Tuesday, 26 August 2025

राज्यकर्ती अहिल्याबाई

 

राज्यकर्ती अहिल्याबाई

राजकारणात  फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे. महिलांना त्यातले काय कळते? असा दृष्टिकोन नेहमी दिसतो. एकोणिसाव्या शतकाच्या सामाजिक सुधारणेच्या काळापर्यंत स्त्रीचे विश्व म्हणजे चूल आणि मूल एव्हढेच मर्यादित होते. एव्हढेच नव्हे तर तिने त्या पलीकडे जाऊच नये. शिकू नये नाहीतर ती बिघडेल अशी भीती काही जणांना होती.पण इतिहासात डोकावले तर अशी अनेक उदाहरणे दिसतात कि स्त्रिया राजकारभारात प्रत्यक्ष कामात नसल्या तरी अप्रत्यक्षपणे सल्ला देण्याचे काम उत्तम करत होत्या. प्रत्यक्ष कामात त्यांना संधी नसेच. पण संधी मिळाली तर त्या उत्तम राज्य कारभार चालवू शकतात. चांगले कौशल्य साधू शकतात. शिक्षण मिळाले तर चांगले संधीचे सोने करू शकतात. हे अनुभवाने सिद्ध होत गेले आहे. या स्त्रिया प्रजेचे हित लक्षात घेतात. राज्याचे चांगले रक्षण करतात.

अहिल्याबाई होळकर या त्यातल्याच एक राज्यकारभार चालवणाऱ्या उत्तम राजकारणी होत्या. वेगवेगळ्या कालखंडात स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला तर ,अनेक धुरंधर स्त्रिया दिसतात. हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छाअसे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या मातोश्री जिजाबाई होत. हे हि ईच्छा शिवाजींच्या मनात बीजरूपाने रोवणाऱ्या मातोश्रीच  होत्या. असे संस्कार बालपणापासूनच शिवाजी महाराजांवर आई जिजाबाई यांनी केले होते. राज्य कारभारातील अनेक कौशल्ये त्यांनी बाल शिवाजींना शिकवली होती.

पेशवाईच्या कालखंडात पण कर्तृत्ववान स्त्रिया होत्या. अहिल्या बाई होळकर त्या पैकीच एक . रणांगणावर सुद्धा जीवाची बाजी लावणाऱ्या स्त्रिया भारतातीलच. राणी लक्ष्मीबाई यांचेही कर्तृत्व आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा सहभाग होता. त्या नंतरच्या काळात सुद्धा अनेकींनी राजकारणात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

कुटुंबात स्त्री हि मुख्य घटक असते.लोकशाहीमध्ये तिचा वाटा निम्मा आहेच. तशी ती समाजात, चळवळीत,सार्वजनिक जीवनात, हातात तर राजकीय जीवनात सुद्धा ती महत्वाची भूमिका बजावत आहे. स्त्री जात्याच संवेदनशील असल्याने कुटुंब सांभाळतांना ती चोख जबाबदारी बजावते त्या प्रमाणेच इतर क्षेत्रात सुद्धा तशीच कर्तव्य बजावत असते.

फक्त तिला जाणणारा. तिची हुशारी, कौशल्य याची पारख करणारा समाज अथवा कुटुंब  हवे. ज्याला ते कळेल तोच स्त्रियांना संधी देईल. कारण अजूनही बऱ्याच अंशी पुरुषी वर्चस्व असलेल्या समाजात स्त्रियांना महत्वाची संधी मिळेलच असे नाही.अगदी हेच अहिल्याबाई यांच्या बाबत घडले असे म्हणता येईल.

  पूर्वी लहान वयात लग्न  होत असत. त्यामुळे सासरी घरात सून म्हणून जरी प्रवेश झाला असला तरी लहान वयातल्या या सुनेवर घरातले वडीलधारे संस्कार करत असत. अहिल्येचे खंडेरावांशी लग्न वयाच्या आठव्या वर्षीच झाले. होळकरांचे तर सुभेदार घराणे होते.त्यामुळे घरातले वातावरण, कामाचा प्रकार, हे सगळंच अहिल्याबाईंना लहानपणापासून परिचयाचे झाले होते. लहान अहिल्येची चुणूक बघून मल्हारराव तिलाच महत्वाची कामे सांगत असत.याच वातावरणात तीची जडणघडण होत होती. तिची बुद्धीमत्ता ,अंगभूत कौशल्ये, हजरजबाबीपणा, निर्णय क्षमता हे सासरे मल्हाररावांनी ओळखले होते. तिला लहान वयातच सांगितलेली कामे ती चोखपणे करत असे. हे ओळखूनच  मल्हररावांनी मुलगा खंडेराव याच्या निधनांनंतर अहिल्येला सती जाऊ न देता तिच्यावर विश्वास दाखवला होता. खंडेराव च्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी काहीही सल्ला मसलत किंवा हितगुज करायचे असल्यास अहिल्या बाईंनाच ते विषय सांगत असत. इतकी अहिल्याबाई बद्दल मल्हार रावांना खात्री वाटत असे.

मल्हारराव मग खंडेराव आणि पुढे मुलगा मालेराव हेच वारस म्हणून सत्तेत होते.परंतु मुलगा खन्डेराव च्या मृत्युनंन्तर मल्हारराव अहिल्येकडेच खरा वारस म्हणून बघत होते. ते अहिल्येमध्येच खंडेराव बघत होते. मुलाचे दुःख तर मल्हाररावांना होतेच तेंव्हापासून ते अहिल्येची सतत मदत घेऊ लागले, त्यामुळे अहिल्येचा राज्यकारभारातील कामाचा आलेख दिवसेंदिवस चढताच राहिला. सुभेदारांच्या सर्व सूचना व त्यांनी दिलेली उद्दिष्ट्ये व्यवस्थितपणे पूर्ण करणे /सर्व परगण्यातील व्यवहार त्या चोख बघत असल्याने आता माळवा / इंदूर प्रांतांची मल्हाररावांना काळजी नव्हती राहिली. राजकीय परिस्थितीवर सुद्धा अहिल्येचे बारकाईने लक्ष होते हेही त्यांना दिसले.

 मल्हारराव मोहिमेवर गेले की सर्व कारभार अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानवर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता चिरेबंद आश्रयस्थाने हवीत . त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधून घेतल्या.   

          राजकारण करता करता एकाच वेळी ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्‍या लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्‍या बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

 पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती, रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती,आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा, शेतीसाठी सिंचना सोयी, जमीनिसाठी ९\ ११चा  कायदा ,माळरानावर वृक्षलागवड  आरक्षित गायरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय अशा अनेक गोष्टी केल्या .

    मालेरावच्या निधनापर्यंत हातात सत्ता नसताना अहिल्याबाई राज्यकारभारात लक्ष देत होत्याच पण खऱ्या अर्थाने त्या मालेरावच्या मृत्यूनंतरच राज्यकर्त्या झाल्या. म्हणूनच हातात राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे नसतांना सुद्धा अनेक विषय हाताळण्याचा अनुभव अहिल्या बाईंना आतपर्यंत काम केल्यामुळे होता. तसंच स्वतंत्रपणे राज्यकारभार हातात येईपर्यंतच्या काळात अहिल्या बाई अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोऱ्या गेल्या होत्या. एक स्त्री म्हणून सामाजिक, कौटुंबिक स्तरावर अनेक रूढी परंपरांचे मणामणांचे ओझे त्यांनी सांभाळले होते. सती सारख्या प्रथांना बळी पडलेल्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबातच त्यांनी पाहिल्या होत्या. सती जाणं, वारसा हक्क, हुंडा पद्धती, विधवांचे अधिकार,अशा अनेक प्रथांचा स्त्रियांना काय त्रास भोगाव लागतो ते अहिल्याबाईंनी स्वतःअनुभवले होते. एक स्त्री म्हणून सर्व जाणीव आणि संवेदनशीलता त्यांच्यात होती. म्हणून त्यांच्या राज्यात समाजातील स्त्रियांना अहिल्याबाई एक हक्काचा आधार वाटत होत्या. अहिल्याबाईंनी अनेक स्त्रियांना परंपरेच्या काही जोखडातून मुक्त करून तिच्या व्यक्तिमत्व विकासाला वाट दिल्याचे दिसते. स्वातंत्र्य दिल्याचे दिसते. त्यांचे सुधारणावादी विचार यातून लक्षात येतात.         

     राज्य कारभारातले सर्व समस्या विषय अहिल्या बाई सहज पणे सोडवत असत. मग आर्थिक व्यवस्था, सामाजिक प्रश्न, लोकांचे हिताचे निर्णय, न्याय व्यवस्था, अगदी रणांगण अथवा युद्ध विषय, त्या संबधीचे निर्णय घेणं, हिशोब हे सर्व अहिल्याबाई कौशल्याने हाताळत असत. कुटुंबातील अनुभव प्रत्यक्ष घेतले होतेच पण आपल्या राज्यावर झालेले आक्रमण हेही त्यांनी पाहिले. पानिपत च्या युद्धात पराभव झालेला व त्याचे दुःख आणि परिणाम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. यावेळी अहिल्येची सासरेबुवांना खूप मदत झाली. सुभेदाराची कर्तव्ये  ही   आपलीही  जबाबदारी समजून सून अहिल्या पुढे सरसावली.पानिपतानंतर सासूबाई गौतमा बाई यांचे निधन झाले त्यामुळे संसारात तत्वज्ञान सांगणाऱ्या, मैत्रीपूर्ण वागणाऱ्या, धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई पण गेल्या. जाताना अहिल्येला सांगून गेल्या कि तुला इथून पुढे कुटुंबाबरोबर राज्य कारभार आणि म्हातारे होत आलेले सुभेदार सासरे, मल्हारराव याना तुलाच सांभाळावे लागणार आहे. असा सगळ्यांचाच आधारवड म्हणजे अहिल्याबाई होत्या. प्रजेच्या कल्याणाबरोबरच त्या इतरांचीही काळजी घेत असत.  

     प्रजेबरोबरच प्राणी, पक्षी यांच्या आयुष्याचा विचार सुद्धा राज्यकर्ती  म्हणून अहिल्याबाई करत असत. त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यन्त्च मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी, ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच. माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, एव्हढेच काय मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे  अन्नदान करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.

त्यांच्याकडे दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथसंग्रह होता. विद्वान आणि कलावंत यांची त्या कदर करीत, योग्य तो मानसन्मान देत. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी इतर प्रांतातील शास्त्री, पंडित, वैद्य व वैदिक यांना आणून,राहण्याची सोय करून त्यांनी एक प्रकारे ज्ञान संवर्धन व संरक्षण केले. उदा. काशी येथील ब्रह्मपुरी,

 कायदा आणि न्यायदानात सुद्धा योग्य दिशेने काम करत असत. त्या इतक्या चाणाक्ष होत्या कि त्या काळात कायद्यात आवश्यक ते बदल  (सुधारणा) त्यांनी करवून घेतले होते. जे समाजाच्या हिताचेच होते.राज्याचे आर्थिक धोरण सुद्धा त्या कौशल्याने हाताळत असत. जगाच्या इतिहासात उत्कृष्ट प्रशासिका म्हणून अहिल्याबाई होळकर यांची नोंद आहे  .

अठराव्या शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी . अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान.  

  लोकांसाठी रोजगार निर्माण व्हावेत म्हणून योग्य ते धोरण त्यांनी आखले होते. राज्यकारभार चालवताना त्यांनी जनतेच्या अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टीबरोबरच, समता शांतता, बंधुता, न्याय, विचार स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान या मुल्यांची जपणूक त्यांच्या काळात झालेली दिसते.

    अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा ,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्‍यांचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले.

     अठराव्या शतकातील, 28 वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्‍या मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्तीची ओळख तुम्हा आम्हाला झाली ती गुणांची जाण असणाऱ्या केवळ आणि केवळ मल्हारराव होळकर यांच्यामुळेच .नाहीतर सर्व सामान्य अहिल्या खंडेरावांच्या मृत्यनंतर सती गेली असती तर एक कर्तृत्ववान राज्यकर्ती महिला म्हणून अहिल्या बाई कुणालाच समजल्या नसत्या. त्यांच्या राज्यकारभाराने अनेक मापदंड आजच्या राज्यकर्त्यांना घालून दिले आहेत, अनेक आदर्श उदाहरणे समोर ठेवली आहेत.राज्य कर्त्यांची कर्तव्ये काय असली पाहिजेत हे दाखवून दिले आहे. एक सामान्य स्त्री      बुद्धीचातुर्य, मुत्सदीपणा, प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म आणि संस्कृती टिकून ठेऊ शकते याचे पुढच्या पिढीला धडे देऊन गेली आहे. या राज्यकर्तीला शतशः प्रणाम !  (हा लेख 'राजकारणातील महिलांचा सहभाग' या विशेषांकात प्रसिद्ध झाला.)

ले. डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे 

—------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment