Tuesday, 29 October 2024

कर्तृत्वशालिनी - अहिल्याबाई होळकर - भाग २

  

कर्तृत्वशालिनी - अहिल्याबाई होळकर

भाग २


छत्रपती शिवरायांच्या नंतर जो हिंदवी स्वराज्याचा विस्तार झाला त्यात अनेक सरदार व अनेक घराणी यांचे महत्वाचे योगदान आहे.त्यापैकीच एक इंदूरचे होळकर घराणे. होळकर घराण्याचे मूळ पुरुष, ज्यांनी होळकरशाहीचा पाया रोवला ते मल्हारराव होळकर. यशस्वी बावन्न लढाया लढणारे मल्हारराव, मराठेशाहीचे आधारस्तंभच. मल्हाररावांच्या नंतर लोककल्याणकारी राज्य चालवले ते अहिल्याबाईनी .

     राज्य कारभार हातात येण्याआधी अहिल्याबाईंची मनोपृष्ठभूमी अनेक अनुभवातून तयार झाली होतीच. पती खंडेराव यांच्या (१७५४मध्ये )मृत्यूमुळे वैधव्याचं दु:ख पदरी आलं होतं. मात्र केवळ आणि केवळ सासरे मल्हारराव होळकर यांच्या दूरदृष्टीमुळे अहिल्येचे सती जाणे वाचले होते. दहा वर्षांनी १७६६मध्ये मल्हारराव यांचे निधन झाले. मल्हारराव यांच्या दोन्ही पत्नी बनाबाई आणि द्वारकाबाई सती गेल्या.  आपल्या डोक्यावरचे छत्र हारपले याची जाणीव अहिल्याबाईंना झाली. नाही म्हटले तरी सासरा - सुनेचे हे नाते, स्वामी आणि सेवकाशिवाय, गुरु शिष्याचे नाते पण होतेच.आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत, चर्चा होत असत. मल्हार राव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास होता. त्यांच्या मार्गदर्शना खाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या. अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हार राव स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. या दहा वर्षांच्या काळात अनेक घटना घडल्या, त्याच्या साक्षीदार अहिल्याबाई होत्या. आता राज्याचा वारस म्हणून अहिल्याबाई आणि खंडेराव यांचा एकुलता एक मुलगा मालेराव याच्या हाती येणे साहजिक होते.

खंडेराव होळकर 
मल्हारराव गेल्यानंतर, मालेराव यांस लिहीलेल्या पत्रात अहिल्यादेवी त्यांना धीर देतात, कसं वागायला हवं ते सांगतात. त्या म्हणतात, “आता शोक करत बसायची वेळ नाही. आपलं प्रथम कर्तव्य सरदारकी आहे. ती कशी चालली पाहिजे याचा विचार केला पाहिजे. दौलत चालली पाहिजे. हे समजून घेऊन यात आता विचारपूर्वक लक्ष घालावे. तुमच्या तीर्थस्वरूप वडिलांनी ज्याप्रमाणे कामाचा पाया घालून लौकिक निर्माण केला त्या प्रमाणे तुम्हीही कार्य करा. वडिलांची किर्ति लक्षात घ्या . त्याही पेक्षा तुम्ही अधिक लौकिक संपादन करा”.

    जरी मालेराव याच्या हाती कारभार आला होता तरी अहिल्याबाईंचे जातीने लक्ष होते. अननुभवी तरुण मालेराव कारभार कसा चालविल याची आई म्हणून त्यांना काळजी होतीच. दुर्दैवाने वर्षभरातच मालेराव चे निधन झाले. मालेराव च्या दोन्ही पत्नी सती गेल्या. या सर्व घटनेनंतर एक आई म्हणून अहिल्याबाई यांची काय अवस्था झाली असेल याची आपल्याला कल्पना येते. अं:तकरण हेलावून गेलेल्या अहिल्याबाईना राज्य कारभारा पुढे फार शोक करत बसणे परवडणार नव्हते. होळकर राज्याचे तीन वारस गेले. आता इंदोरला होळकर वाड्यात राहणे त्यांच्या उद्विग्न मनाला नकोसे वाटू लागले. अहिल्याबाईनी महेश्वर राहण्यासाठी निवडले. मल्हारराव होळकरांनी मोगलांकडून जिंकून महेश्वर ताब्यात घेतले होते आणि महेश्वर वसविले होते. आता पुढे काय? राज्य चालवायचे कोणी? कसे? या जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर अहिल्यादेवीच देणार होत्या.  

मालेराव होळकर 
मालेराव च्या मृत्यूनंतर अहिल्याबाई महेश्वरला येऊन राहिल्या. नर्मदा घाट, किल्ल्यातून च होणारे नर्मदेचे  दर्शन व दिसणारे विहंगम दृश्य, भोवतालची मंदिरे आणि सात्विक व मंगल वातावरणामुळे दु:खी अहिल्याबाईना इथे जरा शांत वाटत होते. असे होते तरी बाहेर राज्यकारभाराबाबत काय काय शिजतय, काय होऊ शकते याची कल्पना त्यांना आली होती. म्हणून त्या सावध सुद्धा होत्या. एका पाठोपाठ होळकर  घराण्यात तिघांचे निधन झाल्याने, होळकर घराणे पारंपरिक राजकीय दृष्ट्या निर्वंश झाले होते. एक तर अधिकृतरित्या आता होळकर राज्याला वारस असा कोणीच नाही, एकटी बाई माणूस काय करेल ? असा समज नेहमी स्त्रियांच्या बाबतीत असतो तो होताच. तशी वेळ आली तेंव्हा अहिल्याबाईंनी ठणकाऊन सांगितले की, “होळकर घराण्याच्या  कैलासवासी सुभेदारांच्या वारसातल्या एकाची मी पत्नी तर, दुसर्‍याची माता आहे. त्यामुळे दत्तक वारस जरी निवडायचा झाला तरी तो अधिकार माझाच आहे”. याला दुजोरा, थोरले माधवराव पेशवे यांनी दिला होता. त्यांनी सांगितले की, “खंडेराव यांच्या विधवा पत्नीला कारभार पाहण्याचा अधिकार आहे”.झाले.

आणि अधिकृतपणे अहिल्याबाई होळकर आता महेश्वरहून राज्यकारभार पाहू लागल्या.

तत्पूर्वी त्यांनी प्रतिज्ञा केली की, “माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरा पुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदर्‍या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडावयाच्या आहेत”. 

 

लेखन- डॉ. नयना कासखेडीकर, पुणे

संपर्क- ०७७६७०८१०५७      

-----------------------------------------------

No comments:

Post a Comment