Friday, 21 April 2023

विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

 



विल्यम शेक्सपिअर आणि जागतिक पुस्तक दिन

                                           

२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. जगातल्या लेखकांचा व पुस्तकांचा सन्मान करणे आणि लोकांमध्ये वाचनाची सवय वाढीस लावणे हा उद्देश असतो.आपणही कुसुमाग्रजांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सजरा करतो तसाच, जगातील ख्यातकीर्त इंग्रजी कवी, नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा हा जन्म दिवस जगात पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस सर्वप्रथम युनेस्कोने जाहीर केला. विशेष म्हणजे २३ एप्रिल हा शेक्सपिअर यांचा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस पण आहे. (२३ एप्रिल, १५६४–२३ एप्रिल १६१६)

      नाट्यतंत्राचा कसून केलेला अभ्यास, अनुभव, अल्पावधीत नाट्य क्षेत्रात मिळालेले व्यावसायिक यश यामुळे शेक्सपिअर यांना ‘फादर ऑफ ड्रामा’ असेही म्हटले जाते. शेक्सपीअर १५९० ते १६१२ या काळात अखंड पणे नाटके लिहीत होता. त्यांच्या नाटकांचे विषय असत ऐतिहासिक, शोकात्मिका,सुखांतिका आणि सुख दुखाचे मिश्रण असणारे रोमान्स.१५९२ ते १५९४ या काळात प्लेगमुळे नाट्यगृहे बंद होती. या काळात विळ्यां यांनी सुंदर काव्य निर्मिती केली. १५९४ मध्ये नाट्यगृहे पुन्हा चालू झाली तेंव्हा किंग्ज मेन नाट्य मंडळीमध्ये शेक्सपिअर झळकला. १५९४ ते १६०३ या काळात त्याने दर वर्षाला दोन नाटके लिहिली. इथून सुरू झाले त्यांचे वैभवचे दिवस.

     अशा जगप्रसिद्ध विल्यम शेक्सपिअर ची मराठी माणसाने आठवण काढलीच पाहिजे. कारण मराठी भाषेत शेक्सपिअर यांची अनेक नाटके आहेत. तीही अत्यंत गाजलेली. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या नाटकांचा व साहित्याचा अनुवाद मराठीत केला आहे. तो तितकाच मराठी प्रेक्षकांना भावला आहे. अगदी ‘हॅम्लेट’ या नाटकाचं मराठीत गोपाळ गणेश आगरकर, गोविंद कानिटकर, आनंद बर्वे, नाना जोग, भा. द. खेर, परशुराम देशपांडे, नानासाहेब फाटक, सई परांजपे, प्रभाकर देशपांडे, वि.वा.शिरवाडकर(गगनभेदी ) यांनी हॅम्लेट मराठीत अनुवादीत केलाय. कवि मंगेश पाडगावकरांनी रोमिओ अँड जूलिएट केला. वीर वामनराव जोशी यांनी मेझर फॉर मेझर (संगीत झोटिंगशाही), मॅकबेथचा अनुवाद वि वा शिरवाडकर, शि. म. परांजपे, यांनी केला आहे आणि आपल्या सर्वांच्या ओळखीचे वि.वा. शिरवाडकरांचे गाजलेले ,आम्हा प्रेक्षकांनी अत्यंत गौरविलेले ‘नटसम्राट’ नाटक म्हणजेच विल्यम शेक्सपीअर चे ‘किंग लियर’चा अनुवाद. याची मराठीत ९ लेखकांनी भाषांतरे केली आहेत.

   To be? or not to be? that is the question

जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या ऊकिरड्यावर खरकट्या
पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं ?
का फेकुन द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये?
आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहाराने? ....


   हे अप्पासाहेब बेलवरकरांचे नटसम्राट मधील स्वगत, मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून आहे. ‘नटसम्राट’ हे विल्यम शेक्सपिअर यांच्या कलाकृतीवर आधारित नाटक. आजही अनेक दशकानंतर या नाटकाचे नावीन्य तसेच आहे आणि ते तसेच टिकून राहील. विल्यम शेक्सपियर यांच्या नाट्य पंढरीचा स्वताला वारकरी समजणारे कुसुमाग्रज यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. मानवी जीवनाचा सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, आणि वैयक्तिक असा धांडोळा घेतला तर जे जे काही मनुष्य स्वभावाचे कंगोरे, उदा. कट -कारस्थाने, विश्वासघात, सत्यता, असत्य, अहंकार, मत्सर आणि लोभ, प्रेमातला संघर्ष,आणि जीवनमूल्ये रंगभूमीवर मांडून ती जगात सगळीकडे सारखीच आहेत हे सिद्ध झालं, ते शेक्सपिअर यांच्या साहित्यामुळेच. म्हणूनच जगातल्या जवळ जवळ सर्वच भाषेत त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे आणि अमर झाले आहे.

   ऑथेल्लो हेही एक नाटक महादेवशास्त्री कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल. वि वा शिरवडकर यांनी अनुवाद केलेलं आहे. त्यांच्या नाटकनवरून ‘हॅम्लेट’, ‘अंगूर’ (हिन्दी) ‘मकबुल’ हिन्दी (मॅक बेथ वर आधारित) आणि ‘ओमकारा’(ऑथेल्लो वर आधारित) हे चित्रपट निघाले आहेत. अंगूर सिनेमा आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा विनोदी चित्रपट १९८२ मध्ये प्रकाशित झाला. गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याची कथा विल्यम शेक्सपिअर च्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकाची आहे. आज हा चित्रपट सर्वश्रेष्ठ विनोदी चित्रपट म्हणून नावाजला जातो.

                                                    

     शेक्सपिअर ची काव्ये आणि नाटके हे दोन साहित्य प्रकार अजरामर झाले आहेत. त्यांचे विशेष काव्य प्रकार म्हणजे सुनीत लिहिली (sonnets १४ ओळींची कविता) शिवाय दीर्घकाव्ये सुद्धा. त्यांनी ३८ नाटके, १५४ सुनीते, दीर्घ कविता, स्फुट कविता असे लेखन केले. शेक्सपिअर ची सुनीत-माला इंग्रजी साहित्यातला बहुमोल अलंकार मानला जातो.

    परभणीचे प्रभाकर देशपांडे तर शेक्सपिअर च्या नाटकाने झपाटलेलेच होते. त्यांनी तर शेक्सपियर यांच्या नाटकांचे अनुवाद केलेले पाच खंडच लिहिले आहेत. त्यात ७ शोकांतिका, ७ सुखांतिका, ७ नाटके, ८ ऐतिहासिक नाटके आणि इतर १५ नाटके असे पाच खंडात लिखाण केले आहे. हे खंड विशेष म्हणजे जागतिक ग्रंथ दिनी म्हणजे २३ एप्रिललाच २०१५ मध्ये प्रकाशित केले गेले. वाईचे गणेश ढवळीकर यांनीही शेक्सपिअरची, मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाईन, ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ अँड जूलिएट , टेंपेस्ट ही नाटके कथारूपात मराठीत अनुवादीत केली आहेत.

    विल्यम शेक्सपिअर यांच्या साहित्याने सर्व जगालाच भुरळ पडलेली दिसते. याचा इतका प्रभाव होता की शेक्सपीअर यांच्या साहित्याची सूक्ष्म समीक्षा केली गेली. त्यांनी नाटकातून उभे केलेली पात्रे,काव्ये, प्रतीके, त्यांनी वाप्रलेले शब्द, वृत्त,राज्यशास्त्र, वैद्यक शास्त्र, ज्योतिष, नाट्य शास्त्र, संगीत या सगळ्या विषईंचे ज्ञान यांचा पण अभ्यास केला गेला. शेक्स पियर नाटककार म्हणून मोठा की कवि म्हणून मोठा यावे चर्चा झडल्या, त्यांच्या नाटकातील पात्रांची सूची तयार केली गेली,नाटकातील प्रसंग .घडामोडी आणि व्यक्ति प्रत्यक्षात होऊन गेल्या होत्या का याचा ही शोध घेतला गेला.

    जगातल्या मुख्य भाषा सोडाच पण मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पण त्यांच्या साहित्याला स्थान दिल्याचे दिसते. म्हणूनच त्यांच्या जीवनावरील, नाटकांवरील, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या काळातील इंग्रजी रंगभूमी वर अभ्यास झालेला दिसतो. मग ती शोकनाटये, सुखांतिका, सुनीते, कथा, कविता, त्यांच्या नाटकातील सौंदर्य स्थळे, मराठी नाटक आणि शेक्सपिअर असा सर्वच विषयांचा लेखाजोखा आपल्या मराठी भाषेमध्ये मांडला गेला आहे.

    स्ट्रॅटफर्ड-ऑन-अॅव्हन या शेक्सपीअर यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक आहे. अॅव्हन नदीच्या काठावर एक नाट्यगृह, ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. यात शेक्सपीअर यांच्यावरील दहा हजारांवरील दुर्मिळ पुस्तके ठेवली आहेत. हस्तलिखिते आहेत. मार्च ते ऑक्टोबर या काळात येथील नाट्यगृहात शेक्सपीअरची नाटके सादर केली जातात. जगाच्या पाठीवरचा हा नावाजलेला कवि आणि नाटककार २३ एप्रिल चा महानायक (हीरो) आहे. अभ्यासकांना आणि वाचकांना एक दिशा देणारे त्यांचे साहित्य आहे. वाचकांनी आपल्या मराठी भाषेतली त्यांची साहित्यकृती नक्की वाचावी, समजून घ्यावी.

(हा लेख काल प्रकाशित झालेल्या 'साहित्य परिमळ' या ई साहित्य पत्रिकेत प्रसिद्ध झाला.हा अंक वाचण्यासाठी लिंक -- https://online.flippingbook.com/view/898043842/ )

- - डॉ. नयना कासखेडीकर
                                                              ----------------------------



1 comment:

  1. अप्रतीम.नयना!
    गाढ अभ्यासक आहात आपण.

    ReplyDelete