अहिल्याबाईंचा दिनक्रम अगदी आखीव रेखीव होता. पहाटे उठून स्नान आटोपून शंकराची पूजा. स्तोत्र पठण. थोडे दूध पिऊन मग दिवसभराच्या कामाची आखणी व आढावा घेणे, आलेल्या तक्रारींचे कागद वाचून ठेवणे. गुप्त पत्रे लिहिणे. कोतवालीत जाऊन कामे बघणे. तोपर्यंत भोजनाची वेळ होई मग भोजन आटोपून, न्यायदानाची कामे, हिशोब असे दिवसभर चाले. कधी कधी रात्री उशिरापर्यंत काम चाले. कधी हिशोबांचा गुंता झाला असेल तर त्या रात्रभर जागून स्वत: मार्गी लावत असत. १७६७ ला अहिल्याबाईंचा कारभार सुरू झाला . पाच वर्षे झाली तरी आर्थिक गणित नीट बसत नव्हते. घरात एका पाठोपाठ एक मृत्यू झालेले, पती खंडेराव, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, आणि या तिघांच्या सती गेलेल्या बायका. स्वत:च्याच घरात तेरा जणी सती गेल्या होत्या. या सगळ्याची सल मनात ठेऊन त्या कारभार करत होत्या. आता फक्त मुलगी मुक्ताचाच त्यांना आधार होता. अशा मानसिक अवस्थेत सुद्धा अहिल्याबाई राज्याचा कारभार अत्यंत कर्तव्य निष्ठेने करत होत्या. प्रजेचा अपमान किंवा अनादर केलेला त्यांना आवडत नसे. त्यांच्या बरोबर असत्य किंवा अनुचित व्यवहार केलेलाही चालत नसे, त्यांच्या मते प्रजेसाठी आपण आहोत. गावात एखादा अनुचित प्रकार कानावर आला तर लगेच त्याला समज देत. हिशोबत गोंधळ असेल तर त्यांना तो लगेचच लक्षात येई. प्रजेच्या पाठीशी उभे राहून अधिकार्यांना जबाबदार धरत. वेळप्रसंगी त्याला अधिकार पदावरून काढून टाकत.
एकदा गावात श्रीमंत व्यापारी मरण पावला. त्याच्या मागे फक्त पत्नी होती. मुलबाळ नव्हते. वारस नसल्याने सर्व संपत्ती सरकारजमा होईल, त्या ऐवजी त्यांच्या विधवा पत्नीने अहिल्यादेवीकडे ती दान करायची असे ठरविले. मात्र न्यायप्रिय अहिल्यादेविंनी विधवा पत्नीला बोलवून संगितले की, “हा पैसा तुमच्या पतीचा आहे, आता तुम्हीच त्याच्या मालक आहात. तुम्ही स्वेच्छेने हा पैसा एखाद्या अन्नछत्राला द्या, अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च करा, पाणपोया उघडा, धर्मशाळा बांधून द्या. घाट बांधायला पैसे द्या, विहिरी खोदा, दानाचे सुख घ्या”. असा एक मोठा सामाजिक संदेश त्या काळात अहिल्यादेवी देत होत्या. पक्षपात, भेदभाव असे त्यांच्या ठायी नव्हतेच. सर्वांना न्यायपूर्ण वागणूक देत.
त्या मृदु होत्या, मायाळू होत्या. तरीही वेळ आली तर तितक्याच कठोर पण होत्या. मल्हार राव हो;ल्करांचे बाजीराव पेशव्यांशी संबंध चांगले होते. ते तसेच त्यांच्या नंतर सुद्धा अहिल्याबाईंनी चांगले सांभाळले होते. त्या हुशार, व्यवहारी, मुत्सद्दी, धीट आणि फटकळ सुद्धा होत्या. त्यामुळे व्यवहार अगदी चोख असत. कोणाला त्यात काही गडबड करू देत नसत. केलीच तर चांगले फैलावर घेत. कोणाच्या स्वार्थी मनात कशाचे इमले आहेत हे त्या लगेच ओळखत.
एकदा, पुणे दरबारातून अहिल्याबाईंनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून, भेटायला हरिपन्त आले होते. त्यांनी हरिपंतांना स्पष्ट संगितले की, “सुभेदार मल्हाररावांपासून आमची निष्ठा बाजीराव पेशव्यां बरोबर आहे. हा एकनिष्ठेचा बेलभंडार आम्ही कधीच उचलला आहे तो काही उगीच नाही”. हरीपंताना लगेच सगळे ध्यानात आले. शिवाय महेश्वर मधल्या, बाजारपेठा, संशोधन केंद्रे, युद्धभंडार, चिलखते, भाला- बरच्या, तोफा हे सर्व पाहून ते थक्क झाले. त्यांच्या मनात आता अहिल्याबाई न्यायदान कसे करतात त्याचा अनुभव घ्यावा असे आल्याने ते शेतकर्याचा वेष घेऊन दरबारात आले. त्यावेळी एक कवी दरबारात आला आणि
असे कवन गाऊ लागला. हे ऐकताच अहिल्यादेवी म्हणाल्या, “कविराज, तुमची माझ्याविषयी जी श्रद्धा आहे याचा मी आदर करते पण, माझे हे अतिशयोक्तीचे वर्णन मला पटत नाही. एकतर ईश्वराने माझ्या रूपात अवतार घेणे अशक्य आहे. नारद तुंबर स्वर्गात माझी लीला गाणं हे ही अशक्य आहे. देवांना आणी देवळांना तुम्ही माझ्या अभागिनीच्या पायाशी आणून ठेवलत. हा अपराध आहे तुमचा. कशासाठी गाता असे? चांगले काव्यगुण दैवाने मिळाले आहेत ते चार पैशांसाठी सत्ताधार्यांची कौतुके गाण्यात का दवडता ? त्या ऐवजी समाजाची दु:खे काव्यातून मांडा. ईश्वराची लीला रचा. शौर्याचे पोवाडे गा. मग सोन्याचे कडेही देईन. पण आज ती चोपडी इकडे द्या, नर्मदेत बुडविते. या तुम्ही.” हरिपन्त हा प्रसंग पाहून आश्चर्यचकीत झाले. देवलाही आपली स्तुति आवडते आणि अहिल्याबाई ? त्यांच्या विषयी केलेली स्तुति नर्मदेत फेकली ?
असे अनेक प्रसंग घडले, इतिहासात त्याची नोंद आहे. काशी येथे अहिल्यादेविंनी ब्रम्हपूर स्थापन केले. कारण एकदा काशीचे ब्राह्मण अहिल्यादेवींकडे आले. मुसलमानांचा उच्छाद सुरू होता, वेदाभ्यास करायला जागा नव्हती. मुसलमान हल्ला करत तेंव्हा शिष्यगण सैरावैरा पळून जात, आश्रमास कोणी जागा देत नसे. अहिल्यादेवींनी एकाला त्या ब्राम्हणांबरोबर देऊन काशीला पाठवून ,आता हे आश्रमासाठी जागा शोधून देतील असे संगितले. ब्राम्हण आनंदले. पण त्या म्हणाल्या, “एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी वास्तू बनेल त्याचे नाव ब्रम्हपुरी असेल. दर तीन महिन्यांनी आमचे गुप्तहेर कुठल्याही वेशात तिथे येतील, तिथली पाहणी करतील. ज्ञानदान नीट चालले असेल तर प्रश्नच नाही . तसे नसेल तर शिक्षा च”. अशा प्रकारे त्या प्रेम आणि शक्तीने जनतेचे हित, प्रजेची सोय नेहमी बघायच्या.वास्तविक वाराणशी महेश्वर पासून वेगळा प्रांत होता तरीही तिकडील लोक सुद्धा अहिल्याबाईंकडे असा न्याय मागायला यायचे. नुसत्या धर्मशाळा उघडल्या तरी त्यात सोयी करत. तिथे पहारेकरी असे, आतमध्ये तुळस आणि शिवलिंग मंदिर तसेच पाण्याची सोय म्हणून विहीर आणि अन्नछत्र एव्हढी सोय त्या लोकांसाठी त्या करत असत. अशा कामांमुळे व निर्णयांमुळे त्या लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या होत्या.
- डॉ. नयना कासखेडीकर. पुणे
--------------------------------------