Tuesday, 26 August 2025

आमचे पारंपरिक खेळ

                                     आमचे पारंपरिक खेळ

        आपल्याला अभिजात कला आणि विद्या यांच्याप्रमाणे खेळांचासुद्धा एक प्राचीन वारसा लाभला आहे. शारीरिक सुदृढतेसाठी व्यायाम ही आपल्या समाधानी जीवनासाठीची एक नितांत आवश्यकता फार पूर्वीपासूनच समजली गेली आहे. आपले पारंपरिक स्वरूपाचे खेळ, हे आपला देश, आपली संस्कृती आणि लोकजीवन यांचा अविभाज्य भाग आहेत. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे समाजव्यवस्थाच आमुलाग्र बदलत चालली आहे. पूर्वीच्या सामाजिक रचनेत पुस्तक वाचन आणि विविध प्रकारचे मैदानी खेळ याला महत्वाचे स्थान होते. आताची जीवनशैली अधिक सोयीस्कर, जलद, सुखावह झालेली आहे. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल हे साधन आल्याने पालक आणि मुले एका वेगळ्याच जगात वावरत आहेत. आधीच्या पिढीत वेगळे वातावरण होते. एकत्र कुटुंब व्यवस्था होती, साहजिकच घरात संस्कार करणारे आजी-आजोबा, एकमेकात सुसंवाद असणारे पालक आई-वडील, गावात-शहरात खेळायला असलेली मोकळी मैदाने, घरासमोरील अंगण, फिरायला व सायकलिंगला मोकळे रस्ते, सकाळ संध्याकाळचा निवांत वेळ, या सगळ्या गोष्टी मुलांच्या जडणघडणीत महत्वाच्या असत. पारंपरिक खेळ या जडणघडणीचा भाग होता. आता या पारंपरिक खेळांची जागा मोबाईल गेम्सने घेतली आहे आणि भयावह दुष्परिणाम सतत दिसत आहेत, सिद्ध होत आहेत.


                                      

वैदिक काळामध्ये स्वसंरक्षण व आत्मबल वाढवण्यासाठी शारीरिक शिक्षण दिले जायचे. ते युद्धोपयोगी असे. त्यात धनुर्विद्या, घोडदौड, रथ चालविणे याबरोबरच योग विद्या, सूर्य नमस्कार, प्राणायाम हेही शिकविले जात असे. नंतरच्या मध्ययुगीन काळामध्ये लढाऊ वृत्ती वाढीस लागण्यासाठी व टिकण्यासाठी इतर शारीरिक शिक्षणाचा समावेश करण्यात आला. त्यात अश्वारोहण, मुष्टी युद्ध, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती यांचा समावेश होता. यामुळे शरीर स्वास्थ्य ही टिकून राहत असे. छत्रपती शिवरायांच्या काळात युवकांना बलसंवर्धन व युद्धाचे शिक्षण मिळू लागले. समर्थ रामदास स्वामींनी तर राष्ट्रभक्ती बरोबरच बलोपासना करण्याचे तंत्र शिकवून आपला शिष्यवर्ग निर्माण केला होता. त्यांनी हनुमान मंदिरे स्थापन करून भक्ती बरोबर शक्ती संवर्धनासाठी दंड, बैठका, सूर्यनमस्कार, कुस्ती, वजन उचलणे, लाठी काठी, दांडपट्टा, ढाल तलवार, जंबिया व भाल्याने युद्ध खेळणे असे प्रशिक्षण सुरू केले. त्याचेच पुढे आखाडे झाले. देवाचे चिंतन करण्यापूर्वी वैयक्तिक विकासावर ( म्हणजे उच्च आत्मबल आणि सुदृढ शरीर ) चिंतन करण्याचा त्यांनी उपदेश केला. धर्मप्रचारक बलवान असला पाहिजे असे त्यांना वाटत असे. त्यातूनच शरीर कसदार व बलवान, घाटदार बनविण्याचे व्यायाम प्रकार म्हणजे मल्लखांब, मल्लविद्या इ. वर भर देण्यात आला. कालांतराने यातील काही प्रकार खेळ म्हणून मान्यता पावून त्याच्या स्पर्धा होऊ लागल्या, विजेतेपद मिळवण्याची चुरस वाढली, विजयी संघांना पारितोषिके देण्यात येऊ लागली.


                                  

खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाचे असतात तसेच ते मनोरंजनसाठी सुद्धा महत्वाचे ठरतात. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच खेळांमुळे आत्मविश्वास वाढतो, अंगी लवचिकता येते, चापल्य येते, स्नायू बळकट होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते, व्यक्तीची निर्णय क्षमता विकसित होते, नेतृत्व गुणांचा विकास होतो, संयम शिकायला मिळतो, संघभावनेने वागण्याचे धडे मिळतात.


                                   

खेळांचे अनेक प्रकार आहेत, परंतु मुख्य दोन प्रकार. एक म्हणजे बैठे खेळ आणि दुसरे मैदानी खेळ. बुद्धिबळ, कॅरम, पत्ते, सागरगोटे, सोंगट्या, काचकवड्या, भातुकली हे खेळ बसून खेळले जातात, म्हणून ते बैठे खेळ. यात बुद्धीचा वापर केला जातो. अशा खेळात तर्कशक्ती वाढते. तर खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आदि खेळ मैदानात खेळले जातात. यात भरपूर शारीरिक हालचाली असतात, कौशल्याची कसोटी लागते. आपले पारंपरिक खेळ म्हणजे कबड्डी, खो-खो, गोट्या, विटीदांडू, लंगडी, आट्यापाट्या, लगोरी, फुगडी, ठिक्कर ,झिम्मा, भिंगऱ्या, भोवरा इत्यादि.


                                      

याशिवाय आणखी खेळ आहेत. लपंडाव, शिवाजी म्हणतात, तळ्यात-मळ्यात, पकडा-पकडी, विषामृत, डोंगराला आग लागली, डब्बा ऐस पैस, मामाचं पत्रं हरवलं, आबा धोबी,पोत्यात पाय घालून पळणे, नाव-गांव-फळ-फूल, आंधळी कोशिंबीर, दोरीवरच्या उड्या, लुटुपुटूची लढाई या सगळ्या खेळात पूर्वी लहान मुले मनसोक्त रमायची, खेळायची. यातून मुलांच्या शरीर व मनावर चांगले व योग्य संस्कार होत असत. इतिहासात डोकावल्यावर आपल्या संस्कृतीतले लोकजीवन कसे होते हे कळतेच, पण खेळ व व्यायाम यासाठी त्या काळात काय साधने वापरत याचाही अंदाज येतो.


                                      

क्षत्रिय लोकांच्या शारीरिक विकासासाठी धनुर्विद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी, मल्ल युद्ध, कुस्ती, भालाफेक याचे प्रशिक्षण दिले जात असे. त्या शिवाय बैलगाडी स्पर्धा व नौका नयन स्पर्धापण होत असत. हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या उत्खनन अवशेषात सिंधु संस्कृतीत कित्येक प्रकारचे अस्त्र, शस्त्र ,खेळणी आणि खेळ उपकरणे सापडली आहेत. पौराणिक कथांमधील बलराम, भीम, हनुमान, जांबूवंत, जरासंध यांची मल्लयुद्ध प्रसिद्ध आहेत. वैदिक काळात शिकार करणे, हत्तींना वश करणे, रथांची शर्यत, असे अनेक खेळ होते. पूर्वी तर द्यूत खेळणे व रथ शर्यत हा राज्याभिषेकाच्या विधीचाच एक भाग होता. पुरुष आणि स्त्रियामध्ये चेंडू खेळण्याची प्रथा होती. पकडा पकडी, लपाछपी हे खेळ मुलींमध्ये खेळले जात. पौराणिक काळातील इतिहासावरून स्वयंवरासाठी झालेल्या स्पर्धेमध्ये शारीरिक क्षमताच तपासल्या जायच्या. याचे उदाहरण म्हणजे सीतास्वयंवर हे आपल्याला माहिती आहे. तर अर्जुनाचे नेमबाजीचे कौशल्य आपण वाचले आहे. गुरु द्रोणाचार्यांनी घेतलेल्या परीक्षेत अर्जुनाने आपल्याला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो आहे हेच सांगितले आणि यावरून एकाग्रता किती महत्वाची असते ते सिद्ध होते. खेळांमध्ये एकाग्रता महत्वाची असते.

युद्धकला भारतात सर्वप्रथम सुरू झाल्या. योग कलासुद्धा भारतातच सुरू झाल्या. याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इतके ते प्राचीन आहे.

बुद्धिबळ खेळ हा आता जगप्रसिद्ध खेळ झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या स्पर्धा भरवल्या जातात. पण रावणाच्या पत्नीने मंदोदरीने सर्वात प्रथम हा खेळ रावण बरोबर खेळल्याचे इतिहास सांगतो. सहाव्या शतकात या खेळाला शतरंज म्हटले जाऊ लागले. तर, हा खेळ युरोप मध्ये गेल्यावर त्याला chess नाव पडले.


                                   

सापशिडी हा खेळसुद्धा भारतीय खेळ आहे. याला मोक्षपटसुद्धा म्हणतात. हा खेळ जगभरात खेळला जातो. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी तयार केला होता. नैतिकतेचे धडे शिकविणारा हा खेळ सतराव्या शतकात तंजावर मध्ये प्रसिद्ध झाला. नैतिकतेवर आधारित हा खेळ इंग्रजांना पण भावला आणि तो त्यांनी १८९२ मध्ये इंग्लंड ला नेला. तिथून तो युरोपीय देशात गेला आणि ल्युडो किंवा स्नेक्स अँड लॅडर्स नावाने ओळखला जाऊ लागला.


                                     

कबड्डी - हा भारतीय सामूहिक खेळ आहे. याला हुतुतूपण म्हटले जाते. यात स्वसंरक्षण शिकवले जाते. महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे. खो खो खेळसुद्धा प्राचीन भारतीय खेळ आहे. यात स्वसंरक्षण आणि आक्रमण व प्रती आक्रमण ही कौशल्ये शिकवली जातात.


                               

द्युत क्रीडा – महाभारतातील कौरव पांडवांचे युद्ध या द्यूतक्रिडेमुळेच झाले होते. इतिहासातील वर्णनावरून वेगवेगळ्या प्रसंगावरून द्यूत हा खेळ म्हणजे दुर्व्यसन मानले गेले होते. जिंकले तर वर्ष मंगलमय होते आणि द्यूतात हारले तर वर्षभर धनाची हानी होत राहते. द्यूतक्रीडा हे एक मनोरंजनाबरोबरच धनसंपत्ति जमविण्याचे त्या काळातले साधन होते. भारतीय संस्कृति व कलांमध्ये एक प्रमुख भाग म्हणून द्यूतक्रीडा समजली जायची.


                                                  

सागोल कांगजेई (पोलो)- आताच्या पोलो खेळाचे हे भारतीय प्राचीन रूप आहे. सागोल म्हणजे घोडा आणि कांगजेई म्हणजे घोड्यावर बसून चेंडू खेळण्यासाठी एका टोकाला त्रिकोणी लाकडी टोक असलेला वेताची लांब काठी. भारतातील मणिपुरचा हा प्राचीन खेळ समजला जातो. इसवी सन पूर्व ३१०० वर्षांपूर्वी या खेळाची सुरुवात मणिपुरमध्ये झाल्याचे इतिहास सांगतो. राजा खंगेम्बाच्या कारकिर्दीत हा खेळ खूप लोकप्रिय झाला होता. हा खेळ म्हणजे एक लढाऊ प्रशिक्षण असायचे. यातील खेळाचे खरे योद्धे लहान पण वेगवान, चपळ व शक्तिशाली असे मणिपुरी घोडे असतात. हा खेळ जगभरातल्या पोलो खेळाचे मूल स्वरूप मानले जाते. हा नुसता खेळ नाही तर मणीपुरचा इतिहास व संस्कृतीपण आहे. मणिपुर येथील मैतेई योद्ध्यांचा वारसा आहे. दरवर्षी नोहेमबर मध्ये सांगाई महोत्सवात संगोल कांगजेई स्पर्धा होतात. इंफाळमध्ये जगातले सर्वात जुने पोलो ग्राउंड आहे. ब्रिटीशांना हा खेळ खूप आवडला तो त्यांनी त्यांच्या देशात नेला, त्याचे नियम निश्चित केले. मोठे घोडे, मोठे मैदान असे बदल करून स्वत:चे नाव देऊन नवा खेळ पोलो म्हणून प्रसिद्ध केला. नंतर तो जगभर पसरला, आता जागतिक स्तरावर याच्या प्रतिष्ठित स्पर्धा भरतात. म्हणजे पोलो हा खेळ भारताने जगाला दिलेला खेळ म्हणजे एक देणगीच आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची अशीच गोष्ट आहे.


                                          

मार्शल आर्ट -मणीपुरी युद्धकला ‘थांग-ता’. वसाहतवादी राजवटीने या कलेवर बंदी घातली होती. पण योद्ध्यांनी ही कला कौटुंबिक परंपरा म्हणून नंतर जपली व वाढवली आणि आजतागायत जिवंत ठेवली आहे. यात तलवार आणि भाला या शस्त्रावर प्रभुत्व मिळवून लढण्याच्या आणि स्व-संरक्षणाच्या युक्त्या शिकविल्या जातात. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी विकसित केलेले हे कौशल्य म्हणजे त्यांची जिवनशैलीच आहे.

तिरंदाजी- bow and arrow – धनुष्याच्या सहाय्याने आपल्या लक्षाच्या दिशेने बाण सोडणे व त्याचा वेध घेणे म्हणजे तिरंदाजी. हजारो वर्षापासून प्रचलित असलेली ही धनुर्विद्या आहे. सुरुवातीला युद्धाचे आणि शिकारीचे साधन म्हणून याचा वापर होत होता. याची मुळे पाषाण युगापासून दिसतात. ग्रीक, रोमन आणि आर्मेनियन यांच्या इतिहासात निष्णात धनुर्धारी अश्या वीरांचे उल्लेख आहेत. भारतात एकापेक्षा एक सरस असे धनुर्धर होते. आपल्या इथे पौराणिक कथांमध्ये कर्ण, अभिमन्यु, एकलव्य, अर्जुन, भीष्म, द्रोण, प्रभू श्रीराम, शिव ही व्यक्तिमत्वे नेमबाजीसाठी ओळखली जात होती.


                                

विदेशी खेळसुद्धा भारतात खेळले जातात. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, गोल्फ, हे प्रामुख्याने पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आलेले आहेत व लोकप्रिय झाले आहेत. क्रिकेटच्या ‘वेडाचे’ वेगळे वर्णन करण्याची आवश्यकताच नाही.




                                     

लंगडी, खो-खो, कबड्डी, गोट्या, विटीदांडू, मल्लखांब, रस्सीखेच हे खेळ भारतीय परंपरेतून विकसित झालेले आहेत. हे खेळ शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरले आहेत. प्राचीन काळी खेळासाठी नैसर्गिक साधनसामग्री वापरली जात होती, उदा. दगड, लाकूड, माती. आज खेळांसाठी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे, जसे की फायबर बॅट, सिंथेटिक बॉल, कृत्रिम मैदान. पण तरीही पारंपरिक खेळातला आनंद हल्लीच्या पिढीतील मुलांना मिळत नाही, घेत येत नाही. याचे कारण व्यायामाचे महत्व वाटत नाही. दुर्दैवाने बहुसंख्य पालकांनासुद्धा याची गरज वाटत नाही. आई-वडीलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येकजण करियरमागे व स्पर्धेत टिकण्यासाठी धावतोय. मोबाईलच्या आत्यंतिक आहारी गेलेले लोक आहेत आणि त्याच्या ‘व्यसनातून’ त्यांना कसे सोडावयाचे हा एक यक्ष प्रश्न समाजधुरीणांच्यासमोर निर्माण झालेला आहे. साहजिकच आपल्या परंपरा पाळायला, त्या पाळण्याचा आग्रह धरून त्या अंमलात आणायला मोठ्यानाच जमत नसेल तर आजची पिढी म्हणजे लहान मुले ही सुद्धा अनभिज्ञच राहतील. त्यांना खेळांचे महत्व कसे कळणार? त्याचे लाभ कसे कळणार ?


                                            
लाभ - खेळांमुळे शरीर तंदुरुस्त व सुदृढ राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात. धावणे, पोहणे या प्रकारच्या खेळांमुळे हृदय व फुफुसे मजबूत होतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर खेळ मनावरचा ताण-तणाव कमी करतात, व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवतात आणि त्याची निर्णयक्षमता अधिक चांगली होते. सहकार्यभावना वाढीस लागते. तसेच खेळांमुळे आनंद व सकारात्मक विचारसरणी निर्माण होते. भारतीय पारंपरिक खेळांचा विचार केल्यास खो-खो, कबड्डी इ. खेळांसाठी फार साहित्याची आवश्यकता नसते. काही खेळांसाठी अत्यल्प साधने लागतात. ते खेळ खेळण्यासाठी विशेष अशा पूर्व अटी आवश्यक नसतात. सैलसर कपडे आणि मोकळे मैदान इतकेच आवश्यक असते. मागील अनेक वर्षांपासून क्रीडाक्षेत्रात अनेकविध व्यावसायिक संधीही निर्माण होत आहेत. एखाद्या क्रीडाप्रकारांत करीयर करायची महत्वाकांक्षा बाळगून अनेक युवक-युवती पुढे येतांना दिसतात. त्यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन करणारी तज्ज्ञ मंडळीही सुदैवाने उपलब्ध आहेत. शासकीय पातळीवर अनेकविध प्रयत्न व उपक्रम आखले जात आहेत. लहानपणापासूनच भावी खेळाडूतील गुण हेरून त्याला त्यात प्राविण्य मिळवता यावे यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केले जातात. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. त्यांना क्रीडाविषयक सोई-सुविधा देऊन, त्यांच्यातील ‘स्पार्क’ हेरून खेळाडूला घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

आपले पारंपरिक खेळ शारीरिक विकासाबरोबरच, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक दृष्टीने ही महातवाचे ठरतात, आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत अश्या विचारातून ही भावी पिढी शारीरिक तंदुरुस्त व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायची असेल, सामाजिक एकता टिकवायची असेल आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावायचे असेल तर, सहज साध्य होणारे, सुलभ असणारे, आर्थिक दृष्टीने परवडणारे, मनाला आनंद देणारे, व्यक्तिमत्व विकसित करणारे, अनेक सामाजिक लाभ मिळणारे असे हे सर्व पारंपरिक खेळ माहिती करून घेऊन खेळले पाहिजेत. नालंदा आणि तक्षशीला या प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये लष्करी प्रशिक्षण, कुस्ती, धनुर्विद्या, पोहणे, श्वासोच्छवासाचे व्यायाम, योग हे अभ्यासक्रमाचे अविभाज्य भाग होते. हा विचार प्रत्येक घरात, शाळांमध्ये, समाजामध्ये, रुजवला पाहिजे. हे खेळ जपले पाहिजेत. कारण हा आपल्या संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे, जो मागच्या पिढीकडून आपल्याला मिळाला आहे.

ले. डॉ नयना कासखेडीकर .

------------------

No comments:

Post a Comment