मुलखावेगळी ती -
निर्मला थोरमोटे
सौंदर्य म्हणजे कायम आनंद ! निसर्गाचे सौंदर्य माणसासाठी नुसते नेत्रसुखासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठी ,शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि मनशांती व आनंद मिळवण्यासाठी एक वरदान आहे. त्यामुळे पुढे भविष्यात हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी ,तो वृद्धिंगत होण्यासाठी आणि तो सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संतुलित राखले पाहिजे. प्रदूषण रोखले पाहिजे, (नद्या, परिसर, नाले, ओढे, समुद्र व त्याचे किनारे, जंगले, शहरातील बागबगीचे, वाहनांचे धूर, प्लास्टिकचा वापर व कुठेही फेकून द्यायची सवय.) निसर्गाचं सौंदर्य वाढविणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी माणसाने जागे व्हायला हवे. एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला शासन एकटे किती पुरणार? त्यांना वेळीचं जागं करणं ही नैतिक वं सामाजिक जबाबदारी कुणी घ्यायला हवी. (पण कुणी? कारण शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात –ही वृत्ती) हे काम करताहेत निर्मलाताई थोरमोटे. स्वत:च्या सोसायटी पासून ते परिसरातील इतर सोसायट्या, बागा, टेकड्या,रस्ते, ट्रॅफिक, अशा विषयात निर्मला ताईंनी खूप वेगळं काम केलं आहे. ‘पर्यावरण वाचवा, जीव वाचवा’ हे म्हणायला सोप्पं आहे, पण लोकांच्या मनात हा विचार रुजविणे तेव्हढेच अवघड आहे.
आपल्याला एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर जो निर्मल व खरा आनंद मिळतो तो तिथल्या वातावरणामुळे, स्वच्छ हवेमुळे. हे निर्माण करणं, केवळ आणि केवळ मनुष्याच्याच म्हणजे आपल्याच हातात आहे. प्रत्येकाने आपले घर आणि परिसर स्वच्छता करणं आणि शून्य कचरा व्यवस्थापन करणं हे कर्तव्य केलं पाहिजे. हे तुमचे कर्तव्य आहे असे लोकांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. बापरे हे कसे शक्य आहे? कोण करणार हे काम? इथे कोणाला अशा कामासाठी फुरसत नाही. आणि काय अडलय लोकांना शिकवायचे? एव्हढी मोठी लोकसंख्या आणि पर्यावरण, शून्य कचरा व्यवस्थापन कोणाकोणा ला शिकवत बसणार? हा प्रश्न स्वाभाविक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ‘निर्मलाताई थोरमोटे’. निर्मलाताईंनी पर्यावरण क्षेत्रात काम केल्याचे कळले होते ,तो विषय बोलता बोलता लक्षात आले की, त्या प्रत्यक्ष झाडे लावत नाहीत, की शून्य कचरा व्यवस्थापना मध्ये कचरा उचलत नाहीत. तर लोकांमध्ये जागृती निर्माण करून या गोष्टी टाळता येतील, लोक स्वत:, पुढे येऊन, समजून घेऊन, यात सहभागी होतील असा वरवर आपल्याला अवघड दिसणारा प्रयत्न त्या सहज करतात. असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
पुणे शहरात गेल्या काही वर्षात कचरा निर्माण होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ‘कचरामुक्त शहर’ किंवा ‘कचरामुक्त आपले गाव’ हे मोठे आव्हान सर्वांसमोरच आहे. कचर्याचे व्यवस्थापन करायला, एक मोठे व्यवस्थापन शासकीय पातळीवर काम करत आहे. निर्मला ताईंनी स्व नुभवातून रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब,सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि प्रत्यक्ष नागरिक यांन बरोबर घेऊन मोठ मोठे उपक्रम राबवले आहेत.
इनर व्हील क्लबचे काम करता असताना मनोरंजना कडे कधी ओढा नसायचा पण सामाजिक काम, लोकांना बरोबर घेऊन उपक्रम करणे यातच रस असलेल्या निर्मला ताई आपल्या संवाद कौशल्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करतात.
त्यांना हॉटेलिंग, मनोरंजन, गप्पा टप्पा ,पार्ट्या ,गॉसिपिंग अजिबात आवडत नाही. तोच वेळ चांगल्या क्रिएटिव्ह कामासाठी त्या देतात. त्यांचं काम वाढल्याने आणि त्याचा प्रसार आणखी वाढवण्यासाठी त्यांनी DO SAVE ही संस्था सुरू केली. DO SAVE यात व्यापक अर्थ दडला आहे. यातून त्या समाजाला पर्यावरण वाचवा, स्वच्छता ठेवा आरोग्य सांभाळा, शून्य कचरा व्यवस्थापन, रक्तदान करा जीव वाचवा, शून्य कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिक आणि सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंट, पर्यावरण पूरक गणपती विसर्जन, रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम पाळा, रस्त्यावर असताना अॅम्बुलन्स सायरन वाजत असताना तिला पुढे जायला जागा कशी द्यायची हे समजून घ्या म्हणजे पेशंटचा जीव वाचू शकतो ,नुसते अॅम्बुलन्स आली वाटतं म्हणून विचार करत बसू नका,जागा करून द्यायची चटकन कृती करा. नुसते पर्यावरण वाचवा हा इवेंट म्हणून झाडे लावू नका, लावलेली झाडे, कशी वाढवायची व जपायची इकडेही लक्षं द्या. अशीच त्यांच्या कामाची यादी विचार करायला लावणारी आहे नक्कीच.
ईलेक्ट्रोनिक इंजिनीअर असणार्या पण समाजक्षेत्रात अधिकार वाणीने वावरणार्या निर्मला ताई स्वत: रेग्युलर रक्तदात्या आहेत.
‘आपला परिसर कचरा मुक्त करूया’ म्हणून अभियान त्यांनी राबविलं. स्वतच्या कचर्याचं योग्य व्यवस्थापन करून वीज, पाणी वाचवून, रसायन वापर टाळून, छोट्या छोट्या गोष्टी अमलात आणून प्रत्येकाने आपले घर पर्यावरण पूरक हरित घर करावे असे आवाहन ‘हरित घर सप्ताहा’त त्यांनी केलं. त्या म्हणतात, “घरातला ओला कचरा घरातच जिरवा बाहेर टाकू नका. माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे”. हे करण्यासाठी त्या म्हणतात, Refuse, Reduce, Reuse, Return, Recycle या 5 R वर भर द्या.
स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर, स्वच्छ देश. ही महत्वाची स्लोगन खूप काही शकविते. नुसतं कचरा व्यवस्थापन केल की आरोग्याचा केव्हढा मोठा प्रश्न मार्ग लागतो. निर्मला ताई अनेक माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधून सांगत आहेत की, कचऱ्याचे वर्गीकरण करा.
“तुमचा ओला कचरा तुम्ही स्वतःच जिरवा.
एक चौ.फूट मात्र इतक्या जागेत तुम्ही हे करू शकता.
प्लास्टिक कचरा (स्वच्छ आणि कोरडा) वेगळा करा आणि पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा.
थर्माकोलचा वापर पूर्णपणे बंद करा.
इतरही कोरडा कचरा जमेल तितका वेगळा करा.
हे सगळं स्वतः करा आणि इतरांनाही सांगा.
पर्यावरण वाचवा...जीव वाचवा!”
स्वच्छता सर्वेक्षण 2022-23 च्या त्या ब्रॅंड अॅम्बेसिडर, धनकवडी- सहकार नगर वॉर्ड,म्हणून निवड , लातूर च्या येळम मित्र संस्थेने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले, स्वच्छ पुणे च्या उपक्रमात असलेल्या योगदाना बद्दल पुणे महानगर पालिकेने पण गौरविले, सामाजिक कामासाठी अचिव्हर अवॉर्ड . शांतीदूत परिवाराकडून ‘शांतीदूत जीवनदाता पुरस्कार’ ,लातूर च कोरोंना योद्धा पुरस्कार अशा त्यांच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे.
- ले – डॉ. नयना कासखेडीकर
----------------------------------------