नमस्कार! पहिल्या साहित्य परिमळच्या अंकात आपण मॉरिशसची मराठी संस्कृती बघितली, मराठी टिकविण्याचे प्रयत्न बघितले. दुसर्या अंकात फिनलंड येथील अमित व राधिका यांची संस्कृती जपण्याची धडपड अनुभवली. आता या अंकात आपण मिशिगन येथे बरीच वर्षे वास्तव्यास असलेल्या एका मोठ्या कुटुंबातील प्रतिनिधी जयश्रीताई मोकाशी आणि मोकाशी काका यांना भेटणार आहोत.
अमेरिकेतील उत्तर भागातील मिशिगन राज्यात, लान्सिंगमध्ये मोकाशी कुटुंबिय राहतात. लान्सिंग हे मिशिगनच्या मध्यभागात ग्रँड नदीच्या काठावर वसलेले एक शहर असून ते डेट्रॉईट आणि ग्रँड रॅपिड्स या दोन शहरांच्या मध्ये आहे. डेट्रॉईट मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर असून, लान्सिंग शहर मिशिगनची राजधानी आहे. मिशिगनमधली फोर्ड आणि बोईंग कंपन्यांची नावे आपल्या परिचयाची आहेत.
एका परदेशी मुलूखात आपल्याला केवळ आपले मराठी बांधवच नाही तर इंडियन म्हणजे कुठलेही भारतीय बांधव, कोणत्याही प्रांतातले असोत ते भेटले की कोण बरं वाटतं. भारतीय असल्याची अस्मिता जागृत असतेच शिवाय आपली उत्सवप्रियता आपल्याला गप्प बसू देत नाहीच आणि मग सुरु होतात भेटीचे सोहोळे. आपसातले नातेसंबंध आणखी दृढ करण्यासाठी महत्वाचे ठरतात ते आपल्या संस्कृती आणि परंपरा असलेले भारतीय सण आणि उत्सव - ज्याची योजना वर्षभर आपण करू शकतो.
परदेशात तर असे समाजबांधव एकत्र आले म्हणजे एक भारतीय कुटुंबच तयार होतं. हे तर झालं सार्वजनिक कार्यक्रमाचे, पण आपल्या कुटुंबातील व्यक्ति, मुले, सुना, नातवंडे व इतर कुटुंबिय यांनाही जोडणारा एक धागा असतो, तो म्हणजे आपले सण उत्सव!
असेच मिशिगनच्या लान्सिंगमध्ये राहत असलेले कुटुंब मोकाशी कुटुंब . भारतातही जे आता कमी दिसतं ते म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती. चार भाऊ, त्यांच्या बायका, मुले, मुली, सुना, नातवंडे आणि वयोवृद्ध मातोश्री वय वर्षे ९८ !. असे भले मोठे भारतीय कुटुंब एकमेकाला धरून, सांभाळून चक्क एकत्र राहतय. दोघेही मोकाशी पती-पत्नी एकेक किस्से सांगत होते ! “सुट्ट्या आणि वेळापत्रक नीट जमलं तर, सणावारांना २९ जण जमतो आम्ही. परदेशातील हवामान व वातावरण आणि कामाचे वेळापत्रक बघितलं तर भारतीय कॅलेंडरप्रमाणे बहुतेक वेळा जमत नाही . पण पुण्यात- तेही सदाशिव पेठेत राहणारे आम्ही सर्वजण हौशी आहोत, आपले सण -उत्सव पारंपरिक पद्धतीने पाळण्याला महत्व देतो. मोठे कुटुंब असल्याने एकत्र येऊन ते साजरे करायला मज्जा येते. सर्वांनाच आवडतं. फक्त एक प्रोब्लेम येतो इथे, रजा नसतात आणि सुटीचा दिवस आपल्या सणालाच येईल असे नाही”.
“दिवाळीची रोषणाई करतो, आकाश कंदील लावतो. पणत्या दिवे लावतो. दिवाळी उत्सव म्हणून आपल्या सारखेच वातावरण इथेही निर्माण करतो. ऑक्टोबर/ नोव्हेंबरमध्ये दिवाळी असते तेंव्हा इथे खूप थंडी असते. तेंव्हा झेंडूची फुले मिळत नाहीत. पण प्रत्येकाला पर्याय आहेतच. आम्ही आमच्या बागेत झेंडूची रोपे लावतो त्यामुळे दारातच फुले मिळतात. मात्र थंडीत ही झाडे टिकत नाहीत. आम्ही भारतातुनच फुलांच्या कृत्रिम माळा आणल्या आहेत. गरज पडली तर त्या वापरुन सजावट करतो. जे उपलब्ध आहे त्यातून सर्व साग्रसंगीत पार पाडतो. आंब्याची पाने मिळतात. त्याचे तोरण करतो. रांगोळी काढतो दारात. आकाशकंदील घरीच तयार करून लावतो. त्याचे सर्व साहित्य इथे मिळते. घराला रोषणाई करतो. फटाके उडवता येत नाहीत नियमाप्रमाणे. सुरूवातीला घेऊन ठेवलेले म्हणून उडवले होते पण लगेच पोलिस येतात, तक्रार होते. छोटे फुलबाज्यासारखे फटाके चालतात. न्यू ईअरला कॉमन जागेवर उडवतात. दिवाळीत महाराष्ट्रियन लोक एकत्र येऊन हॉल घेऊन दिवाळी साजरी करतात, कार्यक्रम बसवतात. एव्हढच काय मातीचा किल्ला पण मंडळात केला जातो. सगळ्यांनाच हौस असते”.उत्साह आणि आनंद असे वातावरण जगाच्या पाठीवर कुठेही आपण असलो तरी संस्कृतीच्या निमित्ताने आपण निर्माण करू शकतो हेच सिद्ध होते यावरून.
ताई सांगत होत्या, “आम्ही इथे आलो तेव्हा भारतात गौरी गणपती आमच्याकडे होतेच. इथेही ते साजरे करतो. उलट सुरुवातीला या निमित्ताने सर्वांना घरी बोलविणे, हळदीकुंकू करणे आणि आमच्याकडे आमचे शंभरावर परिचित इ. जेवायला बोलवत असू. सर्व पुरणपोळ्यांचा स्वयंपाक घरी करत असू. आनंद वाटतो त्यात. त्यानंतर इथे गणपती मंदिर झाले तेंव्हापासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला. तोही जोरदार साजरा होतो इथे. आता महाराष्ट्र मंडळपण आहे. मराठी समाज बांधव एकत्र येऊन साजरे करतात. सुरूवातीला गणपतीची मूर्ति भारतातून आणायचो, आता इंडियन स्टोअर्स झाली आहेत. आता गणपतीपण मिळतात. इथे गणेश विसर्जनाचा प्रश्न येतो. नियम कडक आहेत. रंग नैसर्गिक हवे. ठराविक मातीचीच मूर्ति हवी, पर्यावरणाला हानी पोहोचवायची नाही. आता तर त्यांच्या नियमांनुसार मंडळाची मूर्ती बनवली जाते इथेच. पण आता विसर्जन मात्र टाकीतच करायची पद्धत सुरू झाली आहे”.
“नातवंडांची नवी पिढी आहे, त्यांनाही आपली संस्कृती समजली पाहिजे, परंपरा समजल्या पाहिजेत असे वाटते आणि आपणच नाही या गोष्टी पाळल्या तर त्यांना तरी कशा दिसणार? आणि समजणार?कारण इथे बाहेर कुठलेही वातावरण नाही, असे जयश्रीताईना वाटते. त्या म्हणतात, “नातवंडांना आपल्या कॅलेंडर प्रमाणे येणारे सण, उत्सव व दिनविशेष असतात त्या दिवशी त्यांना फोन करून आज काय आहे याची माहिती आम्ही देतो आणि त्याची एखादी कथा सांगतो, महत्व सांगतो आणि शुभेच्छा व आशीर्वाद देतो . जसे हॅप्पी दिवाळी. हॅप्पी न्यू इयर करतो तसे हॅपी संक्रांत, हॅपी गुढीपाडवा, होळी असे सर्व सणांना शुभेच्छा देणे हा उपक्रम चालू असतो आमचा. गोकुळाष्टमीला कृष्णाची गोष्ट सांगायची. कारण या पिढीला सतत या गोष्टी सांगत राहिल्या पाहिजेत तेंव्हाच त्यांना कळतील आणि ते या विषयाशी जोडलेले राहतील”. ऑक्टोबरमध्ये इथे हॅलोविनचे वातावरण असते. आम्हाला विज्ञान आणि योग्य उत्तर देऊन एखाद्या प्रश्नाचे समर्थन द्यावे लागते. आपली संस्कृती व विज्ञान पटवून द्यावे लागते”.
जयश्री ताईंच्या मते, आपण वेगळ्या प्रांतात राहत असू तर आपल्या प्रांताची, आपल्या जीवन पद्धतीची ओळख नव्या पिढीला करून देणं आणि ती आपल्या कृतीतून सुद्धा दाखवणं आवश्यक आहे. आपण आहे तिथे आहे तसेच राहिलो तर आमची संस्कृती आमच्या मुलांना कळणारच नाही आणि हळू हळू ही ओळख विसरत जातील. त्या म्हणतात, “इथे शाळेत अथवा बाहेर सुद्धा आपल्या सणांचे वातावरण काहीच नसते. वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या संस्कृतीचा परिचय होत राहतो. पण आपली संस्कृती सुद्धा त्यांना कळली पाहिजे, त्याची जाणीव त्यांना राहिली पाहिजे, म्हणून आम्ही घरी तरी मुद्दाम पाळतो. या वातावरण निर्मितीमुळे एक प्रकारचा आनंद व उत्साह असतो, मन उल्हसित होते. भेटीची ओढ असते त्यामुळे आवर्जून भेटायला येतातच”. आपण पालकांनी किंवा घरातील मोठ्या माणसांनी या परंपरा संस्कृती पाळणे आवश्यक असते असे जयश्री ताईना वाटते. तरच मुलांना घरात दिसेल आणि त्याचे महत्व वाटेल. जयश्री ताई मोकाशी पतीपत्नींनी आणि त्यांच्या कुटुंबाने दीर्घ काळ अमेरिकेत राहूनही नाते संबंध, आपल्या परंपरा, आपली शिकवण, अध्यात्म जपले आहे. एक मोठे कुटुंब आणि त्यांच्यातील नात्यांचे बंध घट्ट पकडून ठेवले आहेत. सर्व भाऊ आणि त्यांच्या बायका एकत्र राहून वय वर्षे ९८ च्या आपल्या आईला एकत्र सांभाळत आहेत. आनंद घेत आहेत आनंद देत आहेत. अशा या कुटुंबाला मानाचा मुजरा !
(हे सदर 'साहित्य परिमळ' या ई- त्रैमासिकासाठी सुरू केले आहे. ते ब्लॉग वाचकांसाठी, हा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला .link= https://online.pubhtml5.com/bmycd/xifv/index.html )
- डॉ. नयना कासखेडीकर
-----------------------------