मुलखावेगळी ती
सौ. मृदुल गणेश पाठक
सामाजिक मूल्य कुटुंबात रुजलेले असले आणि समाजाप्रती संवेदनशीलता असेल तर पूर्ण कुटुंबच आपल संपूर्ण आयुष्य समाजासाठी देतो. घरात लहानपणापासून हे सामाजिक संस्कार मुलांवर झालेली कुटुंबं फार वेगळी असतात. आपल्या वडिलांच्या समाज सेवेचा वारसा आणि भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या संस्कारात वं सहवासात समाज सेवेचा घेतलेला वसा, पुढच्या पिढीपर्यंत नेणारी मुलखावेगळी ती- मृदुल ताई .दीनदयाल शोध संस्थान मध्ये पूर्ण वेळ काम केलेल्या शिक्षण, महिला सबलीकरण आणि ग्रामविकास याच कामाला वाहून घेतलेल्या मृदुल ताई, अनेक अडचणी आल्या पण १९७८ पासून आज पर्यन्त सतत ४५ वर्षे अविरत सामाजिक काम करणार्या समाजशिल्पी आहेत, विद्यार्थी दशेतच सामाजिक कामाची आस असणार्या मृदुल भांगेनी शिक्षण झाल्यावर विवेकानंद केंद्राचं काम करण्याचं मनाशी ठरवलं होतं. आणि ‘लग्न केलचं तर सामाजिक क्षेत्रात काम करणार्या आणि हुंडा न घेणार्या मुलाशीच करायचं’ असा पण केलेल्या मृदुलाताईना जोडीदार पण तसाच मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी हा सामाजिक कामाचा पटच उलगडून दाखवला ,अत्यंत आनंदाने आणि समाधानाने अजूनही काम करत असलेल्या मृदुल ताईंना, समाजाला आपला उपयोग झाला याचा आणि नानाजी देशमुख या थोर व्यक्तीबरोबर काम करण्याचे भाग्य लाभले याचा अभिमान आहे.
त्यांनी
कामाची सुरुवात कशी झाली हे सांगताना म्हणतात, “वडील संघ स्वयंसेवक
असल्याने सतत प्रचारक आणि कार्यकर्त्यांचे घरी येणे जाणे असे.संघ कार्यकर्ते
विश्वनाथ लिमये नेहमी येत असत. ते सतत विचारात असत शिक्षणांतर काय ? मीही विचार केला की लग्न केंव्हातरी होणारच आहे आणि नाही झालं तरी तेच
आयुष्यच ध्येय नाही आपल्या ,लग्न नाही झालं तर, राष्ट्र सेविका समितीचे काम आयुष्यभर करू एव्हढ मोठ काम आहे. ते करायचं
हा विचार मनात पक्का झाला होता. मग हळू हळू गोंदिया च्या आजूबाजूच्या परिसरात
समितीच्या शाखा सुरू करून त्याचं काम वाढवत गेले, आजही या
शाखा सुरू आहेत याचा अभिमान वाटतो. याच
सुमारास नागपूरला दीनदयाल शोध संस्थान चे बालजगत चे काम सुरू झाले होते आणि
ओळखीच्या काकूंनी हे स्थळ सांगितलं होतं. नानाजी देशमुख यांच्या बरोबर काम करतोय
मुलगा हिलाही सामाजिक कामाची आवड आहे तर हे स्थळ पहावे. नानाजी देशमुखच मला बघायला
आले होते. त्यांनी तेंव्हाच सांगितलं की लग्नानंतर तुला गोंदियाला शाळा सुरू
करायची आहे. नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं.
दिन दयाल संस्थेमध्ये ‘समाजशिल्पी’ ही
संकल्पना राबवली जायची.
मा. नानाजी
देशमुख यांच्या बरोबर काम करणार्या कार्यकर्ता गणेश पाठक यांच्याशी नानाजींच्या
आशीर्वादाने लग्न झालं. समाजशिल्पी परिवारात मृदुलताई सामील झाल्या. सुरुवातिच्या
कामाबद्दल त्या सांगतात, “ नानाजींची कल्पना अशी होती की परिवाराने प्रचारक म्हणून काम करावं. दिन
दयाल संस्थेमध्ये ‘समाजशिल्पी’ ही
संकल्पना राबवली जायची. नानाजींनी राजकारणातून संन्यास घेऊन,
मे ७८ मध्ये या सामाजिक कामाची सुरुवात केली होती.त्या पहिल्या दिवसापासून माझे
पती नानाजीं बरोबर काम करत होते. मी लग्नानंतर गोंदिया तून गोंडा प्रकल्पात काम
करायला गेले.वाहनाची सोय नाही. आजूबाजूच्या १५ गावातून फिरून काम सुरु केले. ३६
मुलांपासून शाळा सुरू केली.शिक्षण त्या भागातील लोकांना नवीनच होते. शिवाय मुलींना
शिकवतात हेच माहिती नव्हते. अशा लोकांसाठी त्यांच्या मुलांमुलीसाठी हे काम होते.
त्यांचा विकास हेच उद्दीष्ट.शाळांमधून राष्ट्रीय शिक्षण ही कल्पना नानाजींची होती.
गोरखपुरला त्यांच्या कल्पनेतले पहिले शिशुमंदिर साकार झाले”.
गोंडा प्रकल्पाच्या शैक्षणिक कामा साठी मला B.Ed करावं लागलं. आणि अयोध्या
युनीवर्सिटीतून नवीनच सुरू झालेले एज्युकेशन मध्ये MA पण
केलं.त्या काळात वीज कनेक्शन असून लाइट नसायचे ग्रामीण भागात. दिवसा फक्त शेतकर्यांसाठी
लाइट यायचे. त्यामुळे अभ्यासासाठी रात्री कंदील किंवा लॅम्प वापरावा लागे . तिकडे
स्त्रियांना घुंघट घालावे लागायचे ,अगदी महिलाना महिलांसमोर
सुद्धा घुंघट घेऊनच बोलायला लागायचे. सतत संवाद साधून हे कमी झाले.भजनाचा ग्रुप
करून त्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मी मुख्याध्यापिका असल्याने शाळेत
जेंव्हा मुली यायला लागल्या, तेंव्हा त्यांची फी (१० रुपये
फक्त,) भरायला वडिलांच्या ऐवजी आईनेच यावे असा आग्रह
केल्याने, त्या महिला शाळेत यायला लागल्या. त्यातून त्यांचे
दर महिन्याला एकत्रीकरण, खेळ ,प्रार्थना
असे उपक्रम सुरू झाले. एक समितीच सुरू झाली. या निमित्ताने त्या महिला घराबाहेर
पडू लागल्या. या केंद्रात मा. रज्जु भैय्या, उषा काकू, प्रमिलताई आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते भेट द्यायला यायचे त्यांच्याशी
संपर्क होत असे. सहवास होत असे. नानाजी बरोबरच काम होत असे त्यांच्या
मार्गदर्शनामुळे आम्हीही घडत होतो. त्या वेळी माहिती नव्हतं की हे एव्हढे मोठे
आहेत. ज्यावेळी त्यांना भारतरत्न मिळालं त्या कार्यक्रमाला आम्ही दिल्लीला गेलो
त्यावेळी नानाजी किती मोठे व्यक्तिमत्व होते ते जाणवलं. कारण ते इतके साधे होते आणि
आपल्यातलेच एक वाटत . अभिमान वाटला, अशा व्यक्तीचा सहवास आणि
मार्गदर्शन आपल्याला जीवनातली नऊ वर्षे लाभले आहे.”
त्यानंतर बीड
मध्ये काम सुरू करायचे होते. डोंगरी मध्ये साखर कारखान्यातल्या कामगारांच्या
मुलांसाठी . ते काम आम्ही बघाव असे ठरलं. नानाजींच काम प्रत्येक गावाप्रमाणे, शहरं प्रमाणे,
तिथल्या गरजा ओळखून योजलेले असायचे . मागसलेले गाव असेल त्याप्रमाणे तशी योजना
ठरायची. गोंडा, नागपुर, बीड याठिकाणी
काम उभा केलं, चित्रकूटला व्यवस्थित प्लॅन करून यशस्वी प्रयोग
झाला. मग पुढे पुढे आधी १०० गावं नंतर ५०० गावं दत्तक घेऊन प्रत्येक ५ गावांमागे
एक समाजशिल्पी परिवार कामाला लागला होता. तसे आवाहनच केले होते प्रत्येक परिवाराने
आपल्या जीवनातला काही काळ समाजासाठी द्यावा. नानाजींची सौंदर्य दृष्टी खूप
महत्वाची होती. अनेक गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या . जरी सामाजिक काम करत असलो
तरी ते इतके व्यवस्थित हवे नीट नेटके हवे की कोणालाही तिथे यावेसे वाटले पाहिजे.
महिलांसाठी छोटे छोटे कुटीरोद्योग आणि कलेच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय सुरू करून देणे त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण देणे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे.जेणे करून महिला स्वतच्या पायावर उभ्या राहतील. हे काम खूप चांगलं उभं झालाय, त्यासाठी आधी महिलांसाठी कला वर्ग घेतले. शिवण क्लास घेतले. अनेक प्रकार शिकविले , बॅग, बाळंतविडे, ड्रेसेस. हँड एम्ब्रोयडरीला तर खूप मागणी आहे. ब्युटिपार्लर, बटाटा चिप्स मशीन्स, लेदर बॅग,कापड तयार करणे, शेवया बनविणे, असे उपयुक्त काम सुरू आहे. नोकरी करणार्या महिलांसाठी बाळांची सोय म्हणून पाळणाघर आणि बालवाडी सुरू केली. बीड भागात जशा गरजा होत्या तसे काम उभे केले. आदर्श शैक्षणिक मॉडेल तयार करायचे आणि लोकांना द्यायचे. विद्यार्थ्याला दहावीनंतर व्यवसाय प्रशिक्षण द्यायचे ज्यामुळे नंतर त्याला नोकरी नाही मिळाली तरी तो काही उद्योग चालू करू शकेल.
गोंडा
प्रकल्पात काम सुरू केल्यानंतर इतक्या वर्षांनी तिथे चार पाच वर्षापूर्वी जाण्याचा
योग आला तो संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी नानाजी देशमुख यांच्या जन्म शताब्दी
वर्षा निमित्त सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा स्नेह संमेलन ठेवलं होतं. त्या 5
दिवसात आम्ही ज्यावेळी 90, 91 पर्यन्त गोंडा ला काम करत होतो त्यावेळी जेव्हढे विद्यार्थी शिकत होते, त्यांना आम्ही आलो असे कळताच,त्या सगळ्यांनी
दिवसभराचे सकाळी, दूध, नाश्ता, जेवण, दुपारचं चहा, नाश्ता, रात्रीचे जेवण आणि रात्री दूध असे सात वेळांचे प्रत्येकाकडे वेळापत्रक
ठरवून आम्हाला आग्रहाने नेलं. आज आता त्यांची मुले त्या शाळेत शिकत आहेत, प्रगती करत आहेत. असं समाधानकारक बदललेलं चित्र पाहायला मिळालं.
बीड ला वेगळ्या प्रकारे काम करावे लागले. खूप
निरक्षर महिला होत्या. त्यांना आधी साक्षर करून निदान थोडे वाचता येईल असे शिकवून
मग इतर प्रशिक्षण द्यावे लागले. त्यासाठी आम्ही छोट्या लायब्ररी सुरू केल्या, छोट्या गोष्टी शिकवून वाचायला लावून त्या
सांगणे स्वत:च आपल्या विकासात पुढाकार घेऊन केले तर लवकर प्रगती होते.मागे वळून
पाहताना समाधान वाटतं की आपण आपल्याला नेमून दिलेल्या कामाला न्याय दिला आहे.”
आता
पूर्ण वेळ काम थांबवावे असा विचार केलेल्या मृदुला ताई काम पुन्हा कसं सुरू झालं
ते सांगतात, “ २०१३
आम्ही आता या कामातून थांबायचे ठरवले.कारण पूर्ण वेळ आम्ही दोघांनी संस्था म्हणेल
तसा व तिथे वेळ दिला होता.पुढे काय करावं हे ठरवलं नव्हतं .वर्ध्याला गेलो. तिथे
खेळघर सुरू केलं. लहान मुलांना दिशा देणे हाच आमचा उद्देश होता. आम्ही एक गाव पण
दत्तक घेतलं होतं पण कौटुंबिक कारणाने २०१८ ला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. लॉक
डाउन सुरू झालं . या काळात संस्कृत भारतीचा कोविद कोर्स केलं अभ्यास केलं.
अहमदाबाद च्या एका युनिव्हर्सिटी साठी एक पुस्तक लिहिण्याचा योग आला. नंतर एकनाथजी
रानडे यांच्यावरील मराठी पुस्तकाचा हिन्दी अनुवाद केला आहे”.
“सध्या
राष्ट्र सेविका समितीने पश्चिम महाराष्ट्रचे सेवा विभागाचे दायित्व दिले आहे .
तळेगावला मा. ताई आपटे यांच्या नावाने मोठी वास्तु बांधली आहे तिथले प्रकल्प सुरू
आहेत, त्याचे उदघाटन नानाजी यांनीच केलेले आहे. पुन्हा नानाजींच्या प्रकल्पात मी
सामील झाले आहे .
संघटन तर
करायचेच पण जोडलेल्या लोकांना काम करण्यास प्रवृत्त पण करायचे हे महत्वाचे आहे. माझ्या
मुली पण लग्नानंतर स्वेच्छेने कामात आहेत, समितीचा काम करतात. मुलीची मुलगी माझी नात समितीशी जोडली आहे
आणि माझी आई पण समितीचं काम करते अशा आम्ही चार पिढ्या या कामात आहोत . नानाजींचे
म्हणणे होते संपूर्ण परिवार कामात हवा, समाजशिल्पी परिवार !
अनेक अडचणीं ना तोंड देत काम करावं लागत पण
अडचणी आपण कुटुंबात काम करतो तेंव्हाही असतातच , त्या सोडवतच आपण पुढे जात असतो, तसच या
कामात सुद्धा अडचणी सोडवत पुढे जायचं”.अशा मृदुल ताई पाठक प्रामाणिक पणे समाज
कार्य करणार्या मुलखावेगळ्या कार्यकर्त्या आहेत.(ही मुलाखत विश्व संवाद केंद्र,आणि इतर पोर्टल्स वर प्रसिद्ध झाली)
- - डॉ नयना कासखेडीकर
-
----------------------------
No comments:
Post a Comment