Friday, 4 November 2022

तीर्थ विठ्ठल ....

 



तीर्थ विठ्ठल ....

संत नामदेव (रेळेकर)

                                                 
(जन्म-१२७०- नरसी,हिंगोली,वैकुंठगमन-१३५० )

(आई-गोणाई,वडील-दामाशेटी)

तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥

आज कार्तिक शुद्ध एकादशी! कार्तिक एकादशीला वारकरी सांप्रदायात विशेष महत्व आहे. आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी वारी करणारे सुद्धा असंख्य वारकरी भक्त महाराष्ट्रात आहेत.चातुर्मासात आषाढी एकादशी पासून कार्तिक शुक्ल दशमी पर्यन्त शेषशय्येवर झोपी गेलेले भगवान विष्णु या दिवशी जागे होतात, म्हणून या एकादशीला प्रबोधिनी किंवा देवऊठी एकादशी म्हणतात.या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पुजा करतात. देव जागे होऊन पुन्हा कल्याणकारी कामाला सुरुवात करतात अशी श्रद्धा आहे.

आजचे अजून महत्व म्हणजे आजच कार्तिक एकादशीला संत नामदेवांची जयंती असते. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार करणारे आद्य प्रचारक संत नामदेव महाराज मराठीतले पहिले चरित्रकार व आत्मचरीत्रकार होते.भागवत धर्माचा प्रचार भारतभर करत त्यांनी भावनिक एकात्मता आणि सामाजिक समरसता साधली होती. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हेच त्यांचे ध्येय होते. जनतेचा आध्यात्मिक विकास त्यांना साधायचा होता. संत नामदेवांची आणि संत ज्ञानेश्वरांची पहिली भेट आळंदी येथे झाली. गुरुपदेशाचे महत्व त्यांना कळले. या भेटीनंतर नामदेवांच्या आयुष्यात बदल झाला. विसोबा खेचर त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. ज्ञांनेश्वर आणि इतर संतांबरोबर त्यांनी तीर्थयात्रा केल्या. ते भक्तीप्रचारासाठी महाराष्ट्रातून निघून भारताच्या चारही दिशांना फिरले. कर्नाटक, तामिळनाडू, रामेश्वर, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब .हरयाणा,हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेले. हि त्यांची पदयात्रा होती. त्यांच्या तीर्थयात्रेची साक्ष या सर्व प्रांतात, मंदिरांच्या रूपाने आजही आहे. सामाजिक समरसता, भक्ति, मानवता, भूतदया ,प्रेम .आदर या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून आपल्याला शिकवण देतात.

संत नामदेव हे एक अभ्यासू आणि बहुश्रुत होते हे अनेक कीर्तनातून आपण सर्व जण ऐकतोच, संत नामदेव यांनी आपल्या अभंगातून आणि भक्ति गीतातून समता व ईश्वर भक्तीची शिकवण दिली. संत नामदेव यांनी आत्मस्वरूप स्थिति, उपदेशपर, आत्मसुख, भक्तवत्सलता, नाम महिमा, गौळण, करुणा, कृष्ण माहात्म्य, नाम संकीर्तन माहात्म्य, पंढरी माहात्म्य, पौराणिक चरित्रे, काही कथा लिहिल्या आहेत. अतिशय मार्गदर्शक अभंग रचना आहेत.

संत नामदेव म्हणजे आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावणारा पांडुरंगाचा सगळ्यात जवळचा सखा होता असे म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीन्चा संतांचा उपदेश सामान्य लोकांमध्ये रुजविणार्‍या नामदेवांना या भक्तिमार्गाचा आधारस्तंभ मानतात. म्हणूनच म्हणतात,

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ॥ नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारीला भागवत ॥ भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥

सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी भागवद्भ भाव मानावा ,हाच खरा भागवत धर्म आहे . जे जे भेटे भूत ,ते ते मानिजे भगवंत हे भक्तीयोगाचे सूत्र त्यांनी निश्चित केले. याचे अनेक प्रसंग त्यांच्या चरित्रात आढळतात. संत नामदेव एकदा जेवत असताना त्यांच्या ताटातली पोळी कुत्र्याने पळविली, ते पाहून नामदेव त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळतात आणि म्हणतात, “हे माझ्या देवा अशी कोरडी पोळी खाऊ नका तिला जरा तूप तरी लावून खा” असा हा प्राणिमात्रांच्या ठिकाणचा त्यांचा भक्तीभाव. असा हा विठ्ठलमय भक्त संत नामदेव, त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी विठ्ठलच दिसायचा.

                                               
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।

जय देव जय देव ।। धृ० ।।
पंढरपूरला अठ्ठावीस युगांपासून विठ्ठल विटेवरी उभा आहे, त्याच्या डाव्या हाताला रखुमाई उभी असून, त्यांचे हे रूप अत्यंत शोभा देणारं आहे. पुंडलिकासाठी विठ्ठल पंढरीला येऊन राहिला आहे. त्याच्या चरणी वाहणारी चंद्र्भागा सर्व भक्तांचा उद्धार करत आहे. हे वर्णन केले आहे संत नामदेव यांनी. तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की ही रचना म्हणजे आपण म्हणतो ती विठ्ठलाची आरती आहे.

यात संत नामदेव यांनी पंढरीचा महिमा वर्णन करताना आषाढी आणि कार्तिक एकादशीला दरवर्षी येणारे भक्तजन,त्यांचा चंद्र्भागेतिरी जमलेला मेळावा, त्यांचा भक्तीभाव, विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ आणि केवळ कळस दर्शनाने सुद्धा आनंदलेले वैष्णवजन आणि हा सोहळा व त्याचे महत्व नामदेव महाराज या आरतीत सांगतात. शिवाय घालीन लोटांगण ही प्रार्थना आपण गणेश उत्सवात गणपती आरती नंतर नेहमीच तोंड पाठ म्हणतो. लयीत म्हणतो. ही संपूर्ण प्रार्थना म्हणजे चार कडवी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली आहे. त्यातले पहिलेच कडवे संत नामदेव महाराजांचे आहे.

घालीन लोटांगण, वंदीन चरण,

डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन,
भावे ओवाळीन म्हणे नामा ।। १ ।।

यात कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन, एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. ही प्रार्थना कृष्णाला उदेशून आहे. गणपतीला नव्हे.

संत नामदेव यांचे अभंग मग ते कुठलेही असोत एकदा म्हटले की सतत गुणगुणत राहतो आपण, त्यांनी अनेक गवळणी लिहिल्या आहेत. पैकी -

रात्री काळी घागर काळी । यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवार काळी । गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥२॥
नामदेव गाथेतली ही गौळण आपण नेहमी ऐकतो.यातील काळी रात्र.काळी यमुना, काळी कृष्णमूर्ती याचे वर्णन करताना भक्ताच्या मनस्थितीतचे वर्णन नामदेव महाराज करतात. परमेश्वर दर्शनाची व भक्तीची ओढ आणि तळमळ या प्रतिमांमधून व्यक्त झालेली दिसते. गौळणीतल्या गोपींचे कृष्णावर जसे प्रेम आहे,तसेच प्रेम नामदेव महाराजांना विठ्ठलाचे आहे.विरहाचे दु:ख आहे. भेटीची प्रतीक्षा आहे. मिलनाची आस आहे. संत नामदेवांना विठ्ठल म्हणजे त्यांची जननी होती. म्हणून ते एका रचनेत म्हणतात,

पक्षिणी प्रभाते चारियासी जाये । पिलें वाट पाही उपवासी ॥१॥
तैसें माझें मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतितसे ॥२॥

पहाटेच्या वेळी चारा आणायला गेलेल्या पक्षिणीची तिचे छोटे उपाशी असलेले पिल्लू वाट पाहत रहाते. त्याला जशी आस आहे तशीच आस मला तुझ्या भेटीची आहे.

आत्मसुख कशात आहे हे सांगताना त्यांनी जवळ जवळ २०० अभंगातून उपदेश केला आहे. संत नामदेवांच्या अभंग गाथेत २५०० अभंग आहेत. त्यांनी हिंदीत व ब्रज भाषेत पण रचना केल्या आहेत, तर गुरुग्रंथ साहिब मध्ये गुरुमुखीत सुद्धा लिहिले आहे. त्याचा समावेश गुरुग्रंथ साहेब मध्ये आहे. संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले आहे, आत्मचरित्र लिहिले आहे.

त्यांचा एक आत्मसुख अभंग-

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥
नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥
अनाथाचा नाथ होसी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थू आतां ॥३॥
नामा म्हणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥

वारकरी संप्रदायचे तत्वज्ञान म्हणजे भक्तिमार्ग होता. सदाचार,शुद्ध अंतकरण,नामस्मरन भजन कीर्तन, या माध्यमातून संतांनी जनतेला समजेल अशा लोक भाषेतून सामान्य लोकांना उपदेश केलेला दिसतो. यात त्यांचे स्वतचे अनुभव ,तत्वज्ञान आणि जीवन यांची सांगड संतांनी घातली आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी ही नाम देवांच्या आयुष्यातील महत्वाचा ,प्रत्यक्ष पाहिलेलं प्रसंग आहे. त्यातून त्यांना संत ज्ञांनेश्वर यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे. संत नामदेवांनी इतर संतांची चरित्रे अभंगाच्या माध्यमातून लिहिली आहेत. त्यांनी कीर्तन प्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली . कीर्तनातून त्यांनी संतांची चरित्रे सांगण्याचा पायंडा पडला. त्या मागे भक्ती ही प्रेरणा आहेच.

विठ्ठलाच्या दर्शनाला येणार्‍या संतांच्या चरणाचा स्पर्श आपल्याला घडावा ही त्यांची भक्ती . म्हणून पंढरीच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्याच्या पाहिल्याच पायरीजवळ त्यांनी आषाढ वद्य त्रयोदशीला समाधी घेतली.

                             

नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे ।
संत पाय हिरे देती वल ।।

                       अशा संत शिरोमणी असलेल्या ,संत नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन !

लेखन – डॉ. नयना कासखेडीकर

------------------------------------

Thursday, 29 September 2022

आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना

 

  आदिशक्तीचे पूजन –घटस्थापना

 
ज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत.नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. म्हणूनच भारतीयांनी स्त्रीला समाजाच्या मर्यादा,लज्जा, संस्कृती यांचं प्रतीक मानलं आहे. शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. देवीचे नवरात्र हे त्या पैकीच एक. मातृरूपात असणार्‍या शक्तिचे पूजन करण्याचे आणि आदिशक्तीची आराधना करण्याचे, जागर करण्याचे पर्व आहे.

या देवी सर्वभूतेषू मातृरूपेण संस्थितः

नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमस्तस्यै: नमो नमः।।

सर्व विश्वात मातृरूपात वास करणारी हे भगवती देवी तुला नमस्कार असो.

सर्व प्राणिमात्राच्या मध्ये शांतिरूपात राहणारी, शक्ति रूपात असणारी, बुद्धिरूपात असणारी, चैतन्य रूपात वास करणारी, निद्रारूपात, क्षुधा रूपात, छायारूपात, तृष्णारूपात, क्षमारूपात असणारी आणि लज्जा, श्रद्धा, सौन्दर्य आणि ऊर्जा रूपात, लक्ष्मी रूपात, वृत्ती, स्मृति, दया, समाधान, अशा विविध रूपात  वास असणार्‍या हे देवी तुला नमस्कार असो  असं वर्णन असणारी शक्ति ही स्त्री देवता आहे. हे आमच्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे आदराचे स्थान दर्शवणारी, आमच्या हिंदू धर्म ग्रंथातली पुराण काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

 
नवरात्रात लोक आपली आध्यात्मिक आणि मानसिक शक्ति वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात.  ते या काळात उपवास, संयम, नियम पाळणे, भजन व पूजन करणे, साधना करणे, व्रतस्थ राहणे या गोष्टींवर भर देतात.

पौराणिक कथेनुसार असुरांकडून सृष्टीचा नाश होताना देवदेवतांना बघवेना. मग ही सृष्टी वाचवण्यासाठी त्यांनी जगदंबेची आराधना केली आणि या सृष्टीला वाचवावं म्हणून विनंती केली, तेंव्हा  भगवती देवी व असुरांमद्धे युद्ध झालं. देवीने असूरांचा वध करून देव देवतांना निर्भय केलं, आश्वस्त केलं. तेंव्हापासून या व्रताची सुरुवात झाली असे मानतात. जगात जेंव्हा जेंव्हा असुर किंवा त्यांच्या सारखे क्रूर लोक स्वत:च्या बळाने सज्जनांना छळतात, तेंव्हा तेंव्हा जगज्जननी व विश्वाची पालनकर्ती देवी भक्तांच्या मदतीला धावून येते. म्हणूनच भक्त तिची आराधना, भक्ती करतात, उपासना करतात.

त्यात घटस्थापना, माळा चढविणे, अखंड नंदादीप लावणे आणि कुमारिका/ कन्या पूजन करणे. हे नवरात्राचे मुख्य भाग असतात. स्कंद पुराणात कुमारिकेचे वयाप्रमाणे प्रकार सांगितले आहेत.हे पूजन म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान च आहे एक प्रकारे.

      घटस्थापना करतात म्हणजे, कलशाखाली असलेल्या काळ्या मातीमध्ये सप्तधान्य पेरून नऊ दिवस त्याची नीट काळजी घेतात. या नऊ दिवसात ,नवव्या दिवशी त्या धान्याचे सुंदर तृणात रूपांतर झालेले दिसते.हे सृजन च असते, निर्मिती असते. आणि निसर्गाची खरी पुजा असते. हे देवी तू धन धान्याने आम्हा सर्व तुझ्या लेकरांना असेच समृद्ध कर अशी  कृतज्ञता या देवी जवळ भक्त व्यक्त करत असतात असे वाटते.

घटाला चढवण्यात येणारी माळ सुद्धा या ऋतुत येणार्‍या विविध फुलांच्या च असतात. शेवनती, सोनचाफा,अनंत,मोगरा,चमेली, गोकर्ण,कृष्ण कमळ, अबोली,तेरडा, तीलाची फुले, बेल,कर्दळ, झेंडू, कण्हेर,जास्वंद, गुलाब, अशा विविध रंगी व सुवासिक फुलांच्या माळा वाहण्याचा प्रघात आहे.

     जगातील दुष्ट लोकांचे प्राबल्य कमी करण्यासाठी, लोकांची त्यातून सुटका करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो अशी समजूत आहे. ईश्वर निर्गुण असल्याने त्याला जेंव्हा कार्य करायचे असते तेंव्हा तो अवतार घेऊन आपल्या शक्तिदेवीला प्रेरित करतो आणि ही शक्ति वेगवेगळ्या रूपात प्रगट होते म्हणून त्या अवतारांची पुजा करतात. ज्या उर्जेतून तेजस्वी तार्‍यांचा, सूक्ष्म मानवी मनाचा, भावनांचा जन्म होतो ती ऊर्जा/शक्ति म्हणजे देवी असे म्हटले जाते. ब्रम्हा, विष्णु, महेश या प्रमाणे पार्वती, लक्ष्मी, सरस्वती ही शक्तीची तीन रुपे मानली जातात. या शक्तीचे मुख्य नऊ आणि इतर अनेक असे अवतार मानले जातात. 

    
    विविध महिन्यात महत्व असलेल्या चैत्र गौर, अन्नपूर्णा-चैत्र, ज्येष्ठ गौर व हरितालिका-भाद्रपद, मंगळागौर-श्रावण, अश्विनातील ललिता ही शक्तीची सौम्य रुपे मानली जातात. तर दुर्गा, काली, चंडी ही  देवीची रौद्र रूपं. पृथ्वीवरील राक्षसांच्या निःपातासाठी या शक्तीने / देवीने रौद्र रूप घेतले. नऊ दिवस युद्ध करून त्यांचा नाश केला.

   आम्ही एकेकाळी स्त्रीला अबला मानलं होतं. पण शक्तीरूपातली देवी हीच सर्वांची आदिशक्ती असून ती अत्यंत सामर्थ्यवान आहे असेही मानले गेले आहे. याच कारणामुळे देवीची अनेक व्रते करण्याची प्रथा सुरू झाली. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस चालणारा हिंदूंचा दुर्गा देवीचा उत्सव, अर्थात शारदीय नवरात्र’. ऋतुंवरून प्रचारात आलेला हा उत्सव धार्मिक उत्सव पण आहे.

  दुर्गा किंवा काली ही सर्वांची कुलदेवता असल्याने भारतात हा उत्सव एक कुलाचार सुद्धा असतो. यावर इथला प्रादेशिक ठसा उमटलेला आहे. 

  
   उत्तर भारतात नवरात्र उत्सव म्हणजे प्रभू रामचंद्रांनी दुष्ट शक्तिवर मिळविलेला विजय म्हणून साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीपासून वाचवणारी शक्ति म्हणून देवीचे पूजन होते. रजपूत लोकांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. ते लोक शिवोपासक होते. रजपूत लोक देवीच्या ऐवजी नवरात्रात तोफेची पुजा करतात. त्यावर त्रिशूळाचे चिन्ह काढतात.

   महाराष्ट्रातसुद्धा मराठ्यांच्या राज्यस्थापनेनंतर आपले उपास्य दैवत भवानीदेवीच्या पूजेचा प्रसार झाला. चारही दिशांना ही देवालये स्थापित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा आई भवानी जगदंबेची पूजा बांधली होती हा इतिहास सर्व परिचित आहेच. पेशवे काळातसुद्धा दसर्‍याआधी वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची प्रथा होती. 


     पश्चिम भारतात गुजरातमध्ये नवरात्रात नऊ दिवस अखंड दीप लावून शक्ति जागर म्हणून गरबा मांडला जातो. यात गरबा म्हणजे गर्भदीप लावला जातो. सछिद्र मातीच्या घटात दिवा तेवत ठेवतात. हा घट म्हणजे मनुष्याच्या शरीराचे प्रतीक आणि आतला तेवत असलेला दिवा म्हणजे शुद्ध आत्म्याचे प्रतीक मानले जाते. ही आत्मरूपी ज्योत अखंड तेवत राहो, उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना आदिशक्ती दुर्गादेवीकडे केली जाते.

     पुर्वेकडे पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडे नवरात्रीचे शेवटचे पाच दिवस दुर्गापुजा केली जाते. यातील सिंहावर आरुढ झालेली देवी हातात सर्व शस्त्र घेतलेली आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे.

  दक्षिण भारतात बाहुल्यांचे प्रदर्शन कोलू असते. ते बघायला सर्वजण एकमेकांच्या घरी जातात. कर्नाटकात नवरात्रात रात्रभर पुराण कथांवर आधारित यक्षगानचे प्रयोग नऊ दिवस केले जातात. दुष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून मोठ्या थाटामाटात म्हैसूर दसरा साजरा केला जातो. काही भागात नवमीला आयुधांची पूजा करतात.

   केरळमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर लहान मुलांचा विद्यारंभ केला जातो. भाषा आणि वेष नि आहार वेगवेगळा, पद्धती वेगवेगळ्या, पण या संस्कृतीतून दिला जाणारा संदेश एकच. विविधतेतून एकता हेच या संस्कृतीचे वैशिष्ट्य, हीच परंपरा. अनेक काव्यातून वाड्मयातून शक्ति देवीची स्तुती केलेली दिसते.               

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।


तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

     नऊ दिवसात देवीची म्हणजे आदिशक्तीची ही नऊ रुपे पूजली जातात. ऊर्जा हे देवीचे मूळ तत्व, संरक्षणाची देवता दुर्गादेवी, ऐश्वर्याची देवता लक्ष्मीदेवी आणि ज्ञानदेवता सरस्वतीदेवी या शक्ति रूपात आपण मानतो. हे मानणे म्हणजेच आपल्या मनातील द्वंद्वाच्या, त्रासदायक नकारात्मक भावनांना दूर सारून सकारात्मक दृष्टीचा स्वीकार करणे आहे. कारण जेंव्हा एखादा मनुष्य लहान, मोठ्या संकटाचा सामना करत असतो, तेंव्हा तो आधार शोधतो. मन:शान्ती कशात मिळेल हे शोधतो आणि ती त्याला अध्यात्मामधून, साधनेमधून, कुठल्याही रुपातल्या आराधनेमधून मिळते. ही रुपे अर्थातच शक्तीची असतात. त्याची मनुष्याने प्रतीके शोधली. कारण अमुर्ताला मूर्त स्वरूप दिले की आश्वासक वाटत असते. म्हणून वेगवेगळ्या प्रतिकातून सूचक अर्थ निघत असतात. प्रतिकांचा वापर आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून दिसतो. प्रतीक म्हणजे एखादं चिन्ह किंवा खूण.

  देवीची नवरात्रे चार प्रकारची आहेत. शारदीय, वासंतिक, शाकंभरी आणि गुप्त नवरात्र. तर इतर नवरात्र म्हणजे चंपाषष्टीला खंडोबाचे नवरात्र असते आणि मार्गशीर्षात नृसिंहाचे नवरात्र असते.

मन:शान्ती मिळवण्यासाठी, विशेषता महिलांनो लक्षात घ्या की, मनात भाव व शुद्धता हवी, देवावर/ शक्तिवर विश्वास व श्रद्धा हवी, मन शरीर व परिसर स्वच्छता हवी, सात्विकता हवी. त्यासाठी नुसतं रोज वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या (नवरात्रीचे नऊ रंग, दांडिया, गरब्यासाठी ऊंची ड्रेस आणि अॅक्सेसरीज आणि त्याला जोडून होणार्‍या पार्ट्या) आणि दागिने परिधान करणं, आपल्या दिसण्या-असण्याचा भपका सादर करणं म्हणजे भक्ती नाही की पूजा होत नाही. तुम्ही स्वत:च एक शक्ति आहात, मातृदेवता आहात, मार्गदर्शक आहात ! जर तुम्हीच हे समजून नाही घेतलंत तर तुमची मुले व मुली /पुढची पिढी चुकीच्याच पायंड्यांवरून जात राहतील. आपल्या देशाची सांस्कृतिक प्रतिके आणि आपल्या हिंदू धर्मातील एक शक्तिपूजा, लोक परंपरा, त्यांचा निसर्गाशी असलेला मूळ कार्यकारण भाव, मूळ तत्व हे शोधा, डोळसपणे समजून घ्या आणि ते तुमच्या मुलांना सांगा, म्हणजे ती देखल्या देवा दंडवत असं करणार नाहीत.   

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हणूनच स्पष्ट केलय,

मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव  
देव अशा
नं, भेटायचा नाही हो।
    देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात 
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥

थोडक्यात, मनुष्य हा बुद्धीमान प्राणी आहे. त्याला बुद्धी आहे म्हणूनच तो चराचराचा, निसर्गाचा, प्राणिमात्रांचा विचार करतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, आदर व्यक्त करतो. तसाच तो या अमूर्त शक्तीची पूजा करतो. हे आपल्या देशाचे सांस्कृतिक महत्व आहे. ते मूळ भावात आपण जपले पाहिजे.            

       आपल्या संस्कृतीचा, परंपरांचा बाजार होत नाही ना याकडे आपणच जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. सध्या स्वत:च्या व्यवसायसाठी, स्वार्थासाठी, अधिक नफा कमवण्यासाठी नवे नवे फंडे तयार करून त्याचे मार्केटिंग करण्यात अनेकजण आघाडीवर आहेत. यात माध्यमेही पुढे आहेत.त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे  महत्व त्यांना आहे,  यात कुठेही स्त्रीयांचे / लोकांचे कल्याण किंवा देवाची भक्ती हा भाव नाही आणि नसतो. स्त्रियांच्या भावनांना आवाहन केले की स्त्रिया बळी पडतात. याचाच उपयोग करून घेतला जातो. तेंव्हा आयाबायांनो, मैत्रीणिंनो सणावारी आपल्या संस्कृतीशी बादरायण संबंध जोडून भुलवणार्‍याना लगेच ओळखा. बळी पडू नका. आणि शुद्ध भावाने यंदाची घटस्थापना करा, शक्ति देवतेची उपासना करा. तिच्यापासून संकटाचा सामना करण्याची आणि दुष्ट शक्तींचा बीमोड करण्याची प्रेरणा घ्या एव्हढंच सांगते.         

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके |
 शरण्ये
त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते ||

 

लेखिका-  डॉ. नयना कासखेडीकर,


-------------------------------

Monday, 26 September 2022

संत मुक्ताबाई

 

संत मुक्ताबाई

(जन्म-आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१,आपेगाव,पैठण

वैशाख वद्य द्वादशी शके १२१९ मृत्यू तापीवरील मेहूण गाव).

                                        



मुंगी उडाली आकाशी ,तिने गिळिले सूर्याशी

थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला

विंचू पाताळासी जाय , शेष माथा वंदी पाय

माशी व्याली घार झाली , देखोनी मुक्ताई हासली...-संत मुक्ताबाई

      आश्विन शुद्ध प्रतिपदा ! आज घटस्थापना, आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत नाही.आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा स्थान होती. तिचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती.निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक त्यांना गृहस्थाश्रमात आणते.विवाह होऊन ही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत टाकतो. परंतु याची शिक्षा समाज त्यांना देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. चार चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणार्‍या छळाला  कंटाळून विठ्ठल पंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरच ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन करतात. या वेळी मुक्ताबाई फक्त चार वर्षाची असते.

   भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सन्याशाची मुलं म्हणून समाज त्यांनाही वाळीत टाकतो.आईवडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही. जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वताला सतत सिद्ध करावे लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तरच नवल. असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले आहे.

      समाजातून सतत उपेक्षा, अपमान सहन न होऊन एक दिवस स्वतावरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन, पर्णकुटिचे दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. सन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन झाला असे ज्ञानोबाला पाहून एका ने म्हटले, त्यामुळे ज्ञानोबा खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनी ही विनवण्या केल्या. पण ज्ञाना दार उघडेना. मुक्ताबाईने विनवणी करूनही ते दार उघडेनात. छोट्याशा बहिणीने मुक्ताइने लडिवाळ पणे ज्ञानाला समजावले.ज्ञाना दादा चिडलाय, त्याची मनस्थिती बिघडली हे मुक्ता बाईंना लक्षात आले. ज्ञानोबा पेक्षा लहान असलेली मुक्ता आता त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. लोक कितीही वाईट वागले तरी तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा आता. या अवस्थेतून बाहेर या. असं ममतेने सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत.योगी कसा असावा ,आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे ते मुक्ता बाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे. ज्ञानोबांना जागृत केलं आहे.   

चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा

 

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।
विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।


शब्द शस्त्रे झाले क्लेश। संती मानावा उपदेश।

विश्वपट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

 

ब्रह्म जैसें तैशा परी आम्हा वडील भूतें सारी

अहो क्रोधें यावें कोठे अवघे आपण निघोटे

जीभ दातांनी चाविली कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा

 

    ज्ञानदेव दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत चालले आहेत हे मुकताबाईना जाणवते . या वेळी ज्ञानोबाचे मन शांत करण्याचा प्रयत्न मुक्ता बाई करते. आणि स्वच्छ सात्विक पावन मनाच्या या योगी पुरुषाला तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पेक्षा लहान असलेली लाडकी बहीण मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा मान्य करतात ,शांत होतात आणि पर्णकुटी चे दार /ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या, तत्व चिंतक असलेल्या ज्ञानदेवांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य या चिमुकल्या मुक्ताबाईत होतं.याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला, ते कार्यप्रवृत्त झाले आणि नेवाशाला भावार्थ दीपिका च्या निर्मितीची सुरुवात झाली.

     गुरु संत निवृत्तींनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ता बाई घडत होत्या. नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधुभगिनी झाले होते, प्रेम,आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे, ते शंका निरसन करत. निवृत्तीनाथ तर आईवडिलांचेही प्रेम लहान भावंडांना देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ता बाईंचे गुरु बंधुच होते. पण तिची जडण घडण चालू असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणार्‍या आघता मुळे अनेक प्रसंगांना सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासमोर घडल्या होत्या. शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी नुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंची ही चारही मुले होती.

     मुक्ताई ने योगी असलेल्या ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अभंगातून घेतला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर योगी, संत.साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते. असे वर्णन त्या अभंगातून करतात. 

     अशा अनेक घटना मुक्ता बाईंच्या आयुष्यात घडलेल्या दिसतात की, ज्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता ते आपल्याला लक्षात येतं.यामुळेच मुक्ता बाई तेराव्या शतकातली संत परंपरेतली एक स्त्री गुरु होऊन गेली हे कळतं. गुरु शिष्य परंपरेत तर वयाने लहान असलेली पण चांगदेवांची गुरु मुक्ताबाई होती.चांगदेवांना तिने पासष्टीचा अर्थ सांगितला.हा मुक्ताबाईंचा पहिला शिष्य.   

     संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु, गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे, एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखविली. मुकताईने लगेच तयारी केली. कुंभारवाडयात ती मातीचे परळ आणण्यासाठी गेली असता, वाटेत विसोबा चाटी भेटले. तिच्या हातातले परळ हिसकावून घेतले आणि फोडून टाकले. कुंभारवाडयात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही परळ देऊ नये. निराश होऊन मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तींनाथांची इच्छा पूर्ण करू शक्त नाही याचा तिला खेद वाटला. दु:ख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आला. त्या योग्याने आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ता बाईंना सांगितले, “भाज आता पाठीवर मांडे” .

   मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून विसोबा आश्चर्य चकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत  हे समजले . स्वत:ची चूक उमगली. आपल्याला प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. ते पाहून,मुक्ताबाईने “विसोबा तू खेचरा प्रमाणे उष्टे का खातोस?” असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले. अशी आख्यायिका आहे.

अशाच प्रकारे संत नामदेव यांना ही गुरु चे महत्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले.

       तीर्थ यात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईनी आपला भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली.महिन्याभरातच  सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला चांगदेवांची समाधी पाहिली.आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या,चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे निवृत्तींनाथांना व सर्व संतांना मुक्ताई ने सांगितले. त्यांचीहि अवतार समाप्ती झाली.  आईवडीलांच्या छत्रा नंतर या भावांनीच तिला सांभाळले होते. जिवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी नव्हतीच.या सगळ्या घाटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाली. उदासीन झाली. मुक्ताबाई, निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ. घृष्णेश्वर करत,वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर, मेहुण या गावी आली. नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काही कळायच्या आत अंतर्धान पावली. निवृत्तींनाथ मुक्ताबाईना खूप जपत होते,तरी हे असे कसे झाले, मुक्ताई कुठेच दिसत नाही ? क्षणात त्यांनी ओळखले की आता अवतार समाप्ती आहे ही. संत नामदेवांनी पण हे अनुभवले आणि त्याचे वर्णन केले आहे ते असे-              

कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई
l

संत जनाबाईंनी आदराने म्हटले आहे , आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||'' !

अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई !

 

ले- डॉ. नयना कासखेडीकर.

---------------------------------------