कर्तृत्वशलिनी अहिल्यादेवी
भाग-४ - रूढी, परंपरा आणि अहिल्याबाई
(जन्म-३१ मे १७२५-चौंडी,अहमदनगर, मृत्यू- १३ ऑगस्ट १७९५,इंदोर.)
अष्ट वर्षात भवेत कन्या .... या सूत्रा प्रमाणे अठराव्या शतकात मुलीचा आठव्या वर्षीच विवाह केला जाई. तसेच वयाच्या कुठल्याही वर्षी वैधव्य आले तरी ती पत्नी/मुलगी, नवर्याबरोबर सती जाई. अगदी ८,९ वर्षांच्या कोवळ्या बालिका पण केवळ प्रथा म्हणून सती जात. अशी अनेक बंधने स्त्रियांना त्या काळी पाळावी लागत होती. वास्तविक स्त्रियांना जी जाचक असत. अन्यायकारक असत आणि या बंधनाचे मूळ धर्माशी जोडले जाई. याचा काही लोक गैरफायदा सुद्धा घेत. ही सर्व बंधने स्त्रिया मुकाट्याने सहन करत, पाळत असत. याच वातावरणात अहिल्येचे आयुष्य गेले. परंपरेप्रमाणे तिचा विवाह लहान वयातच झाला. पण तिच्या तजेल बुद्धीने कळत्या वयापासूनच निरीक्षण, अनुभव यातून, बुद्धीच्या कसोटीवर प्रत्येक अशा परंपरा आणि रूढी या गोष्टींचा विचार केला. वृत्तीने धार्मिक असूनही या विरोधात विचार करतात म्हणून लोकांना आश्चर्य वाटे.
सासरे
सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुळेच अहिल्यादेवीचे अस्तित्व उरले होते ते, केवळ
तिला खंडेरावाबरोबर त्यांनी सती जाऊ दिले नाही म्हणून. प्रथेप्रमाणे अहिल्या सती
गेली असती तर? एव्हढे मोठे कार्य उभेच राहले नसते. पण सती जाण्याचा
प्रसंग अहिल्येवर २९ व्या वर्षी ओढवलाच होता. सासर्यांच्या रूपात एक पुरुषच या
प्रथेविरुद्ध अहिल्येच्या मदतीला धाऊन आला होता. पण अहिल्येशिवाय घरात ज्या
स्त्रिया होत्या त्या सर्वच सती गेल्या. मल्हाररावांच्या दोन पत्नी,
खंडेरावच्या इतर बायका (सवती), मुलगा मालेरावाच्या
दोन्ही बायका(वय वर्ष ८च्या ), मुलगी मुक्ता, दोन
नातसुना, अशा स्वत:च्या घरातच १८ बायका सती गेल्या . याचे शल्य
अहिल्यादेविना सतत बोचत राहिले. कारण त्यांनी कडाडून विरोध केला तरी काही झाले
नाही. उलट सुना आणि नात सुना सती जात होत्या तेंव्हा अहिल्यादेविंना भूल देऊन
झोपवले जात होते. त्यांना हा त्रास सहन होत नव्हता. घरातच भोगलेल्या या दु:खामुळे
समाजासाठी सती विरोधात लोकांची मते सुधारण्यासाठी त्या सतत काम करत राहिल्या. ज्या
रूढी परंपरा पटत नाहीत त्याच्या विरोधात जाऊन निर्णय पण घेतले. कृती केली.
दोन्ही सुना
(मालेराव च्या बायका) सती जायला निघाल्या,तेंव्हा
इवल्याशा पोरींना सतीची वस्त्रे नेसवली तेंव्हा त्या व्याह्यांना विरोध करत म्हणाल्या
का जायचं एव्हढ्याशा पोरींनी सती? पण रूढी होत्या. व्याही
म्हणाले, “आमचे घराणे सतीचे आहे, आमच्या
घरात एकही विधवा नाही, आमच्याकडची कन्या पण ‘सतीचं
वाण’ घेऊनच जन्माला येते”. अहिल्यादेवी कळवळल्या. कुटुंबातील
लोकांना पण वाटत होते की एव्हढी स्त्री पण धर्म विरोधी कृत्याला परवानगी देते. उलट
अहिल्या सती न गेल्याने तीनेच धर्म विरोधी कृत्य केले आहे असे त्यांचे म्हणणे
होते.
अहिल्यादेवींचे
जसे हे सती विरोधी विचार होते तसे लग्न लावण्याच्या बाबतीत पण स्वत:च्याच घरात
त्यांनी धारिष्ट्य दाखवून प्रयोग केला. तो म्हणजे, मुलगी
मुक्ताचे लग्न ठरवताना,स्वयंवर सारखा ‘पण’ ठेवला.
या भागात प्रजेची सुरक्षितता, प्रवाशांची आणि रस्त्याने
जाणार्या यात्रेकरूंची लूट करणार्या , भिल्ल लोकांचा जो बंदोबस्त
करील त्याच मुलाशी माझ्या मुक्ताचे लग्न लावून देईन असा तो पण होता. यालासुद्धा लोकांनी
नावे ठेवली. दूषण दिले. मुक्ता अठरा वर्षाची झाली आणि हा ‘पण’ पूर्ण
करणारा शूर युवक यशवंत फणसे याच्याशी मुक्ताचे लग्न लावून दिले. इथे लग्नाचे वय आणि
स्वता विधवा असून मुक्ताच्या कन्यादानाचे कर्तव्य पार पाडत ही परंपरा अहिल्याबाईनी
मोडीत काढली होती. लोकांना म्हणूनच हा धक्का होता.
अहिल्याबाईंच्या
मते ज्या रूढी अंधारकडून उजेडकडे नेतात त्याच मानाव्यात. उजेडाकडून अंधाराकडे
नेणार्या रूढी त्यांना मान्य नव्हत्या. लग्न वयाप्रमाणेच हुंडा पद्धत पण त्यांना
अजिबात मान्य नव्हती. स्त्रियांना आदिशक्ती, देवी, देवतासम
मानणे म्हणजे स्त्रियांच्या कौतुकाची नुसती ढोंगबाजी वाटायची त्यांना. तिला लग्न
करून घरी आणताना मात्र हुंडा घेणे, मानपान करून घेणे, सोनेनाणे घेणे, पैसे घेणे हा सारा स्वार्थी खेळ ? मग काय
त्यांनी राज्यात हुंडा बंदी केली. राज्यात कुठल्याही जाती जमातीत विवाह समयी
कन्येच्या पालनकर्त्याकडून पैसे घेतल्यास तो गुन्हा समजण्यात येईल. असा आदेश
त्यांनी काढला . हुंडा घेणारा, हुंडा
देणारा आणि मध्यस्थ या सगळ्यांना दंड ठोठावला जाण्याची कायद्यात तरतूद केली. त्या
काळात हा निर्णय घेणे म्हणजे धैर्याचीच गोष्ट होती. वास्तविक त्यांना स्वताला याचा
काय उपयोग ? पण सामाजिक चालीरीतिंचा स्त्रियांना त्रास होऊ नये हे
प्रजेचे हित त्यांनी लक्षात घेतले होते.
पितृपंधरवडयात
त्यांच्या कडे श्राद्धे घातली जात. आजही स्त्रिया पाणी देत नाहीत. अंत्यविधी करत
नाहीत. स्वता अहिल्यादेवी ही श्राद्धे करत. त्या म्हणत मला स्त्री त्या देवानेच
केले आणि विधवा पण त्यानेच केले मग मी जशी आहे तशानेच कार्य करत्ये.
त्यांना वाटे ‘स्त्रियांचा
सन्मान’ म्हणजे माळवा प्रांतातला ‘लौकिक’ असला पाहिजे. विधवेकडून नजराणा घेणे ही राजयकारभाराची प्रथा म्हणजे शुद्ध
दरोडाच आहे असे म्हणून त्यांनी विधवा महिलांना मूल दत्तक घेण्याची परवानगी दिली
होती. म्हणजे वारस असतांना कुणी त्या विधवेला पैसे मागणार नाहीत.
स्त्री
असल्याने स्वता रूढी परंपरा व त्याची दु:खे भोगल्यामुळे ,स्त्रीत्वाची
बंधने सांभाळून .संघर्ष करत करतच आपले जीवन कर्तव्यपूर्तीने सफल केले.
-
लेखिका. डॉ. नयना कासखेडीकर, पुणे .
--------------------------------
No comments:
Post a Comment