहन
न होऊन एक दिवस स्वतावरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन, पर्णकुटिचे
दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. सन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन
झाला असे ज्ञानोबाला पाहून एका ने म्हटले, त्यामुळे ज्ञानोबा
खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनी ही विनवण्या केल्या. पण ज्ञाना दार उघडेना.
मुक्ताबाईने विनवणी करूनही ते दार उघडेनात. छोट्याशा बहिणीने मुक्ताइने लडिवाळ पणे
ज्ञानाला समजावले.ज्ञाना दादा चिडलाय, त्याची मनस्थिती
बिघडली हे मुक्ता बाईंना लक्षात आले. ज्ञानोबा पेक्षा लहान असलेली मुक्ता आता
त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. लोक कितीही वाईट वागले तरी
तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा आता. या अवस्थेतून
बाहेर या. असं ममतेने सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत.योगी
कसा असावा ,आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे ते मुक्ता
बाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे. ज्ञानोबांना जागृत केलं आहे.
चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन
मनाचा। साही अपराध जनाचा।
विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे
पाणी।
शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा
उपदेश।
विश्वपट
ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
ब्रह्म जैसें तैशा परी आम्हा
वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे अवघे
आपण निघोटे
जीभ दातांनी चाविली कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ज्ञानदेव दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत चालले आहेत हे मुकताबाईना जाणवते . या
वेळी ज्ञानोबाचे मन शांत करण्याचा प्रयत्न मुक्ता बाई करते. आणि स्वच्छ सात्विक पावन
मनाच्या या योगी पुरुषाला तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून
त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पेक्षा लहान असलेली लाडकी बहीण
मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा
मान्य करतात ,शांत होतात आणि
पर्णकुटी चे दार /ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या, तत्व चिंतक असलेल्या ज्ञानदेवांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य या
चिमुकल्या मुक्ताबाईत होतं.याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला,
ते कार्यप्रवृत्त झाले आणि नेवाशाला भावार्थ दीपिका च्या निर्मितीची सुरुवात झाली.
गुरु संत निवृत्तींनाथ यांच्या
मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता बाई घडत होत्या. नाथ
संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली
होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधुभगिनी झाले होते, प्रेम,आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही
बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे, ते शंका निरसन करत. निवृत्तीनाथ तर आईवडिलांचेही प्रेम लहान भावंडांना
देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ता बाईंचे गुरु बंधुच होते. पण तिची जडण घडण चालू
असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणार्या आघता मुळे अनेक प्रसंगांना
सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासमोर घडल्या होत्या. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ नुसार विठ्ठलपंत आणि
रुक्मिणी बाईंची ही चारही मुले होती.
मुक्ताई ने योगी असलेल्या
ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अभंगातून घेतला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर
योगी, संत.साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते. असे वर्णन त्या अभंगातून करतात.
संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु, गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे, एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखविली. मुकताईने
लगेच तयारी केली. कुंभारवाडयात ती मातीचे परळ आणण्यासाठी गेली असता, वाटेत विसोबा चाटी भेटले. तिच्या हातातले परळ हिसकावून घेतले आणि फोडून
टाकले. कुंभारवाडयात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही परळ देऊ नये. निराश होऊन
मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तींनाथांची इच्छा पूर्ण करू शक्त नाही याचा तिला खेद
वाटला. दु:ख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आला. त्या योग्याने
आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ता बाईंना सांगितले, “भाज आता पाठीवर मांडे” .
मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे
पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून
विसोबा आश्चर्य चकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत हे समजले . स्वत:ची चूक उमगली. आपल्याला
प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न
खाऊ लागला. ते पाहून,मुक्ताबाईने “विसोबा तू खेचरा प्रमाणे उष्टे का खातोस?” असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले. अशी आख्यायिका
आहे.
अशाच प्रकारे संत नामदेव यांना ही गुरु चे महत्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला
मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले.
तीर्थ यात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईनी आपला
भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली.महिन्याभरातच सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला
चांगदेवांची समाधी पाहिली.आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या,चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे
निवृत्तींनाथांना व सर्व संतांना मुक्ताई ने सांगितले. त्यांचीहि अवतार समाप्ती झाली.
आईवडीलांच्या छत्रा नंतर या भावांनीच तिला
सांभाळले होते. जिवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी
नव्हतीच.या सगळ्या घाटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाली. उदासीन झाली. मुक्ताबाई, निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ. घृष्णेश्वर करत,वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर, मेहुण या गावी आली.
नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काही कळायच्या
आत अंतर्धान पावली. निवृत्तींनाथ मुक्ताबाईना खूप जपत होते,तरी
हे असे कसे झाले, मुक्ताई कुठेच दिसत नाही ? क्षणात त्यांनी ओळखले की आता अवतार समाप्ती आहे ही. संत नामदेवांनी पण हे
अनुभवले आणि त्याचे वर्णन केले आहे ते असे-
कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l
संत जनाबाईंनी आदराने म्हटले
आहे , “आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||'' !
अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई !
ले- डॉ. नयना कासखेडीकर.
---------------------------------------
अतिशय छान लेख .एका डोळ्यांत त्यान्च्या महानतेचे आनंदाश्रू व दुसरयांत हालअपेश्टांचे दू:खाश्रू उभे करणारा.
ReplyDeleteत्यांचे निर्वाण स्थान मेहुण हे कुठे आहे? कधीतरी दर्शन घडले तर पुण्य पदरी पडेल.
त्यान्च्या मुळेच विसोबा चाटी हे विसोंंबा खेचर म्हणून अजरामर झाले असावेत.
Excellent
ReplyDeleteधन्यवाद
Delete