उत्तरार्ध
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील
घटना-घडामोडींचा,
प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका
विचार - पुष्प - उत्तरार्ध
भाग –६४. मातृभूमिकडे प्रयाण
स्वामी विवेकानंद शिकागो ला सर्व धर्म परिषदेला येण्यापूर्वी
भारतात ते परिव्राजक म्हणून फिरले होते आणि आता अमेरिकेत सगळीकडे परिव्राजक
म्हणूनच फिरत होते. पण दोन्ही कडचे परिव्राजकत्व खूप वेगळे होते. दोन्हीकडील लोक, शिक्षण, परंपरा, तत्वज्ञान, धर्म, अध्यात्म ,विचार व मूल्य ,आर्थिक
परिस्थिति सगळच वेगळं. इथे वैयक्तिक भेटीतून त्यांनी तळागाळातील भारत समजून घेतला
तसच, आता दीड वर्षापासून ते अमेरिकेत फिरत होते. तेथेही भेटी
घेणे, विविध चर्चा,भाषणे, सार्वजनिक ठिकाणची व्याख्याने, तिकडच्या विद्वान
लोकांच्या भेटी, नामवंतांशी झालेल्या चर्चा, यामुळे तिकडची संस्कृती, ते लोक याचा जवळून परिचय होत
होता. अनेक कुटुंबे विवेकानंद यांच्याशी पर्यायाने हिंदू तत्वज्ञानशी जोडले गेले
होते. तिथल्या वृत्तपत्रातून विवेकानंद यांच्या विषयी अनेक वर्णने छापून आल्यामुळे
लोकांना त्यांचा परिचय व्हायचा. त्यांच्या भेटीनंतर आणि ओळख पटल्यानंतर पाश्चात्य
संस्कृतीतल्या स्त्रिया सुद्धा विवेकानंद यांच्याकडे मातृभावाने बघू लागल्या
होत्या. भारतात जसे त्यांचे शिष्यगण तयार झाले होते तसे आता अमेरिकेत सुद्धा
लोकांचा यातला रस वाढू लागला होता.त्यातून अनेक शिष्य ही तयार झाले.
सुरूवातीला सर्व धर्म परिषदेपर्यंत त्यांना कोणी ओळखतही
नव्हते, नंतर
मात्र ते तेंव्हापासून आणि नंतरही विद्वानात सुद्धा चांगलेच परिचित झाले. एक
मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले होते. सुरूवातीचे विषय सुद्धा हिंदू धर्माचे
प्रतिनिधी याच नात्याने असत. खरा हिंदू धर्म समजून सांगणे,
गैरसमज दूर करणे, हेच उद्दिष्ट्य त्यांनी ठेवलेले दिसते.
आता स्वामीजींनी अमेरिकेचा निरोप घेऊन पुढच्या कार्याला
लागायचे ठरवले होते, अनेक जणांना पत्र लिहून निरोप दिला. पंधरा
एप्रिलला न्यू यॉर्क हून लिव्हरपुल ला निघाले.
बरेच जण जहाजावर निरोप द्यायला आले होते. आधी भारतात अडीच वर्षे परिव्राजक
म्हणून ते फिरले, तसे अमेरिकेत सुद्धा जवळ जवळ ते अडीच वर्षे
फिरले. आता ते इथून इंग्लंड ला निघाले होते. एस.एस. जर्मनीक
जहाजाने किनारा सोडून अमेरिकेचा भूप्रदेश दिसेनासा होईपर्यन्त ते बाहेर उभे होते.
या अमेरिकेच्या भूमिने आपल्याला काय काय दिले याचा लेखा जोखा मांडत.
स्वामीजी इंग्लंड
ला पोहोचले. इथे एक आनंदाचा प्रसंग स्वामीजींनी अनुभवला. तो म्हणजे, पाच
वर्षांनंतर गुरुबंधू सारदानंद यांची इंग्लंड मध्ये भेट. भारतभ्रमण सुरू होताना ते
भेटले त्यानंतर स्वामीजींना अमेरिकेतील वास्तव्यात आलेले अनुभव, मिळालेले यश आणि किर्ती हे सारे बघून सारदानंद केव्हढे आनंदी झाले असतील
याची कल्पना आपण करू शकतो. स्वामीजींना खूप वर्षानी आपल्या मातृभाषेत बंगालीत
बोलायला मिळाले याचाही आनंद होता. पत्रव्यवहार होत असला तरी
अनेक गोष्टी आता प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला मिळत होत्या त्याचे एक समाधान होते
दोघांना. ही भेट झाल्यानंतर स्वामीजींनी आपल्या सर्व गुरुबंधूंना उद्देशून सविस्तर
पत्र लिहिले, त्यात मठातील दैनंदिन व्यवहार कसा असावा, त्याचे नियम काय असावेत, मी भारतात परत आल्यानंतर
आपल्याला एक संस्था उभी करायची आहे ती कशी असेल, त्याचे
ध्येय काय असेल, ती कशी चालवायची, याचे
चिंतन होते. ही संस्था म्हणजेच ‘रामकृष्ण मिशन’ ची तयारी होय. रामकृष्ण मिशन चे काम पुढे कसे वाढले आणि त्याचा प्रसार कसा
झाला हे आज आपण रामकृष्ण मठ आणि मिशन चे कार्य बघितले की कळते.
लंडन मध्ये
स्वामीजींनी वर्ग सुरु केला होता. तिथे सीसेम क्लब नुकताच वर्षभरापूर्वी स्थापन
झाला होता. बुद्धिजीवी आणि विचारवंत स्त्रिया आणि पुरुष असा दोघांचा हा क्लब होता.
शिक्षणाचा सर्वांगीण विचार असा त्याचा उद्देश होता. त्यात आठवड्यातून एक दिवस
साहित्य विषयक चर्चा होत असे. ठरलेले वक्ते येऊ शकणार नव्हते म्हणून स्वामी
विवेकानंद यांना व्याख्यानासाठी अचानक बोलवण्यात आले. तिथे त्यांनी मांडलेले विचार
फार महत्वचे होते. ‘शाळेत दिले जाणारे भौतिक विद्येच्या
क्षेत्रातील शिक्षण शेवटपर्यंत थेट पोहोचले पाहिजे. कारण स्वामीजींच्या मते
समाजातील अज्ञान दूर करण्याची ही पहिली पायरी होती. आणि मानवामध्ये सुप्त असलेले
पूर्णत्व प्रकाशात आणणे ही शिक्षणाची फलश्रुति होती. धर्माईतकेच शिक्षणाला महत्व
आहे आणि धर्माचा जसा व्यापार होता कामा नये तसाच, शिक्षणाचा बाजार होता कामा नये, असा स्वामी विवेकानंद यांचा दृष्टीकोण होता. भारतातील प्राचीन गुरुकुल
पद्धती त्यांना आदर्श वाटत होती.
युरोप मध्ये प्रवास चालू होता, आता तर
अभेदानंद हे गुरुबंधु पण स्वामिजिना भेटले. मूलर यांच्याकडे विवेकानंद राहत होते
तिथे अभेदानंद आलेले पाहताच स्वामीजींना कोण आनंद झाला होता. जूनलाच स्वामीजींचा भारतात निरोप गेला होता की “कालीला
ताबडतोब पाठवून द्या”. मग काय? स्वामीजी आणि काली पुढचे
पंधरा दिवस वेदान्त विचाराच्या प्रसाराचे कार्य आणि फक्त त्याचीच चर्चा, असे आनंदात दिवस गेले. अभेदानंद सर्व वेद ग्रंथ,
शतपथ ब्राह्मण, काही सूत्र ग्रंथ, असे
अनेक ग्रंथ घेऊन आले होते. ही सर्व पुढच्या कामाची तयारी होती. सार्या मानव
जातीला एक नवी दिशा द्यायची आहे असे स्वप्न स्वामीजींनी बघितले होते. आता
विवेकानंद यांचे परदेशातील वास्तव्य संपत आले होते. इंग्लंड मध्ये अभेदानंद
आणि अमेरिकेत सारदानंद पुढचे काम बघणार
होते. स्वामी विवेकानंद आता आपल्या मातृभूमिकडे परत येणार होते, ते जवळ जवळ साडे तीन वर्षांनंतर, त्यांना निरोप
द्यायला सगळे जमले होते. १६ डिसेंबर १८९६ रोजी स्वामीजींनी इंग्लंड चा किनारा
सोडला. मातृभूमी त्यांना बोलवत होती.
(क्रमश :)
© डॉ.नयना कासखेडीकर
-------------------
No comments:
Post a Comment